Agnivesh Agarwal Death Sudden Cardiac Arrest During Recovery: अमेरिकेत स्किइंग करताना झालेल्या अपघातानंतर उपचार घेत असताना वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल याचे अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. वयाच्या अवघ्या ४९व्या वर्षी, प्रकृती सुधारत असताना असा अनपेक्षित मृत्यू कसा होऊ शकतो, हा प्रश्न सामान्य नागरिकांपासून वैद्यकीय तज्ज्ञांपर्यंत सर्वांनाच अस्वस्थ करणारा आहे. स्वतः अनिल अग्रवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर यासंदर्भात माहिती दिली. अपघातानंतर न्यूयॉर्कमधील माऊंट सायनाय रुग्णालयात अग्निवेश उपचार घेत होता. त्याची प्रकृती स्थिर होती, सुधारणा दिसत होती. मात्र, अचानक आलेल्या Cardiac arrest ने क्षणार्धात चित्र बदलले!
अचानक हृदयविकाराचा झटका येणे म्हणजे नेमकं काय?
हृदयाची धडधड अचानक थांबते किंवा त्यात अडथळे येतात त्यावेळी हृदय शरीरातील रक्त पंप करू शकत नाही, त्यालाच Cardiac arrest असं म्हटलं जात. परिणामी मेंदू आणि इतर महत्त्वाच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचणे बंद होते. काही मिनिटांतच ही स्थिती जीवघेणी ठरते. यात सर्वात धोकादायक बाब म्हणजे बहुतांश वेळा कोणतीही पूर्वसूचना मिळत नाही. म्हणूनच डॉक्टर याला Sudden Cardiac Arrest म्हणतात. ही अवस्था हार्ट अटॅकपेक्षा वेगळी असते. रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला की, हार्ट अटॅक येतो, तर Cardiac arrest मध्ये हृदयाची विद्युत प्रणालीच कोलमडते.
Cardiac arrest चे मूळ वैद्यकीय कारण काय?
अचानक येणारा Cardiac arrest हे अॅरिदमिया (Arrhythmia) म्हणजे हृदयाच्या ठोक्यांतील गंभीर बिघाडामुळे होतो. यातील सर्वात धोकादायक प्रकार म्हणजे व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन, या अवस्थेत हृदयाच्या खालच्या कप्प्यांमधून निर्माण होणारे विद्युत संकेत अनियमित होतात. हृदय फक्त थरथरते, पण रक्त पंप करत नाही. जर काही मिनिटांत CPR आणि डिफिब्रिलेटरचा वापर झाला नाही, तर मृत्यू अटळ ठरतो.
अपघातानंतर सुधारणा होत असतानाही धोका का कायम असतो?
सामान्यतः रुग्ण स्टेबल झाला किंवा सुधारणा दिसू लागली की, धोका टळल्याचे गृहीत धरले जाते. मात्र वैद्यकीय दृष्टिकोनातून ही केवळ अर्धीच गोष्ट आहे. अपघातानंतर शरीरात अनेक अंतर्गत प्रक्रिया सुरू असतात, ज्या बाहेरून दिसत नाहीत. डॉक्टरांच्या मते, ट्रॉमा रुग्णांमध्ये रुग्णालयात होणारे Cardiac arrest बहुतेक वेळा हृदयाशी थेट संबंध नसलेल्या कारणांमुळे होतात.
कोणती कारणे Cardiac arrest कडे नेतात? (Cardiac Arrest Symptoms in Marathi)
१. मोठ्या प्रमाणावरील रक्तस्राव (Hemorrhage)
अपघातानंतर अंतर्गत रक्तस्राव लक्षात न आल्यास रक्ताचे प्रमाण झपाट्याने कमी होते. रक्त हे ऑक्सिजन वाहून नेण्याचे माध्यम असल्याने, त्याचा थेट परिणाम हृदयाच्या कार्यक्षमतेवर होतो.
२. श्वसनव्यवस्थेत अडथळा (Respiratory insufficiency)
छातीला झालेली इजा, फुफ्फुसांचे नुकसान, श्वसनमार्गात अडथळा किंवा मेंदूवरील परिणाम यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. ही स्थिती थेट Cardiac arrest कडे नेऊ शकते.
३. इलेक्ट्रोलाइट असंतुलन
पोटॅशियम, सोडियम किंवा कॅल्शियमसारख्या घटकांचे प्रमाण अचानक बदलले, तर हृदयाची विद्युत प्रणाली बिघडू शकते.
४. संसर्ग आणि सेप्सिस
जखमांमधून झालेला संसर्ग संपूर्ण शरीरात पसरला, तर रक्तदाब घसरतो आणि हृदय अचानक निकामी होण्याचा धोका वाढतो.
५. रक्ताच्या गाठी किंवा फॅट एम्बोलिझम
हाडे तुटल्यानंतर किंवा दीर्घकाळ हालचाल न झाल्यास रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तयार होतात. या गाठी फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास अचानक मृत्यूही होऊ शकतो.
६. छातीला थेट इजा (Direct cardiac damage)
जोरदार आघातामुळे हृदयाच्या स्नायूंना किंवा प्रमुख रक्तवाहिन्यांना थेट नुकसान होऊ शकते.
लक्षणे दिसतात का?
काही वेळा Cardiac arrestच्या आधी चक्कर येणे, धडधड वाढल्यासारखी वाटणे, छातीत वेदना, श्वास घेण्यास त्रास, मळमळ यासारखी लक्षणे दिसू शकतात. परंतु, अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता Cardiac arrest येतो. मात्र तज्ज्ञ स्पष्ट सांगतात, अनेक प्रकरणांमध्ये कोणतीही पूर्वसूचना न देताही Cardiac arrest येतो.
या घटनेतून काय धडा मिळतो?
अपघातानंतर रुग्ण बरा होत असला, तरी शरीर आतून तणावाखाली असते. म्हणूनच अशा रुग्णांचे सतत निरीक्षण, नियमित तपासण्या, आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था अत्यंत महत्त्वाची असते. अचानक हृदयविकाराचा झटका कोणालाही, कधीही, अगदी बरे होत असतानाही येऊ शकतो. जागरूकता आणि वेळेवर उपचार हेच प्राण वाचवू शकतात.
