अमेरिकेचे एफ-३५ ( F-35) हे लढाऊ विमान जगातील सर्वात आधुनिक लढाऊ विमान मानले जाते. अमेरिकन वायू दलाकडे असलेले हे विमान टर्कीला मिळू शकते का? ही चर्चा आता पुन्हा एकदा सुरू झाली आहे. F-35 विमान मिळवण्यासाठी टर्की कित्येक वर्षांपासून वाट पाहत आहे. टर्कीला F-35 देण्याबाबत ट्रम्प विचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ पासून अमेरिका व टर्की यांच्यातील संरक्षण करार स्थगित आहेत. नाटो समिट नुकतेच टर्कीत पार पडले. त्यावेळी ट्रम्प व टर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्यात F-35 बाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. या घडामोडींना इस्रायलने मात्र तीव्र विरोध केला आहे.

अमेरिकेने हे पाचव्या जनरेशनचे लढाऊ विमान टर्कीला देऊ नये, टर्कीला विमान दिल्यास मध्य पूर्वेतील समतोल बिघडू शकतो, असा इशारा बिन्यामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेला दिला आहे. ‘सीएनएन’ वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, F-35 अमेरिकेने टर्कीला देऊ नये. तसे केल्यास मध्य पूर्वेतील शक्तीचा समतोल बिघडू शकतो. तसेच टर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांच्या नेतृत्वातील टर्की हा अमेरिकेचा मित्र देश होऊ शकत नाही, असे बिनामिन नेतान्याहू यांनी अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले आहे.

अमेरिकेचे F-35 लढाऊ विमान टर्कीला का खरेदी करता आले नाही?

‘F-35 जॉईंट स्ट्राइक फायटर प्रोग्राम’चा टर्की हा देश आंतरराष्ट्रीय भागीदार होता. १०० हून अधिक F-35 विमान खरेदी करण्याचे तसेच या विमानाचे काही पार्ट्स तयार करण्याचे नियोजन टर्कीने केले होते. टर्कीचे व अमेरिकेचे संबंध २०१९ मध्ये कमालीचे बिघडले. टर्कीने रशियाची एस-४०० (S-400) ही एअर डिफेन्स सिस्टिम खरेदी केली. ही सिस्टिम खरेदी न करण्याचा इशारा अमेरिकेने टर्कीला दिला होता.

रशियाचे S-400 आणि अमेरिकेचे F-35 यांना एकाच वेळी तैनात करणे किंवा वापरणे धोक्याचे ठरू शकते, असा इशारा अमेरिकेने टर्कीला दिला होता. परंतु, टर्कीने अमेरिकेला जुमानले नव्हते. F-35 ची माहिती व तंत्रज्ञान यामुळे रशियाच्या हाती लागू शकते, असा धोका अमेरिकेला वाटत होता. त्यामुळे अमेरिकेने टर्कीला F-35 शी संबंधित प्रोग्राममधून काढून टाकले. तसेच टर्कीवर संरक्षण क्षेत्राशी संबंधित निर्बंधही लादले.

अमेरिकन काँग्रेसने टर्कीला F-35 विमान न देण्याबाबत एक कायदाही संमत केला. त्यानुसार जोपर्यंत टर्कीकडे S-400 एअर डिफेन्स सिस्टिम असेल तोपर्यंत टर्कीला F-35 लढाऊ विमान विकले जाणार नाही, अशी त्यात तरतूद करण्यात आली. दरम्यान, टर्कीसोबत भागीदारी वाढवण्याचे मार्ग ट्रम्प शोधत आहेत. परंतु, त्यांनी उचललेले कोणतेही पाऊल अमेरिकन काँग्रेस तसेच कायद्याच्या विरोधात जाऊ शकते.

कोणत्या देशांकडे सध्या F-35 लढाऊ विमान आहेत?

