Password Risks Common Hacking Methods: डिजिटल जगात आपली माहिती सुरक्षित असल्याचा विश्वास असला, तरी पासवर्ड निवडताना केलेली एक साधी चूक तुमच्या वैयक्तिक खात्यांपासून देशाच्या महत्त्वाच्या डेटाबेसपर्यंत अनेक गोष्टी धोक्यात आणू शकते.
जुलै २०२६ मध्ये आलेली अविनाश अरुण दिग्दर्शित ‘प्रीतम अँड पेद्रो’ ही हॉटस्टारवरची वेब सीरिज आठवतेय? त्यात अर्शद वारसीने सायबर जगताची गंधवार्ताही नसलेला पेद्रो हा पोलिस ऑफिसर साकारला होता. दुर्दैवाने त्याची बदली सायबर सेलमध्ये होते आणि एक महत्त्वाची केस त्याच्याकडे सोपवली जाते. त्या केससाठी तो प्रीतम या त्याच्या नव्या सायबर एक्स्पर्ट मित्राची मदत घेतो. या सीरिजमध्ये पासवर्ड क्रॅक करण्याबद्दल एक गमतीशीर प्रसंग आहे. पेद्रोला प्रीतमच्या हातात एक यादी दिसते आणि तो प्रीतमला त्या यादीबद्दल विचारतो.
पेद्रो : “हे कशासाठी?”
प्रीतम : “यात त्या माणसाचा वाढदिवस, आवडता सिनेमा, आवडतं गाणं, कुत्र्याचं नाव अशी सोशल मीडियावर मिळाली तेवढी माहिती आहे. त्याची सायबर कुंडलीच जणू! याने मला पासवर्ड क्रॅक करायला मदत होईल. लोक याच कॉम्बिनेशनने पासवर्ड तयार करतात. माझ्याकडचं ब्रूट फोर्स नावाचं ॲप या यादीतले वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करेल.”
तेव्हा पेद्रो छाती फुगवून सांगतो, “माझ्या पासवर्डमध्ये तर वाढदिवस, कुत्र्याचं नाव असं काहीच नाही. पण, आजवर कोणालाच तो क्रॅक करता आला नाही.”
प्रीतम : “आहे तरी काय तुमचा पासवर्ड?”
पेद्रो : “12345”
पेद्रोसारखेच अनेकजण आपल्या साध्याशा वाटणाऱ्या पासवर्डबद्दल फुकाचा आत्मविश्वास बाळगून असतात, त्यामुळे सीरिजमधला हा प्रसंग बघायला गमतीशीर वाटतो खरा, पण प्रत्यक्षात कोणीतरी आपलीही सायबर कुंडली नेमकी अशीच वाचत असतं. डेन्मार्कमध्ये नुकतीच घडलेली घटना हेच सिद्ध करते. तिथल्या सेंट्रल रजिस्टर ऑफ पर्सन्स (CPR) या संपूर्ण देशाच्या डेटाबेसमधून ८८ लाख नागरिकांचा डेटा चोरीला गेला आहे. हा डेटाबेस हॅक करण्यासाठी वापरला गेलेला पासवर्ड होता – ‘123456’! विशेष बाब म्हणजे, ही चोरी तब्बल १० दिवस सुरू होती आणि कुणालाही याचा थांगपत्ता लागला नाही.
