scorecardresearch

विश्लेषण : उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा राजकीय वारसा गमावण्याची भीती होती का?

मातोश्रीच्या निष्ठावंत नेत्यांना असे वाटत होते, की राणे शक्तिशाली होत आहेत त्यामुळे पक्षावरील ठाकरे कुटुंबाचे नियंत्रण धोक्यात येत आहे.

Shiv Sena chief Uddhav Thackeray
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या वडिलांचा राजकीय वारसा गमावण्याची भीती होती का? किंवा ठाकरे कुटुंबाव्यतरिक्त दुसऱ्या नेत्याचे शिवसेनेवर वर्चस्व निर्माण होण्याची भीती होती. राजकीय पक्ष म्हणून ते शिवसेनेबद्दल बचावात्मक होते का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील विविध पैलू आणि त्यांच्यासोबत शिवसेनेत असलेल्या अनेक नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध याविषयी रोज नवनवीन किस्से समोर येत आहेत.

एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर आरोप

नुकतेच शिवसेनेतून बंड करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे हे आपल्याच पक्षातील लोकांपासून अंतर ठेवत असल्याचा आरोप केला होता. उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्हाला भेटण्यासाठीही वेळही नव्हता असेही शिंदे म्हणाले होते. लेखक धवल कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘ठाकरे भाऊ’ या पुस्तकात उद्धव ठाकरेंच्या अशा अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

राज ठाकरेंना शिवसेनेपासून बाहेर केले

धवल कुलकर्णी पुस्तकात लिहितात की, “२००४ मध्ये, एकीकडे बाळासाहेब ठाकरे प्रकृतीच्या कारणांमुळे राजकारणातील सक्रिय भूमिकेपासून दूर जाऊ लागले तर दुसरीकडेही राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केले गेले. त्यानंतर उद्धव यांनी पक्षाची संपूर्ण कमांड आपल्या हातात घेतली. हळूहळू अशा गोष्टी कानावर पडू लागल्या की, उद्धव हे पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेर राहायचे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनाही शिवसेनेच्या कार्याध्यक्षापर्यंत पोहोचणे अवघड झाल्याचे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पत्रकारांनी सांगितले. तसेच, “उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचे संबंध पूर्वीही चांगले नव्हते, पण आता ते जास्त बिघडले आहे. बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी राणेंना तासनसास प्रतिक्षा करावी लागत होती. त्यांचा फोनही उचलला गेला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

राणेंचे पक्षातील वर्चस्व वाढले होते

आता बंडखोर शिवसेना गट आणि भाजपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यावर शिंदे गट कदाचित बाळ ठाकरेंचा वारसा ताब्यात घेईल आणि उद्धव ठाकरे वेगळे पडतील, अशी भीती निर्माण झाली आहे. धवल कुलकर्णी पुस्तकात लिहितात, “ज्येष्ठ पत्रकार वगीश सारस्वत हे त्यावेळी वार्ताहर होते. नारायण राणे किंवा राज ठाकरे यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलावू नका, अशी अलिखित सूचना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना होती. शिवसेनेची रचना इतकी अखंड होती, की पक्ष चालवण्यासाठी पक्षप्रमुख प्रादेशिक आणि उपप्रादेशिक शाखांवर अवलंबून होते. मातोश्रीच्या निष्ठावंत नेत्यांना असे वाटले की राणे इतके शक्तिशाली होत आहेत की पक्षावरील कुटुंबाचे नियंत्रण धोक्यात येत आहे.

राज ठाकरे आणि नारायण राणे शिवसेनेचा ताबा घेण्याच भीती

“काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार त्यावेळी राणेंचे विश्वासू होते आणि त्यांनी राणेंसोबत शिवसेना सोडली होती. उद्धव यांच्या विश्वासपात्रांना नारायण राणे आणि राज ठाकरे सेनेचा ताबा घेऊ शकतील, अशी भीती होती. सरकार पाडण्याच्या मोहिमेआधीच पक्षावर नियंत्रण सुटले होते आणि महत्त्वाच्या बैठकांमध्येही आपल्याला बोलवले गेले नाही, अशी कबुली राणेंनी आत्मचरित्रात दिली आहे. उद्धव, मनोहर आणि सुभाष देसाई या त्रिकुटाला आपला अपमान करायचा होता, असा त्यांचा आरोप होता.

उद्धव ठाकरे आणि नेत्यांमध्ये मिलिंद नार्वेकर नावाची भिंत

उद्धव यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवर लोकांना भेटू न दिल्याने सत्तेचे केंद्र बनले होते. आजूबाजूला असलेल्या लोकांमध्ये उद्धव पटकन मिसळत नाहीत, त्यामुळे नार्वेकर उद्धव ठाकरे आणि इतर नेत्यांमधील भिंत बनले होते. नार्वेकर हे लिबर्टी गार्डन्स, मालाड येथे गटप्रमुख होते. म्हणजेच पक्ष संघटनेतील सर्वात खालचे स्थान. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंकडे शाखाप्रमुख बनवण्याची मागणी केली होती. मात्र, उद्धव यांनी त्यांना स्वीय सहाय्यक केले.

नार्वेकरांमुळेच अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली

अनेक वेळा ठाकरे केवळ मिलिंद नार्वेकरांसोबतच राहायचे. त्यामुळे पक्षात नार्वेकरांचा दबदबा वाढला होता. भास्कर जाधव, नारायण राणे आणि मोहन रावले या नेत्यांनीही नार्वेकरांमुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. नार्वेकर आजही जाहीरपणे उद्धव ठाकरेंना पाठिंबा देतात, पण आता त्यांचे पक्षातील वर्चस्व पहिल्यासारखे राहिले नाही. कारण मातोश्रीमध्ये आणखी अनेक सत्तेची केंद्रे उदयास आली आहेत. नार्वेकर हे राज्यसभा किंवा राज्य विधानपरिषदेच्या सदस्यत्वाच्या शर्यतीत होते, पण जानेवारी २०१८ मध्ये त्यांना पक्षाचे सचिव बनवण्यात आले होते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Was shiv sena chief uddhav thackeray afraid of losing his fathers political legacyd dpj

ताज्या बातम्या