Kissing Car Gwalior Motor Vehicle Act Rules : समाजमाध्यमांवर प्रसिद्धी मिळवण्यासाठी एका तरुणाने आपल्या कारवर चुंबनाचे ३,४०० ठसे उमटवले. प्रेयसीची तब्बल साडेतीन तास मदत घेऊन त्याने हा अजब कारनामा केला. यादरम्यान रस्त्यावरून धावणाऱ्या ‘किसिंग’ कारची चित्रफित व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. त्याचवेळी हा अजब प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी संबंधित तरुणाला तब्बल पाच हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच कारवरील सर्व चुंबनाचे ठसे साफ करण्याचे आदेशही दिले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर शहरात घडलेल्या या घटनेची सध्या सगळ्या देशभरात चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तरुणाने स्वत:च्या कारवर चुंबनाचे ठसे उमटल्यानंतर पोलिसांनी त्याला कोणत्या कायद्यानुसार दंड का ठोठावला? असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे, त्याविषयी…

पोलिसांच्या कारवाईनंतर तरुणाची प्रतिक्रिया काय?

आदित्य सिकरवार असे पोलिसांनी दंड ठोठावलेल्या तरुणाचे नाव असून तो ग्वाल्हेर जिल्ह्यातील थाटीपूर गावातील रहिवासी असल्याचे समजते. या कारवाईनंतर माध्यमांशी संवाद साधताना आदित्यने सांगितले की, समाजमाध्यमांवर परदेशी ट्रेंड पाहून कारवर चुंबनाचे ठसे करण्याची युक्ती प्रेयसीने मला सूचवली होती. सुरुवातीला मी नकार दिला होता, पण तरीही तिने हट्ट धरल्यामुळे आम्ही अशा पद्धतीने कार सजवण्याचा निर्णय घेतला. तब्बल साडेतीन तास मेहनत करून माझ्या प्रेयसीने कारवर चुंबनाचे तीन हजार ४०० ठसे उमटवले. त्याकरिता एकाच रंगाच्या विविध लिपिस्टकही वापरण्यात आल्या. या संपूर्ण प्रकाराची चित्रफित आम्ही समाजमाध्यमांवर शेअर केली आणि काही तासांतच त्याला सुमारे ५५ लाख व्ह्यूज मिळाले. त्याचवेळी पोलिसांनी कारच्या क्रमांकावरून माझा शोध घेतला आणि मला पाच हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. कारवाईदरम्यान पोलिसांनी कारवरील चुंबनाचे ठसेही पुसायला लावल्याचा दावा आदित्यने केला आहे.

वाहनात बदल करण्याबाबत कायदा काय सांगतो?

ग्वाल्हेरमधील कार मालकाला मोटार वाहन कायदा, १९८८ अंतर्गत दंड ठोठावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच, यापुढे असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नसल्याच्या अटीवर त्याला समज देऊ सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या कायद्यातील कलम ५२ मध्ये वाहन नोंदणी आणि अनिवार्य सुरक्षा उपायांशी संबंधित विविध तरतुदींबरोबरच वाहनात करण्यात येणाऱ्या बदलांबाबतच्या तरतुदीही नमूद आहे. या कलमानुसार, वाहनाच्या मूळ वैशिष्ट्यात बदल होईल अशा पद्धतीने वाहनाच्या रचनेत कोणताही बदल करण्यास मालकाला परवानगी नाही. कोणतेही वाहन रस्त्यावर चालवण्यासाठी मालकाला स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) नोंदणी प्रमाणपत्र अर्थात ‘आरसी बुक’ घेणे आवश्यक असते. या प्रमाणपत्रात वाहनाचा नोंदणी क्रमांक, रंग, इंजिन क्रमांक यांसारखी महत्त्वाची माहिती नमूद केलेली असते.

viral-kissing-car-gwalior-motor-vehicle-act-fine-rules
कारवरील चुंबनाचे ठसे मिटवताना आदित्य सिकरवार (छायाचित्र पीटीआय)

