गौरव मुठे
दलाली पेढय़ा आणि म्युच्युअल फंडांकडून ‘रोबो सल्लागारा’चा अवलंब आणि गुंतवणूकदारांनी त्याला दिलेल्या स्वीकृतीने भांडवली बाजाराला नवीन तंत्रज्ञानाचे वावडे नाही, हे दिसून आले आहे. तथापि तंत्रज्ञानसमर्थ नावीन्याचे हे क्षितिज विस्तारत जात, डेटा अ‍ॅनालिटिक्स आणि ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ अर्थात ‘कृत्रिम प्रज्ञे’च्या वापरापर्यंत विस्तारू पाहात आहे. याबाबत बाजारातील दलाल, व्यापाऱ्यांमध्ये उत्साह असला तरी, ‘सबुरीनेच पावले पडावीत’ असा बाजार विश्लेषकांचा सल्ला आहे, तो कशासाठी?

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

‘कृत्रिम प्रज्ञा’ काय आहे?

ढोबळमानाने सांगायचे तर प्रज्ञेचे गणिती रूपांतर आणि पुढे कॉम्प्युटर कोड बनवून आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये रूपांतर करून, विविध क्षेत्रांतील जटिल व क्लिष्ट समस्या सोडवणे हा याचा उद्देश असतो. यामध्ये माहितीचे संकलन, वर्गीकरण, नियोजन आणि विश्लेषण करणे तसेच त्याचा योग्य अर्थ लावणे अंतर्भूत असते. असंख्य संगणकीय आणि वास्तविक-जगातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी यात मशीन लर्निग आणि डीप लर्निग मॉडेल विकसित करण्याच्या संकल्पना समाविष्ट आहेत.

शेअर बाजारात कृत्रिम प्रज्ञेचा वापर व कार्य काय?

तंत्रज्ञानाधारित वित्तीय कंपन्यांनी वापरात आणलेले रोबो सल्लागार आता बऱ्यापैकी रुळले आहेत. ते कृत्रिम प्रज्ञा यंत्रणेशी जोडलेले असतात. ते कंपनीच्या समभागाची भूतकाळातील कामगिरी आणि विविध गुणोत्तरांचा अभ्यास करून गुंतवणूकदारांना भविष्यातील अपेक्षित कामगिरीची सूचना देत असतात. रोबो अर्थात यंत्राच्या माध्यमातून संशोधन आणि संख्यात्मक विश्लेषणाद्वारे पुढे आलेला सल्ला हा खात्रीशीर असतो. या शिवाय व्यापारी किंवा ट्रेडर्सना भांडवली बाजारातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी ऐतिहासिक आकडेवारी आणि विविध खरेदी-विक्री प्रारूपांचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा उपयुक्त ठरते. शेअरखान, निओ, एंजेल ब्रोकिंग एआरक्यू किंवा फाइव्ह पैसा यांसारख्या आघाडीच्या दलाली पेढय़ा निर्धारित केलेली बाजार रणनीती आणि बाजारातील कल बघून स्वयंचलितपणे गुंतवणूक योजनांची जी रीत अर्थात ‘अल्गोरिदम’ वापरतात त्यासाठी ‘एआय’ उपयुक्त ठरते. सामान्य गुंतवणूकदारांच्या दृष्टीने पाहायचे झाल्यास, रोबो सल्लागाराला म्हणजेच यांत्रिक प्रणालीला गुंतवणूकदाराची इत्थंभूत माहिती दिली जाते, यामध्ये त्याची जोखीम घेण्याची क्षमता, गुंतवणूक मूल्य, गुंतवणूक कालावधी इ. या माहितीच्या आधारे मग गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात अथवा सुचविले जातात. याला गुंतवणूकदारांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘एआय’चे फायदे काय आहेत?

