२४ जूनला व्हेनेझुएला विनाशकारी दुहेरी भूकंपाने हादरले. ७.२ व ७.५ इतक्या तीव्रतेचे लागोपाठ दोन भूकंप झाले. त्यामुळे अनेक इमारती कोसळल्या, रस्त्यांना मोठे तडे गेले. त्यामध्ये दिवसागणिक मृतांचा आकडा वाढतच होता. सध्या मृतांचा आकडा २,५९५ वर पोहोचला आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या विध्वंसक भूकंपामुळे लॅटीन अमेरिकेतील देश निराशेच्या छायेत आहे. पण याच वातावरणात गुरुवारी २ जुलैला एक सुखद बातमी समोर आली आणि ती म्हणजे कोसळलेल्या बेसमेंटच्या ढिगाऱ्याखाली तब्बल आठ दिवस अडकलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीला बाहेर काढण्यात यश आले आहे. ढिगाऱ्याखाली सापडूनही एक जीव वाचू शकला. त्यामुळे सर्वांना हायसे वाटले.
व्हेनेझुएलातील ग्वायरा या किनारपट्टीवरील शहराला भूकंपाचा मोठा तडाखा बसला. याच शहरातील गॅलेरियास प्लाया ग्रांदे या शॉपिंग सेंटरच्या १४० टन ढिगाऱ्याखाली हर्नान अल्बर्टो गिल फ्लोरेस नावाची व्यक्ती तब्बल आठ दिवस दबून राहिली होती. अखेर बचाव पथकाने त्याची सुखरूप सुटका केली आहे.
कोस्टा रिकन रेड क्रॉस (CRRC)च्या बचाव पथकातील सदस्य मिन्यार कोलाडो यांनी सांगितले, “आम्ही त्यांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी सर्वांत आधी आम्हाला विनंती केली की, ‘मी जिवंत असल्याचं माझ्या पत्नीला सांगू नका. कारण मी वाचेन की नाही, याची मला खात्री नाही.”
मात्र, तब्बल आठ दिवस ढिगाऱ्याखाली अडकूनही हर्नान अल्बर्टो गिल फ्लोरेस जिवंत राहण्याचे कारण काय? बचाव पथकाने त्यांची सुटका नेमकी कशी केली? जाणून घेऊया सविस्तर
व्हेनेझुएलाच्या भूकंपातील आशेचा किरण
हर्नान अल्बर्टो गिल फ्लोरेस हा सुरक्षा रक्षक आहे. तो ग्वायरा बंदर शहरातील गॅलेरियास प्लाया ग्रांडे या शॉपिंग सेंटरमध्ये रात्रपाळीत काम करत होता.
भूकंपाच्या वेळी तो कर्तव्यावर होता. पहिला भूकंप झाला तेव्हा पार्किंग लॉटच्या तळघरातील एका छोट्या काँक्रीटच्या केबिनमध्ये तो बसला होता.
भूकंपाचे हादरे बसताच त्याच्या आजूबाजूचे काँक्रीटचे इमले कोसळू लागले; पण त्याची केबिन मात्र तग धरून राहिली. यादरम्यान केबिन आणि ढिगाऱ्याच्या मध्ये एक एअर पॉकेट निर्माण झाले. त्यामुळे त्याच्या भोवती एक संरक्षक कवच तयार झाले. परिणामी त्याच्या आजूबाजूला आणि त्याच्यावर कोसळलेल्या १४० टन ढिगाऱ्याचा त्याला किंचितसाही धक्का लागला नाही.
कोस्टा रिकन रेड क्रॉसच्या पथकातील सदस्याने बीबीसीला असेही सांगितले की, फ्लोरेसने त्यांना सांगितले की, त्याचे एक नखही चिरडले गेले नाही.
तर इमारतीमधील फ्लोरेसचा सहकारी होजे रिवेरो याने त्याच्या वाचण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण सांगितले. तो म्हणाला की, केबिनच्या जवळच पाण्याच्या टाक्या होत्या. त्या टाक्यांमुळे फ्लोरेस इमारतीच्या धक्क्यापासून बचावला आणि हालचाल करण्यासाठी त्याला जागा मिळाली.
पण मग बचाव पथक फ्लोरेसपर्यंत कसे पोहोचले?
रविवारी फ्लोरेसने मदतीसाठी हाका मारायला सुरुवात केली. त्या ऐकल्यावर कोणीतरी वाचवण्यासाठी येईल, अशी त्याला आशा होती, असे त्याचे म्हणणे बचाव अधिकाऱ्यांनी नमूद केले. “संपूर्ण बचाव कार्यादरम्यान फ्लोरेस उत्साही होता. त्याने स्वतःच आम्हाला पुढे काम सुरू ठेवण्यास प्रोत्साहित केले. त्याने बचावावेळी आमच्या टीमच्या सदस्यांना ओळखले आणि म्हणाला, ‘तुम्ही परत आलात आणि आता माझ्यासोबत आहात ही आशादायी गोष्ट आहे,’ “असे मेक्सिकन रेडक्रॉसचे मार्को अँटोनियो फ्रँको यांनी बीबीसीला सांगितले. त्याच्या या उत्साहामुळेच तो या प्रसंगातून बाहेर पडू शकला, असेही त्यांनी नमूद केले.
