Vitamin D Deficiency Symptoms & Health Benefits: अनेकदा आपण सततच्या थकव्याला कामाचा ताण समजतो किंवा अंगदुखीकडे जुनाट त्रास म्हणून दुर्लक्ष करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, की यामागे एका महत्त्वाच्या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते? व्हिटॅमिन-डी म्हणजे केवळ हाडांसाठी आवश्यक असणारे पोषक तत्व, असा आपला समज आहे. मात्र, आधुनिक वैद्यकीय संशोधनानुसार व्हिटॅमिन-डीचा आपल्या आरोग्यावर होणारा परिणाम हाडांच्या मजबूती पलीकडे, थेट आपल्या मेंदूपासून ते स्त्रियांच्या संप्रेरकांपर्यंत (Hormones) एवढा व्यापक आहे. मुबलक सूर्यप्रकाश असलेल्या आपल्या देशात व्हिटॅमिन-डीची कमतरता हे आता नेहमीचेच झाले आहे. डॉक्टर याकडे वेळेवर लक्ष देण्याचा सल्ला देतात.

गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण

नवी दिल्लीतील ‘श्री बालाजी ॲक्शन मेडिकल इन्स्टिट्यूट’चे सांधेरोपण आणि अस्थिरोग विभागाचे संचालक डॉ. अखिलेश राठी आणि ‘मदर्स लॅप आयव्हीएफ सेंटर’च्या वैद्यकीय संचालिका व आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ. शोभा गुप्ता यांनी ‘एचटी लाइफस्टाइल’शी बोलताना संगितले की, शरीरातील व्हिटॅमिन-डीच्या पातळीकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा आजारातून सावरण्याच्या प्रक्रियेवर (Recovery), रोगप्रतिकारशक्तीवर, संप्रेरकांच्या संतुलनावर (Hormonal balance) आणि दीर्घकालीन आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा सतत येणारा थकवा, अकारण होणारी अंगदुखी किंवा जखमा भरून येण्यास होणारा उशीर यांसारख्या लक्षणांवर स्वतंत्रपणे उपचार केले जातात, परंतु त्यामागची व्हिटॅमिन-डीची कमतरता लक्षात घेतली जात नाही. काळानुरूप, ही दुर्लक्षित कमतरता शारीरिक ताकद आणि शरीराचे अंतर्गत संतुलन बिघडवून गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

१. हाडांची मजबूती आणि रिकव्हरी (सावरणे) यावर होणारा परिणाम

डॉ. राठी सांगतात, शरीरात कॅल्शिअम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन-डी अत्यंत आवश्यक असते, त्याचा थेट परिणाम हाडांची घनता (Bone density) आणि त्यांच्या दुरुस्तीवर होतो. अस्थिरोगाच्या प्रकरणांमध्ये, ज्या रुग्णांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता असते, त्यांना अनेकदा फ्रॅक्चर भरून येण्यास उशीर होणे, सतत सांधेदुखी राहणे आणि पुन्हा पुन्हा दुखापत होण्याचा धोका अशा समस्या जाणवतात. ज्याला आपण ‘हळूवार होणारी रिकव्हरी’ समजतो, ते प्रत्यक्षात पोषक तत्वांच्या अभावामुळे असू शकते.

ते स्पष्ट करतात की, “रुग्ण अनेकदा केवळ वेदनाशामक औषधे आणि फिजिओथेरपीवर लक्ष केंद्रित करतात, परंतु व्हिटॅमिन-डीची कमतरता भरून काढल्याशिवाय बरे होण्याची प्रक्रिया अपूर्ण राहते. फ्रॅक्चर भरून येण्यास उशीर होणाऱ्या अनेक प्रकरणांमध्ये व्हिटॅमिन-डीची कमतरता हे एक मुख्य कारण असल्याचे आम्हाला दिसून येते. ही कमतरता दूर केल्यास रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते.”

२. स्नायूंची कार्यक्षमता आणि दैनंदिन हालचाल

केवळ हाडांसाठीच नाही, तर स्नायूंची ताकद आणि त्यांच्यातील ताळमेळ (Coordination) राखण्यासाठी देखील व्हिटॅमिन-डी महत्त्वाची भूमिका बजावते. डॉ. राठी नमूद करतात की, “अनेक रुग्ण अंगदुखी आणि अशक्तपणाची तक्रार घेऊन येतात. जेव्हा आम्ही याची सखोल तपासणी करतो, तेव्हा व्हिटॅमिन-डीची कमी पातळी हेच त्यामागचे मूळ कारण असल्याचे वारंवार दिसून येते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे थकवा जाणवणे, स्नायूंची शक्ती कमी होणे आणि पडल्यामुळे होणाऱ्या दुखापतींचा धोका वाढू शकतो. हे तरुण आणि वृद्ध अशा दोन्ही वयोगटातील व्यक्तींमध्ये दिसून येते.”

