ओडिशामधील स्थानिक न्यायालयाने २०१८ मधील ‘वेडिंग बॉम्ब’ प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या घटनेत लग्नाचे गिफ्ट म्हणून आलेल्या पार्सलमध्ये बॉम्ब निघाला आणि त्यात नवरदेवाचा आणि त्याच्या आजीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने एका माजी इंग्रजी प्राध्यापकाला दोषी ठरवले आहे. २०१८ च्या प्रकरणाने ओडिशासह संपूर्ण भारताला हादरवले होते. नेमके हे प्रकरण काय? आणि आरोपीचा थांगपत्ता पोलिसांना कसा लागला? त्याविषयी जाणून घेऊयात.
‘वेडिंग बॉम्ब’ प्रकरण?
२३ फेब्रुवारी २०१८ रोजी २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर सौम्य शेखर साहू आणि त्याची २२ वर्षीय पत्नी रीमा ओडिशातील पटनागढ येथील त्यांच्या घरी स्वयंपाकघरात होते. लग्नानंतर पाच दिवसांनी एका डिलिव्हरी बॉयने सौम्यच्या नावाने आलेले एक पार्सल आणून दिले. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, पार्सलवर असलेल्या स्टिकरमध्ये लिहिले होते की ते रायपूर, छत्तीसगड येथील एस. के. शर्मा यांनी पाठवले आहे. “हे पार्सल लग्नाच्या गिफ्टसारखे दिसते, परंतु पाठवणाऱ्याची ओळख नाही,” असे तिने पती सौम्य शेखर साहूला सांगितले. “मी रायपूरमध्ये कोणालाही ओळखत नाही,” असे ती म्हणाली.” पार्सल उघडताच एका मोठ्या स्फोटाने स्वयंपाकघर हादरले. स्फोटात रीमाचा पती सौम्य आणि त्याची ८५ वर्षीय आजी जेमामणी साहू यांचा मृत्यू झाला. ते दोघेही ९० टक्के भाजले होते. रीमा या घटनेत वाचली, पण तीदेखील गंभीर भाजली होती आणि तिच्या कानाचा पडदाही फाटला होता.
ओडिशा पोलिसांनी प्रकरणाचा उलगडा कसा केला?
ओडिशा पोलिसांनी दोन महिन्यांनंतर ‘वेडिंग बॉम्ब’ प्रकरणाचा उलगडा केला. परंतु, या घटनेच्या अनेक आठवड्यांनंतरही कोणीही स्पष्ट संशयित सापडला नाही. त्यांनी १०० हून अधिक लोकांची चौकशी केली. त्यात या जोडप्याचे मित्र आणि नातेवाईक यांचा समावेश होता, परंतु त्यांना कोणताही पुरावा सापडला नाही. तपासकर्त्यांनी सांगितले की, हा नियोजन करून केला गेलेला गुन्हा होता. पोलिसांनी या प्रकरणाचा काही दिवस तपास केल्यानंतर हे प्रकरण ओडिशा गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. मार्च २०१८ मध्ये बीबीसीशी बोलताना रीमा म्हणाली की, तिचा पती सौम्य बंगळुरूमध्ये असताना त्याला एक फोन आला होता.
ती म्हणाली, “गेल्या वर्षी त्याला फोन आला होता. आम्ही फोनवर बोलत असताना त्याने अज्ञात क्रमांकावरून आपल्याला फोन येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्याने माझा कॉल होल्डवर ठेवला होता. त्यानंतर त्याने मला सांगितले की त्याला धमकीचा फोन आला होता. लाइनवर असलेल्या एका माणसाने मला लग्न करू नये असे सांगितले होते.” सौम्य याने त्यानंतर अशा कोणत्याही कॉलचा उल्लेख केला नाही आणि जोडप्याने लग्न केले. पोलिसांनी फोन रेकॉर्ड तपासले आणि सौम्यला धमकी देणारा फोन करणाऱ्या माणसाचीही चौकशी केली, पण तरीही त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर एप्रिलमध्ये आरोपीने लिहिलेल्या एका निनावी पत्रामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकारी अरुण बोथरा यांच्या नेतृत्वाखालील ओडिशा गुन्हे शाखेला हे प्रकरण उलगडण्यास मदत झाली.
निनावी पत्र अन् प्राध्यापकाचा शोध
तत्कालीन बोलांगीर पोलिस अधीक्षकांना एक निनावी पत्र आले. या पत्रात म्हटले होते की, बॉम्ब शर्मा नव्हे तर एस. के. सिन्हा या नावाने पाठवण्यात आला होता. या घटनेची योजना तीन जणांनी आखल्याचा दावाही त्यात करण्यात आला होता. हत्येची योजना विश्वासघाताची शिक्षा देण्यासाठी आणि पैशासाठी आखण्यात आल्याचेही या पत्रात सांगण्यात आले होते. पोलिसांनी निरपराध लोकांना त्रास देणे थांबवावे, असा सल्लाही देण्यात आला होता.