या डेटाबेसच्या नियंत्रणाची संपूर्ण जबाबदारी एका खासगी संस्थेकडे होती. त्या संस्थेच्या तिन्ही अकाउंट्सचा पासवर्ड एकच होता – ‘123456.’ ही चोरी करणाऱ्या हॅकरने ‘पॉलिटिकेन’ या डॅनिश वृत्तसंस्थेशी बोलताना हा दावा केला आहे. डेन्मार्कसारख्या एखाद्या प्रगत देशाचा इतका महत्त्वाचा डेटा एका साध्याशा पासवर्डमुळे चोरला गेल्यामुळे लोकांची पासवर्ड्स निवडण्याबद्दलची मानसिकता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कमकुवत पासवर्ड्स निवडण्यामागची मानसिकता
आपल्या आजूबाजूला रोज डेटाचोरीचे इतके सायबर गुन्हे घडत असूनही चांगले पासवर्ड निवडणं, ते योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने टाईप करणं हे लोकांना जिकिरीचं काम वाटतं. सायबर सुरक्षेबद्दल सातत्याने सजगता वाढवणाऱ्या ‘ब्रिलियन्स सिक्युरिटी मॅगझिन’च्या एका लेखानुसार, कमकुवत पासवर्ड्स निवडण्यामागे लोकांच्या मनात असलेला अवास्तव किंवा पूर्वग्रहदूषित आशावाद आणि मेंदूवर ज्ञानात्मक ताण न देण्याची मानसिकता ही दोन प्रमुख कारणं आहेत.
लोकांच्या मनात असलेला अवास्तव आशावाद हा काही ठरावीक पूर्वग्रहांवर आधारलेला असतो. आपल्यासोबत काहीच वाईट होऊ शकत नाही, ही अवास्तव कल्पना या आशावादाला खतपाणी घालत असते. याला कोणत्याही धर्म, जात, लिंग, पंथ, प्रांत, वर्णाची व्यक्ती अपवाद नाही. या आशावादावर जगणारी व्यक्ती भविष्यातल्या धोक्यांना कायमच गौण किंवा शून्य महत्त्व देते. त्यातूनच आपला साधासा पासवर्डही त्या व्यक्तीला अतिशय मजबूत वाटू लागतो आणि तोच पासवर्ड कायम वापरण्याबद्दल ती व्यक्ती आग्रही होत जाते.
ज्ञानात्मक ताण अर्थात कॉग्निटीव्ह लोड ही संकल्पना जॉन स्वेलर या ऑस्ट्रेलियन मानसशास्त्रज्ञाने विकसित केली आहे. ज्ञानात्मक ताण म्हणजे आपला मेंदू एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी एका वेळी घेत असलेला ताण. वेगवेगळी अक्षरं, आकडे आणि चिन्हांचा वापर करून एखादा मजबूत पासवर्ड तयार करणं, तो लक्षात ठेवणं आणि योग्य ठिकाणी वापरणं, हे लोकांना एकाच वेळी कौशल्याचं आणि तरीही कष्टप्रद असं काम वाटतं, त्यामुळे बहुतेकांचा ओढा हा एकच सोपा पासवर्ड सगळ्या ठिकाणी वापरण्याकडे असतो.
डेन्मार्कच्या घटनेतही हेच घडलं. डेटाबेस सांभाळणाऱ्या कंपनीच्या ठेकेदाराचं कॉर्पोरेट अकाउंट हॅक करत असताना त्या हॅकरच्या हाती आणखी दोन खाती लागली आणि दुर्दैवाने त्यापैकी एक अकाउंट हे डेटाबेसवर नियंत्रण ठेवणारं ॲडमिन अकाउंट निघालं. केवळ ‘123456’ या एकाच पासवर्डच्या आधारे ही तिन्ही खाती हॅक करणं शक्य झालं होतं.
हॅकर नेमका विचार कसा करतो?
संशोधक अपील अधिकारी यांनी आपल्या ‘हाऊ पीपल रिअली चूज पासवर्ड्स: एव्हिडन्स ऑफ अव्हेलेबिलिटी अँड स्टेटस-को बायस फ्रॉम 33 मिलियन अकाउंट्स’मध्ये लोकांच्या पासवर्ड निवडण्यामागच्या मानसिकतेचा अभ्यास केला आहे. सिक्युरिटी रिसर्चसाठी प्रसिद्ध असलेल्या सेक्लिस्ट्स या संस्थेने आजवर लीक झालेल्या पासवर्डचे डेटासेट्स तयार केले आहेत. अशाच २६ डेटासेट्सवर अधिकारी यांचं संशोधन आधारलेलं आहे. सोशल मीडिया, गेमिंग साईट्स, डेटिंग ॲप्स अशा वेगवेगळ्या ठिकाणांहून हे पासवर्ड्स गोळा केलेले आहेत.
