USS Abraham Lincoln US Navy aircraft carrier: अमेरिकेची सर्वात मोठी विमानवाहू युद्धनौका ‘USS अब्राहम लिंकन’ (USS Abraham Lincoln) २६० दिवसांहून अधिक काळ अरबी समुद्रात तैनात आहे. मुदत संपल्यानंतरही या युद्धनौकेला माघारी बोलावल्याने जहाजावरील सुमारे ५,००० नौसैनिकांच्या आरोग्याचा आणि मानसिक ताणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
अन्नटंचाई, नौसैनिकांचे खालावलेले मनोबल
अमेरिकेच्या मध्यपूर्वेतील लष्करी कारवायांचे सर्वांत वरिष्ठ कमांडर आणि यूएस सेंट्रल कमांडचे प्रमुख अॅडमिरल ब्रॅड कूपर यांनी शनिवारी (१५ ऑगस्ट रोजी) अरबी समुद्रात तैनात असलेल्या USS अब्राहम लिंकनला भेट दिली. या युद्धनौकेवरील अन्नटंचाई, नौसैनिकांचे खालावलेले मनोबल आणि काहींनी केलेला आत्महत्येचा प्रयत्न या पार्श्वभूमीवर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

समुद्रात सलग २६० दिवसांहून अधिक काळ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धनौकेवरील प्रतिकूल परिस्थितीचे वृत्त फेटाळून लावले. दरम्यान, प्रशांत महासागरात तैनात असलेली USS जॉर्ज वॉशिंग्टन ही विमानवाहू युद्धनौका अरबी समुद्राच्या दिशेने रवाना झाल्याली असून तिच दीर्घकाळ तैनात असलेल्या ‘USS अब्राहम लिंकन’ची जागा घेईल, असे मानले जाते. चीनने त्यांच्या प्रादेशिक दाव्यांबाबत प्रशांत महासागर आणि अरबी समुद्राच्या परिसरात आक्रमक भूमिका घेतलेली असल्याने या परिसरात विमानवाहू युद्धनौका तैनात असणे, अमेरिकन नौदलाला महत्त्वाचे वाटते.

USS Abraham Lincoln aircraft carrier deployed in Arabian Sea | US Navy aircraft carrier operational stress and crew conditions | अरबी समुद्रात तैनात असलेली अमेरिकन युद्धनौका USS अब्राहम लिंकन | विमानवाहू युद्धनौकेवरील नौसैनिकांची परिस्थिती आणि INS विक्रांत
Carrier Strike Group सोबत USS अब्राहम लिंकन

विमानवाहू युद्धनौका एवढ्या महत्त्वाच्या का?

सोप्या भाषेत सांगायचे, तर विमानवाहू युद्धनौका म्हणजे समुद्रातील तरंगता हवाई तळच. जमिनीवरील लढाऊ विमाने शेकडो किंवा हजारो किलोमीटर दूर समुद्रावर मोहिमेसाठी जाऊ शकतात. मात्र मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यांना कुठेतरी मधेच उतरावे लागते. त्यासाठी इंधन, शस्त्रास्त्रे, देखभाल व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळही आवश्यक असते. त्यासाठीची ही सारी व्यवस्था घेऊनच विमानवाहू युद्धनौका फिरत असते.

मोबाइल एअरबेस

या युद्धनौकेवरून लढाऊ विमाने उड्डाण करून शत्रूच्या लक्ष्यांवर हल्ला करू शकतात, शत्रूची विमाने रोखू शकतात आणि आपल्या ताफ्याचे संरक्षण करू शकतात. तर हेलिकॉप्टर आणि अन्य विमाने पाणबुड्यांचाही शोध घेऊ शकतात. काही विशेष विमाने हवेतूनच ‘रडार स्टेशन’प्रमाणे काम करून दूरवरच्या हालचालींची माहिती देतात. त्यामुळे एखाद्या देशाच्या किनाऱ्यापासून हजारो किलोमीटर दूर पोहोचून विमानवाहू युद्धनौका मोबाइल एअरबेस म्हणून काम करू शकते.

USS अब्राहम लिंकनवर काय घडते आहे?

