Vikram Batra and Dimple Cheema love story: प्रेम हे सांगून, ठरवून होत नसतं. कधी पहिल्या भेटीत, पहिल्या नजरेत; तर कधी सहवासात घालवलेल्या काही क्षणांमध्ये बहरत जातं. अनेकदा प्रेम हे मुकं असतं, ते फार गाजावाजा करत नाही. ते मनाच्या एखाद्या कोपर्यात भावबंध जोपासून राहतं. त्या गुलाबी प्रेमाला ज्यावेळी मोठ्या ध्येयाची, त्यागाची जोड मिळते त्यावेळी मात्र ती गाथा होते. अशीच एक गाथा एका बलिदानानंतर २७ वर्षांपूर्वी जन्माला आली आणि आजही तितकीच जिवंत आहे!
कारगिलमध्ये शहीद झालेल्या विक्रम बत्रांचे नाव परिचित आहेच. अवघ्या वयाच्या २४ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणार्या या शेरशहावर चित्रपटदेखील आला आहे. हे बलिदान नक्कीच सर्वश्रेष्ठ आहेच. त्याच बरोबरीने विवाहाआधीच भाळी वैधव्य आलेल्या त्यांच्या प्रेयसीचा त्यागही तितकाच महत्त्वाचा ठरतो. हा त्याग तारुण्याचा, २७ वर्षांच्या प्रतिक्षेचा आहे… एका अपूर्ण राहिलेल्या संसाराचा आहे आणि गेल्या २७ वर्षांपासून जपलेल्या अव्यक्त प्रेमाचाही आहे!
चंदीगडच्या विद्यापीठ परिसरात त्यादिवशी नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होते. हिरव्यागार आवारातून विद्यार्थ्यांची ये-जा सुरू होती. कॅन्टीनमध्ये भविष्याविषयी चर्चा सुरू होत्या… कोणाला चांगली नोकरी हवी होती, कोणाला परदेशात जायचे होते, तर कोणाला साधे, शांत आयुष्य जगायचे होते. याच गर्दीत विक्रम बत्रा आणि डिंपल चीमा यांची भेट झाली.
त्यावेळी विक्रम देशासाठी प्राण अर्पण करणारा युद्धनायक नव्हता. त्याची ‘शेरशाह’ ही ओळख अद्याप घडायची होती. तो स्वप्न पाहणारा, हसतमुख आणि आत्मविश्वासू तरुण होता. डिंपलसाठी तो दिलखुलास हसणारा, आपली स्वप्ने स्पष्टपणे सांगणारा आणि समोरच्या व्यक्तीला आपलेसे करण्याची विलक्षण ताकद असलेला तरुण होता. त्यांची ओळख हळूहळू मैत्रीत बदलली. मैत्रीला प्रेमाचा स्पर्श कधी झाला, हे कदाचित त्यांनाही सांगता आलं नसतं. त्या काळात विक्रमच्या मनात आणखी एक मोठे स्वप्न आकार घेत होतं, त्याला सैन्यात जायचं होते.
प्रेमापेक्षा मोठे कर्तव्य
मर्चंट नेवीमधील सोन्यासारखी संधी नाकारून विक्रमने भारतीय सैन्यात जाण्याचा मार्ग निवडला, असा उल्लेख त्याच्या चरित्रात आढळतो. हा केवळ एका नोकरीचा निर्णय नव्हता, तर संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवणारा एक ध्यास होता. लष्करी आयुष्य म्हणजे सततच्या बदल्या, खडतर प्रशिक्षण, महिनोनमहिने ताटातूट आणि प्रत्येक निरोपामागे सावलीसारखी उभी असलेली अनिश्चितता! हे कटू वास्तव डिंपलपासून अजिबात लपलेलं नव्हतं.
आपल्या प्रिय व्यक्तीने सदैव बरोबर असावं, असे वाटणे अगदी स्वाभाविक असतं. परंतु खऱ्या प्रेमाची खरी परीक्षा तर तिथेच असते, जिथे प्रियकराच्या ध्येयासाठी त्याला स्वतःपासून दूर जाऊ द्यावे लागते. डिंपलने विक्रमला कधीच रोखलं नाही; ती त्याच्या ध्येयाआड आली नाही.