F-35 हे अमेरिकेचे सर्वात अत्याधुनिक लढाऊ विमानांपैकी एक आहे. हे विमान कोणत्याही देशाला सहजपणे खरेदी करता येत नाही. ज्या देशांचे अमेरिकेशी संबंध अत्यंत दृढ आहेत, त्यांनाच हे विमान अमेरिकेकडून विकले जाते. या विमानात अमेरिकेचे प्रगत तंत्रज्ञान आहे. तसेच ज्या देशांबरोबर अमेरिकेची लष्करी भागीदारी दीर्घकाळापासून आहे, त्या देशांना अमेरिकेने हे विमान दिलेले आहे. २०२६ पर्यंत हे विमान असलेले जगात फक्त ११ देश आहेत. अमेरिका, युनायटेड किंग्डम, इटली, नेदरलँड्स, नॉर्वे, डेन्मार्क, बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, जपान, साऊथ कोरिया, इस्रायल या देशांकडे F-35 विमान आहेत.

तर अनेक देशांनी या विमानाच्या खरेदीसाठी अमेरिकेकडे मागणी केली आहे. त्यात जर्मनी, फिनलँड, पोलंड, स्वित्झर्लंड, झेक रिपब्लिक, ग्रीस, रोमानिया, कॅनडा आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे. वायू दल अधिक शक्तीशाली बनवण्यासाठी या देशांनी F-35 विमानाची अमेरिकेकडे मागणी केली आहे. F-35 विमानांचा वापर अमेरिकेकडून मित्रदेशांशी संरक्षण भागीदारी वाढवण्यासाठीही केला जातो.

टर्कीला F-35 विमान विकण्यास इस्रायलचा विरोध का?

मध्य पूर्वेत इस्रायलचा दबदबा कायम राहावा म्हणून अमेरिकेने ‘क्वालिटेटिव्ह मिलिटरी एज’ (QME) हे धोरण अवलंबले आहे. या धोरणाअंतर्गत अमेरिकेने इस्रायलला F-35 विमान दिले. मध्य पूर्वेत फक्त इस्रायलकडेच हे विमान आहे. इस्रायलने या विमानात अनेक सुधारणा करत त्याला आणखी प्रगत व आधुनिक केले. त्याला F-35I Adir (अदिर) असे नाव देण्यात आले. या विमानाचा वापर करून इस्रायल मध्य पूर्वेत शत्रू देशांवर घातक हल्ला करतो. इस्रायलकडे असलेले F-35 विमान हे इतर देशांकडे असलेल्या F-35 विमानांपेक्षा वेगळे आहे.

जर टर्कीकडे हे पाचव्या जनरेशनचे अत्याधुनिक विमान अमेरिकेने दिले तर मध्य पूर्वेत इस्रायलचा दबदबा कमी होऊ शकतो. ‘सीएनएन’ या वृ्त्तसंस्थेशी बोलताना नेतान्याहू म्हणाले, एर्दोगान यांच्या नेतृत्वातील टर्की हा अमेरिकेचा मित्रदेश होऊ शकत नाही. टर्कीला F-35 विमान दिल्यास मध्य पूर्वेत पुन्हा एकदा अशांतता निर्माण होऊ शकते.

गाझा पट्टीत झालेल्या युद्धानंतर टर्की व इस्रायल यांच्यातील संबंध कमालीचे बिघडले. इस्रायल गाझा पट्टीत नरसंहार करत असल्याची टीका एर्दोगान यांनी केली होती. तर टर्की हा देश मुस्लीम ब्रदरहूड सारख्या संघटनांशी जुळलेला आहे, असा आरोप नेतान्याहू यांनी केला होता.

पुढे काय?

Reuters ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांचे प्रशासन टर्कीला F-35 प्रोग्राममध्ये सामावून घेण्याचे प्रयत्न करत आहे. दरम्यान, टर्कीला सामावून घेण्यात काही कायदेशीर अडचणी आहेत. दरम्यान, अमेरिकेसाठी हा प्रश्न अत्यंत किचकट झाला आहे. एकीकडे नाटोतील सदस्य असलेला टर्की आहे, तर दुसरीकडे इस्रायल आहे. टर्कीला F-35 देताना इस्रायलचा मध्य पूर्वेतील प्रभाव कमी होऊ नये, याची काळजी अमेरिकेला घ्यावी लागणार आहे.