बचाव मोहिमेचा थरार
गेल्या बुधवारी व्हेनेझुएलात दुहेरी भूकंप झाला. त्यानंतर बचावकार्याला वेग आला. प्रचंड नुकसानीमुळे बचाव पथकांसमोर आव्हानं निर्माण होत होती, मदतीसाठी परदेशी अधिकारीही व्हेनेझुएलामध्ये दाखल झाले. याचदरम्यान, फ्लोरेसने रविवारी मदतीसाठीची दिलेली हाक बचाव पथकांच्या कानावर पडली. बचाव पथकांनी तत्काळ काम सुरू केले. त्याला बाहेर काढण्यासाठी योजना आखली गेली.
एक दिवसानंतर बचाव पथकाने रडार, सोनार आणि ध्वनिक शोध उपकरणांचा वापर करून फ्लोरेसशी संपर्क साधायला सुरुवात केली. शोध कॅमेऱ्यामुळे बचाव पथकाला १२ तासांनंतर फ्लोरेसचे लोकेशन मिळाले. तो इमारतीच्या दुसऱ्या तळमजल्याखाली अडकल्याचे निश्चित झाले.
त्यानंतर सुरू झाली खरी कसोटी. पुढील सुमारे १०० तास बचाव पथकाने अत्यंत धोकादायक परिस्थितीत बचावकार्य सुरू ठेवले. इमारतीचा ढिगारा कधीही कोसळेल अशी स्थिती होती, मुसळधार पाऊस सुरू होता आणि वारंवार भूकंपाचे धक्के (Aftershocks) बसत होते, अशा स्थितीत बचाव पथकाने अत्यंत काळजीपूर्वक बोगदा तयार केला आणि त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
“एक जरी चुकीची हालचाल झाली असती किंवा ढिगाऱ्याचा एखादा भाग जरी हलला असता, तर संपूर्ण ढिगारा त्या व्यक्तीवर कोसळला असता असता. तसेच, आणखी एक जोरदार आफ्टर शॉक बसला असता, तर उर्वरित इमारतही कोसळली असती आणि आमचे बचावकर्तेही त्याखाली अडकण्याची शक्यता होती.”
ट्रे एस्पी यांनी सांगितले, “परिस्थिती इतकी नाजूक होती की, एका वेळी फक्त एकच दगड हलवत होतो. चुकीचा दगड हलवला असता, तर संपूर्ण ढिगारा त्या व्यक्तीवर कोसळला असता.”
सामान्यतः भूकंपासारख्या आपत्तींमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीला ४८ ते ७२ तासांनंतर जिवंत सापडण्याची शक्यता कमी मानली जाते. मात्र, फ्लोरेस यांच्या बाबतीत बचाव पथकाला ढिगारा हटवण्याचे काम सुरू ठेवून, त्यांच्यापर्यंत अन्न आणि पाणी पोहोचवण्याचेही काम करावे लागले. त्यामुळे ते आठ दिवस त्यांना आधार मिळाला.
मेक्सिकन रेडक्रॉसच्या बचाव पथकातील फ्रँको यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, “फ्लोरेस यांनी त्यांच्याकडे आवडत्या चवीचे हायड्रेशन ड्रिंक्स मागितले होते. अर्थातच, आम्ही त्यांची ती इच्छा पूर्ण केली.”
अखेर बुधवारी बचाव पथकाला आपण फ्लोरेस यांच्यापर्यंत पोहोचल्याची खात्री झाली. ढिगारा हटवत आणि बोगदा तयार करीत ते हळूहळू त्यांच्या अगदी जवळ पोहोचले. ढिगाऱ्यातून खाली पडणाऱ्या कणांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून चिलीच्या बचाव पथकाने फ्लोरेस यांना सुरक्षात्मक गॉगल्स दिले होते.
त्यानंतर गुरुवारी तो चमत्कारिक क्षण जवळ आला. तब्बल आठ दिवस ढिगाऱ्याखाली अडकलेले फ्लोरेस यांना अखेर सुखरूप बाहेर काढण्यात आले. विविध देशांच्या ध्वजांसह उपस्थित असलेल्या बचाव पथकांनी हे यश साजरे केले. बचावकर्त्यांनी फ्लोरेस यांना स्ट्रेचरवरून रेडक्रॉसच्या रुग्णवाहिकेत हलवले. या यशानंतर कोस्टा रिकन रेड क्रॉस (CRRC) बचाव पथकाने एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त केला.
फ्लोरेस यांना पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. “हा खरोखरच चमत्कार आहे,” अशी भावना फ्लोरेस यांच्या पत्नी गुस्बिमार गोंझालेझ यांनी वृत्तसंस्था एएफपीशी बोलताना व्यक्त केली आहे. त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही.
