Venezuela Earthquake live updates and Impact of Devastating Twin Quakes : बुधवारी व्हेनेझुएला विनाशकारी भूकंपांनी हादरले आहे. अनेक शहरांना जुळ्या भुकंपाचा तडाखा बसल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. ७.२ आणि ७.५ ऱिश्टर स्केलच्या शक्तिशाली अशा डबलेट (दुहेरी) भुकंपामुळे अनेक इमारतींना तीव्र हादरे बसले असून रस्त्यांवर मोठे तडे गेल्याचे दिसत आहेत, त्यामुळे नागरिक सुरक्षित आश्रयाच्या शोधात बाहेर पडल्याचे भीषण चित्र पाहायला मिळत आहे.

भूकंपानंतर अमेरिकेच्या त्सुनामी इशारा केंद्राने प्युर्टो रिको आणि व्हर्जिन आयलंड्ससह काही भागांना संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता. मात्र, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा इशारा नंतर मागे घेण्यात आला. दरम्यान, व्हेनेझुएला मध्ये मागोमाग भूकंपाचे तीव्र धक्के बसल्यानंतर जपानलाही भूकंपाचा तडाखा बसला. परिणामी दोन्ही देशांत भीतीचे सावट पसरले आहे.

भूकंपाची टाईमलाईन काय

व्हेनेझुएलातील स्थानिक वेळेनुसार, बुधवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शक्तिशाली असे दोन भूकंप झाले. अमेरिकी भूवैज्ञानिक सर्वेक्षण (USGS) ने निरीक्षणानुसार, पहिला भूकंप मोरोन या किनारपट्टीवरील शहराच्या पश्चिमेस सुमारे २१ किलोमीटर अंतरावर (१३.२ मैल) होता, तर १३.२ किमी खोलीवर त्याचे धक्के बसले. सुरुवातीला या भूकंपाची तीव्रता ७.१ असल्याचे नमूद करण्यात आले होते, मात्र, पुढील विश्लेषणानंतर ती ७.२ इतकी असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पहिल्या धक्क्यानंतर अवघ्या एका मिनिटाच्या आत त्याच्या उत्तरेस ७.५ तीव्रतेचा आणखी एक शक्तिशाली भूकंप झाला. हा भूकंप सुमारे १० किलोमीटर खोलीवर नोंदवण्यात आला. यूएसजीएसच्या मते, हा दुहेरी भूकंपाचा प्रकार होता. ७.५ तीव्रतेचा मुख्य भूकंप होण्यापूर्वी अवघ्या ३९ सेकंद आधी ७.२ तीव्रतेच्या पूर्वधक्क्याने हादरले होते.

दुहेरी भूकंप कसे घडतात?

अगदी काही वेळेतच जेव्हा एकाच प्रदेशात जवळपास समान तीव्रतेचे भूकंप होतात तेव्हा त्यांना दुहेरी भूकंप म्हटले जाते. हे दुहेरी भूकंप दुर्मिळ असतात, या भूकंपाचे तडाखे जेव्हा बसतात तेव्हा पहिल्या तड्यामुळे मुक्त झालेला भूगर्भीय ताण अधिक वेगाने शेजारच्या भ्रंशरेषेवर हस्तांतरीत होतो. परिणामी पृथ्वीचा कवच स्थिर होण्यापूर्वीच दुसऱ्या मोठ्या भूकंप घडू शकतो, असे निरीक्षण अमेरिकेच्या सिस्मोलॉजिकल सोसायटीने नोंदवले आहे.

भूकंपातील विध्वंसक चित्र

अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणाने नमूद केले की, या जुळ्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला असून मोठी जीवितहानी झाली आहे. मृ्तांचा आकडा १० हजार पासून १ लाखांचा आकडा पार करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या विध्वंसातील मृत्यू आणि जखमींची अधिकृत आकडेवारी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. पण मोठ्या प्रमाणात हानी झाल्याचे दिसत आहे. गृहमंत्री डियोसडाडो कॅबेलो सरकारी वाहिनीला सांगतात, ‘आमच्याकडे इमारती, घरे आणि बंगले कोसळले आहेत. सुरक्षा, नागरी मदतीच्या बाबतीत आमच्याकडे जे काही उपलब्ध आहे, त्या सर्वांचा वापर करून आम्ही परिस्थिती हाताळत आहोत.’ यामुळे एकूणच परिस्थिती अधिकच गंभीर असल्याचे दिसत आहे.