‘USS अब्राहम लिंकन’ला समुद्रात सलग आठ महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. नियोजित मर्यादेनुसार मे महिन्याच्या अखेरपर्यंत ती तैनात असणार होती. प्रत्यक्षात आता मुजत संपून तीन महिने उलटून गेल्यानंतरही ती अद्याप कार्यरत आहे. इराण आणि अमेरिका या दोन्हींकडून होर्मुझ सामुद्रधुनीची नाकेबंदी करण्यात आलेल्या परिसरातच सध्या ही युद्धनौका तैनात आहे. युद्धनौकेवर सुमारे ५,००० कर्मचारी असूनही टपाल, ताजी रसद आणि अन्य आवश्यक सामग्री पोहोचवणे दिवसेंदिवस कठीण होते आहे.

मानसिक तणावाबद्दल चिंता

गेल्या महिन्याभरात युद्धनौकेवरील परिस्थिती बिघडत असल्याचे वृत्त आले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठ अमेरिकी नौदल अधिकाऱ्यांसोबत झालेल्या ‘टाउन हॉल’मध्ये काही कुटुंबीयांनी नौसैनिकांच्या मानसिक तणावाबद्दल चिंता व्यक्त केली. दोन नौसैनिकांनी तर आत्महत्येचा प्रयत्न केल्याचेही त्याप्रसंगी सांगितले. भारतीय नौदलात ३५ वर्षांहून अधिक काळ सेवेत राहिलेले निवृत्त पाणबुडी अधिकारी कॅप्टन अनुराग बिसेन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना दीर्घकाळ समुद्रात राहण्याचा मानसिक ताण हा नौसैनिकांसाठी सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले. कुटुंबीयांपासून दीर्घकाळ दूर राहणे, संवादाचा अभाव, एकसुरी दिनक्रम आणि मनोरंजनाच्या मर्यादित साधनांचा तोचतोचपणा नौसैनिकांच्या मनोबलावर परिणाम करतो. बिसेन यांच्या मते, जमिनीचा स्पर्श दीर्घकाळ न होणे हाही नौसैनिकांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करणारा महत्त्वाचा घटक असतो. पाणबुडीतील नौसैनिकांसाठी तर दीर्घकाळ सूर्यप्रकाशापासून दूर राहावे लागत असल्याने हा परिणाम आणखी तीव्र होतो. त्यामुळे समुद्रात असताना नौसेनिकांच्या मनोबलावर सातत्याने लक्ष ठेवणे हे कमांड टीमसाठी अत्यंत महत्त्वाचे काम असते.

‘बुरशी लागलेले शॉवर आणि साबणही नाही…’

डेमोक्रॅटिक काँग्रेसमन माइक लेव्हिन यांनी ११ ऑगस्ट रोजी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, लष्करी कुटुंबांनी आपल्या नातेवाईकांना युद्धनौकेवर भेडसावणाऱ्या समस्यांबाबत माहिती दिली आहे. त्यामध्ये बुरशी लागलेले शॉवर, खराब स्वच्छतागृहे, अनेक आठवडे बंद असलेली लॉन्ड्री, दीर्घकाळ गरम पाणी उपलब्ध नसणे, तसेच एका जेवणात केवळ अर्धा कप भात आणि दोन टॉर्टिला मिळाल्याच्या तक्रारींचा समावेश होता. साबण, डिओडरंट आणि टूथपेस्टसारख्या मूलभूत वस्तूंचाही तुटवडा असल्याचा दावा करण्यात आला.

USS Abraham Lincoln aircraft carrier deployed in Arabian Sea | US Navy aircraft carrier operational stress and crew conditions | अरबी समुद्रात तैनात असलेली अमेरिकन युद्धनौका USS अब्राहम लिंकन | विमानवाहू युद्धनौकेवरील नौसैनिकांची परिस्थिती आणि INS विक्रांत
USS अब्राहम लिंकनवरील हेलिकॉप्टर्स

नौसैनिकांवर मोठा ताण

१५ ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या नौदलाचे कार्यवाहक सचिव हंग काओ यांनी सांगितले की, काही मानसिक आरोग्याशी संबंधित प्रकरणांवर उपचार सुरू आहेत. जीवितहानी झालेली नाही. ताजी रसद उपलब्ध नव्हती म्हणून जेवणाच्या नियोजनात बदल करण्यात आला, पण एकही जेवण कुणाचेही चुकले नाही. ऑपरेशनल धोका अधिक असल्याने मायदेशी फोन करण्यावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. दरम्यान, काओ यांनी हेही मान्य केले की या मोहिमेमुळे अमेरिकी नौसैनिकांवर मोठा ताण आला आहे.

