डॉ. देवदत्त पोखरकर
पहिलं महायुद्ध हे फक्त सैनिकांसाठीच नव्हे, तर घोड्यांसाठीही कठोर परीक्षा घेणारं ठरलं होतं. शत्रूचा हल्ला, तोफगोळे आणि मशिनगनच्या गोळ्यांबरोबरच रोगराई, थंडी, उपासमार, थकवा आणि अतिश्रम यामुळे पहिल्या महायुद्धात सुमारे ८० लाख घोड्यांच्या मृत्यूचा उल्लेख आढळतो. या लाखो घोड्यांच्या बलिदानाच्या भयावह कहाणीतला तो घोडा मात्र युद्धभूमीतून विजयी होऊन परतला, जर्मनांना पुरुन उरला. त्याची ही शौर्यगाथा…

माणूस जसा घोड्यांवर स्वार झाला, जग जिंकून घेण्याच्या त्याच्या ईर्षेला अकल्पित असं बळ आलं. म्हणूनच प्राचीन काळापासून ते आधुनिक युद्धांपर्यंत घोड्याचं मानवाशी असलेलं नातं विलक्षण आत्मीय राहिलं आहे. कधी तो योद्ध्याचा विश्वासू साथीदार बनला, कधी संदेशवाहक, तर कधी सैन्याच्या दळणवळणाचा आणि रसद व्यवस्थेचा मोलाचा आधार. या कालखंडात पहिल्या महायुद्धातील रक्तरंजित रणभूमीवर घोड्यांनी बजावलेली भूमिका आणि दिलेलं बलिदान इतिहासात विशेष स्थान मिळवून आहे. त्यातही युद्धभूमीवरून जिवंत परतलेल्या ‘वॉरियर’ची कथा तर लोकविलक्षण आहे.

…तरीही लाखोंनी प्राणांची किंमत चुकवली

वॉरियर हा ब्रिटिश जनरल जॅक सीली यांच्या मालकीचा थरब्रेड जातीचा (Thoroughbred) घोडा. त्याचा जन्म १९०८ चा. पहिलं महायुद्ध सुरू झालं तेव्हा सहा वर्षांचा वॉरियर आपल्या मालकासोबत रणांगणावर गेला अन्् पुढची चार वर्षे त्यानं युद्धाची भयावहता प्रत्यक्ष अनुभवली. १९१४ ते १९१८ या काळात वॉरियर अनंत संकटांतून गेला. तो जखमी झाला, मरणाच्या दारापर्यंत गेला; पण त्यानं हार मानली नाही.आपल्या मालकाची साथ सोडली नाही. घोड्यांना युद्धाचं राजकारण माहीत असण्याचं कारण नव्हतं. कोणता देश बरोबर आणि कोणता चूक, विजय म्हणजे काय किंवा पराभव म्हणजे काय, हेसुद्धा ठाऊक असणं शक्य नव्हतं. तरीही वर्चस्ववादी मनोवृत्तीने पछाडलेल्या माणासानं सुरू केलेल्या युद्धाची किंमत त्यांना आपल्या प्राणांची आहुती देऊन चुकवावी लागली होती…

मृत्युच्या पडछायेतला साथीदार

युद्धाच्या काळात जनरल सीली आणि वॉरियर यांच्यात निर्माण झालेलं नातं केवळ मालक आणि घोड्याचं नव्हतंच. ते माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट प्रेम, मैत्री, निष्ठा आणि विश्वासाचं प्रतीक बनलं होतं. त्याकाळी युद्धभूमीवर तैनात सैनिकांसाठी घोडा केवळ प्रवासाचं साधन नसे; तर भीती, अनिश्चितता आणि मृत्यूच्या पडछायेत तो त्यांचा जिवाभावाचा, मूक साथीदारही असे. म्हणूनच वॉरियरची कथा केवळ एका घोड्याच्या शौर्याची कथा राहत नाही; ती मानव आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्याची कथा बनते.

