US Missing Scientists Investigation Mystery : जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेतून गेल्या तीन वर्षांत जवळपास डझनभर शास्त्रज्ञ बेपत्ता झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यातील काही जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व घटना अतिशय गूढ परिस्थितीत घडल्याने तेथील गुप्तचर यंत्रणांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर बेपत्ता झालेले किंवा मृत्युमुखी पडलेले शास्त्रज्ञ कोण होते? त्यांच्या संशोधनाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? या प्रश्नांनी अमेरिकन सुरक्षा वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे, त्याविषयीचा हा आढावा…
२०२३ पासून अमेरिकेतील सुमारे डझनभर शास्त्रज्ञांचा संशयास्पद मृत्यू किंवा ते बेपत्ता झाल्याचे समोर आले. या धक्कादायक घटनांमुळे अमेरिकन सरकार आणि तेथील गुप्तचर यंत्रणांमध्ये मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. आम्ही या प्रकरणांची सखोल चौकशी सुरू केली असून लवकरच त्याबाबतची माहिती समोर आणली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यादरम्यान मृत किंवा बेपत्ता झालेले अनेक शास्त्रज्ञ अणुऊर्जा किंवा ‘अनआयडेंटिफाइड एरियल फेनॉमेना’ म्हणजेच पूर्वी ‘UFOs’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विषयांवर संशोधन करत होते, त्यातील चार जण न्यू मॅक्सिको येथील असल्याचे सांगितले जात आहे. या शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा आणि त्यांच्या मृत्यूचा काही संबंध आहे का? या प्रश्नांनी अमेरिकन सुरक्षा वर्तुळात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे.
विल्यम नील मॅककॅसलँड बेपत्ता
पेंटागॉनमध्ये अंतराळ संशोधन आणि संपादन विभागात कार्यरत असलेले मेजर जनरल मॅककॅसलँड हे फेब्रुवारी महिन्यात बेपत्ता झाले. त्यांच्या बेपत्ता होण्यातील काही बाबी अत्यंत संशयास्पद आहेत. मॅककॅसलँड यांनी ओहायोमधील ‘राईट-पॅटरसन’ एअर फोर्स बेसच्या प्रयोगशाळेचे नेतृत्व केले होते. हे तेच ठिकाण आहे, ज्याचा संबंध १९४७ च्या प्रसिद्ध ‘रोसवेल यूएफओ क्रॅश’शी लावला जातो. २०१६ च्या ‘विकिलिक्स’ हॅकमध्येही त्यांचे नाव समोर आले होते, ज्यामध्ये ते अनआइडेंटिफाईड एरिअल फेनोमिनावर काम करत असल्याचा दावा करण्यात आला होता. बेपत्ता होण्यापूर्वी मॅककॅसलँड यांनी आपला फोन, चष्मा आणि सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे घरीच सोडली होती. मात्र, त्यांचे पाकीट, हायकिंग बूट आणि एक रिव्हॉल्व्हर त्यांच्यासोबत होते.
आणखी वाचा : अयातुल्ला खामेनी यांचा दफनविधी ५० दिवसांपासून का रखडला? इराणला नेमकी कशाची भीती?
मोनिका रेझा ट्रेकिंग करताना बेपत्ता
नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’मध्ये मटेरिअल प्रोसेसिंग संचालक असलेल्या मोनिका रेझा गेल्या वर्षी जूनमध्ये बेपत्ता झाल्या. २२ जून २०२५ रोजी सकाळी ९:१० च्या सुमारास त्या ‘एंजेल्स क्रेस्ट हायवे’वर ट्रेकिंग करत होत्या. त्यांच्यासोबत असलेल्या मित्राने सांगितले की, तो त्यांच्यापासून अवघ्या ३० फूट पुढे चालत होता, पण क्षणार्धात त्याने मागे वळून पाहिले असता मोनिका अचानक बेपत्ता झाल्या. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अमेरिकन प्रशासनाने मोनिका यांची शोधाशोध सुरू केली, पण त्यांचा अद्याप कुठेही थागपत्ता लागला नाही. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेट सायंटिस्ट मोनिका रेझा आणि मेजर जनरल मॅककॅसलँड यांच्यात घनिष्ठ व्यावसायिक संबंध होते. विशेष म्हणजे, अवघ्या आठ महिन्यांच्या अंतराने या दोन दिग्गज व्यक्तींचे गायब होणे हा केवळ योगायोग नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
स्टीव्हन गार्सिया ऑगस्टमध्ये बेपत्ता
‘टाईम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, अल्बुकर्क येथील ‘कॅन्सस सिटी नॅशनल सिक्युरिटी कॅम्पस’मध्ये कार्यरत असलेले सरकारी कंत्राटदार स्टीव्हन गार्सिया ऑगस्ट महिन्यात बेपत्ता झाले. ४७ वर्षीय गार्सिया हे अण्वस्त्रांच्या ‘नॉन-न्यूक्लियर’ (बिगर-अणु) भागांचे व्यवस्थापन करणाऱ्या विभागात कार्यरत होते. त्यांच्याकडे उच्चस्तरीय ‘सिक्युरिटी क्लिअरन्स’ होता. त्यांचीही पोलिसांकडून शोधाशोध सुरू आहे.
७८ वर्षीय शास्त्रज्ञाचे घरातून अपहरण
‘लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरी’चे माजी कर्मचारी अँथनी चावेझ मे २०२५ पासून बेपत्ता आहेत. ७८ वर्षीय चावेझ यांची कार घराबाहेर लॉक केलेल्या स्थितीत आढळली. त्यांचे पाकीट, चाव्या आणि इतर सर्व वैयक्तिक वस्तू घरातच होत्या. एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने अशा प्रकारे सर्व वस्तू सोडून जाण्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांचे अपहरण झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून अँथनी यांची शोधाशोध सुरू आहे.