कॅबेलो पुढे म्हणाले की, अनेक राज्य भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तसेच कॅराकसमधील अल्तामिरा परिसरात घरे आणि इमारती कोसळून भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. या भूकंपामुळे आणखीही मोठी नुकसानी होण्याची शक्यताही कॅबेलो यांनी बोलून दाखवली आणि घराबाहेरच थांबण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.

भूकंपाची तीव्रता अद्याप ओसरली नसल्याने इमारतींचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असल्याचे कॅबेलो सांगतात आणि लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या, आणि एकमेकांच्या संपर्कात राहून कोणी जखमी झालेले नाही याची खात्री करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

आपली घरं डोळ्यासमोर उद्धवस्त होताना पाहिलेल्या रहिवाशींनी या विध्वंसक भूकंपाबद्दल सांगितले. कॅराकसचे रहिवासी रॉबर्टो डमास यांनी ‘द गार्डियन’शी म्हटले की, इमारत अक्षरशः एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला हादरत होती. भूकंपाची शक्ती प्रचंड होती. ते संपूर्ण चित्र भयंकर होते. आम्ही चालत होतो आणि भूकंपामुळे आम्ही इकडे तिकडे हलत होतो. अपार्टमेंटमधील सर्व काही उद्धवस्त झाले, पण सुदैवाने आम्ही बाहेर पडलो.

बीबीसी मुंडोच्या लेखिका निकोल कोल्स्टर यांनीही भूकंपाचा थरार सांगितला, जेव्हा भूकंपाचे धक्के जाणवले तेव्हा त्या मध्य कॅराकसमधील पालोस ग्रांडेस येथील एका अपार्टमेंट इमारतीच्या सातव्या मजल्यावर होत्या. त्या म्हणतात, ‘मी खिडक्या हलताना पाहिल्या आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी, समोरच्या दाराच्या किंवा दगडी भिंतीच्या मध्ये जाण्याशिवाय मला दुसरे काहीच सुचले नाही, माझ्या मते ती भिंत बरीच मजबूत आहे.’

भूकंपाच्या धक्क्यांनंतर पोर्तो रिको आणि व्हर्जिन बेटांमध्ये त्सुनामीची दाट शक्यता निर्माण झाली होती. संभाव्य धोक्याचा अंदाज घेत अमेरिकन त्सुनामी चेतावणी प्रणालीने अलर्ट जारी करण्यात आला. समुद्राच्या पातळीत होणारे असामान्य बदल आणि जोरदार सागरी प्रवाह किनारपट्टी भाग, बंदरांमध्ये त्सुनामीचे संकट निर्माण करण्याची शक्यता होती. मात्र, पुढील तपासणीनंतर त्सुनामीचा धोका नसल्याचे स्पष्ट झाल्याने इशारा रद्द करण्यात आला.

भूकंपानंतर व्हेनेझुएलाच्या हंगामी नेत्या डेल्सी रॉड्रिगेझ यांनी तात्काळ आणीबाणी जाहीर केली. सरकारी वाहिनीशी बोलताना त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांची किंवा जखमींची संख्या जाहीर केली नसली तरी, कॅराकसजवळील मायकेतिया येथील सायमन बोलिव्हार विमानतळ प्रचंड नुकसानीमुळे बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राजधानी कॅराकस व्यतिरिक्त, मिरांडा, ला ग्वायरा, अरागुआ, कॅराबोबो आणि फाल्कॉन ही राज्ये सर्वाधिक प्रभावित झाल्याचे रॉड्रिगेझ यांनी पुढे नमूद केले. तर रेल्वे आणि मेट्रो सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, कॅराकसमधील अमेरिकी दूतावासाने लोकांना खबरदारीचे आवाहन केले आहे. नुकसानग्रस्त भागात जाणे टाळावे आणि नुकसान झालेल्या इमारतींमध्ये प्रवेश करू नये’ असे आवाहन केले आहे. तसेच, लोकांनी अद्ययावत माहितीसाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे आणि ‘सुरक्षित आश्रय घ्यावा’ असेही ते म्हणाले.