Vidyanand Bapat Marathi: पुण्यातल्या नारायण पेठेत राहणारे विद्यानंद बापट बीपीओ आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. गणेशोत्सवातल्या डीजेविरोधातली त्यांची स्पष्ट भूमिका आणि त्याहूनही जास्त चर्चेत आहे ती म्हणजे त्याची भाषाशैली! त्यांची भाषा इतकी व्हायरल झाली आहे की, लोकांनी त्यांना बिरुद दिलं – ‘मराठीतले शशी थरूर.’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या भाषेच्या शुद्धतेचं कौतुक केलं. पण खरा प्रश्न असा आहे की, एका सर्वसामान्य माणसाची भाषा चर्चेचा विषय का होते? आणि शशी थरूर यांच्याशी त्यांची तुलना का केली जाते? याच प्रश्नांची उत्तरं आपलं भाषाशास्त्र देतं.

कोण आहेत विद्यानंद बापट?

३७ वर्षीय विद्यानंद बापट मूळचे रत्नागिरीचे. तिथेच त्यांचं बालपण आणि शालेय शिक्षण झालं. गेल्या आठ वर्षांपासून ते पुण्यात, नारायण पेठेतले निवासी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठातून वाणिज्य शाखेत शिक्षण घेतलं असून सध्या एका खाजगी कंपनीत बीपीओ क्षेत्रात, घरून काम करतात. गणेशोत्सवातल्या मिरवणुकांमध्ये डीजे आणि कर्णकर्कश आवाजाच्या विरोधात त्यांनी ठाम भूमिका मांडली आणि याच मुद्द्यावर बोलताना समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या मुलाखतींमधून त्यांची भाषाशैली सर्वांच्या नजरेत भरली.

अस्खलित मराठी चर्चेचा विषय

गंमत म्हणजे बापटांनी मराठी विषयात कुठलंही औपचारिक शिक्षण घेतलं नाही आहे. तरीही बोलताना ते सहजपणे अस्खलित मराठी बोलतात, इतकंच नाही तर रोजच्या बोलीत क्वचितच ऐकू येणाऱ्या शब्दांचा ते अगदी सहजतेने वाक्यात वापर करतात. यामुळे, अनेकांचा असा समज झाला की त्यांनी मराठीत पदवी किंवा पीएचडीच केली असावी.

शशी थरूर यांच्याशी तुलना कशासाठी?

शशी थरूर यांची ओळखच मुळात त्यांच्या इंग्रजीतील प्रभुत्वाशी जोडलेली आहे. क्लिष्ट आणि कमी वापरले जाणारे शब्द इतक्या सहजतेने ते वाक्यात गुंफतात की नेहमीच ऐकणाऱ्या माणसाला शब्दकोशाचीच मदत घ्यावी लागेल. नागालॅंडमधल्या एका कार्यक्रमात तर एक श्रोता स्वतः बरोबर चक्क शब्दकोश घेऊन आला होता. भाषेवरचं हे विलक्षण प्रभुत्व, आणि रोजच्या व्यवहारातल्या भाषेपेक्षा एक पायरी वरची शैली, हीच थरूर यांची ओळख झाली.

बापट यांच्या बाबतीतही नेमकं तेच घडतंय, फक्त इथे इंग्रजीऐवजी मराठी आहे. रोजच्या बोलण्यात क्वचित वापरले जाणारे तत्सम (संस्कृतोद्भव) शब्द, नेटकी वाक्यरचना, शब्दांचे स्पष्ट उच्चार, इंग्रजीतल्या शब्दांसाठी मराठीतले प्रतिशब्द वापरण्याची सवय आणि विषयाची सखोल मांडणी यामुळे त्यांची तुलना थरूर यांच्याशी होऊ लागली. दोघांची भाषा वेगळी असली, तरी त्यांच्यात एक सामान धागा आहे जो त्यांना जोडतो – भाषेचा प्रमाणित आणि शिस्तबद्ध वापर, जो आजच्या बोलण्यात दुर्मीळच आहे.

