भारत आणि पाकिस्तान यांच्यात बांगलादेश मुक्तीच्या निमित्ताने डिसेंबर १९७१मध्ये झालेल्या युद्धामध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी उघडपणे भारताची बाजू घेतली होती. निक्सन यांच्या मते सोव्हिएत रशियाने भारताची बाजू घेतल्यामुळे पाकिस्तान एकटा पडला. अशा परिस्थितीत भारताविरुद्ध युद्ध सुरू करावे अशी विनंती निक्सन यांनी चीनला केल्याचे नुकत्याच उघडकीस झालेल्या गोपनीय कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. चीन युद्धात उतरल्यास आम्ही मदत करू, असे आश्वासन अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिले होते. भारत-पाकिस्तान युद्धाच्या निमित्ताने व्यापक युद्ध सुरू करण्याची निक्सन यांची योजना होती. यात भारत आणि तत्कालीन सोव्हिएत रशियाविरुद्ध अमेरिका, पाकिस्तान, चीन अशी आघाडी उघडण्याचे ठरत होते.

‘वॉटरगेट’ कागदपत्रांमध्ये उल्लेख

निक्सन प्रशासनाकडून विरोधकांवर पाळत ठेवल्याप्रकरणी गाजलेल्या वॉटरगेट प्रकरणामध्ये निक्सन यांनी ग्रँड ज्युरींसमोर साक्ष नोंदवली. जवळपास पाच दशकांनी या साक्षीशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आली आहेत. त्यात इतर अनेक प्रकरणांप्रमाणे निक्सन आणि त्यांच्या प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांदरम्यान बांगलादेश मुक्ती युद्धाबाबत झालेल्या चर्चा-संवादाचा परामर्श अंतर्भूत आहे. रशिया आणि भारत यांच्यात गुप्त सहकार्य करार झालेला आहे. त्यामुळे कम्युनिस्ट रशियाचा भारताला पाठिंबा असेल, तर आपणही पाकिस्तानला पाठिंबा दिला पाहिजे याविषयी निक्सन आग्रही होते. प्रस्तुत कागदपत्रांमध्ये याविषयी सविस्तर तपशील आढळतो.

निक्सन यांचा भारतावर राग का?

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याविषयी निक्सन आणि त्यांचे परराष्ट्रनमंत्री हेन्री किसिंजर यांचे मत अजिबात चांगले नव्हते. इंदिरा गांधी यांनी अमेरिकेशी कटुता व्यक्त केली नव्हती. पण सोव्हिएत रशियाविरुद्ध अमेरिकेचे राजकीय मांडलिकत्व पत्करण्यास त्या कधीही तयार झाल्या नाहीत. निक्सन-किसिंजर दुकलीचा पाकिस्तानचे हुकूमशहा याह्या खान यांच्यावर अधिक विश्वास होता. कारण चीनशी संबंध सुधारण्याच्या निक्सन यांच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेत याह्या खान यांनी मध्यस्थाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे याह्या खान यांच्या अमदानीत दोन्ही पाकिस्तानांत मानवी हक्कांची पिळवणूक झाली तरी त्याकडे निक्सन प्रशासनाने कानाडोळाच केला.

अमेरिकेची युद्धाची तयारी?

भारताने बांगलादेश युद्धामध्ये पाकिस्तानविरुद्ध झपाट्याने विजय मिळवले, तशी निक्सन बिथरले. त्यांनी अमेरिकी नौदलाला न कळवताच ‘एंटरप्राइज’ या अमेरिकी युद्धनौकेला बंगालच्या उपसागराकडे रवाना केले. हे पाऊल अत्यंतक स्फोटक होते. विशेष म्हणजे असे करताना निक्सन यांनी परराष्ट्रमंत्री किसिंजर यांनाही विश्वासात घेतले नव्हते. तसे त्यांनी कबूलही केले. ‘वॉटरगेट’ प्रकरणात झालेल्या साक्षीपुराव्यांमध्ये हे प्रकरण अत्यंत गोपनीय मानले गेले. भारत-पाकिस्तान युद्धामध्ये चीनला गुंतवून रशियाविरुद्ध आघाडी उघडण्याचा हा निर्णय निक्सन यांच्यासाठी विलक्षण आत्मघातकी ठरला असता. विशेषतः व्हिएतनाम युद्धाची नामुष्की ओढवलेल्या काळात हे दुःसाहस निक्सन यांनी अतिरेकी सोव्हिएत आणि भारतद्वेषातूनच केले असते. हा अत्यंत स्फोटक तपशील इतकी वर्षे अनेक ज्युरींपासूनही दडवून ठेवण्यात आला होता.

भारताच्या तडाख्याने अमेरिकेचा डाव धुळीस

पूर्व पाकिस्तानवर पश्चिम पाकिस्तानात बसलेल्या पाकिस्तानी लष्करी शासकांनी अनन्वित अत्याचार केले नसते, तर कदाचित बांगलादेश युद्ध घडलेच नसते. तत्कालीन पूर्व पाकिस्तान म्हणजे आताच्या बांगलादेशात १९७०मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक याह्या खान राजवटीने नाकारली आणि बांगलादेशाची मागणी करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांची कत्तल सुरू केली. यामुळे हजारोंनी निर्वासित पूर्व पाकिस्तानातून भारतात येऊ लागले, ज्याने भारतात कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षेचा प्रश्न जटिल बनू लागला. निर्वासितांच्या निवास आणि अन्नाची सोय करणेही अत्यंत आव्हानात्मक ठरू लागले.

इस्लामाबादवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी भारताने प्रयत्न सुरू केले. पण चीन आणि अमेरिकेच्या पाठिंब्याच्या जोरावर पाकिस्तानी नेतृत्व मुजोर बनले होते. मग ऑगस्ट १९७१मध्ये भारतानेही सोव्हिएत रशियाबरोबर संरक्षण सहकार्य करार केला. त्या पाठबळावर युद्धाची तयारी केली. पहिली चिथावणी ३ डिसेंबरो रोजी पाकिस्तानकडून हवाई हल्ल्याच्या माध्यमातून मिळताच भारताने प्रतिकार सुरू केला. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान अशा दोन्ही आघाड्यांवर भारताच्या सैन्यदलांनी, लष्करी अधिकाऱ्यांनी आणि इंदिरा गांधी सरकारने विलक्षण झपाटा दाखवला आणि अवघ्या १३ दिवसांमध्ये बांगलादेशला मुक्त करून पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. या झपाट्यामुळे निक्सन यांची कुटिल योजना अमलात येऊच शकली नाही.

अमेरिकेच्या पाकिस्तानप्रेमावर शिक्कामोर्तब!

पाकिस्तानचे ९३ हजार सैनिक आणि त्यांचे जनरल ए. ए. खान नियाझी यांनी १६ डिसेंबर रोजी शरणागती पत्करली. पाकिस्तानने हार मान्य करून युद्धबंदी जाहीर केली. पण अमेरिकेच्या सांगण्यावरून चीनने पाकिस्तानला अखेरपर्यंत मदत केलीच नाही. कदाचित इतक्या लवकर भारत युद्धाचा निकाल लावेल याची त्यांनाही कल्पना नसावी! मात्र पाकिस्तानची बाजू घेऊन भारताला एकटे पाडण्याचा उद्योग अमेरिका कशा प्रकारे करत असे हे यानिमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले. अमेरिकेच्या पाकिस्तानधार्जिण्या धोरणावर यामुळे शिक्कामोर्तबच झाले.