प्रत्येक शहराला किंवा राज्याला एका अशा ‘आयडॉल’ची गरज असते, जो तिथल्या तरुणांना पारंपरिक सामाजिक चौकटीबाहेर पडून जग जिंकण्याची हिंमत देतो. मग ते कला क्षेत्र असो, उद्योग असो वा क्रीडा, जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिखर गाठते, तेव्हा ती संपूर्ण राज्याच्या स्वप्नांना पंख देते. हे आपण भारतीय क्रिकेटमध्ये वारंवार पाहिले आहे. उत्तर प्रदेशच्या अलिगढमधील गॅस सिलेंडर वाटप करणाऱ्याचा मुलगा ‘रिंकू सिंग’ जेव्हा ‘आयपीएल’मध्ये एकाच ओव्हरमध्ये ५ सलग षटकार मारून ‘नॅशनल फिनिशर’ बनतो, तेव्हा तो अख्ख्या उत्तर प्रदेशच्या गल्लीबोळातील गरिबीशी लढणाऱ्या तरुणांचा चेहरा बनतो.
‘मोहम्मद सिराज’ जेव्हा हैदराबादच्या रस्त्यांवर ऑटो चालवणाऱ्या वडिलांचे स्वप्न घेऊन थेट टीम इंडियाचा हुकमी एक्का बनतो, तेव्हा तो तेलंगणाच्या प्रत्येक गरीब मुलाला जागतिक स्वप्न पाहण्याची ताकद देतो. ही माणसं केवळ मैदानात जिंकत नाहीत, तर आपापल्या राज्याची ओळख बदलतात. पण जेव्हा आपण ‘बिहार’चा विचार करतो, तेव्हा मुख्य प्रवाहातील माध्यमं अनेकदा गुन्हेगारी, राजकीय अस्थिरता आणि मागासलेपणाचेच चित्र उभे करतात. अशा नकारात्मकतेच्या गर्तेत अडकलेल्या आणि केवळ सरकारी नोकऱ्यांच्या (UPSC/BPSC) पारंपरिक वाटांनाच यशाचा निकष मानणाऱ्या बिहारच्या मातीत, १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी हा असाच एक क्रांतिकारी ‘आयडॉल’ बनून उदयास आला आहे. ताजपूरसारख्या एका छोट्या गावातून आलेल्या या मुलाने इथल्या तरुण पिढीला विश्वास दिला आहे की, जर तुमच्या मनगटात ताकद असेल तर कोणत्याही गॉडफादरशिवाय बिहारचा तरुणही जगावर अधिराज्य गाजवू शकतो!
संजीव यांनी पाहिलेलं ते धाडसी स्वप्न आज वैभवने मैदानात उतरून पूर्ण केलं आहे. १५ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याने ‘इंडियन प्रीमियर लीग’मध्ये (IPL) राजस्थान रॉयल्ससाठी आपल्या धडाकेबाज फलंदाजीने धुमाकूळ घातला. बहुतांश क्रिकेटपटूंना त्यांच्या अखंड कारकिर्दीत जमले नाही, असे अनेक विक्रम त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी सहजतेने मोडले. ‘आयपीएल’मधल्या ख्रिस गेलच्या सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडणे असो, अनकॅप्ड (uncapped) खेळाडू म्हणून ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक धावा करणे असो, पॉवरप्लेमध्ये ५०० धावा करणारा पहिला खेळाडू बनणे असो किंवा ‘आयपीएल’मध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणे असो, सूर्यवंशीने हे सर्व लीलया पेलले आहे.
राजस्थान रॉयल्ससाठी सलामीला येऊन स्फोटक खेळी खेळणाऱ्या सूर्यवंशीने अवघ्या ४७ चेंडूत ९६ धावा झळकावल्या. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार मारले. त्याचा सलामीचा जोडीदार १ धावेवर बाद झाला आणि यष्टीरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेल अवघ्या ६ चेंडूत ७ धावा करून माघारी परतला. संघाची अवस्था २ बाद ९ अशी नाजूक असताना, सूर्यवंशीने रवींद्र जडेजाच्या साथीने राजस्थानचा डाव सावरला. हा केवळ डाव सावरणारा खेळ नव्हता, तर बिहारच्या मातीतील जिद्द जगाला दाखवणारा लढा होता.
