Venezuela Earthquake Impact on India Fuel Prices : व्हेनेझुएलातील विध्वंसक दुहेरी भूकंपाचा फटका आता लॅटिन अमेरिकेच्या सीमेपलीकडे देखील बसण्याची चिन्ह आहेत. विनाशकारी भूकंपामुळे अनेक शहरं उद्ध्वस्त झाली आहेत. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठीचे बचाव कार्य सुरु आहे. अशातच सर्वाधिक तेल उत्पादक देशातील या नैसर्गिक संकटांचा फटका जागतिक तेल बाजारालाही बसण्याची चिन्ह आहेत. व्हेनेझुएलातील नुकसानीमुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामी सर्वात मोठा तेल आयातदार असणाऱ्या भारताला याचा मोठा फटका बसणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

व्हेनेझुएलातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेल पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झालाय असा दावा किंवा पुरावा अद्याप समोर आलेला नाही. परंतु व्हेनेझुएलाच्या कच्च्या तेलावरील भारताचे वाढते अवलंबित्व पाहता, येत्या काही दिवसांत काय घडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

व्हेनेझुएला भारतासाठी महत्वाचा का?

गेल्या दोन महिन्यांत, पश्चिम आशिया आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील भू-राजकीय अशांततेनंतर पर्यायांच्या शोधात असलेल्या भारताने व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची आयात मोठ्या प्रमाणात वाढवली आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मते, एप्रिल आणि मे २०२६ मध्ये व्हेनेझुएला भारताच्या सर्वात मोठ्या कच्च्या तेलाच्या पुरवठादारांपैकी एक म्हणून उदयास आला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील सरासरी मासिक आयात सुमारे ६४,००० मेट्रिक टनांवरून आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल-मे दरम्यान दहा लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त झाली.

व्हेनेझुएलामधील ही आपत्ती भारताच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील काळात घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अनिश्चिततेमुळे भारत पर्यायी कच्च्या तेलाचा स्रोत म्हणून व्हेनेझुएलावर अबलंबून आहे. या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलाचे महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एप्रिल आणि मे २०२६ या कालावधीत व्हेनेझुएला भारताच्या प्रमुख कच्च्या तेल पुरवठादारांपैकी एक बनला. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये दरमहा सरासरी सुमारे ६४ हजार मेट्रिक टन असलेली आयात आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल-मे महिन्यांत वाढून दहा लाख मेट्रिक टनांहून अधिक झाली. ही वाढ भारताने ऊर्जा सुरक्षेसाठी पर्यायी पुरवठादारांवर वाढवलेल्या अवलिंबात्वाचे चित्र स्पष्ट करते.

व्हेनेझुएलाचे कच्चे तेल भारतासाठी प्रमुख ऊर्जो स्त्रोत आहे. कारण देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तसेच खासगी तेल शुद्धीकरण कंपन्या व्हेनेझुएलाच्या जड कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहेत. त्यामुळे या तेलाचा वापर भारतीय रिफायनरी सहजपणे करू शकतात. सरकारने व्हेनेझुएलाला भारताच्या ऊर्जा विविधीकरण धोरणाचा एक प्रमुख आधारस्तंभ असल्याचे नमूद केले आहे.

भूकंपामुळे तेल पायाभूत सुविधांना फटका?

सध्या तरी या प्रश्नाचे ठोस उत्तर नाही. भूकंपानंतर तेल शुद्धीकरण प्रकल्प, निर्यात टर्मिनल आणि पाइपलाइनचे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचे अधिकृत माहिती नाही. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या अहवालानुसार, शक्तिशाली भूकंपानंतरही व्हेनेझुएलाच्या तेल पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आलेले नाही. त्यामुळे तेल उत्पादन आणि निर्यातीवरही सध्या कोणताही मोठा परिणाम झालेला नाही.

मात्र, भूकंपाचा सर्वाधिक फटका कॅराकास आणि आसपासच्या भागांतील निवासी वस्त्या, रस्ते आणि सार्वजनिक सुविधांना बसल्याचे समोर आले आहे. औद्योगिक आणि ऊर्जा क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे सविस्तर मूल्यांकन अद्याप सुरू आहे.

तज्ज्ञांच्या मते, धोका पूर्णपणे टळला आहे असे मानता येणार नाही. मोठ्या भूकंपानंतर निर्यात टर्मिनल, पाइपलाइन आणि तेल साठवणूक सुविधांची संरचनात्मक तपासणी केली जाते. या तपासणीत नुकसान आढळल्यास त्याचा परिणाम काही दिवसांनी तेल उत्पादन आणि पुरवठ्यावर दिसून येऊ शकतो.

भारतासमोर पुन्हा इंधन संकट?

