USS Gerald R. Ford aircraft carrier deployment records and Middle East crisis: सध्या ‘USS जेराल्ड आर. फोर्ड’ (USS Gerald R. Ford) ही विमानवाहू युद्धनौका सध्या अमेरिकेचे सर्वात मोठे शस्त्र ठरली आहे. २०२६ च्या एप्रिल महिन्यात या नौकेने २८० दिवस सलग तैनात राहण्याचा टप्पा पार केला असून, ती आता भूमध्य समुद्रातून लाल समुद्राच्या दिशेने कूच करत आहे. सागरी वर्चस्व आणि सामरिक राजकारणावर दबाव या दोन्ही अर्थांनी अमेरिका या विमानवाहू युद्धनौकेचा वापर करते आहे.
भूमध्य सागराकडून लाल समुद्राकडे सरकणारी ही USS Gerald R. Ford ही विमानवाहू नौका म्हणजे केवळ एक युद्धातील महत्त्वाचे लष्करी साधन नव्हे तर ती तंत्रज्ञान, राजकारण आणि जागतिक सामरिक समीकरणांचा केंद्रबिंदू ठरली आहे. या अमेरिकन विमानवाहू युद्धनौकेने २०२६ च्या एप्रिल महिन्यात २८० दिवस सलग तैनात असण्याचा टप्पा पार केला. दीर्घकाळ चालणारी युद्धमोहीम, सातत्याने युद्धपरिस्थितीत तैनात असणे आणि समुद्रावरची वेगळी युद्धनीती असा आक्रमक पवित्रा यानिमित्ताने पाहायला मिळतो आहे.
USS Gerald R. Ford आहे तरी काय?
फोर्ड ही अमेरिकेच्या नव्या पिढीतील विमानवाहू युद्धनौकांमधील अग्रभागी असणारी पहिली युद्धनौका आहे. २०१७ मध्ये सेवेत दाखल झालेली ही युद्धनौका ‘निमिट्झ’ वर्गाला पर्याय म्हणून विकसित करण्यात आली आहे. १००,००० टनांहून अधिक असलेले वजन, ३३७ मीटर लांबी आणि तब्बल १३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च यामुळे ती जगातील सर्वात मोठी आणि महागडी युद्धनौका मानली जाते.

इंधरभरणा न करताच दीर्घपल्ला
महत्त्वाचे म्हणजे ही विमानवाहू युद्धनौका अणुऊर्जेवर चालणारी असल्याने तिला पुनःपुन्हा इंधन भरण्याची गरज भासत नाही. त्यामुळे ती दीर्घकाळ समुद्रात कार्यरत राहू शकते, हेच तिचे सर्वात मोठे बलस्थान आहे. अन्यथा इतर युद्धनौकांना समुद्रात असताना टँकरनौकांद्वारे इंधन भरावे लागते किंवा मग कोणते तरी एक बंदर गाठून इंधनभरणा करावा लागतो. सर्वसाधारणपणे कोणतीही विमानवाहू युद्धनौका ही ‘कॅरिअर स्ट्राइक ग्रुप’चा भाग असते, या ताफ्यामध्ये विनाशिका (डिस्ट्रॉयर), पाणबुड्या आणि हवाई तुकडी यांचा समावेश असतो. म्हणजेच, ही एक गतीशील युद्धव्यवस्था असते.
USS Gerald R. Ford ची मोहीम विक्रमी का ठरते आहे?
USS Gerald R. Ford गेल्या २८० दिवसांहून अधिक काळ तैनात आहे. आणि याशिवाय ती एकूण ११ महिने तैनात राहील, अशी शक्यता आहे.
इतर युद्धनौकांबरोबरची तुलना:
- USS Nimitz — ३४१ दिवस (२०२१, कोविड कालखंड)
- USS Midway — ३२७ दिवस (व्हिएतनाम युद्ध)
- USS Abraham Lincoln — २९५ दिवस (२०२०)
या तुलनेत फोर्डचे तैनात असणे ही वेगळे आहे. कारण ती सध्या प्रत्यक्ष युद्धग्रस्त कालखंडात तैनात आहे.

सध्या फोर्ड कुठे आहे?
२०२६ च्या सध्या सुरू असलेल्या एप्रिल महिन्यात ही नौका भूमध्य समुद्रात असून ‘सेंटकॉम’ (CENTCOM) क्षेत्राकडे म्हणजेच लाल समुद्र आणि पर्शियन आखाताच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. क्रोएशियातील स्प्लिट बंदरात थांबून किरकोळ दुरुस्ती केल्यानंतर ती पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने कार्यरत झाली आहे. सध्या ती ‘कॅरिअर स्ट्राइक ग्रुप १२’चे नेतृत्व करत आहे, ज्यामध्ये USS Winston S. Churchill सारख्या युद्धनौका आणि प्रगत हवाई तुकडीचा समावेश आहे.
USS Gerald R. Ford च्या मोहिमांमध्ये पुढील बाबींचा समावेश आहे-
- हवाई हल्ले (एअर स्ट्राईक्स)
- ड्रोन हल्ले निष्प्रभ करणे
- सागरी सुरक्षा
- मित्र राष्ट्रांना मदत

