Heart Attack Risk Vitamin K2 Cuts by 50%: हार्ट अटॅक हा शब्दच सध्या भीतीदायक वाटू लागलाय. वयोवृद्ध, तरुण… अगदी लहान मुलंसुद्धा या गंभीर आजाराशी सामना करत आहेत. या वर्षाची सुरुवातच आठ वर्षांच्या दोन लहान मुलींच्या हार्ट अटॅकमुळे झालेल्या मृत्यूने झाली होती.
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकजण धावत सुटला आहे. पैसा, लाईफ स्टाईल, गॅजेटस अशा एक ना अनेक गोष्टींच्या मागे माणूस धावतोय. तंत्रज्ञानाने वारेमाप प्रगती केली आहे, वैद्यकशास्त्रातही भरपूर प्रगती झाली आहे. तरीही मानवी शरीरात बळावणाऱ्या रोगांचे प्रमाण वाढतचं आहे. रोजची धावपळ, जंक फूड, स्ट्रेस अशा अनेक कारणांमुळे हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, कॅन्सर, किडनीच्या समस्या, सांधेदुखी- हाडांचे दुखणं वाढतच आहे. त्यामुळे आपल्या शरीरात आत काय जात आहे, हेही पाहणं गरजेच आहे. अलीकडच्या काही संशोधनामध्ये शरीरातील व्हिटॅमिन डेफिशियन्सी अर्थात जीवनसत्त्वांची कमतरता हेही या रोगांसाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. त्यातही हृदयाच्या आरोग्यासाठी K2 या व्हिटॅमिनकडे लक्ष पुरवण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
व्हिटॅमिन K2 हृदयाच्या आरोग्यासाठी एक नवा नायक ठरत आहे, परंतु बहुतांश लोकांना हृदयाशी संबंधित त्रास होईपर्यंत या व्हिटॅमिनचे नावही माहीत नसतं, महत्त्व माहीत असण्याचा तर प्रश्नच येत नाही. शरीरातील व्हिटॅमिन K2 ची कमतरता कडक झालेल्या धमन्यांपासून ते हृदयाच्या झडपांशी संबंधित समस्यांपर्यंत, हृदयविकारांपासून ते हार्ट अटॅकपर्यंत साऱ्यांसाठी कारणीभूत ठरते आहे. विशेष म्हणजे या व्हिटॅमिनची कमतरता मूत्रपिंड व पित्ताशयातील खड्यांच्या त्रासांनाही कारणीभूत ठरू शकते.
व्हिटॅमिन K2 काय करतं?
व्हिटॅमिन K2 शरीरात एक विशेष प्रोटिन सक्रिय करण्याचे महत्त्वाचे काम करते, या प्रोटिनला Matrix Gla Protein (MGP) असे म्हणतात. या प्रोटिनचे वर्णन धमन्यांचा रक्षक म्हणून केले जाते. या प्रोटिनचे मुख्य काम शरीरातील कॅल्शियम हाडांमध्ये पाठवणे आणि रक्तवाहिन्यांमध्ये जाण्यापासून थांबवणे आहे. कारण जास्त कॅल्शियम धमन्यांमध्ये साठल्यास त्या कडक होतात. K2 या व्हिटॅमिनची कमतरता असताना MGP सक्रिय राहत नाही. परिणामी, कालांतराने कॅल्शियम धमन्यांच्या भिंतींमध्ये साठू लागते. त्यामुळे त्या कठीण होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. PubMed Central मध्ये प्रकाशित झालेल्या Vitamin K2- A Neglected Player in Cardiovascular Health या शोध निबंधात, व्हिटॅमिन K2 चे प्रमाण वाढवल्यास नेमके काय होतं, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
व्हिटॅमिन K2 चे फायदे
- धमन्यांचा कडकपणा कमी होतो,
- रक्तवाहिन्यांतील आणि झडपांमधील कॅल्शियम साठण्याची गती मंदावते,
- टाइप 2 डायबेटीस आणि हृदयरोगाचे प्रमाण कमी होते,
- आणि हृदयविकारांमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही घटते.
व्हिटॅमिन K2 ची कमतरता
अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्टपणे सिद्ध झाले आहे की, व्हिटॅमिन K2 ची कमतरता थेट धमन्यांमध्ये कॅल्शियम साठण्याच्या प्रक्रियेला गती देते. यामध्ये कॅल्शियम आपल्या हाडांना बळकटी देण्याऐवजी रक्तवाहिन्यांमध्ये साचू लागते. PubMed Central वर शोध निबंधात म्हटले आहे की, ज्या व्यक्तींच्या आहारात व्हिटॅमिन K2 चे प्रमाण जास्त होते, त्यांच्या धमन्यांमध्ये कॅल्शियम साठण्याचा आणि हृदयरोगामुळे मृत्यू होण्याचा धोका ५०% पर्यंत कमी होता. हे परिणाम इतके ठळक आहेत की, ज्या व्यक्ती व्हिटॅमिन K च्या कार्याला अडथळे निर्माण करतील अशी औषधे घेतात (जसे की वारफारिन) त्यांच्या धमन्यांमध्ये कडकपणा झपाट्याने वाढतो.