परंतु, हेच पत्र पोलिसांच्या तपासात फायद्याचे ठरले आणि तपासाला वेग आला. तत्कालीन आयजी आणि अतिरिक्त डीजी दर्जाचे अधिकारी अरुण बोथरा यांच्या लक्षात आले की, पार्सलच्या स्टिकरवरील नाव चुकीचे वाचले गेले होते आणि त्याला शर्माऐवजी सिन्हा म्हणून वाचण्यात आले होते. ही बाब केवळ पत्र पाठवणाऱ्यालाच कळू शकली असती. ‘बीबीसी’च्या नुसार संशयिताने स्वतः पत्र पाठवले होते, यावर पोलिसांना विश्वास बसला. “हे स्पष्ट होते की, पाठवणाऱ्याला गुन्ह्याबद्दल पोलिसांपेक्षा जास्त माहिती होती. हा संदेश एका संदेशवाहकाने पाठवला आहे असे लिहून त्याला सांगायचे होते की हा कट तीन लोकांनी रचला होता. त्याला हे प्रकरण गांभीर्याने घ्यायचे होते आणि म्हणून त्याने आम्ही केलेली चूक दाखवली,” असे बोथरा यांनी २०१८ मध्ये ‘बीबीसी’ला सांगितले.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, बोथरा यांनी सांगितले की, हे पत्र तपास यंत्रणेला फसवण्यासाठी होते, परंतु आरोपीने पत्रात असे अनेक संकेत सोडले होते. बोथरा म्हणाले, “भाषा, फॉन्ट आकार आणि पत्रातील अंतरावरून असे दिसून आले की, हे पत्र इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या एखाद्या व्यक्तीने पाठवले होते. त्यामुळे आम्हाला आरोपी इंग्रजीचा प्राध्यापक असल्याचा संशय आला आणि त्याचा शोध लागला. जेव्हा आम्ही त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा आम्हाला काही पुरावे मिळाले, जे वैज्ञानिकदृष्ट्या जुळले आणि हाच या प्रकरणातील महत्त्वाचा टप्पा ठरला,” अशी माहिती बोथरा यांनी दिली.
सौम्यची आई आणि महाविद्यालयीन शिक्षिका संजुक्ता साहू यांनी पत्रातील लेखनशैली आणि वाक्यरचना ओळखली आणि ती त्यांचे सहकारी पुंजीलाल मेहर यांची असल्याचे सांगितले, असे वृत्त ‘बीबीसी’ने दिले. त्यानंतर पोलिसांनी मेहरची चौकशी केली. त्याने चौकशीत सुरुवातीला हे पत्र कोणीतरी आपल्याला धमकी देऊन लिहून मागितल्याचा दावा केला होता. परंतु, नंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. सौम्यच्या आईमुळे मेहेरला त्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता, त्यांनंतरच त्याने हत्येचा कट रचण्यास सुरुवात केली होती.
दिवाळीच्या वेळी त्याने फटाके साठवायला सुरुवात केली. त्यातून गनपावडर काढली आणि बॉम्ब कसे तयार करायचे हे शिकण्यासाठी इंटरनेटचा वापर केला. त्याने तयार केलेला बॉम्ब कार्डबोर्ड बॉक्समध्ये ठेवला आणि भेटवस्तूंनी गुंडाळला. स्फोटाच्या काही दिवस आधी मेहर कॉलेजला गेला आणि पार्सल घेण्यासाठी घरी परतला. तो पार्सल घेऊन कांताबंजीला गेला आणि नंतर पटनागड शहरापासून सुमारे २५० किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड येथील रायपूरला ट्रेनने गेला. त्याने आपली ओळख पटू नये म्हणून रेल्वेचे तिकीट खरेदी केले नाही.
रायपूरमध्ये मेहरने सीसीटीव्ही नसलेल्या कुरिअर सेवा कंपनीचा शोध घेतला. त्याने कुरिअर कंपनीला पार्सलमध्ये भेटवस्तू असल्याचे सांगितले होते. त्याने पार्सलवर खोटे नाव आणि चुकीचा पत्ता लिहिला. त्यानंतर मेहर संध्याकाळी ट्रेनने घरी परतला. या पार्सलचा तब्बल ६५० किलोमीटरचा प्रवास झाला. यादरम्यान ते अनेकांच्या हातात आले. लग्नाची भेट म्हणून देण्यात येणारे हे पार्सल २० फेब्रुवारी रोजी पटनागडला पोहोचले आणि सौम्यला ते तीन दिवसांनी मिळाले. मुख्य म्हणजे मेहर मृत सौम्य याच्या लग्नाला आणि अंत्यसंस्काराला उपस्थित होता. ऑगस्ट २०१८ मध्ये गुन्हे शाखेच्या आरोपपत्रात ७२ साक्षीदारांच्या जबाबांचा उल्लेख होता. त्याच्याविरोधातील पुराव्यांमध्ये कांताबंजी रेल्वेस्थानकावरील पार्किंग लॉटचे पत्र आणि पावती पुस्तके महत्त्वाची ठरली.
आरोपीला झाली जन्मठेप
मुलगा गमावून सात वर्षांहून अधिक काळ ओलांडल्यानंतर अखेर संजुक्ता साहू यांना न्याय मिळाला. ओडिशाच्या बोलांगीर जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने बुधवारी (२८ मे) मेहरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी वकिलांनी मेहरच्या या घृणास्पद कृत्यासाठी मृत्युदंडाची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने हे प्रकरण ‘दुर्मिळातील दुर्मीळ’ प्रकरणात वर्गीकृत केले नाही. न्यायालयाने दोषीला ५०,००० रुपयांचा दंडही ठोठावला. संजुक्ता साहू यांनी न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले. सौम्यचे वडील रवींद्र साहू यांनी न्यायालयाबाहेर सांगितले, “आम्हाला हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्ह्याचा प्रकार लक्षात घेता मृत्युदंडाची शिक्षा मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आम्ही न्यायालयाचे आभार मानतो.”