-डॉ. प्राची मोघे
Valentine’s Day And Concept of Vedic Love: वैदिक काळातील प्रेमाची संकल्पना केवळ एका भावनेपुरती मर्यादित नसून, ती विश्वाला एकत्र बांधणारी एक मूलभूत ऊर्जा आहे. प्रेम ही एक आदिम नैसर्गिक प्रेरणा/भावना आहे. पण वैदिक काळात विधी, संस्कार याद्वारे या नैसर्गिक भावनेला सामाजिकतेची डूब देण्यात आली. प्रेम आणि विवाह हा निसर्ग आणि संस्कृती यांना जोडणारा एक दुवा होता. प्रेम हे त्याच्या मूळ स्वरूपात केवळ रोमँटिक संबंधांमध्येच नाही, तर कौटुंबिक बंध, सामाजिक सौहार्द आणि जीवनाप्रती असलेल्या निष्ठेमध्येही दिसून येते. ही संकल्पना आपण काम (इच्छा), स्नेह (जिव्हाळा) आणि सामंजस्य (सौहार्द) या तीन दृष्टिकोनातून अधिक समजून घेऊ शकतो.
काम: आदिम इच्छा
वैदिक संदर्भात, ‘काम हे मनोकामनांचे पहिले बीज मानले जाते. ही तीच सर्जनशील ऊर्मी आहे ज्यामुळे विश्वाची निर्मिती झाली. वेदांमध्ये शारीरिक आकर्षणाकडे दुर्लक्ष केलेले नाही. सौंदर्याचे कौतुक करणारी आणि जोडीदाराच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणारी अनेक सुक्ते यात आहेत.
शारीरिक प्रेमाला पृथ्वी आणि आकाश यांच्यातील मीलनाचे एक प्रतीक मानले जात असे. शारीरिक प्रेम हे आरंभीच्या काळात महत्त्वाचे असतेच पण आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ते प्रेम मनोकायिक आणि अंतिमतः ते दैवी / आध्यात्मिक प्रेम असा त्याचा विकास होत असतो. प्रेमाचा हा विश्वव्यापी विकास खूप मनोवेधक असतो.

स्नेह (जिव्हाळा ) / भावनिक सखोलता
खरे तर, वेदाने टिपल्याप्रमाणे मानवी जीवनाचे सारच प्रेमाच्या या बहुआयामी रूपावर अवलंबून आहे, ज्यामध्ये शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही आयामांचा समावेश होतो. प्रेम म्हणजे केवळ स्त्री-पुरुषाचे आकर्षण नाही, तर त्यात समाजातील एकता आणि निसर्गाप्रती असलेली ओढ यांचाही समावेश आहे. प्रेमाच्या शारीरिक आणि भावनिक पैलूंमधील हे मूलभूत द्वैत वेदांतील मानवी संबंधांच्या चित्रणाचा पाया आहे.
प्रेमातील गुंतागुंत वेदांना मान्य
बहुतेक सजीव प्राणी प्रामुख्याने शारीरिक स्तरावर आकर्षण अनुभवत असताना, मानवाकडे भावनिक सखोलतेची एक अद्वितीय क्षमता आहे, ज्यामुळे प्रेम केवळ शारीरिक संबंधांच्या पलीकडे जाऊ शकते. वेदांनी यावर भर दिला आहे की, मानवाकडे ‘हृदय’ (भावनाप्रधान जाणीव) आहे. प्रेम हे केवळ त्वचेच्या स्पर्शापुरते मर्यादित न राहता आत्म्यापर्यंत पोहोचणे अपेक्षित होते. वेद ही गुंतागुंत मान्य करतात. म्हणूच वेदांमध्ये आपल्याला अशी सूक्ते आढळतात ज्यात प्रेमाच्या शारीरिक आणि भावनिक दोन्ही पैलूंना समान महत्व आहे आणि दोन्ही पैलू एकमेकांत छान गुंफले आहेत.
मैत्री:
विवाहाच्या अनेक मंत्रांमध्ये पती-पत्नीला “सात पावले सोबत चालणारा मित्र” म्हटले आहे. यावरून हे स्पष्ट होते की दीर्घकालीन प्रेमाचा पाया परस्पर आदर आणि बौद्धिक मैत्री हा होता.
मम व्रते ते हृदयं दधामि मम चित्तमनु चित्तं ते अस्तु । – (अर्थ: मी तुझे हृदय माझ्या व्रताशी (कर्तव्याशी) जोडतो; तुझे चित्त माझ्या चित्ताशी एकरूप होवो.) येथे ‘हृदय’ (भावना) आणि ‘चित्त’ (बुद्धी/विचार) या दोन्ही स्तरांवर ऐक्याची मागणी केली आहे. प्रेमाची उत्कटता या मंत्रात दिसते
प्रेमाची परिणीती विवाह संस्कारात होणे अपेक्षित आहे. अथर्ववेदात विवाहाकडे केवळ एक करार म्हणून न पाहता, दोन जीवांचे आणि कुटुंबांचे विलीनीकरण म्हणून पाहिले जाते. अथर्ववेदातील विवाह सूक्त ( कांड १४) भागीदारी आणि तादात्म्य याचे उत्तम उदाहरण आहे. एकात्मिक दृष्टिकोन हा पाया असल्याने शरीर आणि मन यांना वेगळे न मानता प्रेमाला एक ‘पूर्ण अनुभव’ मानले गेले आहे.
