What is V2V : भारतात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय बनले आहे. २०२५ मध्ये रस्ते अपघातांमध्ये देशात १.८३ लाख लोकांचा मृत्यू झाला. मागील वर्षाच्या तुलनेत ही संख्या सुमारे ६ हजारांनी जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकार आता नवी रस्ते सुरक्षा यंत्रणा आणण्याच्या तयारीत आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) लवकरच व्हेईकल-टू-व्हेईकल (V2V) संवाद यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेने पावलं उचलत आहे. या तंत्रज्ञानामुळे रस्त्यावर धावणाऱ्या एका वाहनाला दुसऱ्या वाहनाशी वायरलेस पद्धतीने संवाद साधता येणार आहे. एखाद्या वाहनासमोर अचानक अपघाताचा धोका निर्माण झाल्यास जवळच्या किंवा मागील वाहन चालकाला त्याचा इशारा मिळू शकतो.

२२ जुलै २०२६ रोजी रस्ते वाहतूक मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन (सुधारणा) नियम, २०२६ चा मसुदा प्रसिद्ध केला. त्यावर ३० दिवसांत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. आता या सूचना आणि हरकतींचा विचार केला जाणार आहे.

व्ही टू व्ही संवाद प्रणाली नेमकी काय आहे?

व्ही टू व्ही म्हणजे Vehicle-to-Vehicle communication. सोप्या भाषेत सांगायचं तर, वाहनं वायरलेस पद्धतीने वेग, स्थान, दिशा आणि वेगातील बदल यांसारख्या गोष्टींवर एकमेकांशी संवाद साधू शकतात.

यासाठी वाहनांमध्ये ऑनबोर्ड सुरक्षा यंत्रणा (OBU) बसवण्यात येईल. ही यंत्रणा इतर वाहनांशी थेट वायरलेस पद्धतीने माहितीची देवाणघेवाण करेल. या तंत्रज्ञानासाठी Cellular Vehicle-to-Everything (C-V2X) वापरलं जाईल. त्यासाठी 5.875 GHz ते 5.925 GHz हा फ्रिक्वेन्सी बँड वापरण्यात येणार आहे.

१० जून २०२६ रोजी दूरसंचार विभागाने या फ्रिक्वेन्सी बँडच्या वापरासाठी परवान्याची आवश्यकता काढून टाकली. त्यामुळे वाहन उत्पादकांना नव्या वाहनांमध्ये व्ही टू व्ही सिस्टीम बसवण्यासाठी या स्पेक्ट्रमचा वापर करता येणार आहे. या यंत्रणेमुळे भारतातील वाहन उत्पादन आणि रस्ते व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.

प्रस्तावित नियमांमध्ये काय आहे?

प्रस्तावित नियमांमुळे वाहनांमधील सुरक्षा तंत्रज्ञानात मोठा बदल होणार आहे. सध्या वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रगत चालक सहाय्य प्रणाली (ADAS) सारख्या सुरक्षा यंत्रणांपलीकडे जाऊन आता दोन वाहनांना एकमेकांशी जोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

रस्त्यावर व्ही टू व्ही प्रणाली बसवलेली वाहनं आणण्यापूर्वी त्यांच्यात कोणती किमान तांत्रिक आणि सुरक्षा वैशिष्ट्यं असावीत, हे नियमांमध्ये निश्चित केलं जाणार आहे. तसेच वाहन उत्पादकांनी व्ही टू व्ही सिस्टीम कधीपर्यंत बसवायची, याची मुदतही ठरवण्यात आली आहे.

१ ऑक्टोबर २०२७ किंवा त्यानंतर तयार होणाऱ्या L , M आणि N या श्रेणीतील वाहनांमध्ये व्ही टू व्ही प्रणाली बसवली असेल, तर या वाहनांना AIS-230 च्या तांत्रिक निकषांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

यामध्ये:
L श्रेणी – दुचाकी आणि तीनचाकी
M श्रेणी – कार आणि बस
N श्रेणी – मालवाहू वाहनं

AIS-230 मध्ये काय आहे?

AIS-230 म्हणजे Automotive Industry Standard-230. हे व्ही टू व्ही प्रणालीसाठीचं महत्त्वाचं तांत्रिक मानक आहे. यात रेडिओची कार्यक्षमता, फ्रिक्वेन्सीची स्थिरता, रिसिव्हरची संवेदनशीलता, सायबर सुरक्षा, संवादाची सुरक्षा, इलेक्ट्रोमॅग्नेटिक हस्तक्षेप आणि सुसंगत संवाद यांसारखे निकष आहेत. याशिवाय ग्लोबल नेविगेशन सॅटेलाईट प्रणालीवर (GNSS) आधारित रस्ते सुरक्षा सुविधांचाही यात समावेश आहे.

व्ही टू व्ही प्रणालीमध्ये टप्प्याटप्प्याने आणखी सुरक्षा सुविधा जोडण्याचीही तरतूद आहे. यामध्ये अचानक ब्रेक लावल्याचा इशारा, समोरच्या वाहनाशी धडक होण्याचा इशारा, चुकीच्या दिशेने वाहन चालवण्याचा इशारा आणि आपत्कालीन वाहनाचा इशारा अशा सुरक्षा सुविधांचाही समावेश केला जाणार आहे.