भावनेला स्थान नसणे हा एक फायदा. शेअर बाजारात ‘एआय’च्या अर्थात रोबो सल्ल्याने समभाग खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना समभागाची खरेदी आणि विक्री कोणत्या किमतीला अथवा पातळीला करायची हे संगणकीय पद्धतीने आधीच ठरलेले असते. यामुळे संगणकाद्वारे खरेदी-विक्रीचे व्यवहार स्वयंचलितपणे कार्यान्वित केले जाऊ शकतात. शिवाय याच पद्धतीने अतिलोभावर नियंत्रण राखणेदेखील गुंतवणूकदारांना शक्य होते. दुसरा मुद्दा आर्थिक शिस्तीचा. भांडवली बाजारात व्यवहार करताना आर्थिक शिस्त महत्त्वाची असते. बाजारात नुकसान होण्याची भीती किंवा थोडा अधिक नफा मिळवण्याची इच्छा यासारख्या भावनिक कारणांमुळे ती अनेकदा मोडीत निघण्याची भीती असते. मात्र ऑटोमेटेड ट्रेडिंग ही शिस्त राखण्यास मदत करते. याशिवाय वेळेची बचत होते. सेकंदासेकंदाला कोटय़वधींचे व्यवहार होऊन बाजारात समभागांची किंमत सारखी बदलत असते. काही नॅनो सेकंदाचा विलंबदेखील नफ्यावर परिणाम करू शकतो. अशा वेळी ‘एआय’ प्रणालीचा वापर खूप फायदेशीर ठरतो.

विश्लेषकांचा ‘एआय’वरील आक्षेप काय?

भांडवली बाजारातील विश्लेषकांच्या मते, ‘एआय’चा वापर करून गुंतवणुकीचे सल्ले देणाऱ्या मंचांची परिणामकारकता सिद्ध झाली नसून ती अद्याप प्रयोग अथवा चाचणी अवस्थेतच आहे. यामुळे या मंचाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चुकीचा सल्लादेखील दिला जाऊ शकतो. शिवाय अशा चुकीच्या सल्ल्यावर दाद मागण्यासाठी कोणताही कायदेशीर मार्ग सध्या उपलब्ध नाही. कारण भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून अशा प्रकारच्या सल्लागार कंपन्यांचे कोणत्याही प्रकारचे नियमन केले जात नाही. यामुळे गुंतवणूकदारांना विश्वासार्ह गुंतवणूक सल्ला दिला जाईलच असे नाही. भांडवली बाजारात गुंतवणुकीचा सल्ला देण्यासाठी ‘सेबी’कडे सल्लागार म्हणून नोंदणी करणे बंधनकारक असते. या सल्लागारांना ‘सेबी’च्या पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते, त्यांनतर इतरही काही निकष पूर्ण केल्यानंतरच त्यांना नोंदणीकृत आर्थिक सल्लागार म्हणून दर्जा मिळतो. यामुळे भविष्यात रोबो सल्लागाराच्या माध्यमातून गुंतवणूक सल्ला देणाऱ्या संस्था ‘सेबी’च्या नियामक कक्षेत आणल्या जाऊ शकतील. याशिवाय अनुभवाच्या अभावाचा अडसर हाही मुद्दा आहे. कारण बऱ्याचदा अस्थिर भांडवली बाजारामध्ये भविष्यातील परिणामांचा अंदाज लावण्यासाठी मागील आकडेवारीचे (डेटा) विश्लेषण करणे धोकादायक आहे. ते वैयक्तिकरीत्या व्यवहार करणाऱ्या ट्रेडर किंवा गुंतवणूकदारासाठी उपयोगी ठरेलच असे नाही. भांडवली बाजारावर अनेक घटक प्रभाव टाकतात. शिवाय काही घटनांचा बाजाराने आधीपासून विचार केलेला नसतो. त्यामुळे या प्रत्येक घटनांमुळे बाजारात चढ-उतार होतात. यामुळे ‘एआय’ साधने वापरण्यासाठी गुंतवणूकदारांना तसेच ट्रेडर्सना अनुभव आणि बाजारातील जोखमींची चांगली समज असणे आवश्यक आहे.

विदेशातील अनुभव काय?

जागतिक पातळीवर अनेक देशांमध्ये हे तंत्रज्ञान अतिशय प्रगत असून अनेक गुंतवणूकदार त्याकडे आकर्षित होत आहेत. उदाहरणार्थ, अमेरिकेत शिकागोस्थित न्यूरेन्सिकचे व्यवहार आकृतिबंधाचे विश्लेषण करणारे मंच आणि सिएटल येथे मुख्यालय असलेले केवूटचे ‘के-स्कोअर’ हे डेटा विश्लेषण मंच ‘एआय’च्या वापरातून समभागांच्या खरेदी-विक्रीचे निर्णय घेतात. भारतातील रोबो-सल्लागार अद्याप प्राथमिक टप्प्यावर आहेत. इथे ते अजून तरी तितकेसे लोकप्रिय झालेले नाहीत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishleshan share market artificial intelligence mutual funds investors capital market print exp 0622 ysh
First published on: 25-06-2022 at 00:06 IST