Vitamin B12 deficiency in women निरोगी राहण्यासाठी शरीराला जीवनसत्त्वांची आणि पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी १२ यांसारखी जीवनसत्त्वे शरीरासाठी खूप महत्त्वाची आहेत. व्हिटॅमिन बी १२ ऊर्जा, मेंदूचे कार्य आणि महिलांमध्ये हार्मोन्सना संतुलित ठेवण्यास मदत करते. मात्र, व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे बोटांमध्ये मुंग्या येणे, झोप पूर्ण होऊनही थकवा जाणवणे यांसारखी लक्षणे दिसू लागतात. अनेक स्त्रिया या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र, त्यांना कदाचित हे ठाऊक नसते की, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेने शरीरात गंभीर समस्या उद्भवू शकतात. काय आहेत या कमतरतेची कारणे? याचा महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो? त्यावर उपाय काय? जाणून घेऊयात…
बी १२ च्या कमतरतेचा महिलांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?
बंगळुरू येथील केआयएमएस हॉस्पिटलच्या डर्मेटोलॉजिस्ट डॉ. दीपाश्री आर यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना सांगितले की, व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे मासिक पाळीत अनियमितता, विसरभोळेपणा, चिंता, नैराश्य आणि पायांमध्ये जळजळदेखील होऊ शकते. “लाल रक्तपेशी केसांच्या मुळांपर्यंत कमी ऑक्सिजन पोहोचवतात तेव्हा केस गळणे, केस पातळ होणे आणि केस अकाली पांढरे होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्वचेतील बदल, जसे की बोटांचे सांधे काळे पडणे किंवा तळहात आणि तळपायांवरील रेषा गडद होणे हेदेखील एक लक्षण असू शकते,” असेही त्या सांगतात. व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेचे परिणाम चेहऱ्यावरही दिसून येतात. त्याची लक्षणे म्हणजे चेहऱ्यावर कोरडेपणा, निस्तेजपणा दिसणे. तोंडात वारंवार अल्सर येणे, जिभेला सूज येणे आणि लालसरपणा येणे हीदेखील व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता दर्शवतात.
शाकाहारी किंवा व्हीगन आहार, मासिक पाळीतील रक्तस्राव, पचनाचे विकार जसे की गॅस्ट्र्रायटिस किंवा पीसीओएस संबंधित पचनाच्या समस्या, सेलिएक रोग, अँटासिड्सचा दीर्घकाळ वापर, गर्भधारणा आणि स्तनपान यामुळे महिलांमध्ये बी १२ च्या कमतरतेचा धोका जास्त असतो. त्या सांगतात, “बी १२ च्या कमतरतेसाठी गोळ्या उपयुक्त ठरू शकतात. परंतु, गंभीर कमतरता किंवा शोषण प्रक्रियेत समस्या असल्यास इंजेक्शनची आवश्यकता असू शकते. गुंतागूंत टाळण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी बी १२ कमतरतेची वेळीच ओळख आणि व्यवस्थापन आवश्यक आहे,” असा सल्लाही त्या देतात.
सर्व वयोगटातील महिलांना या कमतरतेचा वाढत्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. बी १२ ची कमतरताही शरीरात अनेक बदल घडवते. त्याचा मज्जातंतू, स्मरणशक्ती, त्वचा आणि कधीकधी भावनांवरही परिणाम होतो. आयुर्वेदात गोळ्यांच्या माध्यमातून तात्पुरता आराम देण्याऐवजी पचन, भावनिक आणि शारीरिक संतुलन आदींवर लक्ष केंद्रित केले जाते. पौगंडावस्था हा एक संवेदनशील काळ असतो. शरीर विकसित होत असते आणि हार्मोन्समध्ये बदल होत असतात. याच टप्प्यापासून आरोग्याची काळजी करणे आवश्यक असते.
किशोरवयीन मुलींसाठी आहाराचा समतोल महत्त्वाचा
- जेवणात तूप, काळे तीळ आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असलेले गरम जेवण घ्यावे.
- पचन सुधारण्यासाठी जेवणानंतर ओव्याचे पाणी प्यावे.
- दररोज योगासने आणि पहाटेच्या कोवळ्या उन्हात वेळ घालवावा.
- जे मांसाहार करतात त्यांनी आठवड्यातून एकदा सेंद्रिय अंडी किंवा मासे आहारात समाविष्ट करावे.
महिलांनी या कमतरतेसाठी काय करावे?
करिअर, कुटुंब आणि स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष; यामुळे या वयोगटातील महिलांमध्ये ‘बर्नआउट’ आणि पोषक तत्वांची कमतरता होण्याची शक्यता सर्वाधिक असते.
- रोजच्या जेवणात शेवगा, कढीपत्ता आणि खसखस यांचा समावेश करा.
- ताकद वाढवण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी रात्री अश्वगंधा घ्या.
- पोषक तत्वे शोषून घेण्यासाठी, आतडे निरोगी ठेवण्याकरता झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण घ्या.
- मांसाहार आवडत असल्यास दुपारच्या जेवणात अधूनमधून मटणाचे सूप किंवा देशी चिकन घेऊ शकता. मात्र, रात्री याचे सेवन टाळावे.
४५ वर्षांवरील महिलांनी काय काळजी घ्यावी?
रजोनिवृत्तीदरम्यान (मेनोपॉज) पचन मंदावते आणि त्याबरोबरच बी १२ सारखी महत्त्वाची पोषक तत्वे शोषून घेण्याची शरीराची क्षमताही कमी होते.
गाईचे तूप, आवळा आणि शेळीच्या दुधाचे नियमित सेवन करा.
‘अभ्यंग’ (तेल मालिश) केल्यास शरीरातील स्त्रोत खुले राहतात आणि मज्जासंस्थेला बळकटी मिळते.
मांसाहारी लोकांनी १५ दिवसांतून एकदा बोकडाचे लिव्हर, सैंधव मीठ आणि आल्यासह हलके मसाले वापरून तयार केल्यास उत्तम पोषण मिळते.
