जगभरचा भार, नात्यांमधली ओढाताण, हार्मोन्सचे बिघडलेले संतुलन आणि वाढतं वय, या गोष्टी तुमच्या लैंगिक आयुष्यावर परिणाम करतायत, असंच वाटतंय ना तुम्हाला? पण जर का मी तुम्हाला असं सांगितलं की, तुमची कमी झालेली लैंगिक इच्छा, सतत जाणवणारा थकवा, इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा शरीरसंबंधांमधील निरुत्साह, या सर्वांमागचे खरे कारण तुमच्या रोजच्या आहारात लपलेले आहे तर?
संप्रेरकांचे योग्य संतुलन (हार्मोन्सची पातळी), सुरळीत रक्ताभिसरण, ऊर्जानिर्मिती, मज्जासंस्थेचे उत्तम कार्य व प्रजनन आरोग्य हे घटक तुमच्या लैंगिक कार्यक्षमतेवर (sexual performance) परिणाम करत असतात. परंतु, या सगळ्या घटकांना सक्षमतेने कार्यरत ठेवण्याचे काम जीवनसत्त्वे (vitamins) करीत असतात. पण प्रश्न हा आहे की, लैंगिक कार्यक्षमता आणि जीवनसत्त्वे यांचा संबंध काय?
हे काय नवीन? जीवनसत्त्वे आणि आरोग्याचा परस्पर संबंध
सगळ्यात पहिल्यांदा आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, लैंगिक कार्य हे एका कुठल्या तरी अवयव किंवा हार्मोनवर अवलंबून नसतं; तर मेंदू रक्तवाहिन्या, मज्जासंस्था, संप्रेरके आणि आपली भावनिक स्थिती यांचा त्यावर एकत्रित परिणाम होत असतो.
जेव्हा शरीरात आवश्यक पोषक घटकांची (nutrients) कमतरता निर्माण होते, तेव्हा या प्रणालींची काम करण्याची क्षमता मंदावते आणि मग आपल्याला थकवा जाणवतो, कमी झालेली कामेच्छा (sexual desire), उत्तेजित होण्यात (arousal) येणाऱ्या अडचणी, इरेक्टाइल डिस्फंक्शन, मूडमध्ये होणारे अचानक बदल किंवा प्रजननाशी संबंधित समस्या दिसून येऊ शकतात.
सूर्यकिरणांचा आरोग्याशी काय संबंध?
ड जीवनसत्त्वाची कमतरता ही जगभरातली सामान्य समस्या आहे. या कमतरतेचा त्रास त्या लोकांना जास्त होतो, जे बरेचदा घरात असतात किंवा घरातून काम करतात.
संशोधनानुसार, ‘टेस्टोस्टेरॉन’ या हार्मोनची निर्मिती, रक्तवाहिन्यांचे आरोग्य आणि आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यात ड जीवनसत्त्व अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. पुरुषांमध्ये या जीवनसत्त्वाची पातळी कमी झाल्याचा संबंध कमी झालेली कामेच्छा, सततचा थकवा, मूडमध्ये होणारे बदल आणि इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजे लैंगिक संबंधांसाठी पुरेशी ताठरता (इरेक्शन) मिळवण्यास किंवा ती टिकवून ठेवण्यास येणारी सातत्यपूर्ण अडचण यांसारख्या समस्यांशी जोडला गेला आहे.
तसेच, ड जीवनसत्त्वाची कमतरता असलेल्या महिलांनाही ऊर्जेचा अभाव आणि हार्मोन्सचे असंतुलन यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, ज्याचा परिणाम त्यांच्या लैंगिक इच्छा आणि एकूणच आरोग्यावर होऊ शकतो.
ब १२ जीवनसत्त्व स्टॅमिना कसं वाढवतं?
मज्जासंस्थेचे कार्य, लाल रक्तपेशींची निर्मिती आणि शरीरातील ऊर्जानिर्मिती प्रक्रियेसाठी ब १२ जीवनसत्व (Vitamin B12) अत्यंत आवश्यक असते.
याच्या कमतरतेमुळे सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, मानसिक गोंधळ किंवा सुन्नपणा (Brain fog) आणि शरीराचा स्टॅमिना कमी होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. या सर्व गोष्टींचा परिणाम जोडप्यांमधील शारीरिक जवळीक (intimacy) प्रस्थापित करण्यावर होऊ शकतो.
