Unseasonal Rain Reasons Western Disturbances Impact : मार्चमधील गोंधळात टाकणाऱ्या हवामानानंतर एप्रिलमध्येही देशातील अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गेल्या महिन्यात प्रामुख्याने उत्तर भारतात हवामानाचे विचित्र स्वरूप पाहायला मिळाले. जिथे उंच डोंगराळ प्रदेशात बर्फवृष्टी आणि मैदानी भागात अवकाळी पावसासह गारपिटीने तडाखा दिला. यादरम्यान भारतीय हवामान खात्याने संपूर्ण देशभरात वादळी पावसाचा इशारा दिला आहे. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळणार असला तरीही त्याचा मान्सूनशी थेट संबंध नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात अवकाळी पावसाची स्थिती का निर्माण झाली? त्यामागची नेमकी कारणे काय? त्याविषयीचा हा सविस्तर आढावा…

काय आहे अवकाळी पावसाचे कारण?

एकामागून एक येणाऱ्या तीव्र पश्चिमी विक्षोभांमुळे हवामानात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर तयार झालेले बाष्प आणि वातावरणातील इतर बदलांच्या परस्पर संबंधामुळे देशभरात अवकाळी पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे. यादरम्यान देशाच्या विविध भागांत सुरू असलेल्या पावसामुळे यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये रंगली आहे. मात्र, सध्याचा पाऊस आणि १ जूनच्या सुमारास केरळमध्ये धडकणारा अधिकृत मान्सून यांमध्ये मोठा फरक आहे. सलग दोन पश्चिमी विक्षोभांमुळे हा पाऊस पडत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पश्चिमी विक्षोभ प्रणालीचा उगम अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेपलीकडून होतो. हे वारे भूमध्य समुद्र, काळा समुद्र, कॅस्पियन व अरबी समुद्रातून बाष्प शोषून घेतात आणि उंचीवरून भारतीय उपखंडात दाखल होतात.

मान्सूचे निकष कसे काढले जातात?

सामान्यतः भारतात पश्चिमी विक्षोभाची स्थिती डिसेंबर ते मार्चदरम्यान तयार होते; परंतु यंदा एप्रिलपर्यंत त्यांचा प्रभाव कायम राहिल्याने हवामानात मोठा बदल दिसून आला आहे. मार्च महिन्यातच अशा आठ विक्षोभांचा भारतावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सून जाहीर करण्यासाठी ठरावीक तांत्रिक निकष असतात. त्यामध्ये वाऱ्यांचा विशिष्ट वेग, पावसाची सातत्यपूर्ण नोंद आणि १४ ठरावीक केंद्रांवरील निरीक्षणे यांसारख्या बाबींचा समावेश असतो. साधारणत: हे निकष दरवर्षी मे महिन्याच्या १० तारखेनंतरच तपासले जातात. त्यामुळे सध्याचा पाऊस हंगामी विक्षोभ म्हणूनच गणला जात असून, तो मान्सूनच्या चक्रातील बदलाचा संकेत नाही. सध्या सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका उत्तर-पश्चिम भारताला बसला असून, तेथील तापमानात झालेली घट ही भरउन्हाळ्यात हिवाळ्याची आठवण करून देणारी आहे.

आणखी वाचा : तमिळनाडूतील ९ पोलिसांना फाशीची शिक्षा; पिता-पुत्राची कोठडीत हत्या कशी झाली? करोना काळात काय घडले?

उत्तर भारतातील तापमानात मोठी घट

ढगाळ वातावरणामुळे राजधानी दिल्लीतील तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे ५ एप्रिल रोजी दिल्लीतील कमाल तापमानाचा पारा ३२ अंशाचा खाली आहे, जो सरासरीपेक्षा दोन अंशांनी कमी होता. ढगांच्या आच्छादनामुळे दिवसा सूर्याची उष्णता जमिनीपर्यंत कमी पोहोचते आणि रात्रीच्या वेळी जमिनीतील उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळेच वातावरणात गारवा जाणवत असल्याचे मत ‘स्कायमेट’चे उपाध्यक्ष महेश पालावत यांनी व्यक्त केले. गारव्याचा हा परिणाम इतर राज्यांमध्ये अधिक तीव्रतेने दिसून येत आहे. पंजाबमधील सरासरी कमाल तापमान सामान्यपेक्षा २.६ अंश सेल्सिअसने घसरले. हरियाणातील तापमान सरासरीपेक्षा १.८ अंश सेल्सिअसने कमी नोंदवण्यात आले. ग्वाल्हेर आणि रेवा या भागांत किमान तापमानात २.४ अंश सेल्सिअसपर्यंत मोठी घट झाली.

पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

शहरी भागातील नागरिकांसाठी वातावरणातील हा बदल लाभदायक ठरला आहे. या पावसामुळे दिल्लीची हवेची गुणवत्ता धोकादायक श्रेणीतून सुधारून मध्यम श्रेणीत आली आहे. परंतु, शहरांसाठी दिलासादायक ठरणारे हे हवामान कृषी क्षेत्रासाठी मात्र चिंतेचे कारण ठरले आहे. ऐन शेतीच्या हंगामात आलेल्या या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने महाराष्ट्रासह राजस्थान, पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ऐन काढणीच्या हंगामात आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने बळीराजावर आर्थिक संकट ओढवले आहे.

कोणकोणत्या राज्यात पावसाचा इशारा?

भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पंजाब, हरियाणा, उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात ताशी ६० ते ७० किमी वेगाने वाहणारे वारे आणि गारपिटीची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचलच्या उंचावरील भागात सुरू असलेल्या बर्फवृष्टीमुळे अनेक महत्त्वाचे रस्ते बंद झाले आहेत. तेथील नागरिकांना पुन्हा एकदा उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. उत्तर भारतात थंडावा असला तरी मध्य आणि दक्षिण भारतात हवामानाचे वेगळे रूप पाहायला मिळत आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांत अधूनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. तमिळनाडू, केरळ व कर्नाटक या राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने तेथे यलो अलर्ट देण्यात आला आहे.

हेही वाचा :  लादेनचा खात्मा करणारी अमेरिकेची ‘सील टीम’ इराणमध्ये; वैमानिकाला मृत्यूच्या जबड्यातून कसे वाचवले?

उकाड्यापासूनचा हा दिलासा तात्पुरताच!

अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सध्या वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरीही हवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा इशारा दिला आहे. ढगाळ हवामान आणि पावसाला पोषक ठरणारे वातावरण निवळल्यानंतर संपूर्ण भारतातील तापमानात सरासरीपेक्षा जास्त वाढ होईल, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. यादरम्यान २०२६ च्या नैर्ऋत्य मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज एप्रिलच्या मध्यात जाहीर केला जाणार आहे. हवामानातील या अस्थिरतेमुळे प्रशासन सतर्क असून, ७ एप्रिलच्या सुमारास आणखी एक मजबूत पश्चिमी विक्षोभ सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राजस्थानमधील जोधपूर, बिकानेर व जयपूर जिल्ह्याला वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पडणारा पाऊस आणि गारवा मान्सूनच्या आगमनाचा भास देत असला तरीही प्रत्यक्षात खरा उन्हाळा आणि अधिकृत पावसाळा अजून यायचा असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.