आरटीओला १४ दिवसांत माहिती देणे बंधनकारक

वाहनात करण्यात येणारे कोणतेही बदल ‘आरसी’मध्ये नोंदवलेल्या तपशीलांशी विसंगत असू नयेत. कलम ५२ नुसार योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय किंवा नोंदणी प्रमाणपत्रात अधिकृत नोंद अद्ययावत केल्याशिवाय वाहनात कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. त्याचवेळी मोटार वाहन कायद्यात काही विशिष्ट अपवादांचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये ठरावीक अटींच्या अधीन राहून इंजिन किंवा त्याच्या कोणत्याही भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या इंधनासाठी तसेच ऊर्जेच्या स्रोतासाठी वाहनाचा वापर सुलभ करण्याच्या उद्देशाने करण्यात येणाऱ्या बदलांचा समावेश आहे. या प्रक्रियेत बॅटरी, सीएनजी, सौरऊर्जा आदींचा समावेश होतो. वाहनात कोणताही अधिकृत बदल केल्यानंतर वाहन मालकाने १४ दिवसांच्या आत आपल्या निवासाच्या अधिकारक्षेत्रातील नोंदणी प्राधिकरणाला अर्थात आरटीओला त्याची माहिती देणे आवश्यक आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कोणती शिक्षा?

वाहनांमध्ये बदल करायचे झाल्यास संबंधित मालकाने निर्धारित शुल्कासह नोंदणी प्रमाणपत्र (RC) संबंधित प्राधिकरणाकडे सादर करणे बंधनकारक आहे. जर नोंदणी प्राधिकरण हे वाहनाची मूळ नोंदणी करणाऱ्या प्राधिकरणापेक्षा वेगळे असेल, तर वाहनात करण्यात आलेल्या बदलाची नोंद आणि त्यासंबंधीची माहिती मूळ नोंदणी प्राधिकरणाला कळवणे आवश्यक असते. मोटार वाहन कायद्यात वाहनात निर्धारित नियमांचे उल्लंघन करून बदल केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १८२ अ(४) नुसार, कायद्यात निर्धारित केलेल्या पद्धतीचे पालन न करता वाहनात फेरबदल केल्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास किंवा ५,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. याशिवाय, मोटार वाहन कायद्यातील कलम १७७ मध्ये सर्वसाधारण शिक्षेची तरतूद आहे. एखाद्या प्रकरणात मोटार वाहन कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन झाले, मात्र त्यासाठी स्वतंत्रपणे कोणतीही शिक्षा किंवा दंड निश्चित केलेला नसेल, तर पहिल्या गुन्ह्यासाठी ५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.

तरुणाला कोणत्या कायद्याअंतर्गत दंड झाला?

आदित्य सिकरवार या तरुणाकडे पांढऱ्या रंगाची कार होती. त्याबाबतची नोंदही स्थानिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) नोंदणी प्रमाणपत्रात करण्यात आली होती. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या कारवर सजावट करण्याआधी आदित्यने आरटीओची कोणतीही परवानगी घेतली नाही. त्यामुळे मोटार वाहन कायदा, १९८८ मधील कलम १८२ अ(४) नुसार, त्याला एकूण पाच हजार ५०० रुपयांचा दंड भरावा लागला. यामध्ये वाहनात नियमबाह्य पद्धतीने फेरबदल केल्याबद्दल ५,००० रुपये आणि सामान्य उल्लंघनासाठी ५०० रुपये अशा दंडाचा समावेश आहे. या घटनेबाबत वाहतूक पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक रघुवंशी यांनी सांगितले की, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली कार बघितल्यानंतर आम्ही संबंधित कारमालकाला पोलीस ठाण्यात बोलावले होते. समज दिल्यानंतर त्याने स्वत:ची चूक मान्य केली आणि ठोठावण्यात आलेला दंडही भरला. पुन्हा असा प्रकार होणार नाही, असे म्हणत त्याने कारवर उमटवलेले चुंबनाचे तीन हजार ४०० ठसेही मिटवले, त्यामुळे त्याला सोडून देण्यात आले आहे.