रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे एक गूढ व्यक्तिमत्त्व असल्याचे आपण अनेकदा ऐकले असेल. पुतिन यांच्या खासगी आयुष्याची माहिती सहसा बाहेर येत नाही. त्यांचे आजवरचे आयुष्यही अनेक रहस्यांनी वेढलेले राहिले आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून ७० वर्षीय पुतिन आणखी बेरकी झाले आहेत. आपल्यावर हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका आल्यानंतर पुतिन यांनी विमानाने प्रवास करणे टाळले असल्याची माहिती समोर येत आहे. रशियामध्ये फिरण्यासाठी पुतिन सर्व सुविधांनी युक्त, चिलखताप्रमाणे मजबूत अशा ट्रेनमधून प्रवास करत आहेत. पुतिन यांच्या या ट्रेनला रहस्यमयी ट्रेन संबोधले जाते. या ट्रेनचे वेळापत्रक कुठेही दिसत नाही किंवा अशी ट्रेन अस्तित्त्वात आहे, याचे पुरावे रेल्वेकडे उपलब्ध नाहीत. पुतिन या ट्रेनने रशियात अंतर्गत प्रवास करतात, हे आता सर्वपरिचित आहेच. मागे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी या ट्रेनमध्ये एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती, या बैठकीचे फोटो क्रेमलिनकडून (राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान) सार्वजनिक करण्यात आले होते. त्या फोटोवरूनच या ट्रेनचे २२ डबे असून त्यात एक बोर्डरुम आहे, याव्यतिरिक्त फारशी माहिती कुणाला नव्हती. डॉसियर सेंटर या लंडनस्थित रशियन तपास गटाने पुतिन यांच्या या रहस्यमयी ट्रेनचे काही फोटो आणि कागदपत्रे सार्वजनिक केले आहेत. रशियामध्ये प्रवास करण्यासाठी पुतिन ही आलिशान ट्रेन वापरत असतात. हे वाचा >> ५० हजार रशियन सैनिकांचा युक्रेन युद्धात मृत्यू? रशिया सैनिकांच्या मृत्यूचा आकडा जाहीर का करत नाही? ६१० कोटींची आलिशान ट्रेन २०१८ साली या ट्रेनचे काम पूर्ण झाले. पुतिन यांची सुरक्षा व्यवस्था सांभाळणाऱ्या फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसच्या (FSO) अखत्यारित या ट्रेनची व्यवस्था करण्यात येते. या ट्रेनची निर्मिती करण्यासाठी ६१० कोटींचा खर्च आला होता आणि ट्रेनच्या देखभालीसाठी वार्षिक १३० कोटींचा खर्च करावा लागतो, अशी माहिती डॉसियर सेंटरने दिली. डॉसियर सेंटर या संस्थेला मिखाईल खोदोरकोवस्की यांचा पाठिंबा आहे. इंधन क्षेत्रातील मोठे उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, काही वर्षांपूर्वी त्यांना रशियातून बाहेर काढण्यात आले होते. तेव्हापासून ते क्रेमलिनचे टीकाकार झाले आहेत. पुतिन यांच्या ट्रेनसाठी लागणारा खर्च अर्थातच सामान्य लोकांकडून कर रूपातून मिळालेल्या पैशांतून केला जातो. या ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ट्रेनचे अनेक डबे चिलखताप्रमाणे मजबूत असून दरवाजे आणि खिडक्या बुलेटप्रूफ आहेत. एके ४७ किंवा एसव्हीडी रायफलच्या गोळीबारालाही सहन करण्याची ट्रेनच्या चिलखताची क्षमता आहे. तसेच उलट गोळीबार करण्याचीही व्यवस्था ट्रेनमध्ये आहे. तसेच जीवनावश्यक औषधांचा साठा डब्यात आहे. तसेच काही डब्यांमध्ये अत्याधुनिक संवाद यंत्रणा बसविण्यात आली आहे. ट्रेन धावत असतानाही पुतिन यांना बाहेरील जगतात चाललेली सर्व माहिती पुरविण्यासाठी आणि त्यांचा बाहेरील जगाशी संपर्क करून देण्यासाठी या यंत्रणेचा वापर होतो. क्रीडा, आरोग्य, स्पा सुविधांनी युक्त युक्रेन युद्धाआधी पुतिन स्वतःला धाडसी नेते असल्याचे दाखवत. पुतिन अधूनमधून रायफल शूटिंग करतात, घोड्यावर स्वार होतात, कधी कधी ते जिममध्ये घाम गाळतात. याप्रकारचे त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ बाहेर आलेले आहेत. यामुळे ट्रेनमध्येही क्रीडा सुविधा असणार यात आश्चर्य नाही. २०१८ साली ट्रेनमध्ये इटालियन तंत्रज्ञान वापरून एक आलिशान जिम बांधण्यात आली होती. त्यानंतर अमेरिकेतील कंपनीने तयार केलेली व्यायामाची उपकरणे जिममध्ये बसविण्यात आली, अशी माहिती डॉसियरने पुरविलेल्या कागदपत्रांच्या आधारे सीएनएनने दिली आहे. हे ही वाचा >> पुतिन