वैदिक सप्तपदी
- वैदिक काळातील ‘सप्तपदी’ हा विधी मानवी प्रेमाच्या सर्व आयामांना एकत्र गुंफतो. त्यातील प्रत्येक पाऊल मानवी प्रेमाच्या अनुभवाचे प्रतिनिधित्व करते:
- १. अन्न – शारीरिक पोषण
- २.शक्ती- मानसिक आणि शारीरिक आरोग्य
- ३.संपत्ती- साधनसामग्री
- ४. सुख – भावनिक समाधान
- ५.प्रजा-जैविक सातत्य
- ६.ऋतू-निसर्गाशी सुसंगतता
- ७.मैत्री- आध्यात्मिक आणि चिरंतन मैत्री
हे वैदिक मंत्र केवळ व्यक्तींमधील स्नेह प्रतिबिंबित करत नाहीत, तर नात्यांमध्ये अपेक्षित असलेल्या भूमिका आणि जबाबदाऱ्या देखील प्रकट करतात. वेदातील मानवी प्रेमाचे चित्रण त्या काळातील वैदिक समाजाची मूल्ये, नियम आणि श्रद्धा यांवर प्रकाश टाकते. या सुक्तांचा अभ्यास केल्यामुळे त्या काळी प्रेमाकडे कसे पाहिले जात असे, कसे व्यक्त केले जात असे आणि सांस्कृतिक चौकटीत ते कसे गुंफलेले होते, याची जाणीव होते.
उदाहरणार्थ, अथर्ववेद लिंगांमधील गतिशीलता (dynamics between genders) शोधतो आणि सामाजिक सुसंवाद टिकवण्यासाठी भागीदारी आणि वैयक्तिक योगदान या दोन्ही गोष्टींवर भर देतो.
सामाजिक ऐक्य (Social Cohesion):
प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधील आकर्षण नसून समाजाला एकत्र बांधणारा धागा आहे. ती केवळ खाजगी बाब नसून तिचे सामाजिक परिणामही महत्त्वाचे होते.

नैतिक मार्गदर्शक:
हे वेद केवळ मंत्र नसून नात्यात कसे वागावे, याचे नैतिक धडे देतात. वैदिक काळात, प्रेमाचा उपयोग उपजत प्रेरणेचे (Instinct) रूपांतर नैतिकतेत (Ethics) करण्यासाठी केला गेला. विधींच्या माध्यमातून प्रेमाला पवित्र स्वरूप देऊन, मानवी जीवनातील ही सर्वात शक्तिशाली भावना ‘लोकमंगलासाठी’ (ऋत – विश्वव्यापी सुव्यवस्था) कशी वापरता येईल, हे वेदांनी शिकवले.
दैवी संकल्पना
जेव्हा प्रेमात स्वार्थ पूर्णपणे संपतो आणि केवळ समर्पण उरतं तेव्हा ते प्रेम दैवी होतं.
अपेक्षाशून्य भक्ती: जिथे काही मिळवण्याची इच्छा उरत नाही.
अद्वैत: जिथे “मी” आणि “तू” हे दोन वेगळे अस्तित्व न राहता एकरूप होतात.
साक्षीभाव: समोरची व्यक्ती जवळ असो वा नसो, तिच्या सुखातच स्वतःचं सुख मानणं.
तो भौतिकतेचा स्पर्श नव्हता…
भौतिकतेच्या परिघात जेव्हा प्रेम अडकलेले असते, तेव्हा केवळ ‘मिळवण्याची’ ओढ आणि जिद्द असते. पण जेव्हा प्रेमाचा रंग दैवी होऊ लागतो, तेव्हा स्वतःला हरवून समोरच्याला ‘जपणं’ सुरू होतं. राधा-कृष्णाचं नाते असो वा मीराबाईंची आस, त्यात भौतिकतेचा स्पर्श नसून होता तो दैवी श्वास. प्रेम म्हणजे देहाकडून विदेही होण्याकडे जाणारी वाट, जिथे संपतो ‘मी’ पणा आणि सुरू होतो अद्वैताचा थाट. प्रेमाचा हा प्रवास खरोखरच विलक्षण असतो. जेव्हा आपण ‘भौतिक’ जगाकडून ‘दैवी’ जगाकडे वळतो, तेव्हा प्रेमाची व्याख्या बदलून जाते.
दैवी प्रेम हे ‘ध्येय’
माणसाच्या आयुष्यात प्रेमाचा उदय सहसा ‘भौतिक’ स्तरावर होतो. एखादा चेहरा आवडणं, कोणाचं बोलणं भावणं किंवा कोणाच्या अस्तित्वामुळे सुरक्षित वाटणं, ही या प्रवासाची पहिली पायरी आहे. इथे ‘मोह’ असतो, ‘अपेक्षा’ असते आणि ‘माझेपण’ जपण्याची ओढ असते. हे प्रेम देहाशी आणि रूपाशी बांधील असतं. पण जसजसा काळ सरतो, तसतसं हे प्रेम परिपक्व होऊ लागतं. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीच्या दोषांसह त्यांचा स्वीकार करतो, तेव्हा भौतिकतेचे पडदे गळून पडतात. इथे सुरू होतो ‘मानसिक’ आणि ‘भावनात्मक’ प्रवास. भौतिक प्रेम ही ‘सुरुवात’ आहे, तर दैवी प्रेम हे ‘ध्येय’ आहे. देहाच्या आकर्षणातून सुरू झालेला हा प्रवास जेव्हा आत्म्याच्या समाधानावर येऊन थांबतो, तेव्हाच प्रेमाचं सार्थक होतं.