विक्रम सैनिकी प्रशिक्षणासाठी निघून गेला आणि पुढे ६ डिसेंबर १९९७ रोजी ‘१३ जम्मू अँड काश्मीर रायफल्स’मध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाला. खडतर प्रशिक्षण, सीमेवरील सेवा आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांच्यातील अंतर वाढत गेलं. प्रत्यक्ष भेटी दुर्मिळ झाल्या आणि त्यांची जागा पत्रांनी आणि मोजक्या फोन कॉलने घेतली.
आजच्यासारखी मोबाईल आणि इंटरनेटची सोय तेव्हा नव्हती. फोनवर सहज संवाद साधणे शक्य नसे आणि पत्राची वाट पाहण्यातच कित्येक दिवस निघून जात. थोडक्यात सांगायचे तर, ‘प्रतीक्षा’ हाच त्यांच्या नात्याचा श्वास झाला होता.
अशा खडतर परिस्थितीतही त्यांनी भविष्याची सुंदर स्वप्ने विणणे सोडले नाही. युद्ध संपवून विक्रम परत आला की विवाहबद्ध व्हायचे, असे डिंपलने पुढे एका मुलाखतीत सांगितले होते. त्या स्वप्नात कोणतीही भव्यता किंवा अवाजवी अपेक्षा नव्हत्या… त्यांना फक्त आयुष्यभर एकमेकांची साथ हवी होती… इतकीच एक साधी इच्छा!
एका मंदिरातील आठवण
डिंपल चीमा यांनी सार्वजनिकपणे सांगितलेल्या आठवणींमध्ये मनसा देवी मंदिरातील एक प्रसंग वारंवार उद्धृत केला जातो. त्यांच्या विवाहाविषयी कुटुंबीयांकडून प्रश्न विचारले गेले तेव्हा विक्रमने त्यांची भांग आपल्या रक्ताने भरल्याचे डिंपल यांनी सांगितले होते. आणखी एका प्रसंगी त्यांनी मंदिरात एकत्र प्रदक्षिणा घातल्यावर विक्रमने विनोदाने त्यांना आपले लग्न झाल्याचे म्हटले होते. या प्रसंगांना कायदेशीर किंवा औपचारिक विवाहाचा अर्थ नव्हता. डिंपल यांच्या दृष्टीने मात्र ते विक्रमने दिलेल्या निष्ठेच्या वचनासारखे होते. मे १९९९ मध्ये कारगिल, द्रास आणि बटालिकच्या बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूची कुटिल घुसखोरी उघड झाली आणि शांत भासणारा हिमालय युद्धाच्या ज्वाळांनी पेटून उठला. अतिउंच, दुर्गम पर्वतरांगांवर कब्जा करून बसलेल्या शत्रूला हुसकावून लावण्यासाठी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ पुकारले.
या घनघोर युद्धात ‘१३ जम्मू अँड काश्मीर रायफल्स’ची तुकडीही रणांगणात उतरली.
आता विक्रम फक्त डिंपलचा प्रियकर किंवा पालमपूरच्या बत्रा कुटुंबाचा लाडका मुलगा उरला नव्हता. तो एका शूर सैनिकी तुकडीचा खंबीर नेतृत्व करणारा अधिकारी होता. त्याच्या एका हाकेवर प्राण पणाला लावणाऱ्या जवानांचा त्याच्यावर अढळ विश्वास होता आणि त्याच्या प्रत्येक निर्णयावर अनेक कुटुंबांचे भवितव्य अवलंबून होते.
युद्धावर निघतानाचा निरोप हा इतर साध्या निरोपांसारखा कधीच नसतो. त्यात निष्ठेचे आश्वासन तर असते, पण परतीची शाश्वती नसते! “मी लवकरच परत येईन,” असे म्हणणारा विक्रमही परिस्थितीचे गांभीर्य जाणून होता आणि “मी तुझी वाट पाहीन,” असे सांगणारी डिंपल आपल्या काळजातील भीती चेहऱ्यावर न दाखवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती.
