Paris Olympic 2024 पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत कुस्तीत ५० किलोग्राम वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट हिला अपात्र ठरवण्यात आले. महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १०० ग्रॅम वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विनेश फोगटने भावनिक पोस्ट लिहून कुस्तीतून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. 'एक्स'वरील आपल्या पोस्टमध्ये कुस्तीला आई मानत तिने लिहिले, "आई कुस्ती तू जिंकली आणि मी हरले, मला माफ कर. तुझी स्वप्ने पूर्ण करण्याची ताकद आता माझ्यात नाही. अलविदा कुस्ती २००१-२०२४. मी तुझी ऋणी राहीन, मला माफ कर." ऑलिम्पिकच्या स्पर्धेत विनेश फोगटचे प्रदर्शन पाहून ती सुवर्णपदक जिंकेल, अशी खात्री प्रत्येकाला होती. परंतु, सुवर्णपदकाच्या सामन्यासाठी तिला अपात्र ठरविल्यानंतर सर्वांचं स्वप्न भंगलं. मात्र, ती अपात्र झाल्याची बातमी येताच विरोधकांनी षड्यंत्राचा आरोप केला. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची जणू मालिकाच सुरू झाली आणि या मुद्दयावरून राजकारण तापले. विनेश फोगटच्या अपात्रतेवरून राजकारण तापण्याचे कारण काय? याविषयी जाणून घेऊ. हेही वाचा : ‘जमात-ए-इस्लामी’चा वादग्रस्त इतिहास काय? जमातबाबत शेख हसीनांची भूमिका काय होती? फोगटच्या अपात्रतेनंतर आरोपांची मालिका महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरविल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक विरोधी नेत्यांनी सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने आरोप केला की, हे एक 'षड्यंत्र' आहे. त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आणि विचारले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन युद्ध थांबवू शकतात, तर मग ते भारतीय खेळाडूंना न्याय का देऊ शकत नाहीत. काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला म्हणाले की, फोगटने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सात तासांत प्री-क्वार्टर, क्वार्टर फायनल आणि सेमीफायनल जिंकून देशाचा तिरंगा फडकावला आहे. “जागतिक कुस्तीतील सुवर्णपदक विजेती युई सुसाकीला भारताच्या कन्येने पराभूत केले आणि भारताचा झेंडा फडकावला. विनेश फोगट कुस्तीच्या मॅटवर हरली नाही तर षड्यंत्राच्या राजकारणात हरली. खेळाच्या राजकारणासाठी तिचा बळी दिला गेला,” असे सुरजेवाला म्हणाले. महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरविल्यानंतर त्याचे पडसाद देशभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स) काँग्रेस खासदार दीपेंद्रसिंह हुडा यांनीही सांगितले की, “विनेशने फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. जेव्हा खेळाडू सराव करत होते तेव्हा ती कुस्तीमध्ये भारतीय महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी निषेध करत होती. तरीही तिने अंतिम फेरी गाठली. मग, कुठे आणि काय चुकले?" लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले, “भारताची शान, विनेश फोगट विश्वविजेत्या कुस्तीपटूंना पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचल्या. विनेश फोगटला तांत्रिक कारणास्तव अपात्र ठरवण्यात आले हे दुर्दैवी आहे. आम्हाला पूर्ण आशा आहे की, भारतीय ऑलिम्पिक संघटना या निर्णयाला आव्हान देईल आणि देशाच्या मुलीला न्याय देईल. "द्वेषाचे षड्यंत्र" त्यानंतर सुरजेवाला यांनी पुन्हा एकदा एक पोस्ट लिहिली; ज्यात ते म्हणाले, “हे द्वेषाचे मोठे षड्यंत्र आहे. तिच्या विजयामुळे कोण अस्वस्थ होते? कोणी सत्तेचा दुरुपयोग केला?" फोगटच्या अपात्रतेच्या वृत्तानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे खासदार महुआ माझी यांनीही सरकारवर टीका केली. “तिला (फोगट) काही ग्रॅम वजनाने कसे अपात्र ठरवण्यात आले. तिच्याविरुद्ध कट रचला गेला असण्याची शक्यता आहे, तिला न्याय मिळाला पाहिजे.” समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही पॅरिसमधील कुस्तीपटू विनेश फोगटच्या अपात्रतेच्या तांत्रिक कारणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करत सरकारला फटकारले. “विनेश फोगटला अंतिम फेरीत भाग न घेता येण्यामागील तांत्रिक कारणांची सखोल चौकशी व्हायला हवी आणि त्यामागील सत्य आणि खरे कारण समोर यायला हवे,” असे यादव यांनी 'एक्स'वर लिहिले. राजकीय क्षेत्रापासून दूर असणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया यांच्या पोस्टनेही सर्वांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, “विनेश तू हरली नाहीस, तुला हरवले गेले आहे. आमच्यासाठी तू नेहमीच विजेती