भारतासमोर सध्या तरी पुन्हा इंधन संकट उभे राहण्याची शक्यता नाही. याचे कारण म्हणजे भारत सध्या ३५ हून अधिक देशांकडून कच्च्या तेलाची आयात करतो. गेल्या काही वर्षांत ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य देत भारताने आयातीचे स्रोतांमध्ये विविधता आणली आहे. सध्या रशिया हा भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे. तर इराक, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती, अमेरिका, ब्राझील तसेच अनेक आफ्रिकन देशांकडूनही मोठ्या प्रमाणावर तेल आयात केले जाते.

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या देशातून पुरवठा कमी झाला तरी भारतीय तेल कंपन्या पर्यायी स्रोतांकडून खरेदी वाढवू शकतात. तसेच, त्यांच्याकडे आवश्यक तेवढा तेलसाठा असल्याने जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्या तरी भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत तातडीची चिंता व्यक्त करण्याचे कोणतेही कारण नाही.

तरी बाजारपेठेतील अस्वस्थतेचे कारण काय?

व्हेनेझुएलाने जागतिक तेल बाजारात महत्वाचे स्थान बनवले आहे. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत आता व्हेनेझुएलाकडे मोठे तेलसाठे आहेत आणि त्यांनी उत्पादनसोबतच पुरवठासाखळीही भक्कम केली आहे.

या वर्षाच्या सुरुवातीलाच पश्चिम आशियातील तणाव आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अनिश्चिततेमुळे भारताने पर्यायी स्रोतांकडून कच्च्या तेलाची आयात वाढवण्यावर भर दिला. त्याचाच भाग म्हणून व्हेनेझुएलाकडून तेल खरेदीतही लक्षणीय वाढ करण्यात आली. अशा परिस्थितीत, जर व्हेनेझुएलातून होणाऱ्या तेल निर्यातीवर भूकंपाचा परिणाम झाला आणि त्याच वेळी मध्य पूर्वेतील पुरवठाही अस्थिर राहिला, तर जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात पुरवठ्याची कमतरता निर्माण होऊ शकते. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर होण्याची शक्यता आहे.

भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे ८५ ते ९० टक्के तेल आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे जागतिक बाजारात तेलाच्या किमतींमध्ये अगदी अल्प वाढ झाली तरी त्याचा भारताच्या आयात खर्चावर ताण पडू शकतो. यामुळे चालू खात्यातील तूट वाढणे, महागाईचा दबाव येणे आणि इंधन अनुदान किंवा इतर खर्चांमुळे सरकारी तिजोरीवर अतिरिक्त ताण निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवरही परिणाम?

नाही. भारतातील इंधनांच्या किमतीवर पुरवठ्यातील अडथळ्यांव्यतिरिक्त अनेक घटकांचा प्रभाव पडतो. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती, विनिमय दर, कर आणि सरकारी तेल विपणन कंपन्यांनी घेतलेले निर्णय यांसारखे घटक प्रभावी ठरतात. त्यामुळे व्हेनेझुएलामधील स्थितीमुळे पेट्रोल डिझेच्या किमतीवर परिणाम होण्याची शक्यता नाही.

पुढील चित्र कसे असेल?

व्हेनेझुएलातील परिस्थितीचा पुढील काही दिवसांत अधिक स्पष्ट अंदाज येण्याची शक्यता आहे. सध्या तेथील प्रशासन भूकंपामुळे झालेल्या नुकसानीचे घेत आहे. तेल कंपन्याही उत्पादन क्षेत्रे, पाइपलाइन, बंदरे आणि निर्यात टर्मिनलची तपासणी करत आहेत. त्यामुळे तेल निर्यात पूर्ववत सुरू राहते की पुरवठ्यात अडथळा येतो, याकडे जागतिक ऊर्जा बाजाराचे लक्ष लागले आहे.

भारताच्या दृष्टीने पाहता, सध्या कच्च्या तेलाच्या तुटवड्यापेक्षा ऊर्जा आयातीतील विविधीकरणाचे धोरण कायम ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे. पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावानंतर भारताने पर्यायी पुरवठादारांवर भर दिला असून, त्यात व्हेनेझुएलाचाही महत्त्वाचा वाटा आहे.

जोपर्यंत व्हेनेझुएलातून तेल निर्यात सुरळीत सुरू राहते, तोपर्यंत भारताच्या ऊर्जा सुरक्षेला तातडीचा धोका निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. मात्र, पुढील तपासणीत भूकंपामुळे तेल पायाभूत सुविधांचे अपेक्षेपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे समोर आले, तर व्हेनेझुएलातून तुलनेने स्वस्त मिळणाऱ्या कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारताला पुन्हा पर्यायी स्रोतांकडे वळावे लागू शकते आणि त्याचा परिणाम जागतिक तेल बाजारासह देशांतर्गत इंधन अर्थव्यवस्थेवरही दिसून येऊ शकतो.