ब्रिटनमध्ये सध्या लठ्ठ बेरोजगार तरुणांना लठ्ठपणा कमी करण्याची लस देण्याची जोरदार तयारी सुरू आहे. या बेरोजगार तरुणांना सडपातळ करून पुन्हा रोजगारक्षम करता येईल, अशी भूमिका मांडली जात आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि आरोग्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे असल्याचे खुद्द तेथील पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे म्हणणे आहे. आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी सरकारने वेगळ्या पद्धतीने विचार करावा, अशी सूचना आरोग्य मंत्री वेस स्ट्रिटींग यांनी मांडली होती. त्यांनीच लठ्ठ बेरोजगार तरुणांना लठ्ठपणा कमी करण्याची लस देऊन पुन्हा कामावर पाठविण्याची कल्पना सुचविली आहे.

पार्श्वभूमी काय?

जगातील आघाडीच्या एली लिली या औषधनिर्माण कंपनीने मॉन्जेरो ही लस विकसित केली आहे. सरकारने पुढील पाच वर्षांत ग्रेटर मँचेस्टरमध्ये या लशीच्या चाचण्या घेण्याची घोषणा केली आहे. या लशीच्या चाचण्यांसाठी एली लिली कंपनी २७.९ कोटी पौंड गुंतवणूक करीत आहे. पुढील तीन वर्षांत सुमारे अडीच लाख जणांना मॉन्जेरो लस दिली जाणार आहे. वजन कमी करणाऱ्या या लशीचा फायदा आरोग्य व्यवस्थेला होणार आहे. लठ्ठपणामुळे आजारी पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होऊन आरोग्य व्यवस्थेवरील आर्थिक भार कमी होणार आहे. याच वेळी लठ्ठपणातून सुटका झालेले तरुण पुन्हा रोजगारक्षम होऊन अर्थव्यवस्थेत योगदान देतील.

हेही वाचा >>>भारताला ९४ वर्षांमध्ये विज्ञानाचं एकही नोबेल पदक का मिळू शकलं नाही?

लठ्ठपणाची समस्या किती गंभीर?

ब्रिटनमध्ये राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या वतीने २०२२ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, प्रौढांपैकी २९ टक्के लठ्ठ आणि ६४ टक्के जास्त वजन असलेले आहेत. लठ्ठपणाशी निगडित आजारामुळे राष्ट्रीय आरोग्य सेवेला वर्षाला ११ अब्ज पौंड खर्च करावा लागत आहे. याचबरोबर लठ्ठपणा हा टाइप २ मधुमेह होण्यास कारणीभूत ठरत आहे. राष्ट्रीय आरोग्य सेवेकडून मधुमेहाच्या रुग्णांवरील उपचारांसाठी वर्षाला १० अब्ज पौंड खर्च होत आहे. हा खर्च राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या एकूण तरतुदीच्या तब्बल ९ टक्के आहे.

मॉन्जेरो काम कशी करते?

टीरझेपॅटाईड या औषधाचा वापर रक्तशर्करा कमी करण्यासाठी केला जातो. त्याचे ब्रँड नेम मॉन्जेरो हे आहे. हे औषध शरीरातील जीएलपी-१ आणि जीआयपी या दोन रिसेप्टरना सक्रिय करून इनक्रेटिन्स संप्रेरकाची पातळी वाढविते. त्यामुळे शरीराला गरज असेल त्या वेळी जास्त इन्सुलिन निर्मिती करण्यास मदत होते. याचबरोबर यकृतामधून तयार होणाऱ्या शर्करेचे प्रमाण कमी होते. तसेच, अन्नपचनाची प्रक्रिया मंद होते. या सर्व एकत्रित क्रियेमुळे शरीरातील रक्तशर्करा आणि एचबीए१सीची पातळी कमी होते. ही लस ७२ आठवड्यांसाठी घेतलेल्या व्यक्तींनी १० टक्के वजन घटविल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा >>>Massive Door In Antartica: अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?

लस कोण घेऊ शकते?

लठ्ठपणा कमी करण्याची लस टाइप २ मधुमेह असलेले १८ वर्षांवरील सर्व घेऊ शकतात. त्यात आतापर्यंत तीन प्रकारची औषधे घेऊनही मधुमेह नियंत्रणात न आलेले रुग्ण आणि आतापर्यंत दुष्परिणामामुळे औषधे घेऊ न शकलेल्या रुग्णांचा समावेश आहे. याचबरोबर बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ३५ किलो प्रतिचौरस मीटर असलेल्या व्यक्तींनाही ही लस दिली जाऊ शकते. कारण इन्सुलिनच्या वापरामुळे रक्तशर्करा कमी होऊन अशा रुग्णांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ही लस घेतल्यास त्यांच्या दैनंदिन कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही. त्याचबरोबर लठ्ठपणा कमी होऊन त्यांचे आरोग्य सुधारून दैनंदिन कामकाजातही सुधारणा दिसेल.

दुष्परिणाम कोणते?

मॉन्जेरोचेही इतर औषधांप्रमाणे दुष्परिणाम आहेत. याचा अर्थ प्रत्येकालाच त्याचे दुष्परिणाम जाणवतील असे नाही. या औषधामुळे आजारी पडणे, अपचन, बद्धकोष्ठता आणि जुलाब असे दुष्परिणाम दिसून येत आहेत. याच वेळी या औषधामुळे रक्तशर्करेचे प्रमाण कमी होण्याचा धोका आहे. रुग्ण या औषधासोबत इन्सुलिन अथवा रक्तशर्करा कमी करण्याचे औषध घेत असेल, तर असे घडू शकते. त्यामुळे मॉन्जेरो घेणाऱ्या रुग्णांना मधुमेहावरील इतर औषधे न घेण्याचा सल्ला दिला जातो.

उत्पादकता वाढणार?

ब्रिटनमध्ये लठ्ठपणामुळे आजारी पडल्याने रजा घेणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण अधिक आहे. लठ्ठपणामुळे आलेल्या आजारपणात कर्मचाऱ्याला वर्षाला सरासरी चार दिवस अतिरिक्त रजा घ्यावी लागते. याच वेळी अनेक जण लठ्ठपणामुळे काम करू शकत नाहीत. त्यामुळे लठ्ठपणा कमी झाल्यास कर्मचाऱ्यांच्या आजारपणाच्या रजा कमी होतील. त्यातून त्यांची उत्पादकता वाढून अर्थव्यवस्थेला फायदा होईल, असे मत व्यक्त केले जात आहे. अनेक जणांचे आयुष्य या लशीमुळे बदलून जाईल आणि त्यांना पुन्हा कामावर जाता येईल, असा विश्वास आरोग्यमंत्री वेस स्ट्रिटींग यांनी व्यक्त केला आहे.

sanjay.jadhav@expressindia.com

Story img Loader