विमानवाहू युद्धनौका आजही इतक्या महत्त्वाच्या का?

‘USS अब्राहम लिंकन’ नियोजित कालावधीपेक्षा तीन महिने अधिक तैनात होती. आता प्रशांत महासागरातील दुसरी विमानवाहू युद्धनौका तिची जागा घेण्यासाठी पाठवली जात आहे. यावरून अमेरिकेच्या जागतिक लष्करी रणनीतीत विमानवाहू युद्धनौकांना किती मोठे महत्त्व आहे, हे ते पुरते स्पष्ट होते. विमानवाहू युद्धनौका म्हणजे प्रचंड आकाराचे आणि सहज लक्षात येणारे लक्ष्य. ‘USS अब्राहम लिंकन’ची उंची साधारण २० मजली इमारतीएवढी आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि अत्याधुनिक पाणबुड्यांच्या काळात अशा प्रचंड युद्धनौकांवर अब्जावधी डॉलर खर्च करणे कितपत योग्य, असा प्रश्न काही संरक्षणतज्ज्ञ उपस्थित करतात. कारण शत्रूला एखादी विमानवाहू युद्धनौका बुडवण्यात यश आले तर लष्करी आणि आर्थिक नुकसान खूप मोठे असेल. तिच्यावर किमान हजाराच्या संख्येत नौसैनिक असतात. शिवाय अशा घटनेचा राजकीय परिणामही खूप मोठा असू शकतो, ते वेगळेच.

विमानवाहू युद्धनौका सहज बुडवता येतात का?

प्रत्यक्षात हे तितके सोपे नाही. अमेरिकेचीच नव्हे तर कोणत्याच नौदलाची विमानवाहू युद्धनौका एकटी समुद्रात फिरत नसते. तिच्याभोवती Carrier Strike Group म्हणजेच युद्धनौकांचा ताफा असतो. या ताफ्यात रडार आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्रांनी सज्ज विनाशिका व अन्य युद्धनौका, पाणबुड्या आणि रसदवाहू युद्धनौंकांचा समावेश असतो. विमानवाहू युद्धनौकेवरून उड्डाण करणारी विमानेही तिच्या सुरक्षेचा एक महत्त्वाचा भाग असतात. त्यामुळे शत्रूला केवळ एक क्षेपणास्त्र डागणे पुरेसे नसते. त्याला प्रथम ही संरक्षण व्यवस्था भेदून मार्ग काढावा लागतो. विमानवाहू युद्धनौकेच्या पुरेसे जवळ पोहोचून त्यानंतर लक्ष्यावर अचूक प्रहार करावा लागतो. शिवाय, क्षेपणास्त्राच्या प्रहारानंतर तिला लगेचच जलसमाधी मिळेल, असेही नाही. कारण
विमानवाहू युद्धनौकांवर आग विझवणे, पाणी शिरल्यास ते रोखणे, खराब झालेली यंत्रणा दुरुस्त करणे आणि हल्ल्यानंतरही जहाज कार्यरत ठेवणे यासाठी विशेष प्रशिक्षित पथके तयार असतात.

हल्ल्यानंतरही लढत राहणारी यंत्रणा

अमेरिकी नौदलाला या बाबतीत काही धडे प्रत्यक्ष आपत्तींमधून मिळाले आहेत. १९६७ साली ‘USS Forrestal’ वर लागलेल्या आगीत १३४ जणांचा मृत्यू झाला, १६१ जण जखमी झाले आणि २१ विमाने नष्ट झाली. या दुर्घटनेनंतर विमानवाहू युद्धनौकांवरील अग्निशमन, नुकसान नियंत्रण आणि दारुगोळा हाताळण्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल करण्यात आले. म्हणूनच विमानवाहू युद्धनौका ही केवळ विमानांना उड्डाण करता येईल, अशी युद्धनौका नसते तर हल्ल्यानंतरही लढत राहण्यासाठी तयार केलेली संपूर्ण युद्धव्यवस्थाच असते.

भारताकडे किती विमानवाहू युद्धनौका आहेत?