इराण संघर्षात तिची भूमिका काय?
USS Gerald R. Ford ने फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या इराणविरोधातील अमेरिका-इस्रायल संयुक्त कारवायांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. लाल समुद्रातून ती मोठ्या प्रमाणात हवाई मोहिमा राबवत आहे. विमानवाहू युद्धनौका जमिनीवरील हवाई तळांवर अवलंबून न राहता त्यांच्यावर असलेल्या धावपट्टीमुळे थेट समुद्रातून कारवाई करू शकतात, हेच त्यांचे बलस्थान मानले जाते.
USS Gerald R. Ford चा तैनात असण्याचा कालखंड का लाबंला?
USS Gerald R. Ford चे तैनात असणे टप्प्याटप्प्याने वाढत गेले:
- १. आर्क्टिक आणि NATO सराव (२०२५)
- उत्तर ध्रुवीय भागात सराव मोहिमा.
- २. कॅरिबियन मोहीम
- व्हेनेझुएलाशी संबंधित कारवायांमध्ये सहभाग, ज्यात Nicolás Maduro यांची धरपकडही करण्यात आली.
- ३. मध्यपूर्वेतील तणाव
- इराणविरोधातील कारवायांसाठी तातडीने रवाना.
या बाबींमुळे तिचा तैनात असण्याचा कालावधी सुमारे वर्षभरापर्यंत वाढविण्यात आला.

ट्रम्प आणि USS Gerald R. Ford
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धनौकेला विशेष महत्त्व दिले आहे.
त्यांच्या दृष्टीने विमानवाहू नौका म्हणजे:
- अमेरिकन शक्तीचे प्रतीक
- गरज पडल्यास तत्काळ हल्ला करण्याची क्षमता
त्यांनी ‘डबल कॅरिअर’ रणनीतीचा आग्रह धरत फोर्डला USS Abraham Lincoln सोबत तैनात ठेवले आहे.
यातून एक स्पष्ट संदेश दिला जातो तो म्हणजे अमेरिका मागे हटणार नाही, असे ट्रम्प यांना वाटते.
फोर्डचे वेगळेपण
- ही युद्धनौका केवळ आकार किंवा वजनाने मोठी नाही तर ती अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे.
- EMALS प्रणाली
- विमान उड्डाणासाठी वाफेऐवजी विद्युत-चुंबकीय प्रणाली.
- Advanced Arresting Gear
- विमान सुरक्षितपणे उतरवण्यासाठी सुधारित यंत्रणा.
- लढाऊ विमानांची अधिक उड्डाणे
- दररोज अधिक तास हवाई मोहिमा शक्य.
- कमी कर्मचारी
- स्वयंचलनामुळे कमी मनुष्यबळ
यामुळे फोर्ड ही युद्धासाठीचा अतिवेगवान सज्ज प्लॅटफॉर्म ठरते.
विमानवाहू नौका आजही का महत्त्वाच्या?
आधुनिक क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या युगातही या नौका महत्त्वाच्या आहेत:
- १. त्यांचे अस्तित्व शत्रूला धडकी भरवणारे असते
- कोणत्याही देशाच्या सीमेत प्रवेश न करता लांबूनही त्या देशावर दबाव निर्माण करता येतो.
- २. लवचिकता
- क्षणात युद्ध किंवा शांतता दोन्ही भूमिका घेणे शक्य होते.
- ३. राजकीय संदेश
- कॅरिअर अर्थात विमानवाहू युद्धनौका म्हणजे स्पष्ट इशारा अर्थात युद्धाचे बिगुलच.
दीर्घकाल तैनात असण्याचा तोटा
अशा मोहिमांचे दुष्परिणामही असतात:
- कर्मचाऱ्यांना येणारा थकवा
- देखभालीवरील ताण
- उपकरणांवरही ताण येतो
अमेरिकी नौदल सहसा ६-७ महिन्यांसाठी तैनात राहण्याची मर्यादा सांभाळते. ११ महिन्यांसाठी तैनात ही अपवादात्मक परिस्थिती आहे.
पुढे काय?
लवकरच USS George H.W. Bush ही नौका फोर्डची जागा घेईल. त्यानंतर फोर्ड दुरुस्ती आणि विश्रांतीसाठी परत येईल.
फोर्ड तैनात असणे म्हणजे
- बहुआयामी युद्धाची तयारी
- तंत्रज्ञानाधारित लष्करी वर्चस्व
गतीशीलतेचे प्रतीक
USS Gerald R. Ford च्या माध्यमातून अमेरिकेने इराणसह जगाला दिलेला संदेश
- अमेरिका दीर्घकाळ युद्ध लढवू शकते
- जगभर नौदलाचे अस्तित्व राखून आहे
- आणि गरज पडल्यास निर्णायक कारवाई करू शकते
म्हणूनच USS जेराल्ड आर. फोर्ड चे महत्त्व समजून घेणे संयुक्तिक ठरते.