कामेच्छा ही अनेकदा व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेवर अवलंबून असल्यामुळे, ज्या लोकांमध्ये ब १२ जीवनसत्त्वाची पातळी कमी असते, त्यांच्यात लैंगिक संबंधांविषयीचा रस कमी झालेला जाणवतो.
विशेषतः शाकाहारी लोक (Vegetarians), विगन (Vegans) आणि वयस्कर व्यक्तींमध्ये ‘ब १२ जीवनसत्त्व’ कमी असते.
‘फॉलेट’ ब ९ जीवनसत्त्व:
डीएनए (DNA) निर्मिती आणि प्रजनन आरोग्यामध्ये (Reproductive health) ‘फॉलेट’ ब ९ जीवनसत्त्व (फॉलिक अॅसिड) अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते.
पुरुषांमध्ये, ‘फॉलेट’ची पातळी कमी झाल्यास शुक्राणूंची गुणवत्ता खराब (Poor sperm quality) होऊन, प्रजनन क्षमता कमी होते.
महिलांमध्ये प्रजनन आरोग्य उत्तम राखण्यासाठी आणि सुरक्षित व निरोगी गर्भधारणेसाठी शरीरात पुरेशा प्रमाणात ‘फॉलेट असणे अत्यंत आवश्यक असते.
जरी ‘फॉलेट’मुळे कामेच्छेत थेट वाढ होत नसली तरी प्रजननातील त्याच्या महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे गर्भधारणेचा (Conceive) प्रयत्न करणाऱ्या जोडप्यांसाठी तो एक अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक ठरतो.
ई जीवनसत्त्व : प्रजननासाठी कसे आहे उपयुक्त?
आपल्या शरीरातील पेशींचा सांभाळ करणारे ई जीवनसत्त्व एका ‘अँटीऑक्सिडंट’चे काम करत असते. काही संशोधकांच्या मते, ई जीवनसत्त्व शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यास, प्रजनन क्षमता वाढवण्यास आणि शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यास मदत करते.
लैंगिक उत्तेजना (Sexual arousal) व इरेक्शन (ताठरता) यांसाठी शरीरातील रक्तप्रवाह व्यवस्थित असणे अत्यंत गरजेचे असते. तुपामुळे एकूणच लैंगिक तब्येत सुधारण्यासाठी ई जीवनसत्त्वाची गरज असते.
IRON च्या कमतरतेचा लैंगिक आरोग्याशी काय संबंध?
जरी ‘लोह’ (Iron) हे तांत्रिकदृष्ट्या जीवनसत्त्व नसून एक ‘खनिज’ (Mineral) असले तरीही तो आपल्या शरीरात एक महत्त्वपूर्ण काम करतो. लोकांमध्ये लोहाची कमतरता असणे ही अत्यंत सामान्य बाब आहे.
शरीरातील लोहाची पातळी कमी झाल्यामुळे ‘ॲनिमिया’ (रक्ताची कमतरता) होऊ शकतो. त्यामुळे सतत थकवा येणे, अशक्तपणा जाणवणे, थोड्याशा कामानेही धाप लागणे आणि शारीरिक क्षमता कमी होणे यांसारखे त्रास सुरू होतात.
जेव्हा शरीरात ऊर्जेची कमतरता असते, तेव्हा साहजिकच लैंगिक इच्छादेखील कमी होते. त्यामुळे ज्या महिलांना सतत थकवा जाणवतो आणि कामेच्छा कमी झाल्यासारखे वाटते, त्यांच्यात अनेकदा नकळतपणे ‘लोहाची कमतरता’ हेच त्यामागील मुख्य कारण असू शकते.
झिंक : लैंगिक आरोग्याचे गुपित!
आणखी एक आवश्यक पोषक तत्त्व आहे माहितीये? झिंक! ज्याचा लैंगिक आरोग्याशी जवळचा संबंध आहे. ‘टेस्टोस्टेरॉन’ची निर्मिती, शुक्राणूंचा विकास, रोगप्रतिकार शक्ती व प्रजनन क्षमता यांमध्ये ते अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे झिंक. झिंकची पातळी कमी असल्यास पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन कमी होणे, कामेच्छा कमी होणे आणि प्रजनन आरोग्यावर वाईट परिणाम होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. सुका मेवा, बिया (Seeds), मासे, दुग्धजन्य पदार्थ व शेंगावर्गीय भाज्या हे झिंकचे उत्तम स्रोत आहेत.