बापटांच्या शैलीचं वेगळेपण:

बापटांच्या मुलाखतीतून येणारी भाषाशैलीविषयी काही निरीक्षणं नमूद करण्याजोगी आहेत. त्यांची भाषा शुद्ध, संयमित आणि ओघवती आहे. याचा अर्थ नेमका काय हे आपण भाषाशास्त्राच्या मदतीने उलगडून पाहुयात :

  • पहिलं निरीक्षण म्हणजे त्यांची शब्दनिवड. रोजच्या बोलण्यात बहुतांश शब्द मराठीच वापरात असलो तरी सवयीप्रमाणे सहज आपल्या बोलण्यामध्ये इंग्रजी शब्द येतात, उदा. “मी तुम्हाला हे कन्फर्म करून सांगते” किंवा “याचं मेजरमेंट जरा अड्जस्ट करून द्या.” बापट यांच्या बोलण्यात असं शब्दांचं मिश्रण क्वचितच झालेलं आढळतं. त्याऐवजी ते जाणीवपूर्वक मराठी शब्दांचाच वापर जास्त करतात.
  • दुसरं निरीक्षण म्हणजे त्यांची वाक्यरचना. त्यांची वाक्यं तुटक नसतात, वाक्यांमध्ये विचारांची सुसंगतता ते टिकवून ठेवतात त्यामुळे त्यांच्या भाषेला एक प्रवाहीपणा येतो.
  • तिसरं निरीक्षण म्हणजे संदर्भांचा वापर. त्यांच्या शैलीत पौराणिक किंवा साहित्यिक दाखले सहज येतात, ते सर्वसामान्यांच्या संभाषणात फारच कमी आढळतात.
  • चौथं निरीक्षण म्हणजे उच्चार. त्यांची शैली स्पष्ट आहे. भाषाशास्त्रामध्ये एखाद्याच्या बोलण्यासंदर्भात ‘शुद्ध’ असा उल्लेख केला जातो, तेव्हा त्याच्या अर्थामध्ये नेमकं काय अपेक्षित असतं, ते समजून घेणं महत्त्वाचं ठरावं. भाषाशास्त्रात तुम्ही पोळी म्हणता का चपाती म्हणता, पाणी म्हणता का पानी म्हणता याच्याशी काहीही घेणं-देणं नसतं. भाषाशास्त्राच्यादृष्टीने शुद्ध भाषाशैली म्हणजे एखाद्या स्वराचा उच्चार किती परिपूर्ण केला जात आहे याला महत्त्व दिलं जातं. यातही उच्चारस्थानांमधला फरक हा माणसा-माणसाने बदलतो. त्यामुळे बापटांची भाषा स्पष्ट आणि शुद्ध आहे याचा अर्थ असा की त्यांचे उच्चार स्पष्ट आहेत आणि ते योग्य उच्चारस्थानातून (शुद्ध) स्वराची निर्मिती करतात.
  • पाचवं आणि महत्त्वाचं निरीक्षण म्हणजे बोलण्याची पट्टी आणि शैली. कुठलीही शिवीगाळ, आक्रस्ताळेपणा किंवा भडक शब्द न वापरता मुद्दे मांडतात. त्यांच्या शैलीच्या सहजतेतून असं समजतं की ते मराठी बोलण्याचा आव आणत नाहीत, ती त्यांच्या बोलण्याची पद्धत आहे.

भाषाशास्त्र काय सांगतं?

भाषाशास्त्राच्या दृष्टीने ‘शुद्ध भाषा’ ही संकल्पना जितकी वाटते तितकी सरळ नाही आहे. कुठलीही बोली किंवा भाषा स्वतः मध्ये कमी-अधिक ‘शुद्ध’ नसते; प्रत्येक बोलीची स्वतःची एक व्यवस्था असते आणि तिचे स्वतःचे काही नियम असतात. जिला आपण ‘शुद्ध मराठी’ म्हणून संबोधतो, ती प्रत्यक्षात एक विशिष्ट सामाजिक प्रतिष्ठा मिळालेली प्रमाणभाषा आहे. ही मराठीची प्रमाण भाषा पुणे-मुंबईतल्या शिक्षित, उच्चवर्णीय वर्तुळात रूढ झालेली आणि माध्यमांमधून, पाठ्यपुस्तकांमधून प्रसारित झालेली अशी आहे. याउलट कोकणी हेल, वऱ्हाडी बोली, ग्रामीण भागांतली भाषा या तितक्याच सघन आणि नियमबद्ध भाषिक व्यवस्था आहेत, सामाजिक पातळीवर दुय्यम दर्जा दिला जातो.

