अपघाताला कारण ठरणार्या गोष्टींची माहिती चालकाला आधीच कळावी आणि अपघात, मनुष्यहानी टाळता यावी, या हेतूने वाहनांमध्ये टप्प्याटप्प्याने ‘व्ही-टू-व्ही कम्युनिकेशन’ यंत्रणा बंधनकारक करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे…
‘व्ही-टू-व्ही’ म्हणजे काय?
‘व्हेइकल टू व्हेइकल कम्युनिकेशन’ (व्ही-टू-व्ही) अर्थात एका वाहनाचा अन्य वाहनांशी असलेला संपर्क. ऑक्टोबर २०२८पासून ही व्ही-टू-व्ही यंत्रणा प्रत्येक नव्या वाहनांमध्ये स्थापित करणे बंधनकारक असेल. याबाबतचा एक महत्त्वाचा प्रस्ताव केंद्र सरकारने तयार केला आहे. ही यंत्रणा कशी काम करेल, ती ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट सिस्टीमहून (ॲडास) कशी वेगळी असेल आणि रस्ते सुरक्षेत तिचा किती महत्त्वाचा वाटा असेल? त्यातून एकसंध वाहतूक कशी कार्यान्वित होईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. समजा, समोरील वाहनाने अचानक ब्रेक लावल्यानंतर वा ड्रायव्हरच्या नजरेला पडण्यापूर्वी एखादी रुग्णवाहिका लांब अंतरावर असताना गाडीच्या डॅश बोर्डवर तातडीने डिजिटल संदेश मिळेल. रस्त्यावर लगतच्या वाहनांमध्ये बिनतारी संपर्काद्वारे वेग, वाहनाची स्थिती, दिशा इत्यादी माहितीची प्रत्यक्ष देवाण-घेवाण अधिक प्रभावी करणारे तंत्रज्ञान म्हणजे ‘व्ही-टू-व्ही कम्युनिकेशन’.
सरकारचा प्रस्ताव काय आहे?
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने सर्वच- म्हणजे दुचाकी तसेच हलक्या, मध्यम व प्रमाणित मालवाहतूक करणार्या चारचाकी वाहनांमध्ये ‘व्ही-टू-व्ही कम्युनिकेशन’ पद्धती बंधनकारक करण्यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. १ ऑक्टोबर २०२८ पासून या तंत्रज्ञानाचा पहिला टप्पा सुरू केला जाईल. यासाठी भारताच्या केंद्रीय वाहन नियम १९८९मध्ये दुरुस्ती केली जाईल. प्रकल्पाचा एकंदर खर्च पाच हजार कोटी, तर प्रत्येक वाहनामागे सुमारे पाच ते सात हजार रुपये खर्च येईल, असा प्राथमिक अंदाज आहे.
‘व्ही-टू-व्ही’ सध्याच्या ‘ॲडास’हून वेगळी कशी?
वाहनातील कॅमेरा, रडार व इतर संवेदी उपकरणांच्या (सेन्सर) आधारे ‘ॲडास’ अर्थात ‘ॲडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट’ यंत्रणा ही रस्त्यावरील धोका निर्धारित करते. ‘व्ही टू व्ही कम्युनिकेशन’ त्याहून वेगळे आहे. या पद्धतीत चालकाच्या नजरेत न येणार्या धोक्यांबाबत दोन वाहने एकमेकांशी ‘बोलू’ लागतील. म्हणजे, एखाद्या वळणावर, मोठी वाहतूक कोंडी वा धूसर वातावरणात संभाव्य धोका ओळखून सुरक्षाविषयक संदेशांचे तातडीने वहन करतील. यात व्ही-टू-व्ही ही ‘ॲडास’पेक्षा काही पटींनी प्रगत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. ‘ॲडास’चे एकेकटे सेन्सर धोका निश्चित करू शकत नाहीत.
‘व्ही-टू-व्ही’ यंत्रणा कशी काम करेल?
प्रस्तावित रचनेअंतर्गत कारखान्यातच सेल्युलर व्हेइकल-टू-एव्हरीथिंग (सी-व्हीटूएक्स) तंत्रज्ञानावर आधारित ऑन-बोर्ड युनिट बसवले जातील. ही यंत्रणा ५.८७५ ते ५.९२५ गिगाहर्ट- इतक्या प्रगत स्पेक्ट्रमच्या बळावर कार्यान्वित होईल. वाहनातील ही उपकरणे लगतच्या वाहनांशी सुरक्षेशी संबंधित माहितीची सातत्याने देवाण-घेवाण सुरू ठेवतील. त्यात अचानक ब्रेक, वाहनांतील टकरीचा धोका, विरुद्ध दिशेने येणारे वाहन आणि आपत्कालीन स्थितीत मदत पुरवणार्या वाहनांच्या (रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने) माहितीचा समावेश आहे. भारतातील वाहने व सुट्या भागांसाठी नियम तयार करणार्या ‘वाहन उद्योग मानक (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टॅण्डर्ड-‘एआयएस’) समितीने ‘वाहन उद्योग मानक-२३०’ या ठरावात (एआयएस-२३०) अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता स्पष्ट केली होती.
या यंत्रणेची गरज किती?
भारतात २०२५ मध्ये रस्ते अपघातांत एक लाख ८३ हजार माणसे बळी पडली; तर २०२६ मध्ये २७ जुलैपर्यंत बळींची संख्या ६२,१२२ वर पोहोचली. सर्वाधिक अपघातांमध्ये मानवी चुकांचा वाटा अधिक आहे. ‘व्ही-टू-व्ही’च्या साह्याने वाहनांमध्ये प्रत्यक्ष स्थितीतील माहितीची देवाण-घेवाण सुरू ठेवल्यास चालकाला धोक्याचा अंदाज येईल आणि संभाव्य अपघात टाळता येईल. वाहनांमध्ये ‘व्ही-टू-व्ही’ यंत्रणा कार्यान्वित झाल्यास त्याआधारे ‘व्हेइकल-टू-इन्फ्रास्ट्रक्चर’ (वाहन ते पायाभूत सुविधा संपर्क) यंत्रणाही उभारता येईल. यात संवेदी उपकरणे (सेन्सर) विद्युत खांब, पुलांचे कठडे, उड्डाणपुले आणि संरक्षक कठड्यांना बसवली जातील. त्यामुळे वाहनांना संभाव्य धोक्याची माहिती अधिक वेगाने आणि प्रभावीरीत्या मिळू शकेल. यातून सर्वोत्तम वाहतूक व्यवस्थापन व सॉफ्टवेअर निर्धारित केलेल्या वाहन निर्मितीला चालना मिळेल. पूर्णपणे तंत्रज्ञानावर आधारलेली रस्ते सुरक्षा, ही त्याहून महत्त्वाची आणि आश्वासक मजल असेल.
govind.degvekar@expressindia.com
