scorecardresearch

विश्लेषण : सहा दशकांपूर्वीही होते अमेरिका, रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर; काय घडले होते तेव्हा?

रशिया आणि अमेरिका या दोन (लष्करी) महासत्ता परस्परांसमोर युद्धाच्या इराद्याने उभ्या ठाकल्याचा प्रसंग ६० वर्षांपूर्वी उद्भवला होता आणि त्यावेळी जग आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आल्याचे मानले जात होते.

cuban missile crisis
क्युबन क्षेपणास्त्र पेचप्रसंगाला अत्यंत महत्त्वाची पार्श्वभूमी होती. (प्रातिनिधिक फोटो सौजन्य रॉयटर्स)

– सिद्धार्थ खांडेकर

युक्रेनवर हल्ला करण्याच्या इराद्याने रशियाने त्या देशाच्या पूर्व सीमेवर एक लाखांची खडी फौज उभी केली आहे. इतकेच नव्हे, तर युद्धसरावाच्या निमित्ताने युक्रेनच्या उत्तरेकडील बेलारूसमध्ये गेलेले रशियन सैन्यही त्या देशातून मुसंडी मारू शकते. याशिवाय काही वर्षांपूर्वी कब्जा केलेला क्रिमिया हा युक्रेनचा प्रांत, तसेच त्या देशाच्या रशियनबहुल प्रांतांमधील सुसज्ज बंडखोर या घटकांमुळे युक्रेन पूर्णपणे घेरला गेला आहे. त्यामुळे त्या देशाच्या अस्तित्वाच्या आशा सर्वस्वी अमेरिका आणि तिच्या मित्रदेशांचा समावेश असलेल्या ‘नाटो’ संघटनेच्या मदतीवर अवलंबून आहेत. यानिमित्ताने अनेक वर्षांनी प्रथमच रशिया आणि अमेरिका या दोन (लष्करी) महासत्ता परस्परांसमोर युद्धाच्या इराद्याने उभ्या ठाकल्या आहे. असा प्रसंग ६० वर्षांपूर्वी उद्भवला होता आणि त्यावेळी जग आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आल्याचे मानले जात होते. त्यावेळी संभाव्य युद्धाचा केंद्रबिंदू मात्र क्युबा होता.

क्युबा क्षेपणास्त्र पेचप्रसंग काय होता?

नाझी जर्मनीचा पराभव करण्यासाठी अमेरिका व ब्रिटन या पाश्चिमात्य सत्ता आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया ही पूर्वेकडील सत्ता काही काळ एकत्र आले. पण युुद्धजर्जर जर्मनी व युरोपवरील नियंत्रणाच्या निमित्ताने नंतर त्यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले. अमेरिकेने युद्धानंतर लगेचच ‘नाटो’ या प्राधान्याने पश्चिम युरोपिय देशांच्या संघटनेची स्थापना केली. काही वर्षांनी रशियानेही ‘वॉर्सा पॅक्ट’ ही पूर्व युरोपिय देशांची संघटना स्थापली. दोन्ही संघटना सामरिक समूह स्वरूपाच्या होत्या. म्हणजे कोणत्याही एका सदस्यदेशावरील लष्करी हल्ला संपूर्ण संघटनेवरील हल्ला समजून, त्याला सामूहिक लष्करी प्रत्युत्तर देण्याची ही योजना होती. त्याचबरोबरीने दोन्ही देशांनी वाढत्या क्षेपणास्त्र सामर्थ्याचे प्रदर्शन करून परस्परांवर दबाव आणण्याचा चंग बांधला होता. अमेरिकेने इटली आणि तुर्कस्तानमध्ये असे क्षेपणास्त्र तळ उभारले. त्यांचा रोख अर्थातच सोव्हिएत रशियाच्या दिशेने! त्यांना उत्तर देण्यासाठी नुकताच कम्युनिस्ट बनलेल्या आणि अमेरिकेच्या सान्निध्यात असलेल्या क्युबामध्ये क्षेपणास्त्रे तैनात करण्याचा निर्णय रशियाने घेतला. येथून सुरू झाला क्युबन क्षेपणास्त्र पेचप्रसंग.

तेवढे एकच कारण होते?

