व्हिएतनामच्या विमानतळावर भारतीय पर्यटकांनी गरबा केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने प्रवासातील शिष्टाचार, नागरी जाणीव आणि भारताची प्रतिमा यांसारख्या विषयांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. पर्यटकांच्या कृत्याचा देशाच्या जागतिक प्रतिमेवर कसा प्रभाव पडतो याचा हा आढावा…
व्हायरल व्हिडिओत काय दिसले?
परदेशवारी करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे जागतिक पर्यटनात भारताचे स्थान महत्त्वाचे बनत आहे. मात्र हे होत असतानाच दर काही महिन्यांनी, एखादा व्हायरल व्हिडिओ किंवा बातमी भारतीय पर्यटकांच्या वर्तनाविषयी येते आणि देशाच्या प्रतिमेबाबत चर्चा सुरू होते.
नुकतेच व्हिएतनाम येथील विमानतळावर भारतीय पर्यटकांनी केलेल्या गरबा नृत्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाला. यामध्ये व्हिएतजेट एअरचे विमान जमिनीवरून उड्डाण करत असताना, प्रवाशांचा एक गट त्याच्याशेजारी नाचताना, व्हिडिओ रेकॉर्ड करताना आणि मजा-मस्ती करताना दिसत आहे. समाजमाध्यमावर हा व्हिडिओ प्रसारित होताच काही जणांनी याची प्रशंसा केली तर काहींनी टीका केली.
परदेशवारीतील मुख्य मुद्दा काय?
व्हिएतनाम येथील विमानतळावर भारतीय पर्यटकांनी केलेल्या गरबा नृत्याकडे काहींनी भारतीय संस्कृतीचा उत्सव म्हणून पाहिले, तर इतरांनी विमानतळाची धावपट्टी यासाठी योग्य जागा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. यावर प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये ओडिशाचे परिवहन आयुक्त आणि सीआयडी क्राइमचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांचा समावेश होता. बोथरा यांच्या मते परदेशी जाणाऱ्यांना भारतीय पासपोर्ट बाळगण्यासोबत जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. कारण काही प्रवाशांच्या कृतींचा परिणाम कोट्यवधी भारतीयांच्या प्रतिमेवर होऊ शकतो. पर्यटकांच्या वर्तनामुळे काही देशांनी व्हिसा नियमांमध्ये बदल केल्याकडे लक्ष वेधताना त्यांनी थायलंडचे उदाहरण दिले.
थायलंड सरकारने काय नियम केला?
थायलंड सरकारने भारतीय नागरिकांना मिळणारी ६० दिवसांची व्हिसा-फ्री एन्ट्री बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता भारतीयांना व्हिसा ऑन अरायव्हल किंवा ई-व्हिसा काढावा लागणार आहे. तसेच भारतीय पर्यटकांना आता थायलंडमध्ये केवळ १५ दिवसांसाठीच मुक्काम करता येणार आहे. यापूर्वी भारतासह ९३ देशांतील नागरिकांना विनाव्हिसा दोन महिने राहण्याची सवलत होती. मात्र, आता प्रवाशांना विमानतळावर उतरल्यावर व्हिसा घ्यावा लागेल. तसेच प्रवासापूर्वी ई-व्हिसासाठीही अर्ज करावा लागेल. यासाठी पर्यटकांना सुमारे २५०० थाई भाट म्हणजे अंदाजे ७,३२२ रुपये मोजावे लागणार आहेत. समाजमाध्यमावर काही पर्यटकांचे मंदिरामधील हुल्लडबाजीचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.
समाजमाध्यमांवर पर्यटकांच्या कृत्यांचे वृत्त?
