Can Vitamin C Prevent Cancer : आंबट गोड चवीची आणि पिवळ्या केशरी रंगाची संत्री सगळ्यांच्याच आवडीची असतात. सर्दी झाल्यावर संत्री खाल्ल्याने आरोग्यात झपाट्याने सुधारणा होते, असा अनेकांचा समज आहे. मात्र, याच संत्रीचा संबंध आता थेट कर्करोगावरील प्रभावी उपचारासाठी जोडण्यात आला आहे. कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या एका नव्या अभ्यासात संत्र्यांमध्ये आढळणारे ‘व्हिटॅमिन सी’ पचनसंस्थेशी संबंधित कर्करोगाचा धोका कसा कमी करू शकते, याचे विश्लेषण करण्यात आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ थिअरेटिकल बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहेत, त्याविषयी…
कर्करोगग्रस्त रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ
बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून अधिक लोकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची बाब उघड झाली आहे. भारतातही या जीवघेण्या आजाराचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. २०२५ च्या अखेरीस प्रत्येकी पाचपैकी एका पुरुषाला आणि सहापैकी एका महिलेला कर्करोगाची लागण होणार असल्याचा अंदाज ‘इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर’ या संस्थेने वर्तवला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला असून, कित्येकांना कर्करोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भारतात दर दोन मिनिटांना तीन लोकांचा कर्करोगाने मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब आकडेवारीतून समोर आली आहे. भविष्यात हा आकडा आणखीनच वाढणार असल्याची भीती काही अहवालांमधून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे या जीवघेण्या आजारावर प्रभावी उपचारासाठी अनेक देशांत संशोधन सुरू आहे.
‘व्हिटॅमिन सी’ म्हणजे काय?
‘व्हिटॅमिन सी’ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व असून ते शरीराच्या एकंदरीत आरोग्यासाठी आणि कार्यक्षमतेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जाते. हे सूक्ष्म पोषक शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास, संसर्गाशी लढण्यास आणि त्वचा, रक्तवाहिन्या, हाडे निरोगी ठेवण्यास मदत करते. मानवी शरीरात ‘व्हिटॅमिन सी’ आपोआप तयार होत नाही आणि ते साठवूनही ठेवता येत नाही. त्यामुळे संत्री, मोसंबी यांसारखी फळे आणि बेरी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या किंवा पूरक आहारातून ते मिळवावे लागते. यादरम्यान वॉटरलू विद्यापीठातील संशोधकांनी एका गणितीय तंत्राचा वापर करून ‘व्हिटॅमिन सी’ पचनसंस्थेतील कर्करोगाला कारणीभूत ठरणाऱ्या रासायनिक प्रक्रियांवर कसा प्रभाव पाडते, याचा सखोल अभ्यास केला आहे.
कॅन्सरचा धोका कसा कमी होऊ शकतो?
गेल्या काही दशकांत उत्तर अमेरिकेतील नागरिकांच्या शरीरात प्रक्रिया केलेल्या अन्नातील नायट्रेट्स आणि नायट्राइट्सचे प्रमाण वाढले आहे. हे घटक प्रक्रिया केलेल्या मांसासह प्रदूषित माती आणि पाण्यात पिकवलेल्या फळे व भाज्यांमध्ये आढळून येतात. वास्तविक पाहता नायट्रेट्स आणि नायट्राइट्स हे मज्जासंस्था आणि हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे असले तरी पोटामध्ये त्यांच्यावर ‘नायट्रोसेशन’ नावाची रासायनिक प्रक्रिया होते. या प्रक्रियेत तयार होणारी काही संयुगे कर्करोगाचा धोका वाढवू शकतात, असा अनेक वैज्ञानिकांचा संशय आहे. “१९९० च्या दशकापासून अनेक संशोकांकडून या संयुगांचा आणि कर्करोगाचा संबंध तपासला जात आहे. मात्र, त्याचे निष्कर्ष नेहमीच परस्परविरोधी आले आहेत. आमच्या संशोधनानुसार, आहारातील ‘व्हिटॅमिन सी’च्या उपस्थितीमुळे या निकालांमधील विसंगती स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते,” असे या संशोधनाचे प्रमुख डॉ. गॉर्डन मॅकनिकोल यांनी सांगितले.
संशोधकांनी कसे लावले निष्कर्ष?
या संबंधाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी लाळग्रंथी, पोट, लहान आतडे आणि रक्तातील प्लाझ्मा यांचे गणितीय मॉडेल तयार केले. त्यानंतर नायट्राइट्स आणि नायट्रेट्स शरीरात कसे फिरतात आणि कालांतराने त्यांच्यात कसे बदल होतात, यावर संशोधन करण्यात आले. अभ्यासादरम्यान असे आढळले की, पालकसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये ‘व्हिटॅमिन सी’ आणि ‘नायट्रेट’ दोन्ही असतात. अशा भाज्यांच्या सेवनाने कर्करोगाचा धोका झपाट्याने कमी होऊ शकतो. या संशोधनात असेही दिसून आले की- प्रत्येक जेवणानंतर व्हिटॅमिन सी सप्लिमेंट घेतल्यास नायट्रोसेशनमधून तयार होणाऱ्या आणि कर्करोगाच्या धोक्याशी संबंधित संयुगांची निर्मिती काही प्रमाणात कमी होऊ शकते. विशेषतः बेकन आणि सलामीसारख्या पदार्थांमधील नायट्राइट्स व नायट्रेट्समुळे निर्माण होणारा धोका कमी करण्यास त्याचा फायदा मोठा होऊ शकतो.
भविष्यातील संशोधनासाठी होणार मदत
“वॉटरलू विद्यापीठातील संशोधकांनी केलेले हे संशोधन भविष्यातील क्लिनिकल आणि प्रयोगशाळेतील अभ्यासांसाठी एक वैज्ञानिक मार्गदर्शक ठरू शकते. याद्वारे नायट्राइटचे शरीरातील प्रमाण, अँटी-ऑक्सिडंट्सचे सेवन, जेवणाची वेळ, पोटातील आरोग्यविषयक स्थिती आणि तोंडातील सूक्ष्मजीवांची सक्रियता, अशा संभाव्य घातक रासायनिक प्रक्रियांना कारणीभूत ठरणाऱ्या महत्त्वाच्या घटकांची ओळख पटवण्यात आली आहे. भविष्यात हा अभ्यास संशोधकांना अधिक अचूक प्रयोग आणि उपाययोजना आखण्यास मदत करेल; तसेच नायट्रोसेशनची प्रक्रिया नेमकीकधी आणि कोणामध्ये होण्याची शक्यता सर्वाधिक आहे, यावर लक्ष केंद्रित करणे यामुळे सोपे होईल, अशी माहिती या अभ्यासाच्या सह-लेखिका डॉ. अनिता लेटन यांनी दिली आहे.