या संशोधनात पासवर्ड तयार करण्यामागच्या मानसिकतेचा शोध घेताना अधिकारी यांनी अव्हेलेबिलिटी बायस कसा वापरला जातो, हे व्यवस्थितपणे स्पष्ट केलंय. अव्हेलेबिलिटी बायस म्हणजे आपल्या डोक्यात एखादी गोष्ट पटकन आठवली म्हणून तीच गोष्ट जास्त घडते किंवा जास्त महत्त्वाची आहे असं आपोआप वाटून जाणं. पासवर्डच्या बाबतीतही मेंदूला जास्त विचार करायचा कंटाळा येतो, म्हणून तो पटकन आठवेल तेच उचलतो. यात मुख्यतः व्यक्तीचं नाव, जन्मतारीख, जन्मवर्ष अशा पटकन आठवणाऱ्या, सतत डोक्यात राहणाऱ्या गोष्टींचा समावेश होतो. मेंदूला हाच पासवर्ड सोपा, सेफ आणि चांगला वाटतो.
अगदी असाच विचार प्रीतमसारखे सायबर एक्स्पर्ट्स आणि हॅकर्स करतात. प्रीतमनेही पासवर्ड शोधण्यासाठी जी लिस्ट काढली होती, त्यात त्या व्यक्तीचा वाढदिवस, पाळीव कुत्र्याचं नाव, आवडता सिनेमा-गाणं अशा सोशल मीडियावर सहजगत्या उपलब्ध असलेल्या माहितीचा समावेश होता. अशी माहिती हॅकर्ससाठी सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीसारखीच असते. अव्हेलेबिलिटी बायसचा वापर करून त्यांना या माहितीतून पासवर्ड शोधणं अधिक सोपं जातं. अधिकारी यांच्या संशोधनातही, आपल्या अव्हेलेबिलिटी बायसच्या आधारे आपलं नाव किंवा जन्मवर्ष पासवर्डमध्ये गुंफणाऱ्या लोकांची संख्या साधारण ३२% असल्याचं दिसून येतं.
त्याचबरोबर अधिकारी यांनी अव्हेलेबिलिटी बायस-आधारित पासवर्ड्सचा आणखी एका प्रकार सांगितला आहे, तो म्हणजे डिक्शनरी वर्डचा. ज्या पासवर्डमधली चारहून अधिक अक्षरं इंग्रजी शब्दकोशातल्या कोणत्याही शब्दाशी जुळतात, त्याला डिक्शनरी वर्ड पासवर्ड असं म्हटलं जातं. अव्हेलेबिलिटी बायस-आधारित पासवर्ड्सचे नाव आणि जन्मवर्ष या पहिल्या दोन पासवर्ड्सच्या तुलनेत डिक्शनरी वर्ड पासवर्ड हा तितक्या वेगाने हॅकर्सच्या हाती लागणं अशक्य वाटतं. पण विशेष बाब म्हणजे, असे पासवर्ड्स क्रॅक होण्याचं प्रमाणही ३०% असल्याचं अधिकारी यांनी नोंदवलं आहे.
सोप्या पासवर्ड्सचा अवघड गुंता
अव्हेलेबिलिटी बायस-आधारित पासवर्ड्सच्या जवळपासचे पण त्याहूनही अतिशय सोपे प्रकार म्हणजे कीबोर्ड वॉक आणि सिक्वेन्शियल डिजिट्स पासवर्ड्स. कीबोर्ड वॉक पासवर्डमध्ये कीबोर्डवरच्या सलग बटणांचा क्रम समाविष्ट असतो. (उदा. “qwerty”, “asdf”, “1q2w3e”). सिक्वेन्शियल डिजिट्स पासवर्डमध्ये चढत्या किंवा उतरत्या क्रमाने येणारी ४-अंकी संख्यांची मालिका असते (उदा. “1234”, “4321”). डेन्मार्कच्या प्रकरणात हॅकरने क्रॅक केलेला पासवर्ड हा सिक्वेन्शियल डिजिट्स या प्रकारात मोडतो.