भाषाशास्त्रज्ञ याला ‘प्रतिष्ठाप्राप्त बोली’ (prestige dialect) म्हणतात. एखादी व्यक्ती जेव्हा या प्रतिष्ठाप्राप्त शैलीत अस्खलितपणे बोलते, तेव्हा समाज त्या व्यक्तीला आपोआप अधिक शिक्षित, अधिक हुशार, अधिक विश्वासार्ह मानू लागतो; मग त्या व्यक्तीचं प्रत्यक्ष शिक्षण किंवा ज्ञान काहीही असो. बापट यांचं औपचारिक शिक्षण वाणिज्य शाखेतलं असूनही, त्यांची भाषाशैली भाषाविषयक सखोल जाणिवेतून घडलेली दिसते आणि हेच अनेकांना विचार करायला लावणारं ठरलं.

दुसरा मुद्दा आहे ‘रजिस्टर’ म्हणजे संदर्भानुसार बदलणारी भाषाशैली. आपण मित्रांशी बोलताना अनौपचारिक शैली वापरतो, मुलाखतीत बोलताना अनौपचारिक आणि औपचारिक शैलीचा मिलाफ असतो, भाषणात किंवा प्रतिष्ठित व्यक्तींशी बोलताना आपण औपचारिक शैलीत बोलू लागतो. बापट यांची जाहीर मुलाखतीतली भाषा ही मुळात एक ‘रजिस्टर’ आहे आणि ते रजिस्टर सध्या सार्वजनिक संभाषणातून जवळपास हद्दपार झाल्यासारखे वाटते, कारण दैनंदिन मराठी आता मोठ्या प्रमाणात इंग्रजीमिश्रित झाली आहे. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती हे रजिस्टर सहजतेने, दिखाव्याशिवाय वापरते, तेव्हा ते दुर्मीळ आणि म्हणूनच उठून दिसणारे असते.

बापटांची शैली व्हायरल का झाली?

भाषेचं हे कौतुक फक्त भाषिक निरीक्षणापुरतं मर्यादित राहिलं नाही, त्याला सामाजिक आणि भावनिक कंगोरेही आहेत. मराठी भाषा आणि अस्मिता हा महाराष्ट्रात नेहमीच संवेदनशील विषय राहिला आहे. रोजच्या व्यवहारात मराठी भाषा इंग्रजी-हिंदीच्या रेट्याखाली दबत चालल्याची चिंता अनेकांना वाटते. अशा वातावरणात जेव्हा एक सर्वसामान्य तरुण, कुठलाही आव न आणता, नेटक्या आणि शुद्ध मराठीत आत्मविश्वासाने बोलतो, तेव्हा तो एका परीने भाषिक अस्मितेचं प्रतीक बनतो. शिवाय समाजमाध्यमांचं स्वरूपच असं आहे की जे ‘अनपेक्षित’ आहे, जे रोजच्या ठराविक साच्यात बसत नाही, ते पटकन शेअर होतं. एका सर्वसामान्य बीपीओ कर्मचाऱ्याकडून अशी भाषा ऐकणं, हे लोकांच्या अपेक्षांना छेद देणारं आहे आणि हाच विरोधाभास या व्हिडिओंना व्हायरल करणारा मुख्य घटक ठरला.

कौतुक कमी चेष्टा जास्त : नाण्याची दुसरी बाजू

बापटांच्या भाषेचं जितकं कौतुक झालं, तितकीच त्यांची टिंगल उडवली गेली. काहींनी त्यांना दाद दिली, तर काहींनी त्यांच्या शैलीचं रूपांतर नवीन ट्रेंडमध्ये केलं, त्यांची नक्कल उडवली. यातून प्रश्न असा निर्माण होतो की, एकाच व्यक्तीच्या भाषेवर लोकांच्या इतक्या टोकाच्या प्रतिक्रिया का येतात? याचं उत्तर भाषेच्या इतिहासात दडलं आहे.