भारतीय पर्यटकांनी अनेक देशांमध्ये जाऊन अयोग्य कृत्य केल्याचे वारंवार समाजमाध्यमांद्वारे समोर येत आहे. अलीकडेच, जपानमधील एका भारतीय पर्यटकाला दुकानातून वस्तू चोरताना पकडल्यानंतर आणि केवळ ताकीद मिळाल्यानंतरही, त्याच्यावर कोणताही औपचारिक गुन्हा दाखल झाला नाही, असे वृत्त समाजमाध्यमांवर आले. तसेच बालीमध्येही काही पर्यटकांनी रिसॉर्टमधून वस्तू चोरल्याचे एका व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून आले. यात रिसॉर्टचे कर्मचारी हॉटेलमधून परत जाणाऱ्या भारतीय पर्यटकांच्या सामानातून पूल टॉवेल, हेअर ड्रायर, कटलरी आणि बाथरोबयांसारख्या वस्तू कथितरीत्या परत मिळवताना दिसत आहेत. या घटनांमध्ये सहभागी प्रवाशांची संख्या कमी असली तरी या घटनांनी अनेकांचे लक्ष वेधले. विशेषकरून या घटनांमुळे भारतीयांबाबत वेगळे जनमत तयार होऊन त्याचा परिणाम देशाच्या प्रतिमेवर होतो.
देशातही हुल्लडबाजी?
पर्यटकांच्या अयोग्य वर्तनाचा मुद्दा केवळ आंतरराष्ट्रीय प्रवासापुरता मर्यादित नाही. देशात असलेल्या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर काही पर्यटकांच्या वागणुकीबद्दल स्थानिक समुदायांनी वाढत्या प्रमाणात चिंता व्यक्त केली आहे. गोवा येथे परदेशी पर्यटकांचा, विशेषतः महिलांचा, परवानगीशिवाय फोटो आणि सेल्फीसाठी छळ केल्याचा आरोप असलेल्या पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई केली. उत्तर प्रदेशमध्ये पर्यटकांनी वन्यजीव नियमांचे कथित उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने सफारी वाहनांना दंड ठोठावला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही वाहने ठरवून दिलेल्या मार्गांवरून भरकटली. एका घटनेत तर त्यांनी पुलाच्या दोन्ही बाजूंनी वाघाला घेरले. नियमांनुसार मनाई असूनही, एका गटाने वाहनातून बाहेर उडी मारल्याचेही वृत्त आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये तर तेथील सिसू गावच्या ग्रामस्थांनी पर्यटकांच्या हुल्लडबाजीला कंटाळून स्थानिक सणांच्या काळात पर्यटकांवर तात्पुरती बंदी घातली. या घटनांचा एकमेकांशी संबंध वाटत नसला तरी यामध्ये पर्यटकांकडून होणाऱ्या अयोग्य वर्तनाचा एक समान धागा आहे. पर्यटक एखाद्या स्थळाला तेथील संस्कृती, पर्यावरण आणि नियम असलेले ठिकाण म्हणून न पाहता, केवळ मनोरंजनाची पार्श्वभूमी म्हणून पाहतात. त्यामुळेच त्यांच्याकडून अयोग्य कृत्य होते
विवेकपूर्ण प्रवास होणे आवश्यक?
भारताच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन क्षेत्राचे महत्त्वपूर्ण स्थान आहे. यामुळे लाखो रोजगार निर्माण होतात. नागरिकांच्या परदेशवारीचाही यात वाटा आहे. परंतु हे पर्यटन तेथील स्थानिक समुदाय आणि पर्यटक यांच्यातील विश्वासावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटकांनी प्रवासादरम्यान विवेकाने वागणे आवश्यक आहे. भारतीय जास्त प्रवास करतात हा मुद्दा नाही, तर तो कसा करतात हे महत्त्वाचे ठरते. पर्यटकांच्या वर्तनाच्या काही मोजक्या घटना सतत लक्ष वेधून घेतात आणि धारणांना आकार देतात. बहुतांश भारतीय पर्यटक स्थानिक संस्कृतीचा आदर करतात आणि नियमांचे पालन करतात. मात्र चांगल्या वागणुकीचा प्रसार क्वचितच होतो. व्हिएतनाममधील गरबा नृत्यावरून सुरू असलेल्या चर्चेत विवेकपूर्ण प्रवास करणे आवश्यक असल्याचे अधोरेखित झाले, कारण पर्यटक जगभर प्रवास करताना ते आपल्यामागे कोणता ठसा सोडून जातात, हे देशाच्या प्रतिमेसाठी महत्त्वाचे ठरते.
dharmesh.shinde@expressindia.com