अधिकारी यांच्या संशोधनातल्या आकडेवारीत या दोन्ही प्रकारांमधले पासवर्ड क्रॅक होण्याचं प्रमाण कमी असलं तरी ते सुरक्षित किंवा मजबूत ठरत नाहीत. विशेषतः जिथं पूर्णपणे आकड्यांशी संबंधित पासवर्ड्सची आवश्यकता असते, तिथं सिक्वेन्शियल डिजिट्स पासवर्ड्सचा वापर हॅकर्सकडून प्रामुख्याने केला जातो.
नोनहोस्ट या संस्थेने २०२५ मध्ये सहजगत्या हॅक होण्याची सर्वाधिक शक्यता असलेल्या १० पासवर्ड्सची यादी प्रसिद्ध केली होती. सर्वात गंभीर बाब म्हणजे या टॉप १० मधील प्रत्येक पासवर्ड क्रॅक करण्यासाठी हॅकर्सना एका सेकंदापेक्षाही कमी वेळ लागतो. यावरून हे सिद्ध होतं की, असे सोपे पासवर्ड्स ब्रूट-फोर्स किंवा ऑटोमेटेड बॉट हल्ल्यांसमोर क्षणभरही टिकू शकत नाहीत. या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेला पासवर्ड होता – ‘123456’! हा पासवर्ड तब्बल ३० लाखांहून अधिक लोकांनी वापरला असून तो ५ कोटींपेक्षा जास्त डेटा चोरीच्या प्रकरणांमध्ये सापडला आहे.
- या यादीतले ‘123456’, ‘123456789’, ‘1234’, ‘12345678’ आणि ‘1234’ हे अनुक्रमे पहिले पाच पासवर्ड्स हे सिक्वेन्शियल डिजिट्स या प्रकारात मोडणारे आहेत.
- सहाव्या आणि आठव्या स्थानावर ‘password’ आणि ‘admin’ यांसारखे अगदी प्राथमिक शब्द येतात, जे डिक्शनरी वर्ड या प्रकारात मोडतात.
- सातव्या आणि नवव्या स्थानावर अंकाची पुनरावृत्ती (‘111111’) किंवा एकाच पॅटर्नची दोनदा पुनरावृत्ती (‘123123’) असे पासवर्ड्स आहेत. यावरून वापरकर्त्यांची ज्ञानशक्तीवर ताण न देण्याची मानसिकता दिसून येते, ज्याला सायबर सुरक्षेत ‘लो-एफर्ट पॅटर्न’ असंही म्हटलं जातं.
- सर्वात शेवटी ‘abc123’ सारखा अक्षर-अंकांचा सोपा क्रम असलेला पासवर्ड नमूद केलेला दिसतो.
असे पासवर्ड्स वापरणं हे लोकांच्या सायबर सुरक्षेबाबतच्या बेफिकीर वृत्तीचंच निदर्शक आहे. लोक पासवर्ड्स तयार करण्यासाठी अगदी प्राथमिक पातळीवरील कल्पनाशक्तीही वापरत नाहीत. बऱ्याचदा लोकांना वाटते की मोठा पासवर्ड ठेवला म्हणजे तो सुरक्षित असतो, पण ‘123456789’ किंवा ‘12345678’ सारखे पासवर्ड्स लांबी जास्त असूनही सिक्वेन्शियल डिजिट्स या प्रकारातले असल्याने क्षणार्धात क्रॅक होतात. थोडक्यात सांगायचं तर जोपर्यंत आपण अक्षरं, आकडे आणि विशेष चिन्हं यांचं मिश्रण असलेले मजबूत पासवर्ड्स तयार करत नाही, तोपर्यंत हॅकर्सच्या दृष्टीने आपला डेटा कायमच असुरक्षित राहील.
