मूत्राशयाचा संसर्ग हा महिलांमधील सर्वांत सामान्य आजार मानला जातो. लघवी करताना जळजळ आणि वेदना होणे ही त्याची प्रमुख लक्षणे मानली जातात. काही वर्षांपासून महिलांमध्ये या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. असुरक्षित लैंगिक संबंध हे त्यामागचे प्रमुख कारण मानले जात असले तरीही त्याला पुरुषांची अस्वच्छताही जबाबदार असल्याचे समोर आले आहे. प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रायन फर्नांडो यांच्याशी संवाद साधताना महिलांमध्ये वाढणाऱ्या मूत्राशयाचा संसर्गाची अनेक कारणे स्पष्ट केली आहे. त्याविषयीचा हा आढावा…
मूत्राशयाचा संसर्गाची अनेक प्रकरणे
अमेरिकेत दरवर्षी मूत्राशयाच्या संसर्गाची अडीच लाखांहून अधिक प्रकरणे नोंदवली जातात. जगभरातील १५ कोटींहून अधिक महिला, तसेच तरुणी या संसर्गामुळे त्रस्त असल्याचे सांगितले जात आहे. मूत्राशयाचा संसर्ग हा एक अतिशय सामान्य आजार असल्याने तो कोणत्याही वयोगटातील महिलांना होण्याची शक्यता असते. भारतातील महिलांमध्येही या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढले असून, मागील चार वर्षांमध्ये तब्बल तीन हजार १९० महिलांना मूत्राशयाचा संसर्ग झाल्याचे एका आकडेवारीतून समोर आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे यामध्ये तरुणींचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आले आहे. मूत्राशयामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्णावर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाचे मूत्राशय स्वच्छ केले जाते.
मूत्राशयाचा संसर्गाची लक्षणे कोणती?
मुंबईतील कामा रुग्णालयात मागील सहा वर्षांमध्ये तीन हजार १९० महिलांपैकी ७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करण्यात आल्याचे तेथील डॉक्टरांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. महिलांमध्ये मूत्राशयामध्ये संसर्ग होण्यामागे विविध कारणे आहेत. मात्र, त्यामागे असुरक्षित लैंगिक संबंध हे महत्त्वाचे कारण असल्याचे सांगितले जाते. या कारणामुळेच महिलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक दिसून येते. वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होणे, लघवी करताना जळजळ होणे किंवा तीव्र वेदना होणे, लघवीमधून रक्तस्स्त्राव होणे आणि तीव्र ताप ही मूत्राशयाचा संसर्गाची मुख्य कारणे मानली जातात. या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
आणखी वाचा : प्रेमविवाहासाठी आता पालकांची संमती बंधनकारक? गुजरात सरकारच्या निर्णयामुळे वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा?
मूत्राशयाच्या संसर्गाला पुरुष जबाबदार?
फक्त लैंगिक संबंधांमुळेच महिलांच्या मूत्राशयात जीवाणू प्रवेश करतात हा समज अत्यंत चुकीचा आहे. पुरुषांच्या लघवी करण्याचा चुकीच्या सवयीमुळेही महिलांमध्ये या संसर्गाचा धोका वाढण्याची दाट शक्यता असते. घरातील टॉयलेटचा वापर करताना पुरुषांनी स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. लघवी करताना टॉयलेट सीटवर पडलेल्या थेंबांमुळे जीवाणू तयार होतात आणि त्यामुळे महिलांना मूत्राशयाचा संसर्ग होऊ शकतो, असे डॉ. मिकी मेहता यांनी स्पष्ट केले. यादरम्यान पुरुषांच्या तुलनेत महिलांना मूत्राशयाचा संसर्ग होण्याची अधिक शक्यता का असते? याचे कारणही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
महिलांना संसर्गाचा जास्त धोका का?
महिलांच्या मूत्रमार्गाची नळी जननेंद्रियाच्या अगदी वरच्या टोकाला असते. शरीरसंबंधाच्या वेळी याच भागातून जीवाणूंचा शिरकाव होण्याची सर्वाधिक शक्यता असते, असे मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली जोशी यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. या संसर्गापासून बचाव करण्यासाठी त्यांनी महिलांना एक महत्त्वाचा सल्लाही दिला आहे. लैंगिक संबंधानंतर लगेच लघवी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे मूत्रमार्गात शिरलेले घातक विषाणू शरीराबाहेर वाहून जाण्यास मदत होते आणि मूत्राशयाच्या संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो, असे डॉ. जोशी यांनी स्पष्ट केले.
मूत्राशयाचा संसर्ग टाळण्यासाठी काय करावे?
कुटुंबातील महिलांना मूत्राशयाचा संसर्ग होऊ नये म्हणून पुरुषांनी काही मूलभूत स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे अत्यंत गरजेचे आहे. लैंगिक संबंध ठेवण्याआधी पुरुषांनी आपले जननेंद्रिय स्वच्छ ठेवायला हवे. त्याशिवाय लैंगिक संबंधानंतर महिलांनीही ताबडतोब स्वत:चे जननेंद्रिय पाण्याने धुऊन काढावे. घरातील टॉयलेटचा वापर करताना पुरुषांनी स्वच्छता राखावी. लघवी करताना टॉयलेट सीटवर पडलेल्या थेंबांमुळे जीवाणू तयार होतात. त्यामुळे वेळोवेळी टॉयलेट सीट साफ ठेवणे गरजेचे आहे. महिलांनी शक्यतो सार्वजनिक शौचालयाचा वापर टाळायला हवा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. मूत्राशयाचा संसर्ग टाळण्यासाठी महिलांनी स्वच्छ अंतर्वस्त्रे परिधान करणे अत्यंत आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : डोनाल्ड ट्रम्प यांनी नियुक्त केलेले न्यायाधीश त्यांच्याच विरोधात का गेले? कारण काय?
तज्ज्ञांनी कोणती चिंता व्यक्त केली?
जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्गावर औषधे प्रभावी ठरत नसल्याने प्रतिजैविक प्रतिरोधाची स्थिती उद्भवते. देशात प्रतिजैविक प्रतिरोधामुळे मूत्रमार्ग संसर्गाचा धोका अधिक वाढला आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. प्रतिजैविकांच्या अतिरेकी वापरावर मर्यादा आणण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे देण्यात आला. गेल्या वर्षी पुणे शहरात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेत तज्ज्ञांनी देशातील मूत्रमार्ग संसर्ग आणि प्रतिजैविक प्रतिरोधाच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा केली होती. त्यावेळी तज्ज्ञांनी मूत्राशयाचा संसर्ग हा देशातील सर्वांत सामान्य जीवाणू संसर्ग असल्याचे सांगितले होते. या संसर्गाकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिलांना शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, अतिदक्षता विभागात दाखल करावे लागते आणि कधी कधी त्यांना व्हेंटिलेशनची आवश्यकता भासते, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मूत्राशयाच्या गंभीर संसर्गाच्या वाढत्या प्रसाराला तोंड देण्यासाठी संशोधन करण्याची आवश्यकता आहे. त्यातून प्रतिजैविकांची नवीन उपचार पद्धती विकसित करता येईल. देशात मूत्रमार्ग संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी जागरूकता वाढविणे, नवीन उपचार पर्याय, स्वच्छता सुधारणे व प्रतिजैविक प्रतिरोधक समस्येचे निराकरण करणे या बाबी महत्वाच्या असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले होते.
