ज्या देशाकडे सागरी शक्ती तोच व्यापाराचा राजा, या न्यायाने पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र सागरी शक्ती होईल; पुढील दोन दशकानंतर जग जेव्हा भारताकडे महाशक्ती म्हणून पाहील त्यामध्ये वाढवण बंदराचा वाटा सिंहाचा ठरेल अशा प्रकारची वक्तव्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडच्या अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये केली आहेत. देशाच्या व राज्याच्या आगामी काळातील प्रगतीमध्ये या बंदराचे महत्त्व कितपत आहे, याचा हा आढवा.

वाढवण बंदर कसे विकसित होणार आहे?

पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराच्या उभारणीसाठी ७६,२२० कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड प्रमुख बंदरांपैकी एक म्हणून ते विकसित केले जात आहे. या प्रकल्पामध्ये नऊ कंटेनर टर्मिनल, बहुउद्देशीय मालवाहू धक्के, द्रव मालवाहू धक्के, रो-रो सुविधा आणि संबंधित सागरी पायाभूत सुविधांचा विकास समाविष्ट आहे. त्यात  भू-पुनर्प्राप्ती आणि लाटरोधक कामांचाही समावेश आहे. हे बंदर ‘लँडलॉर्ड पोर्ट मॉडेल’वर आधारित असून मुख्य पायाभूत सुविधा सरकारी संयुक्त उपक्रमाद्वारे बांधल्या जातात आणि टर्मिनलचे कामकाज सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे (पीपीपी) खाजगी संस्थांना भाडेतत्त्वावर दिले जाते. या प्रकल्पामध्ये समुद्रातील १,४४८ हेक्टर क्षेत्राचे भरावाद्वारे आणि १०.१४ किलोमीटर लांबीच्या सागरी लाटारोधकाचे (ऑफशोअर ब्रेकवॉटर) तसेच कंटेनर, मालवाहू साठवणूक क्षेत्रांचे बांधकाम केले जाईल.

वाढवणची क्षमता आणि इतर बंदरांच्या तुलनेत अपेक्षित फायदे काय?

पूर्णपणे विकसित झाल्यावर हे बंदर भारतातील सर्वात मोठे आणि जागतिक स्तरावरील पहिल्या १० बंदरांमध्ये समाविष्ट होईल अशी अपेक्षा आहे. या बंदराची एकूण माल हाताळणी क्षमता सुमारे ३०० दशलक्ष टन प्रति वर्ष (एमटीपीए) इतकी असेल. त्यात अंदाजे २३.२ दशलक्ष वीस फुटी कंटेनर (टीइयु) हाताळणी क्षमतेचा समावेश आहे. प्रत्येक टर्मिनलची धक्का लांबी (क्वे) १००० मीटर असेल. या बंदरात २० मीटरचा खोल ड्राफ्ट असेल, ज्यामुळे ते मोठ्या कंटेनर जहाजांना हाताळण्यास सक्षम होईल आणि प्रमुख जागतिक सागरी मार्गांवर भारताची उपस्थिती वाढेल. निर्माण होणाऱ्या क्षमतांमुळे भारत-पश्चिम आशिया- युरोप आर्थिक कॉरिडॉर आणि आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉरमार्फत होणाऱ्या आयात-निर्यात व्यापारालाही मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. जागतिक दर्जाच्या सागरी टर्मिनल सुविधांमुळे सार्वजनिक-खाजगी भागीदारीला प्रोत्साहन मिळेल आणि कार्यक्षमता व आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुदूर पूर्व, युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका आणि अमेरिका यांच्या दरम्यानच्या आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर धावणाऱ्या मुख्य मेगा जहाजांना हाताळण्यास सक्षम असे अत्याधुनिक टर्मिनल तयार होईल.

भूसंपादन, रस्ते बांधकाम आणि इतर बाबींसंदर्भातील सद्यस्थिती

किनारपट्टीजवळील भराव आणि किनारा संरक्षणाची कामे तसेच सागरी लाटरोधकाचे कामे मंजूर करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सार्वजनिक-खाजगी भागीदारी – हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल (एचएएम) चौकटीअंतर्गत राबविण्यात येणारे ड्रेजिंग, सागरी भराव आणि संरक्षण बंधाऱ्यांचे पॅकेज सध्या निविदा प्रक्रियेच्या टप्प्यात आहे. बंदराचा वेळेवर विकास आणि कार्यान्वयन सुलभ करण्यासाठी पायाभूत सुविधांचे हे महत्त्वपूर्ण घटक टप्प्याटप्प्याने हाती घेतले जात आहेत. रस्ते आणि रेल्वे जोडणीसाठीचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले असून लवकरच बांधकाम सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

या बंदराच्या परिसरात कोणती संभाव्य केंद्रे विकसित होण्याची शक्यता आहे?

