Turmeric patent controversy 1996: सध्या सोशल मीडियावर एक ट्रेण्ड प्रचंड व्हायरल झाला आहे. मोबाईल टॉर्चवर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवून त्यात हळद टाकण्यात येते, त्यामुळे अंधारात मोबाईलच्या प्रकाशात काचेच्या ग्लासमध्ये मिसळणारी हळद पाहणं हा अद्भुत अनुभव ठरतो. विशेषतः लहान मुलांसाठी हा आकर्षणचा विषय ठरला आहे. या व्हायरल ट्रेण्डनंतर त्यावर आलेले अनेक मिम्स ही व्हायरल झाले.
टीका करणार्या किंवा समर्थन देणार्या दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रियाही समोर आल्या आहेत. असा ट्रेण्ड शरीराला घातक आहे किंवा या ट्रेण्डमधून शरीराला फायदा होईल का, अशा नाहक चर्चानांही उधाण आलंय. यानिमित्ताने भारताची ओळख असलेल्या हळदीवर एकेकाळी अमेरिकेने आपला हक्क सांगितला होता, त्याचीही चर्चा पुन्हा सुरू झाली.
आज व्हायरल ट्रेंड फॉलो करताना कित्येक भारतीयांना हळदीच्या लढाईचा इतिहास माहितीही नसेल. त्याच पार्श्वभूमीवर ही लढाई भारताने कशी जिंकली? कोणामुळे जिंकली? आणि हळदीचा इतिहास नेमकं काय सांगतो, याचाच घेतलेला हा आढावा.
वेद नेले चोरूनि..
वेद नेले चोरूनि ब्रम्हा आणूनिया देसी | मत्स्यरुपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी …हे विठ्ठलाच्या आरती मधलं कडवं आपल्या सर्वांच्याच मुखी रुळलेलं आहे. शंखासुराने वेद चोरले आणि ते नारायणाने परत आणले. मोठ्या भक्तिभावाने आपण ही आरती म्हणतो, मात्र बोध काहीच घेत नाही. असाच एक प्रकार १९९६ साली हळदीच्या बाबतीत घडला होता.
‘आयुर्वेदातील’ एक औषध अमेरिकेने चक्क चोरून नेले होते. युरोपीय वसाहतवादी देशांनी आशिया खंडातील खूप मोठा सांस्कृतिक वारसा लुटून नेला. अमेरिकेसारख्या देशाने नवीन भूभाग पादाक्रांत करत स्थानिकांचीच संस्कृती संपुष्टात आणली. किंबहुना ९० च्या दशकात भारताला नाव ठेवून त्यांचीच एखादी गोष्ट चोरली तर कुणाला कळणार अशा आविर्भावात तांदुळासह (US 5,663,484) हळदही (US 5,401,504) चोरली.
हळदीचे पेटंट प्रकरण (१९९६)
१९९६ साली अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मिसिसिपी मेडिकल सेन्टर संस्थेने हळदीचे जंतूनाशक गुणधर्म आपणच शोधून काढल्याचा हास्यास्पद दावा केला होता. इतकंच नाही तर या शोधासाठी पेटंट मिळावं म्हणून अर्जही केला होता. विशेष म्हणजे अमेरिकन पेटंट ऑफिसने हे पेटंट (पेटंट क्रमांक : US 5,401,504) या संस्थेला देऊनही टाकले. त्यामुळे या संस्थेच्या परवानगीशिवाय कोणीही हळदीचा वापर जंतूनाशक म्हणून कोणत्याच उत्पादनात करू शकत नव्हतं. ही बातमी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकरांना समजली त्यावेळेस मात्र ते अस्वस्थ झाले. आपल्या हक्कासाठी लढा देण्याचे त्यांनी ठरवले.
कोण आहेत डॉ. रघुनाथ अनंत माशेलकर?
पद्मविभूषण सन्मानित डॉ. र. अ. माशेलकर हे भारतातील नामवंत रसायन अभियंते आणि वैज्ञानिक धोरणकर्ते आहेत. त्यांनी CSIR चे महासंचालक, नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचे संचालक, तसेच इंडियन नॅशनल सायन्स अॅकॅडमीचे अध्यक्ष म्हणून कार्य केलं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवोपक्रमांमध्ये त्यांचा मोठा वाटा असून, AcSIR चे पहिले अध्यक्ष आणि रॉयल सोसायटी (FRS), लंडनचे फेलो होण्याचा मान मिळवलेले ते मोजक्या भारतीयांपैकी एक आहेत.

त्यांनी “गांधीवादी अभियांत्रिकी” (Gandhian Engineering) ही संकल्पना मांडली. ‘कमी संसाधनांतून अधिक लोकांसाठी अधिक निर्मिती’ हे तत्त्व नवसर्जनात त्यांनी अधोरेखित केलं.
५३ पेक्षा अधिक सन्माननीय डॉक्टरेट आणि जगभरातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांची फेलोशिप मिळवलेले डॉ. माशेलकर आजही विज्ञानाधिष्ठित राष्ट्रीय प्रगतीचे प्रेरणास्थान आहेत. त्यांनी अंजनी माशेलकर फाउंडेशन स्थापन करून नवोन्मेषी उपक्रमांना आधार दिला आहे.
