Why Indian Culture Is Deeply Rooted in Thailand and Cambodia: गेल्या वर्षभरापासून थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून होणाऱ्या संघर्षाने जगाचे लक्ष वेधले आहे. हा वाद थांबण्याचे काही नाव घेत नाही. त्यात आणखी भर म्हणजे या सीमाभागात कंबोडियाने उभारलेल्या भव्य विष्णू मूर्तीला उध्वस्त करण्याचे काम थायलंडकडून करण्यात आले. मूर्ती उध्वस्त करण्याचा व्हिडीओ वायरल झाला असून भारत सरकारनेही या प्रकरणावर कडक शब्दात टीका केली आहे. खरंतर थायलंड, कंबोडिया आणि भारतीय संस्कृतीचा जुना ऋणानुबंध आहे, त्यामुळे थायलंडकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती.
थायलंड आणि कंबोडिया वादाची ऐतिहासिक मूळं
थायलंड आणि कंबोडिया यांच्यात सुरू असलेला वाद त्यांच्यातील सीमारेषेवरून असला तरी या वादाच्या मुळाशी ११ व्या शतकातील मंदिर संकुल देखील आहे. या मंदिराचा परिसर Preah Vihear Temple (प्रीह विहियर मंदिर) म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचा परिसर कोणत्या देशाच्या हद्दीत येतो यावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. १९६२ साली आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हे मंदिर कंबोडियाचे असल्याचे मान्य केले होते. तरी, मंदिर समुहाच्या आजूबाजूच्या जमिनीवरून या दोन्ही देशांमध्ये वाद कायम राहिला आहे.
१४ व्या शतकात काय घडले?
प्रत्यक्षात हा वाद सीमारेषेवरून असला तरी त्यामागे ऐतिहासिक संदर्भ देखील आहे. ऐतिहासिक कालखंडपासून थायलंड (Siam) आणि ख्मेर (कंबोडिया) यांच्यात व्यापारी आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत होती. परंतु, १४ व्या शतकात अयुथया राज्याने ख्मेर साम्राज्याच्या कमकुवत स्थितीचा फायदा घेत अंगकोर ही राजधानी ताब्यात घेतली. ख्मेरांनी प्रत्युत्तर म्हणून थायलंडवर आक्रमण केले. हा संघर्ष १६ व्या शतकापर्यंत दीर्घकाळासाठी सुरू राहिला.
विशेष म्हणजे हे दोन्ही देश एका हिंदू मंदिरावरून भांडत आहेत. त्यांच्यातील या संघर्षामुळे जगाचे लक्ष या मंदिराकडे वेधले गेले. मंदिराचा इतिहास किंवा स्थापत्य शैली यावर बरीच माहिती उपलब्ध आहे. परंतु, या दोन्ही देशांमध्ये भारतीय संस्कृती रूजली कशी याविषयी सामान्य माणसाला फारशी माहिती नाही. त्यामुळेच त्या इतिहासाच्या अंशत: भागाचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे.
भारतीय संस्कृती लादलेली नाही
जुन्या काही शोध निबंधात भारताने आग्नेय आशियावर राज्य केलं किंवा बळजबरीने आपल्या संस्कृतीचा प्रसार केला असं म्हटलं आहे. परंतु, नव्या संशोधनातून कोणत्याही देशावर भारतीय संस्कृती लादण्यात आलेली नाही, हे सिद्ध झालेलं आहे. भारतीय संस्कृतीचा स्वीकार हा नैसर्गिक निवडीचा भाग होता. या प्रक्रियेत स्थानिक संस्कृतीने भारतीय संस्कृतीच्या काही गोष्टी आहे त्याच मूळ स्वरूपात स्वीकारल्या. तर, काही गोंष्टीचे स्वरूप बदलून त्यांना स्थानिक स्वरूप दिले. इथे लक्षात घेण्याचा मुद्दा असा की, जेव्हा एखादी संस्कृती किंवा धर्म बळजबरीने लादला जातो. तेव्हा तो व्रण इतिहास देखील सांभाळून ठेवतो. तर, नैसर्गिक संमिलनातून समृद्धी वाढीस लागते.
भारतीय संस्कृती म्हणजे सुसंगत आणि संघटित सांस्कृतिक व्यवस्था
इसवी सनाच्या पहिल्या शतकातच भारतीय संस्कृतीचा प्रसार मोठ्या प्रमाणात आशियात झाला होता. प्राचीन भारतीय साहित्यात सुवर्णभूमी किंवा सुवर्णद्वीप अशी नाव आढळतात. ही नावं आग्नेय आशियाई देशांसंदर्भात वापरली गेली होती. सुवर्णभूमीचे नेमके भौगोलिक स्थान काय, याविषयी अभ्यासकांमध्ये आजही मतमतांतरे आहेत. कंबोडिया आणि थायलंडमधील राष्ट्रवादी विचारवंत व अभ्यासक या संज्ञेचा संबंध आपल्या-आपल्या देशाशी जोडतात. मूलतः ही संज्ञा भारतीय साहित्यात आढळत असली तरी या दोन्ही देशांसाठी महत्त्वाची आहे.
