– डॉ आनंद जोशी
US Slavery History Impact on Black Community: सतराव्या शतकाच्या मध्यावर पिगॉट युद्धाच्या काळात अमेरिकेतल्या कनेक्टिकट वसाहतीमध्ये आफ्रिकनांना आणलं गेलं. अठराव्या शतकाच्या प्रारंभाला या गुलामांच्या आयतीला वेग आला. आताच्या घानाची तेव्हा ‘स्लेव्ह कोस्ट’ अशी ओळख बनली. त्याआधी लिव्हरपूलहून गुलाम पुढे अमेरिका, वेस्ट इंडिज इकडे पाठवले जात. गुलांमांचे सौदे इंग्लंडमध्ये होत. यामुळे लिव्हरपूल बंदर आणि इंग्लंडमधले गोरे व्यापारी गब्बर होत गेले. पुढे एकोणिसाव्या शतकापर्यंत १८२० ते १८६१ या काळात अमेरिकेच्या दक्षिणेतील आणि उत्तरेकडील राज्यांत गुलामगिरी रुजली. अमेरिकेतील यादवी युद्ध संपलं आणि १८६५ साली गुलामगिरी संपली. पण या गुलामगिरीचे गंभीर परिणाम कृष्णवर्णीयांच्या पुढील कितीतरी पिढ्यांवर झाले. याचाच धक्का देणारा अभ्यास कॅलिफोर्निया विद्यापीठाचा सायकॉलॉजी विभाग आणि नॉर्थ कारोलिना विद्यापीठाचा सायकॉलॉजी तसंच न्यूरोसायन्स विभागातल्या संशोधकांनी केला आहे.

एक गुलाम स्त्री कितीला? गुलाम मुलाची किंमत काय?

गुलाम ही मालमत्ता असल्यानं अक्षरशः गुराढोरांप्रमाणे कृष्णवर्णीयांना विकता येत असे. गोरे लोक आपल्या इच्छापत्रांमध्ये इतर वस्तूंसोबतच गुलामांचाही उल्लेख करत. मुख्य म्हणजे, अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध येल युनिव्हर्सिटीच्या उभारणीत आफ्रिकन गुलामांचा मोठा वाटा होता. यावर डेव्हिड डब्ल्यू. ब्लाइट यांनी ‘येल अँड स्लेव्हरी-ए हिस्ट्री’ नावाचं पुस्तकही लिहिलं आहे. त्यामध्ये विद्यापीठाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या गोऱ्यांकडच्या नोंदींमध्ये ए निग्रो गर्ल व्हॅल्यूड अॅट 40 पॉउंड्स…द चाइल्ड वॉज बाय देन व्हॅल्यूड अॅट 7 पॉउंड्स, 15 शिलिंग्ज, 10 पेन्स…ब्लॅक वूमेन व्हॅल्यूड अॅट 40 पॉउंड्स वॉज लिस्टेड अॅज ए पार्ट ऑफ ए ‘लॉस्ट इस्टेट स्पेन्ट इन फॅमिली’ असे खरेदीविक्रीचे भयानक तपशील आले आहेत.

‘कावळ्या’च्या कायद्याने गुलाम ठेचले

अमेरिकेतली गुलामगिरी संपली तरी जिम क्रो कायदे अस्तित्वात होतेच. हे कायदे १८७० ते १९६५ पर्यंत वापरात होते. या कायद्यानुसार शाळा, वाहतूक, उपहारगृहं, रुग्णालयं, स्वच्छतागृहं, सक्तीने वेगळी ठेवण्यात आली. त्यात कृष्णवर्णीयांकरता निधीची कमतरता असल्यामुळे या सुविधासुद्धा अगदी निकृष्ट दर्जाच्या दिल्या गेल्या. कृष्णवर्णीय लोकांना मतदानापासून रोखण्यासाठी मतदान कर, साक्षरता चाचण्या अशा अनेक आडकाठ्या आणल्या गेल्या. अखेरीस हे कायदे १९६५ मध्ये रद्द करण्यात आले. तरीही गोरे आणि काळे याच्यातील असमानता संपुष्टात आली नाही. कायदे जळाले तरी पीळ गेला नाही.

कृष्णवर्णीयांच्या भरडल्या पिढ्या

खरेदी-विक्रीच्या या प्रथेमुळे गुलामांच्या कुटुंबातील नवरा बायको, मुलगा, मुलगी यांची केव्हाही ताटातूट होण्याचा धोका आणि ताण या गुलामांवर असे. याचा त्यांच्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असे. गुलामगिरीपासूनच्या वांशिक अलगीकरणामुळे आज कृष्णवर्णीय समाजांचं काय नुकसान केलं, तेच मानसशास्त्र आणि मेंदू शास्त्रातल्या संशोधकांनी आकडेवारीसह दाखवलं आहे. त्यात कृष्णवर्णीय बाळाचं ‘बर्थ वेट’ कमी असणं, गरोदरपणाचे ९ महिने पूर्ण होण्यापूर्वी बाळाचा जन्म होणं-मुदतपूर्व जन्म होण्याचं प्रमाण कृष्णवर्णीय मातांमध्ये जास्त असणं, कृष्णवर्णीयांचे बैठं जीवन, यामुळे त्यांचे आरोग्य गोऱ्यांच्या तुलनेत खूपच वाईट असणं, असे कित्येक पिढ्यांना भोवणारे दुष्परिणाम समोर आले आहेत.

मरणातही विषमता?