मराठी ही एका रात्रीत तयार झालेली भाषा नाही. शतकानुशतकं संस्कृत, फारसी आणि महाराष्ट्री प्राकृत यांच्या प्रभावातून ती घडत गेली आहे. आजच्या मराठीत तत्सम (संस्कृतोद्भव), तद्भव (संस्कृतातून बदलत आलेले) आणि परभाषीक फारसी, अरबी, पोर्तुगीज, इंग्रजी अशा अनेक भाषांतून आलेले शब्द एकत्र नांदतात. आणि हे फक्त मराठीपुरतं मर्यादित नाही, प्रत्येक भाषा ही आपल्या मूळ भाषेच्या किंवा तत्कालीन प्रभावशाली भाषेच्या प्रभावातून घडत असते. खुद्द इंग्रजीचं उदाहरण घ्या. ग्रीक आणि लॅटिन भाषांचा प्रभाव इंग्रजीवर मोठ्या प्रमाणात आहे. एक काळ असाही होता जेव्हा इंग्रजीला फारशी प्रतिष्ठा नव्हती, ती तत्कालीन ‘गावठी’ (vulnerable) भाषा मानली जात असे. पुढे ब्रिटिशांनी जगाच्या मोठ्या भूभागावर राज्य केलं, आणि त्याच सत्तेतून इंग्रजीला आजचं जागतिक स्थान मिळालं.

एखादी सत्ताधारी किंवा प्रभावशाली भाषा जेव्हा एखाद्या समाजावर आदळते, तेव्हा त्या समाजाचे दोन गट पडतात असं दिसून येतं. एक गट ती भाषा स्वतःच्या मातृभाषेसोबत सामावून घेतो, दुसरा गट मात्र तिला नाकारून आपल्या मूळ भाषेचा आग्रह धरत राहतो. भारताचा आणि पर्यायाने महाराष्ट्राचाही, कल पहिल्या गटाकडे राहिला आहे. आपण इंग्रजीला आपल्या रोजच्या व्यवहाराचा भाग केलं आहे, शिक्षणापासून नोकरीपर्यंत सगळीकडे.

आज प्रमाण मराठीबद्दल सुरू असलेली चर्चा, राज्यभाषेचा आग्रह, या सगळ्या बाबी याच असुरक्षिततेतून जन्माला येतात. ‘आज आपण आपल्या भाषेचा आग्रह धरला नाही, तर पुढच्या पिढ्यांपर्यंत ही भाषा पोहोचणारच नाही’ अशी भीती अनेकांना वाटते. पण भाषा टिकवायची असेल, तर तिचा रोजच्या वापरात समावेश करणं हाच खरा मार्ग आहे, हे मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही. यावर लगेच प्रश्न उभा राहतो की, ‘इंग्रजी संकल्पनांना मराठीत पर्यायी शब्दच नाहीत, मग वापरणार काय?’ पण वस्तुस्थिती अशी आहे की इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द तयार करणं, हे आज अनेक भाषातज्ज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञांचं गांभीर्याने चालणारं काम आहे. असे शब्द जेव्हा रोजच्या वापरात रुळतात, तेव्हा भाषेसाठीचा हा लढा आपोआप कमी होत जातो. इथेच बापट यांच्या भाषेची खरी गंमत आहे. लोकांना त्यांचे शब्द नीट उलगडत नाहीत, कारण ते शब्द आपण कधी ऐकलेलेच नसतात तर भाषेत त्यांचा उपयोग करणं तर लांबचीच गोष्ट आहे . जे कानाला अनोळखी वाटतं, त्याची एकतर आपण वाहवा करतो किंवा त्याची चेष्टा करतो; कौतुक आणि टिंगल या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

विद्यानंद बापट आणि शशी थरूर यांची तुलना वरवर पाहता फक्त एक मजेशीर सोशल मीडिया ट्रेंड वाटतो. पण त्यामागे भाषा, प्रतिष्ठा आणि समाज यांच्यातलं एक सखोल नातं दडलेलं आहे. भाषा ही फक्त संवादाचं साधन नसते, तर ती व्यक्तीचे शिक्षण आणि सामाजिक स्थान यांचा परिचय ठरते. बापट यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे अधोरेखित झालं की, भाषेवरचं प्रभुत्व हे पदवीच्या प्रमाणपत्रावर नाही, तर वाचन, निरीक्षण आणि सराव यावर अवलंबून असतं आणि योग्य वेळी, योग्य शैलीत मांडलेला विचार आजही तितकाच प्रभावी ठरतो.