मेलिसा कॅसियास अचानक बेपत्ता
लॉस अलामोस प्रयोगशाळेतच प्रशासकीय सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या ५३ वर्षीय मेलिसा कॅसियास जून २०२५ मध्ये बेपत्ता झाल्या. धक्कादायक बाब म्हणजे, मेलिसा यांच्या घरी त्यांचे दोन्ही फोन (वैयक्तिक आणि कामाचे) सापडले, परंतु त्यातील सर्व माहिती डिलिट करण्यात आली होती. मेलिसा स्वतःहून बेपत्ता झाल्याची शक्यता त्यांच्या कुटुंबाने फेटाळली आहे, कारण त्यांच्यावर कुटुंबाची मोठी जबाबदारी होती.
परग्रहावर जीवसृष्टी शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचा मृत्यू
नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ फ्रँक मायवाल्ड यांचा जुलै २०२४ मध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचे कोणतेही सार्वजनिक कारण देण्यात आलेले नाही, तसेच त्यांचे शवविच्छेदनदेखील करण्यात आले नसल्याचे समजते. मायवाल्ड हे अंतराळात पाणी आणि सेंद्रिय रेणूंचा शोध घेणारी यंत्रे विकसित करण्यात तज्ज्ञ होते. पृथ्वीबाहेर जीवसृष्टी अस्तित्वात असू शकते का, याचा अभ्यास ते करत होते.
डेव्हिड हिक्स यांचा संशयास्पद मृत्यू
नासाच्या ‘जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी’ मधील ज्येष्ठ संशोधक मायकेल डेव्हिड हिक्स यांचा जुलै २०२३ मध्ये संशयास्पद मृत्यू झाला. १९९८ ते २०२२ या काळात त्यांनी लॅबोरेटरीमध्ये काम केले. डेव्हिड यांनी ८० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले होते. शास्त्रज्ञ ‘मायवाल्ड’ यांच्याप्रमाणेच डेव्हिड यांच्या मृत्यूचे कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही.
बेपत्ता संशोधकाचा मृतदेह तलावात आढळला
नोव्हार्टिस कंपनीतील फार्मा संशोधक जेसन थॉमस हे डिसेंबर २०२५ मध्ये बेपत्ता झाले होते. मार्च २०२६ मध्ये मॅसॅच्युसेट्समधील ‘लेक क्वानपॉविट’ येथे त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, थॉमस आपल्या पालकांच्या निधनामुळे मानसिक तणावात होते. या प्रकरणात घातपाताचा संशय नसल्याचे पोलिसांनी प्राथमिक तपासात म्हटले आहे.
नुनो लौरेरो यांची घरात घुसून हत्या
एमआयटीचे भौतिकशास्त्र आणि अणुविज्ञान विभागाचे प्राध्यापक ४७ वर्षीय नुनो लौरेरो यांची डिसेंबर २०२५ मध्ये त्यांच्या राहत्या घरी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लौरेरो हे ‘फ्युजन एनर्जी’ (अणुसंचलन) क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तिमत्त्व होते. अमर्याद स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याच्या तंत्रज्ञानावर ते काम करत होते. पोर्तुगालमधील विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांची एका व्यक्तीशी ओळख झाली होती, याच व्यक्तीने नुनो यांची हत्या केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यांच्या कामाचा या हत्येशी संबंध असल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत.
हेही वाचा : २२ एप्रिलनंतर पुन्हा युद्ध? अमेरिकेशी चर्चा करण्यास इराणचा नकार; पाकिस्तानची मध्यस्थी निष्फळ?
खगोल भौतिकशास्त्रज्ञाची घरासमोरच हत्या
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्रख्यात खगोल भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ग्रिलमायर (वय ६७) यांची फेब्रुवारीमध्ये पहाटेच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ग्रिलमायर यांचे काम नासाच्या ‘हबल’ आणि ‘स्पिट्झर’ स्पेस टेलिस्कोपशी संबंधित होते. तसेच, हवाई दलाच्या मिसाईल ट्रॅकिंग तंत्रज्ञानावरही त्यांनी काम केले होते. ते डार्क मॅटर आणि राहण्यायोग्य ग्रहांच्या शोधात गुंतलेले होते. या प्रकरणी २९ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्यावर खून, कार जॅकिंग आणि चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शास्त्रज्ञांच्या मृत्यूमागे खरोखरच कट?
अमेरिकेतील शास्त्रज्ञांच्या मृत्यू आणि बेपत्ता होण्याच्या घटनांनी खळबळ उडाली असतानाच तज्ज्ञांच्या एका गटाने यामागे कोणताही संघटित कट असल्याचे दावे फेटाळून लावले आहेत. या घटनांमधील दुवे जोडण्यापेक्षा त्या स्वतंत्रपणे पाहण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक अवी लोएब यांनी या प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. या शास्त्रज्ञांमधील साम्य शोधणे घाईचे ठरेल. प्रत्येक प्रकरण हे एक वेगळे रहस्य असून त्याचा स्वतंत्र तपास होणे आवश्यक आहे. त्यातील काही शास्त्रज्ञांनी ‘अनआइडेंटिफाईड ॲनोमलस फेनोमिना’ (UAP) वर काम केले असले, तरी केवळ त्यावरून हा एखादा नियोजित किंवा समन्वित कट असल्याचे सिद्ध होत नाही, त्यामुळे याबद्दल जास्त चिंता करण्याची गरज मला वाटत नाही, असे अवी लोएब यांनी स्पष्ट केले आहे. सध्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेपत्ता आणि हत्या झालेल्या शास्त्रज्ञांच्या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे, त्यातून काय सत्य समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