अमेरिकेततले गोरे लोक आणि कृष्णवर्णीय यांच्या अपेक्षित आयुर्मर्यादा आणि मृत्यूचं प्रमाण यातही विषमता आहे. कृष्णवर्णीयांची आयुर्मर्यादा गोऱ्या अमेरिकनांपेक्षा कमी आहे. याची पाळंमुळं अर्थातच काळ्यांच्या गुलामगिरीत आणि त्यातून कायमस्वरुपी बिघडत गेलेल्या मानसिक-शारिरिक आरोग्यात आहेत. याची सविस्तर १८६० पासूनची आकडेवारी संशोधकांनी दिली आहे. अगदी आताची आकडेवारीसुद्धा धक्कादायक आहे. असा अंदाज आहे की, १९९९ ते २०२० या २१ वर्षाच्या काळात कृष्णवर्णीय अमेरिकन लोकांचे अपेक्षेपेक्षा १६ लाखाहून अधिक जास्त मृत्यू झालेत. याचा अर्थ अकाली मृत्यूमुळे ८ कोटी संभाव्य आयुष्यं खुरडली गेली.

अमेरिकी गोऱ्यांचा काळा चेहरा

वांशिक अलगीकरणाचे प्रमुख परिणाम आर्थिक असतात. गोरे आणि काळे यांच्या मिळकतीत खूपच फरक असतो. अमेरिकेतील ज्या परगण्यात गुलामगिरीचं प्रमाण जास्त होतं, तिथे ही विषमता आजही जास्त प्रमाणात दिसून येते. गरिबीमुळेच कृष्णवर्णीयांच्या घरांची अवस्था दयनीय असते. घरात ओलावा, बुरशी, पिण्याचं अस्वच्छ पाणी, शौचालयाच्या गैरसोयी, अपुरी खेळती हवा अशी परिस्थिती असते. याचा वाईट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. भारतात झोपडपट्ट्या असतात, अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या रया उडालेल्या इमारती असतात, रोगराई, व्यसनाधीनता, बेरोजगारी असं अभावग्रस्त जगणं तिथल्या रस्त्यांवर ओसंडून वाहात असतं.

शैक्षणिक विषमतेचे फटके कृष्णवर्णीयांनाच?

गुलामगिरीच्या काळात गोरे आणि काळे यांच्यात जी शिक्षण मिळवण्यात दरी निर्माण केली, ती आज एकविसाव्या शतकातही टिकून आहे. खरं तर शिक्षण हा आरोग्य पूर्ण जीवन जगण्याकरता एक कारणीभूत घटक असतो. मात्र, माणुसकीला काळिमा फासणारा गुलामगिरीचा नकोसा वारसा नशिबी आल्यामुळे कृष्णवर्णीय लोक शिक्षणापासून वंचित राहिले, तसंच ते आरोग्य पूर्ण जीवनापासूनही दूर राहिले. गरिबीमुळे शिक्षणाच्या संधी कमी होतात. शिक्षण कमी म्हणून मिळकत कमी असं दुष्टचक्र आकारास येतं. त्यात कृष्णवर्णीय अडकतात. आजचं हे वास्तव आहे. मात्र याचं कारण भोगलेल्या गुलामगिरीत आहे.

गोऱ्यांमध्येही होते वंचित?

कोणत्याही समाजात नोकऱ्या, पैसा आणि जमीन मिळवण्यासाठी गटागटांत तीव्र स्पर्धा असते. कृष्णवर्णीयांना जुलुमी गोऱ्यांनी गुलामगिरीत आडकवल्यामुळे साहजिकच कृष्णवर्णीयांचा हा गट स्पर्धेतून बाद झाला. याचा थेट फायदा सगळ्या गोऱ्या अमेरिकींनी झाला. पण गोऱ्या अमेरिकनांमध्येही गट होतेच. त्यामुळे जे गोरे लोक उच्चभ्रू आणि श्रीमंत होते, त्यांनाच गुलामगिरीमुळे जास्त फायदा झाला. गोरे मध्यमवर्गीय आणि गोरे श्रमजीवी यांना गुलामगिरीमुळे म्हणावा तसा फायदा झाला नाही. त्यावरही या संशोधनात प्रकाश टाकण्यात आलाय.

स्लेव्हरी म्युझियमचा सांगावा काय?

इंग्लंडमधल्या लिव्हरपूल इथं स्लेव्हरी म्युझियम अर्थात गुलामगिरीची भयावहता दाखवणारं संग्रहालय आहे. वसाहत मालक गोरे आफ्रिकेतल्या माणसांना गुलाम बनवून कशा प्रकारे घेऊन येत असत, हे या म्युझियममध्ये सचित्र दाखवलं आहे. आफ्रिकनांना जेरबंद करण्यासाठी वापरलेले साखळदंड आणि विविध प्रकारच्या बेड्या वगैरे क्रूरपणाचं दर्शन घडवणाऱ्या वस्तू इथं ठेवल्या आहेत.

थंड डोक्याची क्रूर कल्पना

मी हे म्युझियम बघायला काही वर्षा पूर्वी गेलो होतो. तेव्हा कितीतरी कृष्णवर्णीय हे म्युझियम पाहायला आले होते. आपल्या पूर्वजांचे झालेले हाल पाहून प्रत्येक जण डोळे पुसत बाहेर पडत होता. म्युझियम पाहून मी तर अक्षरशः सुन्न झालो होतो. कारण पाश्चात्य समाजातील वर्णद्वेष किंवा भेदभाव केवळ वैयक्तिक नव्हता. गुलामगिरी ही गोऱ्यांचे आर्थिक फायदे टिकवून ठेवण्यासाठी थंड डोक्याने केलेली रचना होती. त्याचे परिणाम आजची कृष्णवर्णीयांची पिढी भोगते आहे.