इंडियनायझेशन
कंबोडियात एक संस्कृत अभिलेख सापडला आहे. त्यात प्रथमच भारताबाहेर सुवर्णभूमी या संज्ञेचा उल्लेख आढळला. या अभिलेखाचा संबंध Chenla शी आहे. चेनला हे आग्नेय आशियातील एक प्राचीन ख्मेर राज्य होते. आज परिस्थिती काहीही असली तरी आशियातील प्राचीन समाजांनी भारतीय संस्कृतीचा प्रभाव मान्य केलेला होता. त्या प्रभावाला Indianisation असं म्हटलं जात. भारतीय संस्कृतीचा प्रसार म्हणजे एखाद्या विशिष्ट गोष्टीचा प्रभाव नव्हता, तर एक पूर्ण, सुसंगत आणि संघटित सांस्कृतिक व्यवस्था आग्नेय आशियात पोहोचली होती, असे मत फ्रेंच अभ्यासक George Coedès यांनी व्यक्त केले आहे. (Coedès, G. (1968). The Indianized States of Southeast Asia. Honolulu: University of Hawaii Press, pg, 15-16).
ख्मेर संस्कृती मुळाशी भारतीय राजकुमाराची प्रेमकथा
आग्नेय आशियात इंडोचायना द्वीपकल्पातील फुनान (Funan) आणि चंपा (Champa) तसेच मलय द्वीपसमूहातील श्रीविजय (Srivijaya) आणि मजपाहितवर (Majapahit) भारतीय संस्कृतीचा प्रभाव होता. कंबोडियाने आपल्या सर्वात प्राचीन फुनान (Nokor Phnom) या राज्यापासूनच भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार केला. Funan हे ख्मेर संस्कृतीचे पाळणाघर (cradle of Khmer civilisation) मानले जाते. फुनान या साम्राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली. सहाव्या शतकापर्यंत हे राज्य समृद्धीच्या शिखरावर होते. फुनान हे साम्राज्य आग्नेय आशियाच्या बहुतांश मोठ्या भागावर पसरले होते. या साम्रज्याच्या मुळाशी भारतीय राजपुत्र कौंडिण्य आणि कंबोडियन राजकन्या सोमा (Soma) यांची प्रेमकथा आहे. याच प्रचलित लोककथेच्या आधारे भारत-ख्मेर सांस्कृतिक आणि नागरी संबंधांचे मूळ इ.स. पहिल्या शतकापर्यंत मागे जाते. गुप्त आणि पल्लव या भारतीय साम्राज्यांच्या कालखंडात या संबंधांना आणखीनच बळकटी मिळाली.

चीनशीही संबंध मग भारतीय संस्कृतीच का?
फुनान आणि त्यानंतरच्या कंबोडियन राज्यांचे चीनशीही संबंध होते. इ.स. पाचव्या शतकात फुनानच्या राजाने नागसेन नावाच्या एका बौद्ध भिक्षूला सम्राट Wudi याच्या दरबारात पाठवले होते. सम्राट वूडी (इ.स.पू. १५६–८७) हा चीनच्या हान राजवंशातील सर्वात प्रभावी आणि दीर्घकाळ राज्य करणाऱ्या सम्राटांपैकी एक होता. इ.स.पू. १४१ ते ८७ हा त्याचा राज्यकाळ आहे. नागसेनाने इतर भेटवस्तूंव्यतिरिक्त दोन हस्तिदंताचे स्तूप चिनी सम्राटाला भेट म्हणून दिले होते. असे असताना चिनी संस्कृतीचा प्रभाव कंबोडिया सारख्या देशावर खोलवर का झाला नाही, हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.
ख्मेर संस्कृतीचा ऱ्हास
अनेक शतकं कंबोडियाने भारतीय संस्कृती आत्मसात केली, याचीच परिणीती म्हणून आग्नेय आशियात Angkor साम्राज्य स्थापन झाले. हा काळ कंबोडियाच्या इतिहासातील सुवर्णयुग मानला जातो. कालांतराने, ख्मेर संस्कृतीचा प्रभाव शेजारील Siam (आजचा थायलंड) आणि लाओसवरही पडला. परंतु, अंगकोर साम्राज्याच्या पतनानंतर ख्मेर संस्कृतीचा झपाट्याने ऱ्हास झाला.

