Donald Trump’s New Immigration Tactic : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या इमिग्रेशन धोरणात मोठा बदल केला. गेल्या वर्षी त्यांनी अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांची मुस्कटदाबी करून त्यांना देशाबाहेर हाकलून लावले होते. त्यावेळी अनेक भारतीयांनाही हाता-पायात बेड्या घालून अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाविरोधात भारतात संतापाची लाट उसळली होती. यादरम्यान ट्रम्प प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतली असून, अवैध भारतीयांना तातडीने अमेरिका सोडण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे.

अमेरिकेने भारतीयांना काय ऑफर दिली?

अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने बेकायदा स्थलांतरितांसाठी एक अनोखी आणि तितकीच वादग्रस्त मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत चक्क ताजमहालच्या चित्राचा वापर करून अमेरिकेत अवैध वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना स्वतःहून देश सोडून मायदेशी परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रम्प प्रशासनाने या मोहिमेला ‘स्वयं-हद्दपारी’ कार्यक्रम असे नाव दिले आहे. त्या अंतर्गत जे स्थलांतरित कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहत आहेत, त्यांना मायदेशी पाठविण्यासाठी विमानाचा संपूर्ण खर्च अमेरिकन सरकार उचलणार. स्वत:हून अमेरिका सोडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तब्बल २,६०० डॉलर्स (सुमारे दोन लाख १५ हजार रुपये) रोख दिले जाणार आहेत.

काय आहे अमेरिकेची हद्दपारीची मोहीम?

अमेरिकन अधिकाऱ्यांनी ताजमहालचे चित्र वापरून स्वयं-हद्दपारीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भारतीयांना भावनिक साद घालून किंवा त्यांच्या ओळखीच्या प्रतीकाचा वापर करून, त्यांना देश सोडण्यास प्रवृत्त करण्याचा हा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. या योजनेंतर्गत बेकायदा स्थलांतरितांना कोणत्याही अटकेशिवाय किंवा निर्बंधांशिवाय देश सोडण्याची संधी दिली जात आहे. सक्तीने हद्दपार करण्यापेक्षा हा मार्ग अधिक मानवी आणि अमेरिकन सरकारसाठी कमी खर्चीीक असल्याचा दावा तेथील अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेच्या या मोहिमेत केवळ भारताचाच नव्हे,, तर चीन व कोलंबिया यांयांसारख्या देशांचाही उल्लेख करण्यात आला आहे. अमेरिकेमध्ये बेकायदा राहणाऱ्यांमध्ये या देशांतील लोकांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे त्यांनाही अशाच प्रकारे मायदेशी परतण्याचे आवाहन केले जात आहे.

आणखी वाचा : Iran Execution : इराणमध्ये १९ वर्षीय कुस्तीपटूला फाशी; कोण होता सालेह मोहम्मदी? त्याचा नेमका गुन्हा काय?

भारतीयांना लक्ष्य करण्याचे कारण काय?

अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांच्या सर्वांत मोठ्या समुदायांपैकी भारतीय समुदाय एक आहे. त्यामुळे त्यांना थेट लक्ष्य केले जात असल्याचे दिसून येत आहे. अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाच्या आकडेवारीनुसार, जवळपास सात लाखांहून अधिक भारतीय नागरिक कोणत्याही कागदपत्रांशिवाय अमेरिकेत राहत आहेत. गेल्या काही वर्षांत ‘डंकी रूट’सारख्या अवैध मार्गांनी अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. याच कारणामुळे अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन एन्फोर्समेंट’ विभागाच्या रडारवर आता भारतीय समुदाय आल्याचे दिसून येत आहे.

कायदेशीर स्थलांतरितांमध्येही भीतीचे वातावरण

ट्रम्प प्रशासनाची स्वयं-हद्दपारीची मोहीम केवळ स्थलांतरितांसाठी असली तरी त्याचे पडसाद संपूर्ण भारतीय समुदायावर उमटत आहेत. ज्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रे नाहीत, त्यांच्यासमोर सरकारची आर्थिक मदत स्वीकारून सन्मानाने मायदेशी परतणे किंवा अटक, सक्तीने हद्दपारी आणि भविष्यात अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी ओढवून घेण्याचा धोका पत्करणे, असे दोनच पर्याय उरले आहेत. या कठोर मोहिमेमुळे केवळ बेकायदाच नव्हे, तर कायदेशीररीत्या अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय विद्यार्थी आणि व्हिसाधारकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. व्हिसाचे नियम कडक झाल्यामुळे आणि वाढत्या तपासणीमुळे कायदेशीर प्रवाशांनाही मानसिक दडपणाचा सामना करावा लागत आहे.

अमेरिकेची मोहीम खरेच यशस्वी होईल का?

ट्रम्प प्रशासनाने अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्या भारतीयांना देश सोडण्यासाठी पैशांसह विमान तिकिटाचे आमिष दाखवले असले तरीही या मोहिमेला मिळणारा प्रतिसाद मर्यादित असू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अनेक स्थलांतरितांसाठी मायदेशी परतणे हा केवळ एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय नसून, ते आयुष्य बदलून टाकणारे पाऊल ठरू शकते. सध्या अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीय कर्ज काढून तिथे पोहोचले आहेत. अशा स्थितीत ते रिकाम्या हाताने परतल्यास कुटुंबाच्या अपेक्षा आणि भारतातील अनिश्चित भविष्य यांसारख्या गंभीर समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहतील, असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. स्वेच्छेने देश सोडणाऱ्यांना भविष्यात पुन्हा कधी अमेरिकेचा व्हिसा मिळेल का, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. ज्यांनी हा पर्याय निवडला आहे, त्यांना भविष्यात पुन्हा प्रवेश दिला जाईल की त्यांच्यावर कायमची बंदी घातली जाईल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

हेही वाचा : Pakistan Republic Day : पाकिस्तानवर मोठे संकट; प्रजासत्ताक दिनाची परेड तातडीने रद्द, कारण काय?

ताजमहलाच्या चित्रावरून वाद का निर्माण झाला?

ट्रम्प प्रशासनाने स्वयं-हद्दपारीच्या जाहिरातीकडे अनेक भारतीयांचे लक्ष वेधले आहे. जाहिरातीत ताजमहालसारख्या सांस्कृतिक चिन्हाचा वापर केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. टीकाकारांच्या मते, एका बाजूला कठोर हद्दपारीचे धोरण राबवायचे आणि दुसरीकडे अशा भावनिक प्रतिमा वापरणे हे संवेदनशीलतेचा अभाव दर्शविणारे आहे. तर काहींच्या मते, विशिष्ट स्थलांतरित गटांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारने केलेली ही एक नियोजित खेळी आहे. यादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाने सुरू केलेल्या स्वयं-हद्दपारीच्या मोहिमेला नेमका किती प्रतिसाद मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.