३. संप्रेरकांचे (Harmonal) संतुलन आणि स्त्रियांचे आरोग्य

डॉ. गुप्ता सांगतात, व्हिटॅमिन-डीचा संबंध शरीरातील संप्रेरकांच्या (Hormones) नियंत्रणाशी जवळून जोडलेला आहे. या जीवनसत्त्वाची कमी पातळी असणे आणि मासिक पाळीतील अनियमितता, ‘पीसीओएस’ (PCOS – Polycystic Ovary Syndrome) तसेच वंध्यत्वाशी संबंधित आव्हाने यांचा एकमेकांशी संबंध असल्याचे दिसून आले आहे. प्रजनन आरोग्य (Reproductive health) उत्तम राखण्यातही हे जीवनसत्त्व महत्त्वाची भूमिका बजावते.

त्या पुढे सांगतात की, “व्हिटॅमिन-डीचे काम केवळ हाडांपुरते मर्यादित नाही; ते स्त्रियांमधील संप्रेरकांच्या संतुलनावरही मोठा प्रभाव टाकते. याची कमतरता मासिक पाळीतील अनियमितता आणि आरोग्याशी संबंधित इतर समस्यांना नकळतपणे आमंत्रण देऊ शकते.”

४. गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती (Menopause)

स्त्रीरोग तज्ज्ञांच्या मते, गर्भधारणेदरम्यान माता आणि गर्भ या दोघांच्या आरोग्यासाठी, तसेच रजोनिवृत्तीच्या काळात व्हिटॅमिन-डीची पुरेशी पातळी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्या स्पष्ट करतात की, “स्त्रियांमध्ये, विशेषतः गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीच्या काळात, तत्काळ आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी व्हिटॅमिन-डीची पातळी योग्य राखणे गरजेचे आहे. हे बाळाच्या हाडांच्या विकासास मदत करते. त्याचप्रमाणे, रजोनिवृत्तीच्या काळात जेव्हा हाडांची घनता नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते, तेव्हा व्हिटॅमिन-डीची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरते.”

५. रोगप्रतिकारशक्ती आणि सूज (Inflammation)

शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा नियंत्रित करण्यातही व्हिटॅमिन-डी महत्त्वाची भूमिका बजावते. तज्ज्ञांच्या मते, या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीरात जळजळ किंवा सूज (Inflammation) वाढू शकते, आजार किंवा दुखापतीतून सावरण्याचा वेग मंदावू शकतो आणि एकंदर शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. म्हणूनच व्हिटॅमिन-डी हे केवळ उपचारांसाठीच नाही, तर आजार रोखण्यासाठी (Prevention) देखील एक मुख्य पोषक घटक ठरते.

व्हिटॅमिन-डीची कमतरता इतकी सरसकट का आहे?

भारतात मुबलक सूर्यप्रकाश असूनही, व्हिटॅमिन-डीची कमतरता ही एक मोठी समस्या झाली आहे. याची मुख्य कारणे म्हणजे आपली बदललेली जीवनशैली. सतत घरात किंवा ऑफिसमध्ये राहणे, कामाचे जास्त तास, सूर्यप्रकाशाशी कमी येणारा संबंध आणि खाण्यापिण्याच्या सवयी. जोपर्यंत याची लक्षणे दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागत नाहीत, तोपर्यंत अनेक जण या समस्येबाबत अनभिज्ञ असतात.

डॉ. राठी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करतात, ज्यामध्ये व्हिटॅमिन-डीच्या पातळीची चाचणी केल्यास ही कमतरता लवकर लक्षात येऊ शकते. ते सुचवतात की, “पुरेसा सूर्यप्रकाश, संतुलित आहार आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट्स (Supplements) घेणे हे व्हिटॅमिन-डीची पातळी योग्य राखण्याचे प्रभावी मार्ग आहेत. मात्र, स्वतःच्या मनाने औषधे घेणे टाळले पाहिजे, कारण याचे अतिप्रमाणही शरीरासाठी घातक ठरू शकते.”

डॉ. गुप्ता समारोप करताना म्हणतात, “व्हिटॅमिन-डीच्या महत्त्वाकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु एका स्त्रीच्या संपूर्ण आरोग्यावर संप्रेरकांच्या संतुलनापासून ते दीर्घकालीन उत्तम आरोग्यापर्यंत याचा होणारा परिणाम अत्यंत मोठा आहे. वेळेवर या जीवनसत्त्वाच्या पातळीकडे लक्ष दिल्यास, अनेक गुंतागुंतीच्या समस्या सुरू होण्यापूर्वीच रोखता येतात. व्हिटॅमिन-डीची कमतरता भरून काढणे म्हणजे केवळ हाडांचा ठिसूळपणा रोखणे नव्हे, तर ते संपूर्ण शरीराला अधिक मजबूत आणि कार्यक्षम बनवणे आहे.”