बंदराचे सामरिक स्थान लॉजिस्टिक्स पार्क, औद्योगिक समूह आणि गोदाम केंद्रांच्या वाढीस चालना देईल. प्रस्तावामध्ये ते पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकेला अखंडपणे जोडलेले आहे, ज्यामुळे पालघर जिल्हा आणि लगतच्या महाराष्ट्र- गुजरात सीमेवर जलद शहरी आणि व्यावसायिक विकासाला चालना मिळेल असे सांगितले जाते.

कोणत्या पायाभूत सुविधांचा विकास आणि त्यांचा अंदाजित खर्च किती?

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एनएचएआय) वाढवणला राष्ट्रीय महामार्ग -४८ आणि बडोदा -मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडणारा ३२ किमी लांबीचा महामार्ग बांधला जात आहे. तसेच पश्चिम रेल्वेद्वारे डीएफसीसाठी एक समर्पित रेल्वे जोडणी बांधली जात आहे. समृद्धी महामार्गाला या बंदराशी जोडण्याच्या दृष्टीने इतर मार्गदेखील विकसित केले जात आहेत.

रोजगाराच्या संभाव्य संधी

बंदर आणि त्याच्याशी संबंधित आर्थिक घडामोडींमुळे कालांतराने अंदाजे १२ लाख प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम, माल हाताळणी, टर्मिनल संचालन, अभियांत्रिकी, सागरी सेवा, सुरक्षा, लॉजिस्टिक्स, रेल्वे, ट्रकिंग आणि वेअरहाउसिंग या क्षेत्रांमध्ये नोकऱ्या निर्माण होतील. कोल्ड चेन, मत्स्यव्यवसाय, कृषी-प्रक्रिया, हॉस्पिटॅलिटी आणि स्थानिक व्यवसायांमुळे विशेषतः पालघर आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांसाठी अधिक रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण होतील, असे सरकारकडून सांगितले जाते.

प्रकल्पापुढील मुख्य आव्हाने कोणती?

या महत्त्वाकांशी बंदर प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार, शेतकरी व इतर घटकांचा विरोध असून अनेक बाबी अजूनही न्यायप्रविष्ट आहेत. इतर आव्हानांमध्ये गुंतागुंतीचे सागरी बांधकाम, जोडणीसाठी भूसंपादन, वैधानिक आणि वन-संबंधित प्रक्रिया, मान्सूनच्या मर्यादा आणि अनेक संस्थांमधील समन्वय यांचा समावेश आहे. मच्छीमारीची उपलब्धता, उपजीविका, नुकसान भरपाई आणि पर्यावरण संरक्षण यांसंबंधीच्या स्थानिक चिंतांकडेही काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी, वैज्ञानिक नियोजन, पर्यावरणीय सुरक्षा उपाय, नुकसान भरपाई, कौशल्य विकास आणि बाधित समुदायांशी नियमित संवाद साधून या समस्यांचे निराकरण केले जात असल्याची माहिती सरकारकडून देण्यात येत आहे.

याशिवाय भूसंपादन प्रक्रियेत अनेक सातबारा उताऱ्यांवर मयत झालेल्या खातेदारांची नावे चढवण्यात आली नसून गोळा सातबारा उतारामधील भागधारकांचे वैयक्तिक वाट्याचे प्रमाण सोडवण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेक जमिनीच्या भूसंपादन प्रक्रियेतील प्रकरण कौटुंबिक वादात असल्याने या बाबी न्यायप्रविष्ट आहेत. पहिल्या टप्प्यात बंदरापासून बोईसर पूर्वेकडील भागात असणाऱ्या दगड खाणीपर्यंत व नंतरच्या टप्प्यात मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गापर्यंत उभारण्यात येणारे महामार्ग व लोहमार्गाच्या करिता राबविण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेत काही अडचणी आहेत.

वाढवण बंदर ‘गेम चेंजर’ ठरण्याचा दावा का?

हे बंदर देशासाठी एक प्रमुख सागरी प्रवेशद्वार म्हणून उदयास येण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारताची व्यापारी स्पर्धात्मकता लक्षणीयरीत्या वाढेल आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वाढीस हातभार लागेल. वाढवण हे जागतिक स्तरावरील १० सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असेल ज्यामुळे भारताच्या व्यापाराच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. या बंदरामुळे पालघर जिल्ह्यासह राज्याचा मोठ्या प्रमाणात विकास होणे अपेक्षित असून आगामी काळात देशात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाण्यासाठी वाढवण बंदराचे योगदान लक्षणीय राहील, असा विश्वास सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.

niraj.raut@expressindia.com