भारताकडे सध्या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत; INS विक्रमादित्य आणि स्वदेशी बनावटीची INS विक्रांत.
तर भारताच्या तिन्ही बाजूस किनारपट्टी असल्याने भारताला तीन विमानवाहू युद्धनौकांची गरज आहे, असे सामरिकतज्ज्ञांना वाटते.

INS विक्रांत : भारताची स्वदेशी ताकद

INS विक्रांत ही भारतीय नौदलाची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका आहे. ४५ हजार टन वजनाची ही युद्धनौका भारतात आतापर्यंत बांधण्यात आलेली सर्वांत मोठी युद्धनौका आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या बांधणीत सुमारे ७६ टक्के स्वदेशी यंत्रणांचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे २३ हजार टन पोलाद, २,५०० किलोमीटर लांबीच्या विद्युत केबल्स आणि १५० किलोमीटर पाइप्सचा समावेश आहे. ३४ लढाऊ विमाने वाहून नेण्याची ‘INS विक्रांत’ची क्षमता आहे. रशियन बनावटीची MiG-29K ही लढाऊ विमाने तिच्यावर तैनात करण्यात आली आहेत. सुमारे १,६०० जणांचे मनुष्यबळ असलेली ही युद्धनौका समुद्रातील एखाद्या छोट्या शहराप्रमाणेच कार्य करते. तिच्यावर दोन ऑपरेशन थिएटर्स, आयसीयू असलेले रुग्णालय, कार्यशाळा आणि तीन स्वयंपाकगृहे आहेत.

INS विक्रमादित्य : रशियन ‘अॅडमिरल गोर्शकोव्ह’ ते भारतीय युद्धनौका

INS विक्रमादित्य २०१३ मध्ये भारतीय नौदलात दाखल झाली. मूळची सोव्हिएत कालखंडातील Admiral Gorshkov ही युद्धनौका भारताने रशियाकडून खरेदी करून तिचे मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण केले.
या युद्धनौकेवर MiG-29K लढाऊ विमाने कार्यरत आहेत. विमानांच्या उड्डाणासाठी ‘स्की-जम्प’ आणि उतरण्यासाठी ‘अरेस्टर वायर’ प्रणालीचा वापर केला जातो.

INS विराट : भारताच्या विमानवाहू इतिहासातील महत्त्वाचे पर्व

‘विक्रमादित्य’ आणि ‘विक्रांत’पूर्वी भारतीय नौदलाची ताकद होती INS विराट. ब्रिटनच्या HMS Hermes या युद्धनौकेचे रूपांतर करून ती भारतीय नौदलात दाखल करण्यात आली. १९८७ साली ‘INS विराट’ भारतीय नौदलात दाखल झाली. श्रीलंकेतील भारतीय शांतिसेना मोहिमेतील Operation Pawan आणि त्यानंतर उत्तर अरबी समुद्रातील Operation Parakram मध्ये ‘विराट’ने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
२०१७ साली ती नौदल सेवेतून निवृत्त झाली.

विमानवाहू युद्धनौकांचे भवितव्य काय?

‘USS अब्राहम लिंकन’ची सलग २६० दिवसांहून अधिक तैनात राहिली. त्यानिमित्ताने सुरू झालेला वाद आधुनिक नौदलासमोरील एका मोठ्या प्रश्नाकडेही लक्ष वेधतो तो म्हणजे अब्जावधी डॉलर खर्चाच्या या महाकाय युद्धनौका क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि पाणबुड्यांच्या नव्या युगात किती काळ प्रभावी राहतील? एकीकडे, त्यांचा अवाढव्य आकार आणि किंमत शत्रूसाठी महत्त्वाचे लक्ष्य ठरते. दुसरीकडे, एका विमानवाहू युद्धनौकेसोबत असलेला संपूर्ण Carrier Strike Group, त्याची हवाई संरक्षणव्यवस्था, पाणबुड्या, लढाऊ विमाने आणि स्वतःची दीर्घ पल्ल्याची हवाईक्षमता यामुळे ती आजही समुद्रावरील तरंगता लष्करी तळ आणि सामरिक दबावासाठी अत्यंत प्रभावी साधन ठरते. असे असले तरी सध्याचा कळीचा प्रश्न म्हणजे सामरिक महत्त्व ठीकच, पण त्यावर असलेल्या नौसैनिकांचे अर्थात माणसांचे काय?