उत्तम लैंगिक आरोग्यासाठी काही उपयुक्त टिप्स
पोषक तत्त्वांनी युक्त आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली यांच्या एकत्रित परिणामामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी, हार्मोन्सचे संतुलन, प्रजनन क्षमता आणि एकूणच लैंगिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
या सुधारणा होण्यासाठी काय करावे :
- आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला संतुलित आहार घ्यावा.
- शरीरातील ड जीवनसत्त्वाची योग्य ती पातळी राखण्यासाठी नियमितपणे कोवळ्या उन्हात वेळ व्यतीत करावा.
- नियमित व्यायाम करणे आणि सात ते आठ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.
- धूम्रपान, अति मद्यपान आणि जास्त प्रक्रिया केलेले अन्न (processed foods) टाळा.
- ताणतणावावर नियंत्रण ठेवा आणि शरीराचे योग्य ते वजन राखले जाईल यासाठी दक्ष राहा.
आपल्या जेवणाच्या ताटात काय बदल करावे?
- ड जीवनसत्त्व: फॅटी फिश, अंड्यातील पिवळा बलक, फोर्टिफाईड दुग्धजन्य पदार्थ.
- ब १२ जीवनसत्त्व : दूध, चीज, अंडी, मासे, मांस.
- ‘फॉलेट’(ब ९ जीवनसत्त्व): पालक, ब्रोकोली, मसूर आणि सर्व प्रकारच्या डाळी, बीन्स.
- इ जीवनसत्त्व: बदाम, सूर्यफुलाच्या बिया, शेंगदाणे.
- झिंक: भोपळ्याच्या बिया, चणे (छोले), दुग्धजन्य पदार्थ, सीफूड.
- लोह (Iron): हिरव्या पालेभाज्या, खजूर, बीन्स.
‘सप्लिमेंट्स’ घेणं हे या समस्येचे निदान असू शकते का?
मेडिकलमधून परस्पर सप्लिमेंट्स (गोळ्या/औषधे) आणून खाल्ल्याने आपले लैंगिक जीवन लगेच सुधारेल, असा अनेकांचा गैरसमज असतो. लैंगिक आरोग्याची समस्या अशा एका गोळीने दूर होण्यासारखी समस्या नाही. त्याचे गांभीर्य आपण लक्षात घ्यायला हवे आणि त्यानुसार संयमपूर्वक उपचार करायला हवेत. जर शरीरात खरोखरच एखाद्या घटकाची कमतरता असेल, तर ती दूर केल्याने तुमची ऊर्जा, हार्मोन्सचे संतुलन आणि एकूण आरोग्य नक्कीच सुधारू शकते.
आता प्रत्येक लैंगिक समस्या ही काही पोषणाच्या अभावातूनच होत नसते; तर ताणतणाव, अपुरी झोप, नात्यातील समस्या, मधुमेह (Diabetes), लठ्ठपणा, हार्मोनल आजार आणि हृदयविकार यांमुळेदेखील लैंगिक समस्या (Sexual dysfunction) उद्भवू शकतात. याच कारणामुळे योग्य वैद्यकीय चाचण्यांशिवाय स्वतःच्या मनाने सप्लिमेंट्स घेणे हा मूर्खपणा ठरेल.
जर तुम्हाला सतत कामेच्छा कमी होणे, इरेक्टाइल डिस्फंक्शन (ताठरतेची समस्या), विनाकारण जाणवणारा थकवा किंवा प्रजननासंबंधीच्या समस्या जाणवत असतील, तर तज्ज्ञ डॉक्टर किंवा सेक्सॉलॉजिस्टचा (Sexologist) सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. रक्ताच्या चाचण्यांमधून तुमच्या लैंगिक आरोग्यावर परिणाम करणारी जीवनसत्त्वांची कमतरता, हार्मोन्सचे असंतुलन किंवा इतर वैद्यकीय कारणे शोधण्यास मदत होऊ शकते.
स्वास्थ्यकर लैंगिक जीवनासाठी केवळ हार्मोन्स नव्हे, तर योग्य आहार आणि पोषण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. तुम्हाला लैंगिक समस्या जाणवत असल्यास केवळ बेडरूमपुरता विचार न करता, तत्काळ आपल्या आहारावर लक्ष केंद्रित करा. कारण- शरीरातील हे छोटे छोटे बदल भविष्यातील एखाद्या मोठ्या आजाराची पूर्वसूचना असू शकतात.