यांना आव्हान देणाऱ्या येवजेनी प्रिगोझिन आणि वॅग्नरच्या योद्ध्यांचे पुढे काय होणार? ट्रेनमध्ये स्पा आणि हमामसारख्याही सुविधा आहेत. आंघोळीसाठी फॅन्सी शॉवर आणि टर्किश बाथ बनविण्यात आले आहे, ज्याच्यासाठी लाखो डॉलरचा खर्च झाला. तसेच मसाजसाठी संपूर्ण कॉस्मेटोलॉजी असलेलाही एक डबा आहे. या डब्यात महागडे सौंदर्यप्रसाधने, त्वचेचा तजेलपणा वाढावा यासाठी रेडिओ-फ्रिक्वेन्सी यंत्र असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रेनमध्ये वृद्धत्व रोखणारे यंत्र, व्हेटिंलेटर, डिफिब्रिलेटर (हृदयाचे अनियमित आकुंचन पूर्ववत करण्याचे यंत्र) आणि इतर आरोग्य सुविधा पुरविल्या गेलेल्या आहेत. ट्रेनमधील असलेल्या सोयी-सुविधांबाबत काही कागदपत्रे बाहेर आली आहेत. या ट्रेनमधून राष्ट्राध्यक्ष फक्त प्रवास करत नाहीत, तर त्यांची काळजी घेण्याचीही खबरदारी घेतली गेली आहे. ट्रेनच्या आतमध्ये ब्युटिशियनचे कार्यालय आहे, जिम आणि हमाम आहे. जर गरज लागली तर जीव वाचविण्यासाठी लागणारी सर्व आरोग्य सुविधाही उपलब्ध आहे. बाहेरून ही ट्रेन इतर ट्रेनप्रमाणेच सामान्य दिसते. आतमध्ये मात्र महागडे बेडरुम, शोभिवंत डायनिंग टेबल असे आलिशान स्वरुप दिसते. रेल्वेचे तज्ज्ञ दिमित्री यांनी सांगितले की, पुतिन यांच्या ट्रेनमध्ये सामान्य चैनीच्या सुविधा नाहीत, तर भव्य अशा ऐशोआरामाच्या सुविधा आहेत. शॉवर, भले मोठे शौचालय, मोठे पॅनॉसॉनिक टीव्ही, डीव्हीडी आणि व्हीएचएस प्लेअर्स अशा वस्तू आहेत. ट्रेनच्या आत नैसर्गिक लाकडाची सजावट आहे. तसेच काही राष्ट्रीय चिन्हही आहेत. काळानुरूप ट्रेनमध्ये नव्या नव्या सुविधाही बसविण्यात येतात. आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक संपूर्ण डबा जोडला गेल्यामुळे पुतिन आजारी असल्याचे दिसून येते. इथे फोटो पहा - पुतिन यांचा गुप्त प्रवास पुतिन यांची रहस्यमयी ट्रेन अस्तित्त्वात असल्याचे रेल्वेमध्ये कोणतेही पुरावे नाहीत. रेल्वेच्या वेळापत्रकात सदर ट्रेन दाखविण्यात येत नाही. ट्रेनच्या सर्व खिडक्या बंद असतात आणि डब्यावर इतर ट्रेनप्रमाणे क्रमांक आणि नाव लिहिलेले नसते. पुतिन यांना ट्रेनचे मुख्य प्रवासी म्हणून संबोधन करण्यात येते. पुतिन व्हलदाइ पॅलेस (Valdai Palace) येथे प्रवास करण्यासाठी या ट्रेनचा वापर करतात. त्या ठिकाणी त्यांची जोडीदार अलीना काबेवा राहत असल्याचे सांगितले जाते. पुतिन यांना ज्या ज्या ठिकाणी नियमित प्रवास करावा लागतो, त्या ठिकाणी विशेष रेल्वेस्थानकही बांधण्यात आले आहेत. मॉस्कोमधील पुतिन यांचे निवासस्थान नोवो-ओगार्योवो येथेही एक स्थानक बनविण्यात आले आहे. आणखी वाचा >> वॅग्नर ग्रुपच्या धमकीनंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये बंदोबस्त वाढविला; भाडोत्री सैनिकांबाबत राष्ट्राध्यक्ष पुतिन काय म्हणाले? जेव्हापासून युक्रेन युद्ध सुरू झाले आहे, तेव्हापासून ही ट्रेन व्हालदाई येथे अनेक काळापासून उभी आहे. जे कर्मचारी ट्रेनमधून प्रवास करतात त्यांना प्रवास सुरू करण्याआधी विलगीकरणात ठेवण्यात येते. रशियन फेडरल सुरक्षा सेवेचे माजी अभियंता ग्लेब काराकुलोव्ह यांना मागच्यावर्षी रशियातून बाहेर काढण्यात आले आहे. ते सीएनएन वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, पुतिन यांचा ट्रेनने प्रवास करण्याकडे कल वाढला आहे. आपल्या ठिकाणांचा पत्ता लागू नये, तसेच कुणीही माग काढू नये यासाठी पुतिन उच्च पातळीवर गुप्तता पाळत आहेत. विमानाने प्रवास करत असताना रडारमध्ये विमानाची हालचाल दिसते. मात्र, ट्रेनमधून प्रवास करताना पुतिन यांना गुप्तपणे प्रवास करता येतो, अशी माहिती काराकुलोव्ह यांनी डिसेंबर महिन्यात एका मुलाखतीत बोलताना दिली होती. डॉसियर सेंटरने जी माहिती बाहेर काढून दावे केले, त्याला क्रेमलिनने फेटाळून लावले आहे. "राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडे अशाप्रकारची कोणतीही ट्रेन नाही", असे प्रत्युत्तर क्रेमलिनने दिले.