हे असं का होतं?
ही स्थिती व्हिटॅमिन K2 च्या कार्बॉक्सिलेशन करण्याच्या (किंवा MGP प्रोटिन सक्रिय करण्याच्या) खास क्षमतेशी संबंधित आहे. सक्रिय झालेलं MGP कॅल्शियमला स्वतःशी जोडून घेते आणि ते धमन्यांमध्ये साचण्यापासून थांबवते. शरीरात व्हिटॅमिन K2 कमी असेल, तर MGP प्रोटीन सक्रिय होत नाही. याला इनॲक्टिव्ह MGP म्हणतात आणि अशा निष्क्रिय स्वरूपाच्या MGP चे प्रमाण जास्त असेल, तर धमन्यांमध्ये कडकपणा वाढतो आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो, हे संशोधनात दिसून आलं आहे.
K2 कमतरतेचे इतर धोकादायक परिणाम
फक्त धमन्याच नाहीत, तर K2 च्या कमतरतेचा परिणाम शरीरातील इतर महत्त्वाच्या भागांवरही होतो;
- ऑस्टिओपोरोसिस व हाडांच्या फ्रॅक्चरचा धोका: कारण कॅल्शियम योग्य ठिकाणी म्हणजे हाडांमध्ये न जाता इतरत्र साचते.
- गॉलस्टोन व किडनी स्टोन: शरीरात चुकीच्या ठिकाणी साचलेले अतिरिक्त कॅल्शियम (विशेषतः धमन्यांमध्ये) कालांतराने पित्ताशयात आणि मूत्रपिंडात खडे तयार करू शकते.
- तोंडाचे आरोग्य बिघडते: दीर्घकाळ व्हिटॅमिन K2 ची कमतरता असणाऱ्या लोकांमध्ये खराब ओरल हेल्थ देखील आढळून आले आहे.
- यामुळे K2 चे संतुलित प्रमाण शरीरासाठी केवळ हृदयापुरतेच नव्हे, तर संपूर्ण आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे.
ही कमतरता किती सामान्य आहे आणि का?
व्हिटॅमिन K2 हे प्रामुख्याने आंबवलेल्या पदार्थांमध्ये, अंड्याचा पिवळा बलक आणि विशिष्ट मांसाहारी पदार्थांमध्ये आढळते. आधुनिक आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K1 भरपूर प्रमाणात असते, पण K2 मात्र कमीच असते. त्यामुळे ही कमतरता दिसत नसली तरी फारच सामान्य आहे. अलीकडील संशोधनानुसार, मध्यमवयीन आणि वृद्ध व्यक्ती तसेच दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांमध्ये K2 ची कमतरता विशेषतः जास्त प्रमाणात आढळते.
K2 कमतरतेची लक्षणं
दुर्दैवाने, व्हिटॅमिन K2 ची कमतरता स्पष्टपणे ओळखता येणारी लक्षणं दिसत नाहीत, तोपर्यंत काहीतरी गंभीर नुकसान झालेलं असत. धमन्यांमध्ये कॅल्शियम साठणे ही एक शांत घडणारी प्रक्रिया आहे. मात्र आता रक्तात इनॲक्टिव्ह MGP चे प्रमाण मोजून ही कमतरता ओळखण्याचा एक नवा मार्ग समोर आला आहे.
K2 पुनर्संचय: अडथळा टाळण्याचा नैसर्गिक उपाय
धमन्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे आहारातून किंवा उच्च दर्जाच्या सप्लिमेंटद्वारे योग्य प्रमाणात K2 घेणे. यासाठी विशिष्ट प्रमाण ठरवले गेलेले नसले तरी MK-7 प्रकारातील K2 चे 100–200 मायक्रोग्रॅम दररोज घेण्याची शिफारस साधारणपणे केली जाते.
K2 चं प्रमाण वाढवण्याचा सुजाण मार्ग
आपल्या आहारात व्हिटॅमिन K2 समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करणे हा एक योग्य आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो. मात्र, बहुतांश लोकांसाठी-विशेषतः ज्यांना हृदयविकाराचा धोका आहे किंवा ज्यांच्या धमन्यांमध्ये आधीच कॅल्शियम साठले आहे…
त्यांच्यासाठी K2 सप्लिमेंट्स घेणे हा एक सोपा आणि खात्रीशीर मार्ग असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
K2 चे सेवन वाढवण्याचे फायदे
आहारातून किंवा सप्लिमेंटद्वारे व्हिटॅमिन K2 चे सेवन वाढवले तर, गंभीर हृदयविकार होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो.
