“रोज चालायला जा, सगळे आजार बरे होतील.” हा सल्ला आपण, मित्रांकडून, सोशल मीडियावर आणि अगदी घरच्यांकडूनही ऐकतो. चालणं हा सर्वात सोपा, स्वस्त आणि सहज उपलब्ध असा व्यायाम मानला जातो. त्यामुळे अनेक जण कोणताही विचार न करता चालायला सुरुवात करतात. पण चालणं खरंच सर्वांसाठी, सगळ्या वयात आणि सगळ्या परिस्थितीत योग्य असतं का, याचा विचार क्वचितच केला जातो.

चालण्याचे फायदे अनेक

चालणं हे आरोग्यासाठी निश्चितच फायदेशीर आहे. नियमित चालण्याने शरीरातील वेगवेगळ्या यंत्रणांना विविध फायदे होतात. हृदयाचं आरोग्य सुधारतं, फुप्पुसांच कार्य सुधारतं, शरीरातील रक्तप्रवाह वाढतो, डायबिटीस असेल तर तो नियंत्रणात राहतो आणि वजन नियंत्रणात राहतं. शारीरिक परिणामांशिवाय चालण्याने मानसिक ताण देखील कमी होतो. मात्र चालणं ही केवळ साधी हालचाल नसून, ती एक फंक्शनल प्रक्रिया आहे.

चालताना सूत्रबद्ध हालचाली महत्त्वाच्या

चालताना पाय, गुडघे, कंबर, पाठ, मान, डोळे आणि मेंदू सगळे एकत्र काम करत असतात. चालताना या सगळ्या अवयवांच्या सूत्रबद्ध हालचाली अपेक्षित असतात. या साखळीत कुठेही कमकुवतपणा असेल, तर चालणं फायदेशीर न ठरता त्रासदायक ठरू शकतं. विशेषतः पायाचे, गुडघ्याचे आणि खुब्याचे स्नायू कमकुवत असतील तर चालण्याची क्रिया तितकी सहज आणि सुसुत्रित होत नाही.

कमकुवत स्नायूंमुळे…

कमकुवत स्नायूंमुळे चालण्याचा संपूर्ण फायदा तर होत नाहीच पण शरीराचं वजन सांध्यांवर असमान प्रमाणात येतं आणि त्यामुळे स्नायू आणि सांधे यांच्या वेदना होऊ शकतात. बहुतेकवेळा रुग्ण याचा सर्रास अर्थ असा काढतात की, चालण्यामुळे वेदना होतात आणि चालणं बंद करतात. यावेळी ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे की या वेदना चालण्यामुळे नसून आपल्या पायांच्या कमकुवत स्नायूंमुळे होण्याची शक्यता जास्त असते.

गुडघा, खुबा आणि पोटरीच्या स्नायूंची क्षमता

चालण्यापूर्वी आणि चालण्याचा व्यायाम करताना गुडघा, खुबा आणि पोटरीच्या स्नायूंची क्षमता वाढवणारे व्यायाम अत्यंत गरजेचे असतात. हे व्यायाम केले नाहीत तर चालण्याच्या क्रियेत आपसूकच पायांवर येणारा शरीराचा भार पाय व्यवस्थित तोलून धरू शकत नाहीत आणि त्यामुळे वेदना होतात आणि चालण्याची पद्धत बदलते.

गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी

अनेक लोक गुडघेदुखी, कंबरदुखी, टाचदुखी किंवा पाय सुन्न होण्याच्या तक्रारी असूनही ‘चालणं चांगलं आहे’ म्हणून चालायला लागतात. सुरुवातीला थोडं बरं वाटतं, पण काही दिवसांत वेदना वाढतात. मग लोक असं म्हणतात की ‘चालणं माझ्यासाठी नाही.’ प्रत्यक्षात समस्या चालण्यात नसते, तर चालण्याचा वेळ, अंतर, वेग आणि शरीराची तयारी यामध्ये असते.

चालण्याबाबतचे गैरसमज

चालण्याबाबतचा एक मोठा गैरसमज म्हणजे ‘जितकं जास्त चालाल, तितका जास्त फायदा.’ प्रत्यक्षात शरीराला कोणताही भार स्वीकारायला वेळ लागतो. चालणं हाही शरीरावर पडणारा एक प्रकारचा लोड आहे. स्नायू कमकुवत असतील, संतुलन बिघडलेलं असेल किंवा शरीर जास्त काळ निष्क्रिय राहिलं असेल, तर अचानक जास्त चालणं वेदना, सूज आणि थकवा वाढवू शकतं.

चालण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची

चालण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. अनेक वेळा चालताना शरीर पुढे झुकलेलं असतं, पावलांवर भार योग्यरीत्या पडत नाही, किंवा गुडघे आणि कंबर एकमेकांशी समन्वय साधत नाहीत. चुकीची पादत्राणे, खूप कठीण रस्ता, सतत एकाच प्रकारे चालणं, आणि विश्रांती न घेणं यामुळेही त्रास वाढू शकतो. फिजिओथेरेपीमध्ये चालणं फक्त ‘व्यायाम’ म्हणून पाहिलं जात नाही. चालणं ही एक दैनंदिन कार्यक्षम हालचाल आहे.

कधी, किती आणि कसं चालायचं

व्यक्तीचं वय, वजन, वेदनांची जागा, स्नायूंची ताकद, संतुलन, आधीचे आजार आणि दैनंदिन कामाचं स्वरूप हे सगळं लक्षात घेऊन चालणं योग्य आहे की नाही, हे ठरवलं जातं. काही लोकांसाठी चालणं हा सुरुवातीचा उत्तम व्यायाम असतो, तर काहींसाठी आधी स्नायू बळकट करणं किंवा संतुलन सुधारणं गरजेचं असतं.
काही वेळा चालण्याआधी शरीर तयार करणं, म्हणजेच हालचालींची सहनशक्ती वाढवणं, अधिक महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे चालणं बंद करायचं की नाही, हा प्रश्न नसून कधी, किती आणि कसं चालायचं हा खरा मुद्दा आहे.

क्षमता, मर्यादा आणि गरज ओळखून चाला

चालणं हा चांगला व्यायाम आहे, पण तो सर्वांसाठी सारखा नसतो. शरीराची क्षमता, मर्यादा आणि गरज ओळखून चालणं केलं, तर ते आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. अन्यथा योग्य मार्गदर्शनाशिवाय केलेलं चालणं वेदनांचं कारणही ठरू शकतं. चालणं चांगलं आहे पण चालण्याचं प्रमाण, जागा, पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चालण्यासाठी लागणारी पायाच्या स्नायूंची क्षमता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.