जागतिक तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या ध्रुवांवरील बर्फ वेगाने वितळत आहे. वातावरणातील बदलाचा फटका सध्या संपूर्ण जगाला बसतो आहे. जगभरात लोक नैसर्गिक आपत्तींचा सामना करत आहेत. याच बदलत्या वातावरणामुळे एका देशातील हिमनद्या पूर्णपणे वितळल्या आहेत. आधुनिक इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे. त्यामुळे संशोधकांनादेखील धक्का बसला आहे. हे संकट इतके भीषण आहे की, पुढे इतरही देशांत याचा दुष्परिणाम दिसण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाने सहा हिमनद्यांपैकी पाच हिमनद्या फार पूर्वीच गमावल्या होत्या. शेवटच्या हम्बोल्ट या हिमनदीचे शास्त्रज्ञांनी या महिन्याच्या सुरुवातीला बर्फाचे क्षेत्र म्हणून पुनर्वर्गीकरण केले. त्यानंतर या ऐतिहासिक घटनेची नोंद झाली.

व्हेनेझुएलामध्ये सहा हिमनद्यांचे अस्तित्व होते; जे अँडीज पर्वतांमध्ये समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार मीटर उंचीवर होते. २०११ पर्यंत त्यातील पाच नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले. हम्बोल्ट हिमनदी आणखी एक दशक टिकेल, अशी संशोधकांची अपेक्षा होती. परंतु, ही हिमनदी त्यांच्या अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने वितळली आणि दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रफळापर्यंत आकुंचन पावली. त्यामुळे या भागाला आता संशोधकांनी बर्फाचे एक छोटे क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

Loksatta viva June 21 is celebrated as International Yoga Day all over the world
योग: कर्मसु कौशलम।
monsoon delayed reason
पाऊस नेमका आहे कुठे? देशभरात मान्सून कधी सक्रिय होणार?
Loksatta kutuhal Accurate forecasting of weather with the help of multi models
कुतूहल: बहुप्रारूपांच्या साहाय्याने हवामानाचा अचूक अंदाज
Destructive Nagastra suicide drone in possession of India
भारताच्या ताब्यात आता विध्वंसक आत्मघाती ड्रोन…. ‘नागास्त्र’मुळे प्रहारक्षमता कशी वाढणार?
Weather forecasting and artificial intelligence models
कुतूहल: हवामानाचा अंदाज व कृत्रिम बुद्धिमत्ता प्रारूपे
loksatta analysis severe warming in indian cities
विश्लेषण : शहरांमधील तापमानवाढ किती गंभीर? 
tempertaure rising in the world
दिल्लीमध्ये उष्णतेचे सर्व रेकॉर्डब्रेक, जगभरातही हीच परिस्थिती; तापमान आणखी किती वाढणार?
loksatta analysis methods for the quantification of evaporation from lakes
विश्लेषण : जलाशयांतील पाण्याचे बाष्पीभवन रोखायचे कसे?

हेही वाचा : Mumbai Billboard Tragedy : शहरांनी नैसर्गिक प्रकोपामुळे होणार्‍या दुर्घटनांचा मुकाबला कसा करावा?

हम्बोल्ट हिमनदीप्रमाणेच जगभरातील इतर हिमनद्यादेखील संशोधकांच्या संभाव्यतेपेक्षा अधिक वेगाने वितळत आहेत आणि अदृश्य होत आहेत. २०२३ च्या अभ्यासानुसार सध्याच्या हवामान बदलाचा अंदाज बघता, २१०० पर्यंत दोन-तृतीयांश हिमनद्या अस्तित्वहीन होण्याची शक्यता आहे. हिमनद्या म्हणजे काय? हिमनद्या वितळण्याचे कारण काय? हे संकट जगासाठी किती गंभीर आहे? याचा नक्की काय परिणाम होईल? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

हिमनद्या म्हणजे काय?

जमिनीवर शतकानुशतके बर्फ साचल्यामुळे हिमनद्या (ग्लेशियर) तयार होतात. यालाच हिमवाह, हिमानी असेदेखील म्हटले जाते. हा बर्फाचा थर म्हणजे पृथ्वी आणि महासागरांचे संरक्षणात्मक आवरण आहे. अमेरिकेतील जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, या हिमनद्या सामान्यतः त्या भागात अस्तित्वात असतात, ज्या भागात सरासरी वार्षिक तापमान गोठणबिंदूच्या जवळ पोहोचते. हिवाळ्यातील पर्जन्यवृष्टीमुळे एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फ जमा होतो. मोठा आकार आणि गुरुत्वाकर्षण यांमुळे हिमनद्या अतिशय संथ नद्यांप्रमाणे वाहतात. ग्लेशियर म्हणून बर्फाचे वस्तुमान किती मोठे असणे आवश्यक आहे, यावर सार्वत्रिक एकमत नाही. मात्र, यूएसजीएसनुसार सामान्यतः याचा आकार १० हेक्टर असावा लागतो.