गाड्या एकमेकांना इशारा कसा देतील?

समजा एखाद्या कारने अचानक ब्रेक लावला. त्या कारला ही माहिती मागील वाहनांना व्ही टी व्ही प्रणालीद्वारे पाठवता येणार आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनाच्या चालकाला पुढचं वाहन दिसण्याआधीच वेग कमी करण्याचा इशारा मिळू शकतो.

याच पद्धतीने रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट, अचानक ब्रेक लावणे, धोकादायक लेन बदलणे, रस्त्याच्या कडेला उभी असलेली वाहनांचे अडथळे, धुके किंवा संभाव्य धडक या धोक्यांबाबत चालकाला पूर्वसूचना मिळू शकणार आहे. सामान्यतः व्ही टू व्ही सिस्टीमची पोहोच सुमारे ३०० मीटर असते. म्हणजे या अंतरात असलेल्या वाहनांशी संवाद साधता येऊ शकतो.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, व्ही टू व्ही प्रणालीसाठी वापरल्या जाणाऱ्या OBU ची किंमत सुमारे 5 हजार ते 7 हजार रुपये असू शकते. सुरुवातीला ही यंत्रणा नव्या वाहनांमध्ये बसवली जाईल.

ADAS पेक्षा व्ही टू व्ही वेगळं कसं?

आधुनिक वाहनांमधील Advanced Driver Assistance Systems (ADAS) मध्ये कॅमेरे आणि इतर सेन्सर्सचा वापर केला जातो. त्यामुळे ही यंत्रणा प्रामुख्याने वाहनचालकाला रस्ता किती स्पष्ट दिसतो, यावर ही यंत्रणा अवलंबून असते. व्ही टू व्ही मध्ये मात्र दुसऱ्या वाहनाकडून थेट माहिती मिळते. त्यामुळे ब्लाइंड कॉर्नर (न दिसणारे वळण), मोठ्या ट्रकच्या मागचा भाग किंवा चालकाला रस्ता थेट दिसत नसेल अशा परिस्थितीतील संभाव्य धोकाही टळू शकतो. म्हणून व्ही टू व्ही हे ADAS ची जागा घेणारं तंत्रज्ञान नसून, त्याला पूरक ठरणारी यंत्रणा म्हणून पाहिलं जात आहे.

व्ही टू व्ही सुसज्ज वाहनं वेग, स्थान, दिशा आणि वाहनाच्या वेगातील बदल म्हणजेच वेग वाढवण्याची गती अशा रिअल-टाइम डेटाची सतत देवाणघेवाण करतील. या माहितीच्या आधारे पुढील अपघाताचा धोका ओळखून चालकाला आधीच सावध करता येईल.

विमानांसारखीच संकल्पना?

व्ही टू व्ही ची संकल्पना काही प्रमाणात विमान वाहतुकीतील तंत्रज्ञानासारखी आहे.

विमानं आपलं स्थान, वेग आणि उंची यासारखी माहिती प्रसारित करतात. जवळची विमानं आणि जमिनीवरील यंत्रणा ही माहिती स्वीकारू शकतात. जगभरातील विमान वाहतुकीत अशी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. मात्र रस्ते वाहतुकीत व्ही टू व्ही प्रणाली अजून विकसित होत आहे. अमेरिका आणि काही विकसित देशांमध्ये याचा वापर सुरू आहे.

मग गोपनीयतेचा प्रश्न काय?

व्ही टू व्ही मुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी नवं तंत्रज्ञान उपलब्ध होऊ शकतं. मात्र त्यासोबत डेटा प्रायव्हसी आणि सायबर सुरक्षेचे प्रश्नही निर्माण होतात. या प्रणालीमध्ये वाहनांचं स्थान आणि मोठ्या प्रमाणावर डेटा साठवला किंवा प्रसारित केला जाऊ शकतो. त्यामुळे संपूर्ण स्मार्ट वाहतूक व्यवस्थेलाही सायबर हल्ल्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून या डेटाचा वापर, साठवणूक आणि संरक्षण यासाठी स्पष्ट सरकारी नियम आवश्यक असणार आहेत.

याशिवाय आणखी एक प्रश्न आहे, व्ही टू व्ही साठी निश्चित केलेला फ्रिक्वेन्सी बँड रस्त्यांवरील सर्व वाहनांची माहिती हाताळण्यासाठी पुरेसा ठरेल का?दोन वाहनांमध्ये चुकीची किंवा अपुरी माहितीची देवाणघेवाण झाली, तर त्यातून उलट अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून व्ही टू व्ही तंत्रज्ञानामुळे वाहतूक सुरक्षित होण्याची शक्यता असली, तरी केवळ गाड्यांना एकमेकांशी जोडणं पुरेसं ठरणार नाही. या यंत्रणेची तांत्रिक अचूकता, सायबर सुरक्षा, डेटा संरक्षण आणि मोठ्या प्रमाणावरील वापरासाठीची क्षमता तपासणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.