US counter-terrorism official Julia Varvaro faces administrative leave over a ‘Sugar Daddy’ scandal involving financial exploitation allegations: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाशी संबंधित आणखी एक महिला अधिकारी विवादात अडकली आहे. अमेरिकेतील दहशतवाद विरोधी यंत्रणेत काम करणारी वरिष्ठ अधिकारी जुलिया वरवारो हिच्यावर हजारो डॉलर्सची लुबाडणूक केल्याचा आरोप आहे. ‘शुगर डॅडिज’च्या माध्यमातून जुलिया वरवारो हिने संपत्ती तसेच महागड्या वस्तू अर्जित केल्याची तक्रार तिच्या एक्स बॉयफ्रेंडने केली आहे. २९ वर्षीय जुलिया वरवारो हिला बुधवारी (२२ एप्रिल) सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले. जुलियाच्या एक्स बॉयफ्रेंडने तिच्या विरोधात होमलँड सेक्युरिटी विभागाकडे तक्रार केली आहे. तीन महिने नात्यात राहून जुलियाने आपल्याकडून ४० हजार डॉलर लुटले, अशी तक्रार एक्स बॉयफ्रेंडने केली आहे. डिपार्टमेंड ऑफ होमलँड सेक्युरिटीच्या माजी सचिव क्रिस्ती नोएम यांचे पती ब्रायन याचे आक्षेपार्ह चॅटिंग काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते. ब्रायन हे तीन महिलांशी अश्लील संवाद साधत होते. या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेतील महत्वाच्या विभागात काम करणारी वरिष्ठ महिला अधिकारी वादात अडकली आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, सविस्तर जाणून घेऊयात.
जुलिया वरवारो कोण आहे?
२९ वर्षीय जुलिया वरवारो हिच्यावर शुगर डॅडी वेबसाइटचा वापर केल्याचा आरोप आहे. वरवारो हिने २०२४ मध्ये पीएचडी घेतली. ती अमेरिकेतील एका दहशतवाद विरोधी पथकात उपसहाय्यक सचिव म्हणून मे २०२५ पासून कार्यरत आहे. वरवारो ही अमेरिकेतील लाँग आयलंड येथील रहिवासी आहे. तिच्या वडिलांनी न्यूयॉर्क पोलिस विभागात काम केले आहे. ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात जुलिया हिच्या वडिलांनी मदतकार्यात सहभाग घेतला होता. त्याबद्दल जुलियाने तिच्या सोशल मिडिया पोस्टमध्ये माहिती दिली. ती म्हणाली, मला तो दिवस आठवतो. माझे वडील अँथनी वरवारो हे थोडक्यात बचावले होते. त्या दहशतवादी हल्ल्याचे घाव अनेक वर्ष ताजे होते. त्यामुळे दहशतवाद विरोधात काम करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. तशी हिंसक घटना पुन्हा कधीच घडू नये, असे जुलियाने म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी होमलँड सेक्युरिटी विभागाच्या सचिव क्रिस्ती नोएम यांच्याबरोबर जुलियाचे फोटो आहेत.
जुलिया वरवारो विरोधात ‘शुगर डॅडी’चे कोणते आरोप?
जुलिया वरवारो हिच्यावर “शुगर डॅडी”चे आरोप झाल्यानंतर तिला बुधवारी (२२ एप्रिल) सक्तीच्या प्रशासकीय रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच याबाबत तपास सुरू करण्यात आला आहे. होमलँड सेक्युरिटी विभागाकडून याबाबत माहिती देण्यात आली. जुलिया विरोधात तक्रार देणाऱ्या तिच्या एक्स बॉयफ्रेंडचे नाव रॉबर्ट बी असे सांगण्यात आले. जुलियाबरोबर रॉबर्ट तीन महिने नात्यात होता. या कालावधीत जुलियाने ४० हजार डॉलरची फसवणूक केल्याचे रॉबर्टने तक्रारीत म्हटले आहे. ‘हिंज’ नावाच्या डेटिंग वेबसाइट दोघांची ओळख झाली होती. “ती दिसायला आकर्षक होती, त्यामुळे मी तिच्यावर भाळलो”, असे रॉबर्टने तक्रारीत म्हटले.
जुलियाबरोबर सुट्टीची मजा लुटण्यासाठी इटली, सॅन डिएगो, साऊथ कॅरोलविना आणि अरूबा येथील पर्यटन स्थळांना भेट दिली. त्यावेळी जुलियाने महागड्या वस्तू तसेच ज्वेलरी खरेदी केल्याचे रॉबर्टने होमलँड सेक्युरिटी विभागाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच जुलिया ही अलेस्सीया या नावाने ‘शुगर डॅडी’ प्लॅटफॉर्मवर आहे, असेही त्याने नमूद केले. डेली मेल या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रॉबर्ट म्हणाला, पहिल्या डेटवर गेलो तेव्हा माझे १४०० डॉलर खर्च झाले. त्याबदल्यात मला फक्त एक किस मिळाले. जुलियाला अंमली पदार्थांचे व्यसन आहे, असा आरोप देखील त्याने केला.
‘शुगर डॅडी’ म्हणजे काय?
जुलिया वरवारो ही ‘शुगर डॅडी’ प्लॅटफॉर्मचा वापर करते, असा आरोप रॉबर्टने केला आहे. त्याबाबत सध्या तपास सुरू आहे. एखादी वयस्कर व श्रीमंत व्यक्ती एका तरूण किंवा तरूणीला आर्थिक फायदा देते. त्याबदल्यात ती व्यक्ती त्या तरूण/तरूणीकडून शारिरीक सुख अथवा सहवास मिळवते. यातील वयस्कर व्यक्तीला ‘शुगर डॅडी’ (पुरूष) किंवा ‘शुगर मॉमी’ (महिला) असे म्हटले जाते. तर तरूण अथवा तरूणीला ‘शुगर बेबी’ म्हटले जाते. या प्रकारच्या संबंधांना ‘शुगर डेटिंग’ किंवा ‘शुगरिंग’ असेही म्हणतात. हा एक व्यावहारिक नातेसंबंध असतो. काही विद्यार्थी किंवा काही विद्यार्थीनी कॉलेजची फी भरण्यासाठी या नातेसंबंधांचा वापर करतात. दोन्ही पार्टनरचा या नातेसंबंधात स्वार्थ असतो. काही व्यक्ती खासगी कारणांमुळे या संबंधांमध्ये अडकतात. ‘शुगर बेबी’ला या संबंधात आर्थिक स्वातंत्र्य मिळते, असे मानले जाते.
आरोपांवर जुलिया वरवारोची भूमिका काय?
जुलिया वरवारो हिने तिच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘शुगर डॅडी’ प्लॅटफॉर्मवर प्रोफाइल नसल्याचे तिने स्पष्ट केले. ती म्हणाली, “बॉयफ्रेंडबरोबर सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी जाणे चुकीचे असते, हे मला माहिती नव्हते. आम्ही खूप चांगल्या प्रकारे नात्यात होतो. सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गेलो होते. त्यात काय चुकीचे होते, ते मला अजूनही कळले नाही.” ती पुढे म्हणाली, “तो एक वेडा एक्स बॉयफ्रेंड आहे, जो काहीही बडबडतोय. हे खरंच खूप विचित्र आहे. जर शहरातील अल्पावधीत संपुष्टात आलेल्या प्रत्येक नात्याची एक गोष्ट बाहेर आली, तर हे शहरच कोसळेल.” दरम्यान, अंमली पदार्थांचे व्यसन नसल्याचे तिने स्पष्ट केले. आतापर्यंत ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे ती म्हणाली.
