US Special Forces Iran Rescue Operation for F-15E Pilot : पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धात इराणकडून अमेरिकेचे लढाऊ विमान शुक्रवारी पाडण्यात आले होते. विमानातून सुखरूप बाहेर पडलेल्या व इराणमध्ये अडकलेल्या अमेरिकन हवाई दलाच्या दोन अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी अमेरिकेने विशेष मोहिम हाती घेतली होती. त्यात यूएस स्पेशल फोर्सेसचे सैनिक सहभागी होते. इराणमधील अत्यंत दुर्गम भागात अडकलेल्या अधिकाऱ्याला अमेरिकन लष्कराने इराणच्या आत प्रवेश करून वाचवले. या ऑपरेशननंतर ” ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात साहसी मोहिमांपैकी एक मोहिम होती”, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
इराणने लढाऊ विमान हाणून पाडल्यानंतर अमेरिकन हवाई दलाचा एक अधिकारी इराणमध्ये अडकला होता. त्याला शोधण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर करण्यात आले होते. जर इराणच्या तावडीत तो अधिकारी सापडला असता, तर युद्धात वाटाघाटी करण्यासाठी इराणकडे एक भक्कम आधार असला असता. परंतु, अमेरिकेने ती संधी इराणला दिली नाही. संघर्षादरम्यान शत्रू देशात विमान कोसळून वैमानिक अथवा अधिकारी अडकल्यानंतर त्या विमानातील वैमानिकांना वाचवण्यासाठी हाती घेतली जाणारी मोहीम अत्यंत जोखमीची व खडतर असते. लष्कराला त्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते. तसेच शत्रूच्या देशात अडकल्यानंतर जीवंत कसे राहायचे, काय करायचे याचे प्रशिक्षण वैमानिकांना दिले जाते. शत्रू देशात विमान कोसळल्यानंतर अडकलेल्या वैमानिक व अधिकाऱ्यांना कसे वाचवले जाते, त्यांना वाचवण्यासाठी लष्करी मोहीम कशी राबवली जाते, याबाबत जाणून घेऊयात.
अमेरिकेचे लढाऊ विमान कोसळल्यानंतर इराणमध्ये काय घडलं?
इराणने अमेरिकेचे एफ-१५ इ स्ट्राइक इगल (F-15E) हे लढाऊ विमान शुक्रवारी (३ एप्रिल) पाडले. मागील २० वर्षांहून अधिक कालावधीनंतर पहिल्यांदा अमेरिकेचे विमान शत्रू देशाने पाडल्याची घटना घडली. या आधी इराकने २००३ मध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडले होते. अमेरिकेच्या एफ-१५ इ विमानाला इराणने लक्ष्य केल्यानंतर या विमानात असलेले वैमानिक व वेपन सिस्टिम अधिकारी हे दोघेही इराणमध्ये कोसळले. त्यानंतर अमेरिकेच्या हवाई दलाने काही वेळातच वैमानिकाला वाचवले. परंतु, वेपन सिस्टिम अधिकारी मात्र इराणमध्ये अडकला. त्याला शोधून पकडण्याचे आवाहन इराणी लष्कराने नागरिकांना केले होते. अमेरिकन लष्कराने देखील वेपन सिस्टिम अधिकाऱ्याचा शोध सुरू केला.
दरम्यान, एफ-१५ इ हे विमान इराणने पाडल्यानंतर अमेरिकेचे आणखी एक यूएस ए-१० (US A-10) हे लढाऊ विमानदेखील इराणने हाणून पाडले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी अमेरिकन लष्कराने या विमानातील वैमानिकाची सुखरूप इराणमधून सुटका करून घेतली होती. एफ-१५ इ लढाऊ विमानातील वेपन सिस्टिम अधिकाऱ्याचे लोकेशन माहित झाल्यानंतर अमेरिकन लष्कराने रविवारी विशेष मोहीम राबवली. अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे शेकडो सैनिक या मोहिमेत सहभागी झाले होते. अमेरिकन लष्कराने अत्यंत खडतर व जोखिम घेऊन मोहीम राबवत अधिकाऱ्याला इराणमधून सुखरूपपणे बाहेर काढले.
इराणमध्ये अडकलेल्या हवाई दलाच्या अधिकाऱ्याला अमेरिकेने कसे वाचवले?
इराणने अमेरिकेचे लढाऊ विमान एफ-१५ इ पाडल्यानंतर त्यातील वैमानिकाला अमेरिकन हवाई दलाने काही वेळातच इराणमधून सुखरूप उचलून बाहेर नेले. परंतु, त्या विमानातील वेपन सिस्टिम अधिकारी मात्र इराणमध्ये अडकला. डोंगराळ भागात विमान कोसळले होते. त्यामुळे अधिकाऱ्याने डोंगरातील एका गुफेत आश्रय घेतला. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएने अधिकाऱ्याचे लोकेशन माहिती करून घेतले. त्यानंतर अमेरिकन लष्कराकडून अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली.
