सहा वर्षांपूर्वी करोना या विषाणूजन्य साथीच्या आजारामुळे जागतिक स्तरावर मोठा फटका बसला. अजूनही विषाणूजन्य साथींच्या आजाराचा धोका वाढत आहे. हवामान बदल, शहरीकरण आणि जागतिक प्रवसामुळे मानवाचा विविध विषाणूंशी संपर्क वाढत आहे, ज्यामुळे जुने विषाणू उत्परिवर्तित होऊन पसरत आहेत. संसर्गजन्य रोगतज्ज्ञ २०२६ मध्ये अशाच काही विषाणूंवर लक्ष ठेवून आहेत, त्याबद्दल…

आरोगतज्ज्ञ कोणत्या विषाणूंवर लक्ष ठेवून आहेत?

हवामान बदल, शहरीकरण आणि जागतिक प्रवासामुळे मानवाचा विविध विषाणूंशी संपर्क वाढत आहे, ज्यामुळे जुने विषाणू उत्परिवर्तित होऊन पसरत आहेत. इन्फ्लूएंझा ‘ए’ (Influenza A), विशेषतः ‘बर्ड फ्लू’चा प्रकार असलेला H5N1, हा जागतिक महासाथीच्या दृष्टीने चिंतेचा मुख्य विषय राहिला आहे. ‘एमपॉक्स’ (Mpox) चा प्रसार जगभरात झाला असून, पूर्वी प्रभावित झालेल्या क्षेत्रांच्या पलीकडेही याची नवीन प्रकरणे समोर येत आहेत. ‘ओरोपौचे’ (Oropouche) सारख्या कीटकांद्वारे पसरणाऱ्या विषाणूंचा भौगोलिक प्रसार वाढत आहे. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, लसीकरणाचे घटते प्रमाण आणि विस्कळीत झालेली आरोग्य यंत्रणा यांमुळे २०२६ मध्ये धोके अधिक गंभीर होऊ शकतात. जुने विषाणू सतत बदलत (उत्परिवर्तित) असतात. पृथ्वीचे वाढते तापमान आणि वाढती लोकसंख्या यामुळे मानवाचा अधिक आणि विविध प्रकारच्या विषाणूंशी संपर्क येत आहे. तसेच, वाढत्या प्रवासामुळे हे विषाणू मानवी वाहकांबरोबर जगभर वेगाने पसरू शकतात.

इन्फ्लूएंझा ‘ए’ – महासाथीच्या उंबरठ्यावर?

संसर्गजन्य रोगतज्ज्ञ आणि संशोधक २०२६मध्ये अशा काही विषाणूंवर लक्ष ठेवून असून जे अनपेक्षित ठिकाणी किंवा अनपेक्षित संख्येने संसर्ग पसरवण्याची शक्यता बाळगून आहेत. त्यापैकी एक इन्फ्लूएंझा ‘ए’ आहे. हा विषाणू विविध प्रकारच्या प्राण्यांना संक्रमित करतो आणि त्यात वेगाने उत्परिवर्तित होण्याची क्षमता असते. २००९ मध्ये इन्फ्लूएंझाच्या एच१एन१ या उपप्रकारामुळे आलेली सर्वात अलीकडील महासाथ, ज्याला ‘स्वाइन फ्लू’ म्हटले जाते. कारण हा रोग मेक्सिकोमधील डुकरांपासून आला. या आजाराच्या पहिल्याच साथीमध्ये जगभरात २,८०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा विषाणू आजही अस्तित्वात आहे. अलीकडच्या काळात, शास्त्रज्ञ अत्यंत घातक अशा ‘एव्हियन इन्फ्लूएंझा’च्या (बर्ड फ्लू) एच५एन१ या उपप्रकारावर लक्ष ठेवून आहेत. हा विषाणू सर्वप्रथम १९९७ मध्ये दक्षिण चीनमधील मानवांमध्ये आढळला होता; स्थलांतरित पक्ष्यांमुळे हा विषाणू जगभर पसरला. २०२४ मध्ये अमेरिकेतील दुभत्या जनावरांमध्ये (गायी-म्हशींमध्ये) हा विषाणू पहिल्यांदा आढळला आणि त्यानंतर अनेक राज्यांमधील पशुधनामध्ये तो पसरला. २०२६मध्ये, शास्त्रज्ञ एच५एन१ विषाणूमध्ये अशा बदलांचा शोध घेणे सुरूच ठेवतील ज्यामुळे तो एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे पसरू शकेल, जी इन्फ्लूएंझाच्या नवीन जागतिक महासाथीच्या सुरुवातीसाठी एक आवश्यक पायरी आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या इन्फ्लूएंझा लशी कदाचित ‘एच५एन१’पासून संरक्षण देत नाहीत, परंतु शास्त्रज्ञ या विषाणूविरुद्ध प्रभावी ठरू शकतील अशा लशी विकसित करण्यावर काम करत आहेत.