राहशील. तू फक्त भारताची कन्या नाही तर भारताची शानही आहेस. या आरोपांचे नेमके कारण काय? भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह शरण यांच्या विरोधात गेल्या वर्षी कुस्तीपटूंनी निषेध केला होता. देशभरात याची चर्चा झाली होती. या आंदोलनात विनेश फोगट हिचा प्रमुख सहभाग होता, त्यामुळे या प्रकरणाला आणि विनेश फोगटच्या अपात्रतेला जोडले जात आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि इतरांसह विनेश फोगट यांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केले होते. त्यांनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन प्रमुख ब्रिजभूषण सिंह शरण यांच्यावर लैंगिक शोषण आणि धमकावल्याचा आरोप केला होता. आंदोलकांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि महासंघ विसर्जित करण्याची मागणी केली होती. दोन दिवसांच्या विरोधानंतर तत्कालीन क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी विनेश आणि कुस्तीपटूंना या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी एक निरीक्षण समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. मे महिन्यात क्रीडा मंत्रालयाला या समितीने अहवाल सादर केला, पण हा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. त्यानंतर कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलन सुरू केले. कुस्तीपटूंनी पुढे असा आरोप केला की, एका अल्पवयीनासह सात महिला कुस्तीपटूंनी ब्रिज भूषण विरुद्ध सीपी पोलिस स्टेशनमध्ये लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती. परंतु, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग शरण यांच्या विरोधात गेल्या वर्षी कुस्तीपटूंनी निषेध केला होता. (छायाचित्र-पीटीआय) २८ मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या दिवशी पोलिसांनी कुस्तीपटूंना जबरदस्तीने ताब्यात घेतल्याची बातमी आली. या घटनेनंतर कुस्तीपटू आपली पदके गंगा नदीत टाकण्यासाठी हरिद्वारला गेले. याची दखल देशासह संपूर्ण जगाने घेतली. या दृश्याने अनेकांना अश्रू अनावर झाले. शेतकरी नेत्यांनी खूप समजावून सांगितल्यानंतरच विनेश आणि तिच्या सहकारी पैलवानांनी त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार केला. डिसेंबरमध्ये चालू असलेल्या निषेधाचा भाग म्हणून, विनेशने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला. ऑलिम्पिक आणि आशियाई स्लॉट्ससाठी तिच्या निवड चाचणीच्या दिवशी, विनेश स्पोर्ट्स अँड राइट्स अलायन्स (एसआरए) या क्रीडापटूंच्या हक्क संस्थेच्या संशोधकांशी निषेधाबद्दल बोलली, असे इएसपीएनच्या अहवालात म्हटले आहे. “भारतीय समाजात अत्याचार आणि छळ सामान्य आहे. जेव्हा हल्ला भयंकर असेल तेव्हाच ते गांभीर्याने घेतील. हे आपण कुस्तीची लढाई लढतो तसे आहे. आपण एका गुणाने हरलो किंवा दहा गुणांनी, आपण हरलो असतो. तसेच प्राणघातक हल्ला लहान असो वा मोठा, तो प्राणघातक हल्लाच असतो," असे ती म्हणाली असल्याचे अहवालात दिले आहे. डिसेंबरमध्ये चालू असलेल्या निषेधाचा भाग म्हणून, विनेशने तिचा खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला. (छायाचित्र-पीटीआय) या मुद्द्यावर सरकारची प्रतिक्रिया आणि विरोधकांचा सभात्याग जेव्हा विनेश फोगटची अपात्रता जाहीर करण्यात आली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचा उल्लेख 'चॅम्पियन' म्हणून केला. त्यानंतर क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी लोकसभेत या विषयावर सहा मिनिटांचे भाषण केले. याविषयी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाकडे तीव्र निषेध नोंदविला असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनाप्रमुख पी. टी. उषा यांना या प्रकरणात योग्य कारवाई करण्यास सांगितले होते. जेव्हा त्यांनी फोगटला सरकार आर्थिक सहाय्य देणार असल्याची माहिती देण्यास सुरुवात केली, तेव्हा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. हेही वाचा : तीन मुलींची हत्या, वर्णद्वेष, स्थलांतरितांचा विरोध; ब्रिटनमधील हिंसक आंदोलनांची स्थिती काय? आजही (८ ऑगस्ट), फोगटच्या अपात्रतेचे पडसाद संसदेत उमटले. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना या विषयावर चर्चा करू न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला. काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी नंतर पत्रकारांना सांगितले, “भारतीय आघाडीच्या सदस्यांनी विनेश फोगट प्रकरणावरून राज्यसभेतून सभात्याग केला. आम्हाला तिच्या ऑलिम्पिक अपात्रतेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करायची होती, पण सरकार तयार नव्हते.”