अधिकारी ज्या ठिकाणी अडकला त्या भागात इराणी लष्कर येऊ नये म्हणून अमेरिकन हवाई दलाने सर्वात आधी बॉम्बवर्षाव केला. त्यानंतर अधिकाऱ्याला सुखरूप ताब्यात घेतले. दरम्यान, ज्या विमानांमधून कमांडो इराणमध्ये आले होते, त्यापैकी दोन विमाने इराणच्या दुर्गम भागात अडकली. त्यामुळे कमांडोंना नेण्यासाठी तीन विमाने इराणमध्ये पाठवण्यात आली. त्या तीन विमानातून कमांडो वेपन सिस्टिम अधिकाऱ्याला घेऊन इराणमधून बाहेर पडले. परंतु, त्याआधी इराणमध्ये अडकलेली दोन विमाने इराणी लष्कराच्या हाती लागू नये म्हणून उद्ध्वस्त करण्यात आली. न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत वृत्त दिले. दरम्यान, अमेरिकेने राबवलेल्या मोहिमेवेळी अमेरिकेची दोन वाहतूक विमाने व दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर उद्ध्वस्त केल्याचे इराणच्या एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले, याबाबतचे वृत्त Reuters ने दिले.
एफ-१५ इ स्ट्राइक इगल (F-15E Strike Eagle) लढाऊ विमान कसे असते?
अमेरिकेचे ‘एफ-१५ इ स्टाइक इगल’ हे लढाऊ विमान हवेतून हवेत तसेच हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी वापरले जाते. हे विमान वैमानिक व वेपन सिस्टिम अधिकारी या दोघांकडून चालवले जाते. वैमानिक विमान चालवण्यासह हवेतून हवेत मारा करण्याचे काम करतो. तर त्याच्या मागे बसलेला वेपन सस्टिम अधिकारी हवेतून जमिनीवर मारा करण्याचे काम करतो. किचकट मोहिमांमध्ये ही विमाने महत्वाची भूमिका बजावतात.
हवाई दलाच्या वैमानिकांना कोणते प्रशिक्षण दिले जाते?
मोहिमेदरम्यान लढाऊ विमान शत्रूने हाणून पाडल्यास काय करावे, याचे प्रशिक्षण हवाई दलाच्या जवानांना दिले जाते. अमेरिकन हवाई दलाच्या सैनिकांना अशा परिस्थितीत ‘एसइआरइ’ (SERE) चे पालन करण्यास सांगितले जाते. ए-सर्व्हायव्हल (जीवंत राहणे), इ-इव्हेजन (प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करणे), आर-रेझिस्टन्स (प्रतिकार करणे) आणि इ-इस्केप (सुटका करून घेणे) याबाबतचे प्रशिक्षण अमेरिकन हवाई दलाच्या वैमानिक तसेच अधिकाऱ्यांना दिले जाते.
सर्वात प्रथम विमान किंवा जहाज अपघातग्रस्त होण्याआधी त्यातून सुखरूप कसे बाहेर पडावे, याचे प्रशिक्षण हवाई दलाच्या सैनिकांना दिले जाते. एखादे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाल्यानंतर वैमानिक बेपत्ता असल्याची माहिती सर्वप्रथम हवाई दलाला मिळते. त्यानंतर त्या वैमानिकाला वाचवण्यासाठी तात्काळ मोहीम हाती घेतली जाते. याचे विशेष प्रदक्षिण मोहिमेत सहभागी सैनिकांना दिले जाते. वेगवेगळ्या भू-प्रदेशात अडकल्यानंतर अन्न कसे मिळवायचे, प्राण्यांची शिकार करण्यासाठी जाळे कसे टाकायचे, स्थानिक नागरिकांकडून मदत कशी मिळवायची, नकाशा आणि होकायंत्राचा वापर करून मार्ग कसा शोधायचा याचे प्रशिक्षण हवाई दलाला दिले जाते.
‘स्पेशल रेस्क्यू ऑपरेशन्स’ कशी राबवली जातात?
“प्रत्येक लष्कराकडे त्यांच्या स्वत:च्या वैमानिकांचा अथवा मित्र देशांच्या वैमानिकांचा शत्रू देशातून बचाव कसा करायचा, याची एक स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसेस असते. त्याला ‘कॉम्बॅट सर्च अँण्ड रेस्क्यू’ (CSAR) असे म्हटले जाते. शत्रू देशाकडून वैमानिक पकडल्या जाण्याआधी त्याला कसे ताब्यात घेऊन वाचवायचे, याबाबत प्रत्येक लष्कराची एक विशिष्ट कार्यपद्धती तयार असते.
अशा परिस्थितींचा सामना करण्यासाठी वैमानिकांना आधीच प्रशिक्षण दिलेले असते. ते बचाव पथकाशी रेडिओ संपर्क साधू शकतात. त्यांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने स्पेशल फोर्सेसच्या सैनिकांना शत्रू देशात उतरवले जाते. हेलिकॉप्टरला ‘कव्हर फायर’ देण्यासाठी काही विमाने हेलिकॉप्टरच्या अवतीभवती उडत असतात. स्पेशल फोर्सेसचे सैनिक कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. वैमानिक जखमी असल्यास त्याच्यावर तात्काळ उपचार देखील मोहिमेदरम्यान केले जातात. “नो मॅन लेफ्ट बिहाइंड” (कोणी मागे राहायला नको) असे बचाव करण्यासाठी गेलेल्या स्पेशल फोर्सेसचे घोषवाक्य असते.” अशी माहिती मेजर जनरल जीजी द्विवेदी (निवृत्त) यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. १९७१ च्या लढाईत ते सहभागी होते. तसेच भारतीय स्पेशल फोर्सेस मध्ये पॅरा कमांडो म्हणून त्यांनी कामे केले होते.
