भारतात नुकताच चार राज्यांतील २८ विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांत भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) १६ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसचं सरकार असणाऱ्या कर्नाटकातील चारही जागा एनडीएने आपल्याकडे खेचून घेतल्या आहेत. उत्तर प्रदेशात ११ पैकी सहा, बिहारमध्ये आठपैकी चार, तर महाराष्ट्रात पाचपैकी दोन जागा भाजपाने जिंकल्या. तर उर्वरित जागांवर विरोधकांचे उमेदवार निवडून आले आहेत.
विधानसभा निवडणुकीपेक्षा विधानपरिषदेची निवडणूक वेगळी असते. विधानसभेत १८ वर्षांवरील नागरिक मतदान करू शकतात; मात्र विधानपरिषद सदस्य निवडण्यासाठी प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार नसतो. या निवडणुकीत शिक्षक आणि पदवीधरांसाठी स्वतंत्र मतदारसंघ असतात. शिवाय, देशातील सर्वच राज्यांमध्ये विधानपरिषद नाही. मग विधानपरिषद सदस्यांची निवड नेमकी कशी होते? या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर का केला जातो? हे आपण या विश्लेषणातून जाणून घेऊया.
राज्यांमध्ये विधानपरिषद का असते?
संविधानानुसार, देशाच्या संसदेत द्विसदनीय कायदेमंडळ म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा अशी दोन सभागृह आहेत. मात्र, राज्यांच्या बाबतीत अशी दोन सभागृह असणे बंधनकारक नाही. प्रत्येक राज्यात विधानसभेसोबत विधानपरिषद हे दुसरे सभागृह असावे की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. ज्या राज्यात केवळ विधानसभा असते, तिथे एकाच सभागृहातून राज्यासाठी धोरणं आखली जातात.
संविधान तयार होत असताना राज्यांमध्ये दुसरं सभागृह असावं की नाही, यावर मतभेद होते. विधानपरिषदेमुळे वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांना कायदे करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि विधानसभेने घाईघाईत घेतलेल्या निर्णयांचा फेरविचार होऊ शकेल, असे तिच्या समर्थकांचे मत होते. मात्र, दुसरे सभागृह चालवणे खर्चिक असेल, शासकीय कामकाजात विलंब होईल आणि राजकीय नेते आपल्या समर्थकांना विधानपरिषदेवर संधी देण्यासाठी सदस्यत्वाचा वापर करतील, अशी भीती विरोधकांनी व्यक्त केली होती.
या दोन्ही बाजूंचा विचार करून संविधान निर्मात्यांनी राज्यांना विधानपरिषद स्थापन करण्याचा किंवा ती रद्द करण्याचा अधिकार दिला. त्याचबरोबर या सभागृहाच्या सदस्यसंख्येवर आणि अधिकारांवरही मर्यादा घातल्या. सध्या आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि तेलंगणा या सहा राज्यांमध्ये विधानपरिषद आहे.
संविधानातील कलम १७१ नुसार, विधानपरिषदेत किमान ४० सदस्य (आमदार) असणे आवश्यक आहे. तर तिची सदस्यसंख्या त्या राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांशापेक्षा जास्त असू शकत नाही. विधानपरिषदेत कोणत्या गटांतून किती सदस्य निवडले जातील, याची रचनाही संविधानाने निश्चित केली आहे.
विधानपरिषदेत कोणाला प्रतिनिधित्व मिळणार, हे ठरवण्यासाठी संविधानाने सदस्य निवडीचे वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. विधानसभेच्या आमदारांचे विधानपरिषदेतील एक तृतीयांश सदस्य निवडतात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधींच्या मतदानातून आणखी एक तृतीयांश सदस्य निवडले जातात. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून प्रत्येकी एक बारांश सदस्य निवडले जातात. उर्वरित सदस्यांची राज्यपाल नियुक्ती करतात. या नियुक्त्या साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा या क्षेत्रांतील अनुभवी व्यक्तींची विधानपरिषदेवर निवड केली जाते.
विधानपरिषदेसाठी मतदान कसं होतं?
विधानपरिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एकूण सदस्यांपैकी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात. विधानपरिषदेची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किमान ३० वर्षे असणे आणि ती व्यक्ती संबंधित राज्यातील मतदार असणे आवश्यक आहे. राज्यपालांकडून नियुक्त होणाऱ्या सदस्यांसाठी राज्यातील रहिवासी असण्याचा नियम लागू होतो.