एमपॉक्स – परिस्थिती बिघडण्याची शक्यता

एमपॉक्स म्हणजेच मंकीपॉक्स विषाणू याचा शोध सर्वप्रथम १९५०च्या दशकात लागला. अनेक दशके हा आजार क्वचितच आढळत असे आणि तो प्रामुख्याने आफ्रिकेत सहारा वाळवंटाच्या दक्षिणकेडील देशांत मर्यादित होता. त्याच्या मूळ नावाच्या (मंकीपॉक्स) विपरीत, हा विषाणू प्रामुख्याने उंदीरवर्गीय प्राण्यांना संक्रमित करतो आणि क्वचित प्रसंगी माणसांमध्ये पसरतो. एमपॉक्स हा स्मॉलपॉक्स (देवी) या रोगाशी जवळचा संबंध असलेला विषाणू आहे. याच्या संसर्गामुळे ताप येतो आणि वेदनादायक पुरळ उठते, जे बरे होण्यास अनेक आठवडे लागू शकतात. एमपॉक्सचे अनेक प्रकार आहेत, यामध्ये ‘क्लेड I’ (clade I) हा सामान्यतः अधिक गंभीर असतो, तर ‘क्लेड II’ (clade II) हा तुलनेने सौम्य असतो. एमपॉक्ससाठी लस उपलब्ध आहे, परंतु त्यावर कोणतेही प्रभावी उपचार उपलब्ध नाहीत. २०२६ मध्ये अमेरिका आणि परदेशातील एमपॉक्सच्या उद्रेकाची परिस्थिती कशी बदलेल किंवा विकसित होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ओरोपौचे विषाणू – कीटकांद्वारे पसरणारा विषाणू

ओरोपौचे (Oropouche) विषाणूचा शोध सर्वप्रथम १९५० च्या दशकात दक्षिण अमेरिकेच्या किनाऱ्याजवळील त्रिनिदाद बेटावर लागला. हा विषाणू डास आणि चावा घेणाऱ्या लहान माश्या (ज्यांना ‘नो-सी-अम्स’ (no-see-ums) असेही म्हणतात) यांच्याद्वारे पसरतो. या विषाणूची लागण झालेल्या बहुतांश लोकांना ताप, डोकेदुखी आणि स्नायुदुखीचा त्रास होतो. हा आजार सहसा काही दिवसच टिकतो, परंतु काही रुग्णांमध्ये अशक्तपणाची समस्या अनेक आठवडे राहू शकते. सुरुवातीला बरे वाटल्यानंतरही हा आजार पुन्हा उद्भवू शकतो. ओरोपौचे विषाणू आणि त्यातून होणाऱ्या आजाराबद्दल अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत आणि यावर कोणतेही विशिष्ट उपचार किंवा लस उपलब्ध नाही. अनेक दशके असे मानले जात होते की, माणसांना होणारी याची लागण केवळ ॲमेझॉन प्रदेशापुरती मर्यादित आहे. तथापि, २०००च्या दशकाच्या सुरुवातीपासून, दक्षिण अमेरिका, मध्य अमेरिका आणि कॅरेबियन बेटांच्या मोठ्या भागात याची प्रकरणे दिसून येऊ लागली. २०२६मध्येही ओरोपौचेचा प्रादुर्भाव अमेरिकी खंडांमधील प्रवाशांवर परिणाम करत राहण्याची शक्यता आहे. ओरोपौचे विषाणू वाहून नेणाऱ्या चावा घेणाऱ्या माश्या उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत आढळतात. या विषाणूचा प्रसार होण्याचे क्षेत्र आणखी वाढू शकते.

२०२६मध्ये आणखी कोणत्या विषाणूंचे धोके?

चिकुनगुनिया विषाणूचा जागतिक स्तरावर सुरू असलेला प्रादुर्भाव प्रवाशांवर परिणाम करू शकतो; त्यामुळे काही प्रवासी या आजारावरील लस घेण्याचा विचार करू शकतात. लसीकरणाचे प्रमाण कमी होत असल्याने अमेरिका आणि जगभरात गोवरच्या (measles) रुग्णांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय मदतीमध्ये व्यत्यय आल्यामुळे, प्रभावी उपचार उपलब्ध असूनही एचआयव्ही (HIV) पुन्हा मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, मानवाकडून परिसंस्थेत केला जाणारा हस्तक्षेप आणि जगभरातील प्रवास यामुळे भविष्यात कधीही असे विषाणू समोर येऊ शकतात ज्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. जगभरात माणसे, प्राणी आणि व्यापक पर्यावरण एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्ञात आणि नव्याने उद्भवणाऱ्या विषाणूजन्य धोक्यांबाबत सतर्कता बाळगणे तसेच नवीन लशी आणि उपचार विकसित करणे यामुळे सर्वांना सुरक्षित ठेवण्यास मदत होऊ शकते.