अन् अखेर, एका अज्ञात भीतीला उराशी बाळगत डिंपलची ती कारुण्यमयी प्रतीक्षा पुन्हा एकदा सुरू झाली.
“ये दिल मांगे मोअर!”
कारगिल युद्धातील अत्यंत बिकट अन् महत्त्वाचे ‘पॉइंट ५१४०’ हे शिखर शत्रूला धूळ चारत विक्रम बत्रांच्या तुकडीने सर केले. विजयाचा सांकेतिक संदेश देताना विक्रम उद्गारले… “ये दिल मांगे मोअर!” संपूर्ण देशाला या शब्दांत एक पराक्रमी युद्धनायक दिसत होता; पण डिंपलला मात्र त्यात सुरक्षित घरी परतण्याचे वचन देणारा आपला ‘विक्रम’ ऐकू येत होता. एक लक्ष्य जिंकले तरी सैनिकी कर्तव्याची सीमा तिथे संपत नव्हती. पॉइंट ५१४० नंतर विक्रम आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ‘पॉइंट ४८७५’ची अत्यंत कठीण जबाबदारी सोपवण्यात आली. ७ जुलै १९९९ …शत्रूच्या भीषण गोळीबारात, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता जखमी सहकाऱ्यांना वाचवताना अवघ्या २४ वर्षांचे कॅप्टन विक्रम बत्रा धारातीर्थी पडले. देशाचा एक धैर्यवान जवान अमर हुतात्मा झाला; पण बत्रा कुटुंबाने आपला कुलदीपक गमावला आणि डिंपलचे संपूर्ण भविष्य एका क्षणात उध्वस्त झाले.
युद्धात मृत्यू एका क्षणात येतो, पण त्यानंतर निर्माण झालेली पोकळी उरलेल्या आयुष्यात रोज नव्याने छळत राहते. डिंपलसाठी हे केवळ विक्रमचे जाणे नव्हते, तर त्यांच्या भविष्यातील सर्व स्वप्नांचा अंत होता. त्यांची प्रेमकथा संपली नव्हती… फक्त तिची पुढची पाने कायमची कोरी राहिली होती.
तिने दुसरा विवाह का केला नाही?
डिंपल चीमा यांनी नंतर दुसरा विवाह केला नाही. मात्र तिच्या या निर्णयाकडे केवळ दुःख किंवा त्यागाचे प्रदर्शन म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. तिच्या आयुष्याविषयीचा निर्णय तिचा स्वतःचा होता.
सार्वजनिक मुलाखतींमध्ये तिने विक्रमच्या आठवणींशी आपले नाते व्यक्त केले. तिच्यासाठी त्या नात्याचे मूल्य विवाहसोहळा पूर्ण झाला किंवा नाही, यावर अवलंबून नव्हते. प्रेमाला समाजमान्य शेवट मिळाला नाही म्हणून प्रेम खोटे ठरत नाही, अशी तिची भूमिका त्या आठवणींमधून जाणवते. तिने विक्रमच्या नावाचा गाजावाजा करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. ती दीर्घकाळ सार्वजनिक प्रकाशझोतापासून दूर राहिली. तिच्या शांततेतही एक प्रकारची निष्ठा होती.
पण तिच्या निर्णयाचे रोमँटीकरण करताना एक सत्य विसरता कामा नये… एखाद्या स्त्रीने विवाह न करणे हाच प्रेमाचा एकमेव पुरावा नसतो. डिंपलचा निर्णय तिच्यासाठी अर्थपूर्ण होता; तो प्रत्येकासाठी आदर्श किंवा बंधन ठरू शकत नाही. तिच्या प्रेमाची खरी ताकद तिच्या वैवाहिक स्थितीत नव्हती. ती विक्रमच्या कर्तव्याला समजून घेण्यात होती. त्याला रोखण्याचा अधिकार स्वतःकडे असूनही त्याच्या ध्येयाचा आदर करण्यात होती आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मृतीला स्वतःच्या आयुष्याचा शांत भाग म्हणून जपण्यात होती.