विधानसभेतील आमदारांकडून निवडल्या जाणाऱ्या विधानपरिषद सदस्यांची निवडणूक तुलनेने सोपी असते. या निवडणुकीत फक्त विद्यमान आमदारांनाच मतदान करता येते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची पद्धत वेगळी आहे. या मतदारसंघांसाठी ठरावीक प्रादेशिक क्षेत्र निश्चित केलेले असते. त्या क्षेत्रातील पात्र स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, नोंदणीकृत पदवीधर आणि शिक्षक या निवडणुकांमध्ये मतदान करतात.
या तीन पद्धतींमध्ये कोण मतदान करू शकतं, याचेही स्वतंत्र नियम आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात संबंधित क्षेत्रातील महापालिका किंवा नगरपालिका आणि नगरपरिषदेतील विद्यमान सदस्यच मतदान करू शकतात.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मात्र स्वतंत्र मतदारयादी तयार केली जाते. प्रत्येक निवडणुकीपूर्वी ही यादी नव्याने बनवली जाते. त्यामुळे आधीपासून मतदार असलेल्या व्यक्तींनाही पुन्हा नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. यासाठी दरवर्षी १ नोव्हेंबर ही मतदारांची पात्रता निश्चित करण्याची तारीख मानली जाते. पदवीधर मतदारसंघात मतदान करण्यासाठी व्यक्ती भारतीय नागरिक असावी, संबंधित मतदारसंघात नेहमीची रहिवासी असावी आणि तिने देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान तीन वर्षांपूर्वी पदवी मिळवलेली असावी. तर शिक्षक मतदारसंघासाठी संबंधित व्यक्तीने मागील सहा वर्षांच्या काळात माध्यमिक शाळा किंवा त्यापेक्षा उच्च स्तरावरील शैक्षणिक संस्थेत किमान तीन वर्षं अध्यापन केले असणे आवश्यक आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ
पदवीधर आणि शिक्षकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ का ठेवले आहेत, असा प्रश्न इथे पडू शकतो. यामागची कल्पना स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुढे आली आहे. १९३५ च्या भारत सरकार कायद्यात धर्म, आर्थिक स्थिती आणि सामाजिक घटकांच्या आधारे वेगवेगळ्या गटांना प्रतिनिधीत्व देण्याची तरतूद होती.
संविधान सभेचे सदस्य शिब्बन लाल सक्सेना यांनी विधानपरिषदेत राज्यातील सुशिक्षित आणि विविध क्षेत्रांतील जाणकार लोकांना स्थान मिळावे, अशी भूमिका मांडली होती. त्यासाठी संपूर्ण मतदारवर्गातील काही विशिष्ट गटांना स्वतंत्रपणे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार द्यावा, अशी त्यांची सूचना होती. या गटांमध्ये पदवीधर, कामगार संघटनांचे सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचा समावेश असावा, असे त्यांना वाटत होते. पुढे याच कल्पनेचा संविधानात समावेश करण्यात आला.
पसंतीक्रमानुसार मतदानाची पद्धत
विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत मतदार एका उमेदवाराला मत देतो. त्यामुळे मतदानाची प्रक्रिया सोपी असते आणि त्यासाठी ईव्हीएमचा वापर करता येतो. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत मतदानाची पद्धत वेगळी असते. इथे मतदाराला केवळ एकाच उमेदवाराला मत न देता, उमेदवारांना आपल्या पसंतीनुसार क्रम द्यावा लागतो. या पद्धतीला एकल, हस्तांतरणीय मत पद्धती म्हणतात. राज्यसभा निवडणुकीतही याच पद्धतीचा वापर केला जातो.
या निवडणुकीत मतपत्रिकेवर सर्व उमेदवारांची नावे असतात, ज्यात नोटाचा पर्याय नसतो. मतदाराला आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवारासमोर ‘१’, दुसऱ्या पसंतीच्या उमेदवारासमोर ‘२’ आणि तिसऱ्या पसंतीच्या उमेदवारासमोर ‘३’ असे लिहावे लागते. मतमोजणीच्या वेळी ठरावीक मतांचा कोटा पूर्ण करणारे उमेदवार विजयी होतात. आवश्यक मते न मिळालेल्या उमेदवारांना बाद केले जाते.
या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाचा फरक आहे. राज्यसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या आमदारांना आपले मत पक्षाच्या निवडणूक प्रतिनिधीला दाखवावे लागते. २००३ मध्ये संसदेत खुल्या मतदानाची पद्धत लागू करण्यात आली. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत आमदारांनी दिलेले मत गुप्त ठेवले जाते. त्यांना आपले मत कोणत्याही उमेदवाराच्या निवडणूक प्रतिनिधीला दाखवण्याची गरज नसते.