थायलंडवरील भारतीय प्रभाव
थायलंडमध्येही भारतीय संस्कृतीची मूळ खोलवर रुजलेली आहेत. भारतीय रामायणाच्या ‘रामकियन (Ramakien)’ या स्थानिक स्वरूपाला राष्ट्रीय महाकाव्याचा दर्जा देण्यात आला आहे. हे महाकाव्य दशरथ जातक या बौद्ध कथेवर आधारित आहेत, असे मानले जाते. तर त्याची काही मुळे हिंदू रामायणातही आहेत, असे तज्ज्ञ मानतात. थायलंडचे राष्ट्रीय चिन्ह भगवान विष्णूचे वाहन गरुड आहे. थायलंडची जुनी राजधानी अयुथायाचे नाव रामजन्मभूमी अयोध्यावरून ठेवलेले आहे. अनेक थाईलोक आजही हिंदू देवतांची पूजा करतात. देवस्थान (Devasathan) हे थायलंडमधील प्रमुख हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर १७ व्या शतकात राजा राम पहिले यांच्या कालखंडात बांधले गेले. १९३५ पर्यंत थायलंडमध्ये ‘त्रियाम्पवाई–त्रिपवाई’ नावाचा भव्य झुला उत्सव साजरा केला जात होता. या उत्सवाचे नाव तमिळ भाषेतील तिरुवेंपावै किंवा तिरुप्पावै असे आहे. या उत्सवात शिवाशी संबंधित स्तोत्रांचे पठण केले जात होते. अनेक थाई दुकानांबाहेर दिसणारी नांग क्वाक देवी ही लक्ष्मीचेच एक रूप मानली जाते.

थायलंडमधील विष्णू शिल्पपरंपरा
थायलंडमध्ये सापडलेली सर्वात जुनी विष्णूची शिल्पकृती ही इ.स. ५ व्या शतकातील आहेत. ही शिल्प मथुरा आणि अमरावती शिल्पशैलीशी साधर्म्य दर्शवतात. ७ व्या-८ व्या शतकातील विष्णू शिल्पांवर पल्लव शैलीचा प्रभाव दिसतो. श्री थेप हे द्वारवती काळातील महत्त्वाचे केंद्र असून येथे विष्णू आणि कृष्णाची अनेक शिल्पे सापडली आहेत. सुखोथाई काळात (१४ वे शतक) राजांनी स्वतःला विष्णूचा अवतार मानण्यास सुरुवात केली.
शैव परंपरा
दक्षिण भारतातून आलेल्या शैव धर्माचा प्रसार इ.स. ६ व्या ते १० व्या शतकात थायलंडमध्ये झाला. दक्षिण थायलंडमध्ये शिवलिंगे, मुखलिंग, सुवर्णलिंग आणि स्वयंभूलिंग सापडली आहेत.
कंबोडियातील पुरातत्त्वीय पुरावे
या लेखात म्हटल्याप्रमाणे कंबोडियामधील भारतीय संस्कृतीशी संबंधित पुरातत्त्वीय पुरावे इ.स. पहिल्या शतकातील आहेत. फुनान व चेनला काळातील शिलालेखांमध्ये संस्कृत भाषा आणि ब्राह्मीलिपीवर आधारित लिपीचा वापर केलेला दिसतो. या शिलालेखांमधून भारतीय प्रशासकीय व धार्मिक संकल्पनांचा स्वीकार करण्यात आला, याची माहिती मिळते. Sambor Prei Kuk येथील इ.स. ७ व्या शतकातील विटांची मंदिरे ही शैव परंपरेशी संबंधित असून शिवलिंग, नंदी व हिंदू देवतांची प्रतिमा भारतीय धार्मिक प्रभाव अधोरेखित करतात. तसेच Phnom Da येथील प्राचीन शिल्पांमध्ये भारतीय शैलीतील विष्णू व शिवमूर्ती आढळतात. पुढील अंगकोर काळात Angkor परिसरातील मंदिर-स्थापत्य, देव-राजा (Devaraja) संकल्पना, रामायण आणि महाभारतावरील शिल्पफलक आणि विधीपर संस्कृती हे सर्व भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या स्थानिकीकरणाचे पुरातत्त्वीय साक्षीदार आहेत.
सांस्कृतिक हिंसा
एकूणात, थायलंड आणि कंबोडिया सीमावादाच्या नावाखाली घडणारा धार्मिक आणि सांस्कृतिक विध्वंस हा केवळ दोन राष्ट्रांमधील राजकीय संघर्ष म्हणून पाहणे, ही गंभीर चूक ठरू शकेल. हा प्रकार आग्नेय आशियाच्या सामायिक सांस्कृतिक स्मृतीवर घाला घालणारा आहे. युनेस्कोने वारंवार स्पष्ट केल्याप्रमाणे, सांस्कृतिक वारसा हा कोणत्याही एका राष्ट्राची खासगी मालमत्ता नसून तो मानवजातीच्या आणि येणाऱ्या पिढ्यांची ठेव आहे. तरीही, तात्कालिक राजकीय फायद्यासाठी इतिहास, श्रद्धा आणि पुरातत्त्वीय वारसा यांची मोडतोड केली जात असेल, तर तो केवळ विध्वंस नव्हे, तर जाणीवपूर्वक केलेली सांस्कृतिक हिंसा ठरते. सामायिक वारशाकडे पाठ फिरवणारे राजकारण संघर्ष कमी करत नाही, तर तो अधिक खोलवर रुजवते. उलट, या सामायिक सांस्कृतिक मुळांची जाणीव ठेवून संवाद, संवेदनशीलता आणि वारशाचे संरक्षण हा मार्ग स्वीकारला, तर इतिहास संघर्षाचे नव्हे तर सहअस्तित्वाचे साधन ठरू शकतो.
