Vishleshan A wedding ceremony Akluj Solapur district Prevention married male wife Divorce print exp 2212 ysh 95 | Loksatta

विश्लेषण : मियाँ-बिवी राझी तो.. ?

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील एका विवाह सोहळय़ाची राज्यभरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबईतील जुळय़ा बहिणींनी अकलूज येथील तरुणाशी एकाचवेळी, एकाच मंडपात लग्न केले.

विश्लेषण : मियाँ-बिवी राझी तो.. ?
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

प्राजक्ता कदम

सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमधील एका विवाह सोहळय़ाची राज्यभरात सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. मुंबईतील जुळय़ा बहिणींनी अकलूज येथील तरुणाशी एकाचवेळी, एकाच मंडपात लग्न केले. एकीकडे या घटनेने सगळय़ांच्या भुवया उंचावल्या गेल्या, तर दुसरीकडे द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत केलेल्या तक्रारीनंतर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. परंतु द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार, द्विभार्या म्हणजे बायगॅमी हा अदखलपात्र गुन्हा आहे. शिवाय तक्रार नुकसान होणाऱ्या पक्षकाराने म्हणजेच पती किंवा पत्नीने करणे अपेक्षित आहे. त्यामुळे पूर्णपणे पती-पत्नीशी संबंधित असलेल्या या प्रकरणात त्रयस्थ व्यक्तीकडून तक्रार केली जाऊ शकते का ? बदलत्या काळानुसार कायदेबदलाची गरज निर्माण झाली आहे का, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत.

द्विभार्या प्रतिबंधक कायदा काय सांगतो ?

द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार हिंदू विवाहित पुरुष, पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता दुसरे लग्न करू शकत नाही. हा स्वतंत्र कायदा आहे आणि प्रत्येक राज्याने असा कायदा केलेला आहे. शीख, ख्रिश्चन, पारशी आणि जैन धर्मासाठीही हेच तत्त्व सांगणारे स्वतंत्र कायदे आहेत. हिंदू या व्याख्येत बसणाऱ्या पुरुषाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त लग्ने करता येत नाहीत. १९४६ सालच्या द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार एक लग्न झालेले असताना दुसरे लग्न करणे बेकायदेशीर ठरते. मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्मीयांमध्ये लग्नाला कंत्राट मानले जाते. हिंदू धर्मीयांमध्ये लग्न हा धार्मिक संस्कार मानला जातो. त्यामुळेच द्विभार्या प्रतिबंधक कायदा आणण्यात आला.

जोडीदाराकडून फसवणूक झाल्यास अधिकार काय?

हिंदू विवाह कायद्यातही हिंदू पुरुष किंवा महिलेने पहिले लग्न अस्तित्वात असताना दुसरे लग्न केल्यास पती-पत्नीला काय कायदेशीर अधिकार असू शकतात हे नमूद करण्यात आले आहे. लग्नात फसवणूक झालेली असल्यास मात्र दोघांना भारतीय दंडविधान आणि फौजदारी दंडसंहितेतील कायदेशीर तरतुदींचा वापर करता येऊ शकतो.

कायद्यात पळवाटा आहेत का ?

हिंदू विवाह कायद्यानुसार, पहिली पत्नी असताना दुसरे लग्न करण्याची परवानगी नाही. त्यामुळे बरेचजण पहिले लग्न अस्तित्वात असताना दुसरे करायचे असल्यास धर्मातराचा मार्ग स्वीकारतात. पहिल्या पत्नीला आपल्या दुसऱ्या पत्नीबद्दल काहीही आक्षेप नसल्याचे एखादा पुरुष सांगू शकतो का, हा प्रश्नही उपस्थित होतो. एक पत्नी असताना दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणे याविरोधात एक तर कायदेशीर पत्नी तक्रार करू शकते किंवा विवाहाशिवाय सहजीवनासारखे संबंध असलेली स्त्री तक्रार करू शकते. असे असले तरी पहिले लग्न झालेल्या व्यक्तीने दुसरे लग्न केले आणि या गोष्टीला पहिल्या पत्नीचा आक्षेप नसला, तरी त्या दुसऱ्या लग्नाला कायदेशीर मान्यता मिळत नाही.

अकलूजच्या प्रकरणात काय होऊ शकते ?

संबंधित दोन्ही तरुणी उच्चशिक्षित असून त्यांनी त्यांच्या मर्जीने आणि कुटुंबीयांच्या सहमतीने संबंधित तरुणाशी विवाह केला आहे. या दोघींपैकी एकीनेही त्याच्याविरोधात तक्रार केलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्याविरोधात तक्रार नोंदवली व त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी तो अदखलपात्र गुन्हा समजला जाईल. या गुन्ह्याला काहीच अर्थ नाही. आजही अनेक पुरुष एका स्त्रीशी विवाह करतात ती त्यांची कायदेशीर पत्नी असते. तर दुसऱ्या स्त्रीशी ‘विवाहासारख्या’ संबंधांत (लिव्ह इन रिलेशनशिप) राहतात, पण ती त्यांची कायदेशीर पत्नी नसते. त्यामुळे द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागूच होत नाही, असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.

कायद्याचा दुरुपयोग आहे का ?

समाजमाध्यमांच्या जगात अकलूज येथील घटना सगळय़ांसमोर आली. प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमे नसती तर या घटनेचा कोणाला मागमूसही लागला नसता. तसेच त्या जुळय़ा बहिणींनी एकाच तरुणाशी लग्न करणे अनैतिक किंवा गैर नाही. किंबहुना त्यांच्याविरोधात द्विभार्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलाच जाऊ शकत नाही. तो दाखल करण्याचा त्या तिघांव्यतिरिक्त अन्य कोणाला अधिकार नाही. उलट त्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करणे हा कायद्याचा दुरुपयोग असल्याचे ठाम मत वरिष्ठ वकील नितीन प्रधान यांनी व्यक्त केले.

कायदेबदलाची गरज आहे का?

भारतात विवाहविषयक कायदे अगदी स्पष्ट आहेत. त्यामुळे या एका घटनेमुळे कायद्यात बदलाची शक्यता निर्माण झाली हा विचार गैरलागू होत असल्याचे मत वकील अनंत वडगावकर यांनी व्यक्त केले. तर बायगॅमीनुसार, विवाहात फसवणूक झाली तर आणि तरच पत्नी किंवा पती तक्रार नोंदवू शकतात. त्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटाचा अधिकार आहे, तर दुसरीकडे द्विभार्या कायद्यानुसारही फौजदारी कारवाईची मागणी करू शकतात. परंतु अकलूज येथील प्रकरणात ही स्थिती नाही. याप्रकरणी कोणा तिसऱ्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचा आणि खटला चालवण्याचा अधिकार पोलिसांना नाही. त्यात पोलिसांची भूमिकाच नाही, असे वकील गणेश सोवनी यांनी सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
विश्लेषण: फिफा विश्वचषकामध्ये फुटबॉलपटू ‘स्पोर्ट्स ब्रा’ का घालतात? काय आहे यामागील कारण जाणून घ्या