हा प्रवास वाटतो तितका सोपा नक्कीच नव्हता. समस्तीपूरच्या ताजपूरसारख्या एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास एका मोठ्या बंडखोरीपेक्षा कमी नव्हता. ताजपूरच्या खराब रस्त्यांवरून, कधी पावसाने तुंबलेल्या गटारांमधून वाट काढत संजीव आपल्या अवघ्या ८ वर्षांच्या मुलाला घेऊन रोज १५ किलोमीटर दूर असलेल्या पटेल फिल्डवर जात असत. वैभवची भूक एवढ्यावर भागणारी नव्हती. तासन् तास नेटमध्ये फलंदाजी करूनही न थकणाऱ्या वैभवला अधिक स्पर्धात्मक वातावरण मिळावे म्हणून संजीव यांनी नंतर दर वीकेंडला ९० किलोमीटर दूर पटणाची वाट धरली. खचाखच भरलेल्या, डळमळीत बसेसचा तो प्रवास केवळ अंतराचा नव्हता, तर तो बिहारच्या एका नव्या भविष्याला आकार देणारा प्रवास होता. घरची परिस्थिती बेताचीच, पण वैभवची आई रात्री ११ वाजता झोपून पहाटे २ वाजता उठून त्याच्यासाठी जेवण बनवायची, वडिलांनी स्वतःची नोकरी बाजूला ठेवली आणि मोठ्या भावाने घरची जबाबदारी उचलली. संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब या एका स्वप्नासाठी अहोरात्र जळत होते.
आज जेव्हा ‘आयपीएल’च्या लखलखत्या दिव्यात अख्खं जग या १५ वर्षांच्या मुलाचा ‘बॅट स्विंग’ आणि त्याचा बुद्धसदृश शांत आत्मविश्वास पाहतं, तेव्हा त्या प्रत्येक फटक्यामागे ताजपूरच्या त्या काळ्या मातीची आणि वडिलांच्या त्या अपूर्ण राहिलेल्या मुंबईतल्या स्वप्नांची ताकद असते. राहुल द्रविड यांचा कानमंत्र आणि शुभमन गिलने दाखवलेली खेळाडू वृत्ती, या दोन्ही गोष्टी वैभवच्या पुढील प्रवासासाठी शिदोरी ठरणार आहेत. ख्रिस गेलने दिलेली ‘न्यू सिक्स मशीन’ ही पावती किंवा ब्रायन लारासारखी शैली असल्याच्या जगभरातल्या चर्चा, या सगळ्या कौतुकाच्या वर्षावातही वैभव कमालीचा शांत आणि जमिनीवर आहे.
ताजपूरसारख्या शांत गावात पूर्वी फक्त सुगीच्या दिवसांत ट्रॅक्टरचा आवाज यायचा. आज तिथे पहाटे शेजारीच असलेल्या शतकोटी जुन्या शिवमंदिराच्या घंटेसोबतच, एका पत्र्याच्या शेडमधून लेदरचा चेंडू बॅटवर आदळल्याचा ‘टक्क’ असा गोड आवाज येतो. तो आवाज वैभव गावात आल्याची साक्ष देतो.
कधीकाळी जगाच्या नकाशावर नकारात्मक कारणांसाठी चर्चिल्या गेलेल्या बिहारला आता एक सकारात्मक चेहरा मिळाला आहे. संथ गतीने आणि भूतकाळात जगणाऱ्या या प्रदेशाला वैभवच्या रूपाने क्रिकेटचे ‘भविष्य’ गवसले आहे. ताजपूरमध्ये आता एक ‘त्रयी’ (Holy Trinity) पूर्ण झाली आहे, पहिलं ते शतकं जुनं शिवमंदिर, दुसरं वैभवने रक्ताचं पाणी करून गाजवलेली ती क्रिकेटची नेट, आणि तिसरा स्वतः वैभव… जो केवळ ताजपूरचा राहिला नसून, पारंपरिक चौकटी मोडून जग जिंकू पाहणाऱ्या अख्ख्या बिहारचा नवा ‘नजराणा’ आणि आयडॉल बनला आहे!
