Vasai-Virar Nalasopara Rain Update : आठवडाभर सुरू असलेल्या धुवाधार पावसाने मुंबईसह महानगर प्रदेशातील शहरांना झोडपले आहे. वसई, विरार व नालासोपारा या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाच फुटांपर्यंत पाणी साठले आहे. त्यामुळे वाहतुकीसोबतच वीजपुरवठ्यालाही मोठा फटका बसला आहे. संततधारेमुळे पश्चिम रेल्वे सेवा पूर्णत: खोळंबली आहे. दरवर्षी वसई, विरार, नालासोपारा या पट्ट्यात पूरस्थिती का ओढवते? याची वातावरणीय आणि भौगोलिक कारणे नेमकी काय आहेत? याचा सविस्तर आढावा घेऊया.

ग्राऊंडवरील स्थिती काय

मुसळधार पावसामुळे वसई-विरार परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले आहे. वसई पूर्वेतील मधुवन सिटी तसेच नालासोपारा पूर्वेतील सेंट्रल पार्क, ओसवाल नगरी व आचोळे रोडसह अनेक सखल भागांमध्ये पाच फुटांपर्यंत पाणी साठले आहे. त्यामुळे अनेक रहिवासी घरांमध्येच अडकून पडले असून, दैनंदिन जीवनावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे.

त्याशिवाय नायगाव, वसई, विरार आणि नालासोपारा या परिसरातील सुमारे ९० टक्के भागात ४८ तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित झालेला आहे. परिणामी इंटरनेट सेवाही खंडित झाली आहे. मोबाईल फोनला चार्जिंग नसल्याने नागरिकांना कोणाशी संपर्क करणे अशक्य झाले आहे. अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवांवर या परिस्थितीचा विपरीत परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

नालासोपारा आणि वसई रोड स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उपनगरी रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. काही लोकल गाड्या अत्यंत संथ गतीने धावत असल्या तरी लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत किंवा त्यांचा प्रवास विरारच्या पुढेच थांबवण्यात आला आहे. रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने अनेक प्रवाशांना कंबरेपर्यंत भरलेल्या पाण्यातून रेल्वे रुळांवरून वाट काढावी लागच असल्याचे भीषण चित्र आहे.

दरम्यान, पूरस्थितीचा सामना करण्यासाठी वसई-विरार महानगरपालिकेने आपत्कालीन यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लावली आहे. बचाव पथकही जोमाने काम करत आहेत.

जोरदार पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी ट्रॅक्टर आणि दोरांच्या साह्याने बाहेर काढले जात आहे. पूरसदृश परिस्थित दूषित पाणी आणि विद्युत प्रवाहाचा धोका असल्याने नागरिकांनी पाण्यात उतरणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार रात्री उशिरापर्यंत वसई, विरार या भागांत मध्यम ते मुसळधार पाऊस कायम होता. तसेच पहाटेपासून मेघगर्जनेसह पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

पश्चिम रेल्वे ठप्प

रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेने लोकल मार्गात अंशत: बदल केले आहेत. काही गाड्या मार्गातच थांबवल्या जात आहेत; तर काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे, ज्यामुळे कामाच्या दिवसांत नागरिकांचा खोळंबा झाला आहे.

दरम्यान, नागरिकांनी घराबाहेर पडण्यापूर्वी अपडेट तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रेल्वेच्या १३९ हेल्पलाइनवर संपर्क साधून किंवा पश्चिम रेल्वेच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) खात्यावरून मेगाब्लॉक, पाणी साठल्यामुळे झालेला विलंब आणि रेल्वे सेवेतील बदलांची माहिती घेण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. लोकल गाड्यांच्या अनियमिततेमुळे वसई रोड व भाईंदरसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

आजचे हवामान कसे असणार

प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजदेखील पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. सुमारे ८० टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

त्याशिवाय आठवडाभर मान्सून सक्रिय राहणार असल्याने अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळतील, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे सध्या पाण्याखाली गेलेल्या सखल भागांतील पाणी तातडीने ओसरण्याची शक्यता कमी आहे. परिणामी जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागू शकतो.

वसई-विरारमध्ये वारंवार पूरस्थिती का निर्माण होते?

वसई-विरार परिसराची भौगोलिक रचना या परिस्थितीला कारणीभूत मानली जाते. वसई-विरार परिसराच्या पूर्वेला तुंगारेश्वरच्या डोंगररांगा तर पश्चिमेला वसई खाडी आणि अरबी समुद्र आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यानंतर डोंगरांवरून मोठ्या वेगाने वाहून येणारे पाणी थेट सखल निवासी भागांच्या दिशेने येते आणि काहीच वेळेत अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचते.

त्याशिवाय वसई आणि नालासोपारा परिसरातील अनेक वसाहती नैसर्गिक मिठागरांच्या (सॉल्ट पॅन) परिसरात किंवा त्यांच्यालगत विकसित झाल्या आहेत. हे भाग आधीपासूनच सखल असल्याने मुसळधार पावसात मिठागरे पूर्णपणे पाण्याखाली जातात. परिणामी पाण्याचा निचरा होण्यासाठी अतिरिक्त जागा उपलब्ध राहत नाही आणि आजूबाजूच्या निवासी भागांमध्ये याचा मोठा फटका बसतो.

पर्यावरण अभ्यासकांच्या मते, नियोजनातील त्रुटी आणि पायाभूत सुविधांवरील वाढता ताण हेही वसई-विरारमधील पूरस्थितीमागील महत्त्वाचे कारण ठरत आहे. अलीकडच्या काळात कृत्रिमरीत्या उंचावलेल्या भूभागावर अनेक गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात आले. मात्र, जुने रेल्वेमार्ग, प्रमुख रस्ते आणि अंतर्गत जोडरस्त्यांची उंची वाढवण्यात आलीच नाही. परिणामी मुसळधार पावसात रस्त्यांवरूनच पाण्याचा निचरा होत असतो आणि काही वेळातच परिसर जलमय होतो.

वसई-विरार परिसर नोकरदार वर्गासाठीचा निवासी पर्याय ठरत आहे, त्यामुळे येथील लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे अनेक निवासी वसाहती कृत्रिमरीत्या उभ्या राहत आहेत. मात्र, या वाढीच्या तुलनेत रस्ते, जलनिस्सारण व्यवस्था आणि इतर नागरी पायाभूत सुविधांचा विस्तार अपेक्षित वेगाने झाला नाही. त्यामुळे प्रत्येक मुसळधार पावसानंतर या परिसराला पाणी साठणे आणि वाहतूक विस्कळीत होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.