वॉरियर अपराजेय ठरला

अखेरीस १९१८ मध्ये पहिलं महायुद्ध संपलं. थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल चार वर्षं रणांगणावर युद्धसंघर्षात घालवल्यानंतर वॉरियर सुखरूप ब्रिटनला परतला. ज्या भूमीवर त्याने तोफांचा आवाज, मशिनगनचा मारा, चिखल, काटेरी तार आणि मृत्यूचे तांडव अनुभवलं, तिथून तो पुन्हा शांत जीवनात परतला. युद्धात सबभागी सैनिकांमध्ये ‘ज्याला जर्मन सैन्यही मारू शकले नाही असा घोडा’ म्हणून तो प्रसिद्ध झाला. उर्वरित आयुष्य त्यानं आपल्या मालकासोबत आइल ऑफ वाइटवरील ब्रूक हाऊस येथे शांततेत व्यतीत केलं. १९२० मध्ये, वयाच्या सुमारे बाराव्या वर्षी, वॉरियरचा मृत्यू झाला. रणांगणावर मृत्यूला अनेकदा चकवून जिवंत परतलेला हा मूक योद्धा अखेर शांतपणे काळाच्या पडद्याआड गेला.

वॉरियर तुझे सलाम!

मात्र मृत्यूनंतरही त्याची कहाणी विस्मरणात गेली नाही. २०१४ मध्ये पहिल्या महायुद्धाच्या शताब्दीच्या निमित्ताने वॉरियरला PDSA Dickin Medal हा मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात आला. प्राण्यांच्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेचा सन्मान करणारं हे पदक प्राण्यांचा ‘व्हिक्टोरिया क्रॉस’ म्हणून ओळखलं जातं. पदकावर कोरलेले “For Gallantry” हे शब्दं आणि “We Also Serve” हे वाक्य वॉरियरच्या मूक पराक्रमाचं सार सांगतात.
म्हणूनच वॉरियरला मिळालेला हा सन्मान केवळ एका घोड्याचा नव्हता. पहिल्या महायुद्धात सैनिकांसोबत सेवा बजावलेल्या आणि बलिदान दिलेल्या असंख्य प्राण्यांना दिलेली ती सार्थ आदरांजली होती.

विनाशकारी महायुद्धाचा मूक साक्षीदार

आजही कुठे पहिल्या महायुद्धाची चर्चा झाली, की आपल्या डोळ्यांसमोर रणगाडे, तोफा, विमानं, मशिनगन, खंदक आणि लाखो सैनिक व नागरिकांचा मृत्यू उभा राहतो. पण या युद्धाच्या मागे लाखो घोड्यांची शांत आणि निःशब्द मेहनत आणि बलिदान होते, हे विसरून चालणार नाही. वॉरियर त्याच इतिहासातला झळाळता अध्याय होता. तोफांच्या धडकी भरवणाऱ्या आवाजातही न डगमगणारा, चिखलवाटांतून वाट काढणारा आणि साक्षात मृत्युलाही चकवा देत परतणारा वॉरियर हा सैनिकाचा इमानी साथीदार, एका विनाशकारी महायुद्धाचा साक्षीदार आणि रणांगणावरील लाखो प्राण्यांच्या बलिदानाचं प्रतीक होता.

वॉरियर नसता तर?

‘वॉरियर’ने कोणताही प्रदेश जिंकला नाही. त्याला शस्त्रं चालवता येत नव्हतं. त्याला विजयाची भाषा कळत नव्हती; तरी त्याने कर्तव्य सोडलं नाही. मृत्यूला सामोरं जात त्याने आपल्या मालकाला अखेरपर्यंत साथ दिली. युद्ध संपल्यावर तो परतला, आपल्या मृत्युमुखी पडलेल्या शूर अशा मूक सहकाऱ्यांच्या आठवणी घेऊन. म्हणूनच वॉरियरची कथा केवळ एका घोड्याची कथा न राहता धैर्य, निष्ठा आणि मैत्रीची अमर कहाणी बनते. या कहाणीतून वॉरियरचा एकच सांगावा आहे, “We Also Serve” आमचाही या इतिहासात वाटा आहे.