हिमनद्या वेगाने का वितळत आहेत?

ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या अपेक्षेपेक्षा दुप्पट वेगाने वितळत आहेत. जसा बर्फ उष्णतेच्या संपर्कात आल्यावर वितळतो, त्याचप्रमाणे उष्ण तापमानामुळे हिमनद्या वितळत आहेत. इतके उष्ण तापमान होण्याचे कारण म्हणजे हरितगृह वायू (जीएचजी) आहे. १८ व्या शतकात औद्योगिक क्रांती सुरू झाल्यापासून कार्बन डाय-ऑक्साइड आणि मिथेनसारखे हरितगृह वायू वातावरणात सोडले जात आहेत. त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे.

१८८० पासून जागतिक सरासरी तापमानात किमान १.१ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. ही तापमानवाढ कदाचित लहान वाटू शकते; परंतु त्याचे परिणाम विनाशकारी आहेत. उदाहरणार्थ- तीव्र व वारंवार येणार्‍या उष्णतेच्या लाटा, पूर, दुष्काळ, समुद्राच्या पातळीत वाढ, हिमनद्या वेगाने वितळणे. अलीकडच्या दशकांमध्ये तर हरितगृह वायूचे उत्सर्जन गगनाला भिडले आहे.

भारतालाही हिमनद्या गमावण्याचा धोका आहे. भारतात हिमालय पर्वतरांगांमधील हिमनद्या वेगाने वितळत आहेत. जर हरितगृह वायूचे उत्तरोत्तर होणारे उत्सर्जन वेळीच कमी झाले नाही, तर या शतकात ८० टक्क्यांपर्यंत हिमनद्या लुप्त होण्याची भीती आहे.

हिमनद्या वितळल्यास काय परिणाम होतात?

हिमनद्या हे स्थानिक समुदाय, वनस्पती आणि प्राणी यांच्यासाठी विशेषत: उष्ण कालावधीत महत्त्वपूर्ण ठरणारे गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. त्यामुळे हिमनद्या पूर्णपणे लुप्त झाल्यास त्या परिक्षेत्रातील स्थानिक समुदाय, वनस्पती आणि प्राण्यांना गोड्या पाण्यासाठी संपूर्णपणे पावसावर अवलंबून राहावे लागेल.

हिमनद्यांमधून वाहून जाणारे थंड पाणी खाली असणार्‍या पाण्याच्या साठ्यातील (नदी, तलाव) तापमान अधिक थंड ठेवते. यूएसजीएसनुसार, प्रदेशातील अनेक जलचर प्रजातींसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. कारण त्यांना जगण्यासाठी थंड पाण्याचे तापमान आवश्यक आहे. हिमनद्यांवर झालेला परिणाम थेट अशा प्रजातींवर होतो, जे अन्नसाखळीचा एक आवश्यक भाग आहेत.

हेही वाचा : चार धाम यात्रेत ५ दिवसांत ११ भाविकांचा मृत्यू; नक्की काय घडतंय? यात्रेकरूंसाठी जारी करण्यात आलेले नवीन नियम काय आहेत?

वितळणाऱ्या हिमनद्या समुद्राच्या पातळीत वाढ होण्यास कारणीभूत ठरू शकतात. ग्रीनलँड आणि अंटार्क्टिक येथील बर्फ वितळल्याने जागतिक समुद्र पातळीत वाढ झाली. तज्ज्ञांनी सुचवले आहे की, व्हेनेझुएलाच्या हम्बोल्ट हिमनदीमध्ये समुद्राची पातळी लक्षणीयरीत्या वाढविण्यासाठी पुरेसा बर्फ नव्हता.

दक्षिण अमेरिकन देशांतील हिमनद्या वितळल्याने सांस्कृतिक ओळखीवर परिणाम होईल, असे पर्यावरणशास्त्रज्ञ लुइस डॅनियल लॅम्बी यांनी द गार्डियनला सांगितले. ते म्हणाले, “हिमनदी या प्रदेशाच्या सांस्कृतिक ओळखीचा, पर्वतारोहण आणि पर्यटनाचा एक भाग होता.” दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएलातील हम्बोल्ट ही हिमनदी पूर्णपणे लुप्त झाल्यानंतर आता संशोधकांनी इंडोनेशिया, मेक्सिको आदी देशांतील हिमनद्यांचेही अस्तित्व संपुष्टात येणार असल्याचा इशारा दिला आहे.