हळद आणि बासमतीवरील अमेरिकन पेटंटविरुद्ध भारताची यशस्वी लढत त्यांनीच पुढाकाराने लढवली आणि पारंपरिक ज्ञानाचे संरक्षण केलं. हळदीचे औषधी गुणधर्म स्पष्ट करणारे अनेक संस्कृत श्लोक, पाली भाषेतील उल्लेख आणि विविध ऐतिहासिक दस्तऐवज एकत्र करून त्यांचा सखोल अभ्यास केला. याच पुराव्यांच्या आधारावर डॉ. रघुनाथ माशेलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेविरुद्धची ती लढाई यशस्वीपणे जिंकली. यातूनच Traditional Knowledge Digital Library (TKDL) ची निर्मिती झाली.
TKDL आणि परिणाम
TKDL म्हणजे पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय. हा एक डिजिटल डेटाबेस आहे. ज्यात भारताच्या पारंपरिक वैद्यकीय पद्धतींमध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पती, उपचारपद्धती, औषधे आणि त्यांच्या उपयोगांची माहिती वैज्ञानिक आणि पेटंट कार्यालयांना समजेल अशा स्वरूपात भाषांतरित करून संग्रहित केली जाते.
हळदीचा सांस्कृतिक-वैद्यकीय वारसा
हडप्पाकालीन सापडलेल्या भांड्यांच्या विश्लेषणात हळद, आलं आणि लसूण यांचे अंश सापडले असून त्यांचा कालखंड सुमारे इ.स.पू. २५०० इतका प्राचीन असल्याचे सिद्ध झाले आहे. म्हणजेच भारतीय हळदीचा इतिहास सुमारे ५००० वर्षं जुना आहे. उपलब्ध पुराव्यांनुसार इसवी सनपूर्व ५०० च्या सुमारास हळद आयुर्वेदिक औषधोपचारांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून उदयास आली.
अंदाजे इ. स. ७०० मध्ये हळद चीनमध्ये, ८०० मध्ये पूर्व आफ्रिकेत, १२०० मध्ये पश्चिम आफ्रिकेत आणि अठराव्या शतकात जमैकामध्ये पोहोचली. १२८० मध्ये मार्को पोलोने या मसाल्याचे वर्णन करताना केशराशी असलेले तिचे साम्य नोंदवले आहे (Polo, Marco. The Travels of Marco Polo, translated by Henry Yule, revised by Henri Cordier, Volume 2, Book 3, Chapter 26). संस्कृत वैद्यकग्रंथ तसेच आयुर्वेद व युनानी पद्धतींमध्ये हळद औषध म्हणून दीर्घकाळ वापरली गेली आहे. सुश्रुत संहितेने (इ. स. पू. २५०) विषबाधित अन्नाच्या परिणामांपासून बचाव करण्यासाठी हळद असलेला लेप सुचवला आहे. भारतीय संस्कृतीत हळदीचं महत्त्व फक्त औषधांपुरतं मर्यादित नाही. हिंदू धर्मात हळद शुभ आणि पवित्र मानली जाते. संस्कृतिक क्षेत्रात हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूजा व मंगल संस्कार यांत कुंकुवाच्या बरोबरीने हळद असते. ती सौभाग्यकारक असून भूतबाधाही दूर करते. प्रत्येक मंगल कार्यात हळद असतेच.
आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये-संस्कृतमध्ये हळदीची ५३ ते १०० नावे आढळतात, उदा. अनेष्ठ (यज्ञात न अर्पण होणारी), भद्रा (शुभ), बहुला (प्रचुर), दीर्घराजा (लांबट दिसणारी), गंधपलाशिका (सुगंध देणारी), गौरी (गौरवर्ण देणारी), घर्शणी (चोळण्यासाठी), हळदी (तीसाचा तेजस्वी रंग), हरिद्रा (भगवान कृष्णाला प्रिय), हरिता (हिरवट), हेमरागी/हेमरागिनी (सोनेरी रंग देणारी), हृदयविलासिनी (हृदयाला आनंद देणारी), जयंती (रोगांवर विजय मिळवणारी), ज्वरान्तिका (ताप दूर करणारी), कांचनी (सोनेरी), कृमिघ्नी (जंतुनाशक), लक्ष्मी (समृद्धी), मंगलप्रदा (शुभत्व देणारी), मेहघ्नी (चरबी/मूत्रविकार दूर करणारी), निशा / यामिनी (रात्र), पतवालुका (सुगंधी पूड), पवित्र (पवित्र), पिंग/पिंज/पीत/पीतिका (पिवळ्या छटांची), रंजनी (रंग देणारी), रात्रिमाणिक (चंद्रप्रकाशासारखी), शिवा (कल्याणकारी), श्याम (गडद), सुवर्ण / सुवर्णवर्ण / कांचनी (सोनेरी), वैरागी (वासनामुक्त), वर्णदात्री/वर्णिनी (रंग उजळवणारी), विषघ्नी (विषनाशक), योषितप्रिय (स्त्रीला प्रिय) आणि युवती (तरुणी) इत्यादी.
‘रात्रिमाणिक’ ट्रेंड : जुने-नवे दुवे
त्यातील रात्रिमाणिक हे नाव सध्या व्हायरल होणार्या ट्रेण्डशी मिळत जुळत आहे. रात्रिमाणिक म्हणजे beautiful as moonlight..चंद्रप्रकाशासारखी सुंदर. त्यामुळे अंधुक प्रकाशात पाण्यात मिळसणारी चंद्रप्रकाशासारखी सुंदर, सोनेरी हळद भारतीय प्राचीन ज्ञानाच्या समृद्ध परंपरेची पुन्हा एकदा आठवण करून देत आहे. म्हणूनच “ट्रेण्ड फॉलो करताना इतिहास-संस्कृतीची दखल घ्या; मुलांनाही सांगा.”