या पेचप्रसंगाला अत्यंत महत्त्वाची पार्श्वभूमी होती. क्युबाचे तत्कालीन शासक फिडेल कॅस्ट्रो हे रशियाचे विलक्षण लाडके, कारण क्रांती करून ते सत्तेवर आले होते. सत्ताधीश बनल्यानतर अल्पावधीतच त्यांनी अमेरिकनांच्या ताब्यातील बँका, तेल शुद्धीकरण कारखाने, कॉफी मळे यांचे राष्ट्रीयीकरण केल्यामुळे कॅस्ट्रो हे त्यावेळच्या अतिभांडवलशाहीवादी अमेरिकन नेतृत्वाला खुपत होते. कॅस्ट्रो यांची सत्ता उलथून टाकण्यासाठी अमेरिकेच्या पाठिंब्याने क्युबातील कॅस्ट्रोविरोधी बंडखोरांनी त्या देशावर चढाई केली, ज्याला ‘बे ऑफ पिग्ज इन्व्हेजन’ असे संबोधले जाते. १४०० बंडखोरांनी क्युबाच्या नेर्ऋत्येकडून चढाई केली. पण पुरेशा हवाई आणि नाविक समर्थनाविना क्युबन बंडखोर कॅस्ट्रो यांच्या लष्करासमोर कुचकामी ठरले. अमेरिकेची जगासमोर नाचक्की झाली आणि कॅस्ट्रो यांची प्रतिमा अमेरिकाविरोधी जगात विलक्षण उजळली. भविष्यात असे हल्ले होऊ नयेत, यासाठी क्युबामध्ये क्षेपणास्त्रे तैनात करण्याची विनंती कॅस्ट्रो यांनी सोव्हिएत नेतृत्वाला केली, जी अर्थातच तात्काळ मान्य झाली! कारण कॅस्ट्रो आणि रशिया अशा दोहोंचा उद्देश यातून सफल होणार होता.

पुढे काय झाले?

क्षेपणास्त्रे ठेवण्यासाठी आणि डागण्यासाठीच्या सुविधांची उभारणी सुरू होताच, रशियाच्या हेतूंविषयी सुगावा अमेरिकेला लागला. कारण तोवर क्षेपणास्त्र तळ उभारण्याची चर्चा गोपनीय होती. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हा मुद्दा गाजला. जॉन केनेडी अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांनी सल्लागारांची बैठक बोलावली. क्षेपणास्त्र तळांसाठी उभारलेल्या सुविधांवर हवाई हल्ले आणि मग क्युबावर लष्करी आक्रमण हा पर्याय चर्चिला गेला. पण आता नवीन समीकरणात रशियाही शिरलेला होता. त्यामुळे त्याऐवजी क्युबाचे सागरी ‘विलगीकरण’ करण्याचे ठरले. कोंडी हा शब्दप्रयोग टाळला गेला, कारण त्यातून युद्धसदृश परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती अमेरिकेला होती. क्षेपणास्त्रे व त्यांचे सुटे भाग घेऊन येणारी जहाजे क्युबाकडे जाऊ दिली जाणार नाहीत, असे अमेरिकेने जाहीर केले. तसेच, क्युबात तोपर्यंत दाखल झालेली क्षेपणास्त्रे रशियाने परत घेऊन जावीत, असेही अमेरिकेने सांगितले. रशियाने अर्थातच सुरुवातीला हे मान्य केले नाही. परंतु युद्धाचा धोका निर्माण झाल्याचे दिसू लागल्यावर दोन्ही देशांनी गांभीर्याने चर्चा सुरू केली. क्युबात क्षेपणास्त्रे तैनात करणार नाही, हे रशियाने मान्य केले. पण त्याचबरोबर, क्युबावर भविष्यात कधीही हल्ला करणार नाही असे जाहीर वचनही रशियाने अमेरिकेकडून वदवून घेतले. बरोबरीने तुर्कस्तानमधील क्षेपणास्त्र तळही बंद करण्याचे अमेरिकेने जाहीर केले.

या पेचप्रसंगाचा परिणाम काय झाला?

१६ ऑक्टोबर १९६२ ते २० नोव्हेंबर १९६२ असा १ महिना ४ दिवस हा पेच सुरू होता. रशियाची जहाजे रोखण्यासाठी अमेरिकी नौदल सज्ज होते, त्यातून छोट्या चकमकीतून पूर्ण क्षमतेचे युद्ध – तेही अण्वस्त्रयुद्ध सुरू होण्याचा धोका निर्माण झाला. पण अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी आणि रशियाचे नेते निकिता क्रुश्चेव्ह अखेरीस सबुरीने वागले आणि मोठ्या युद्धाचा धोका टळला. या पेचप्रसंगातूनच अमेरिका आणि रशिया यांच्या अत्त्युच्च नेतृत्वादरम्यान थेट संवादसंपर्क असावा या उद्देशाने हॉटलाइनची निर्मिती झाली. त्याचबरोबर, क्षेपणास्त्रे आणि अण्वस्त्रांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने चर्चा करण्याची निकडही तेव्हापासून दोन्ही देशांना भासू लागली.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Usa vs russia ukraine crisis cuban missile crisis cuban missile crisis history facts significance scsg 91 print exp 0122