Weight loss medicine side effects and clinical evolution of obesity drugs in Marathi: वाढत्या लठ्ठपणावर मात करण्यासाठी अनेकजण जिम आणि डाएटचा मार्ग निवडतात, पण जेव्हा हे उपाय थिटे पडतात, तेव्हा ‘मॅजिक पिल्स’ किंवा औषधांचा शोध सुरू होतो. मात्र, गेल्या ७० वर्षांतील वजन कमी करण्याच्या औषधांचा इतिहास अत्यंत धक्कादायक आणि जिवावर बेतणारा राहिला आहे.

“मी हवा खाऊन जगले तरी जाडीच राहाणार!” संयुक्ता वैतागून म्हणाली. संयुक्ताने जिम सुरू करून वर्ष झालं होतं. प्रीता आणि मुक्ता या तिच्या मैत्रिणींनी तिच्याबरोबरच जिममध्ये नाव घातलं होतं. तिघींनीही एकाच आहारतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतलं होतं. प्रीता आणि मुग्धा आधी गुबगुबीत, गुटगुटीत म्हणाव्या अशा होत्या. त्या वर्षभरात छान सडपातळ झाल्या. संयुक्ता पहिल्यापासून गलेलठ्ठच होती. मनोभावे प्रयत्न करूनही तिचं वजन कमी झालं नाही. 

मेंदूतील मेदबिंदू व्यायामाला जुमानेनासा

आपण लठ्ठपणाचे गट पाहिले आहेत. वर्षभरापूर्वी प्रीता पहिल्या गटात (BMI २३ ते २४.९) होती; मुक्ता दुसऱ्या गटात (BMI २५ ते २९.९) होती. वर्षभराच्या तपश्चर्येने त्यांचं वजन व्यवस्थित आटोक्यात आलं. संयुक्ताची उंची १.५ मीटर आणि वजन ९० किलो होतं. म्हणजे BMI ९०/ (१.५ चा वर्ग) = ४० इतका भरभक्कम होता. तिच्या मेंदूतली वजनाच्या ओळखीची नोंद ठेवणारा मेदबिंदू (lipostat) उपासना, व्यायामाला जुमानेनासा झाला होता.  पण तेवढ्या भरमसाठ वजनाचे, मधुमेह, रक्तदाब वगैरे भलभलते दुष्परिणाम टांगत्या तलवारीसारखे संयुक्ताला भेवडावत होते. वजन खाली आणणं निकडीचं झालं होतं.

Award Banner

 
त्यांच्या जिममध्ये संयुक्ता एकटीच वजनाने पछाडलेली मुलगी नव्हती. तिथे येणाऱ्या दोनशे लोकांपैकी दहा जणांना तिच्यासारखाच अतिठ्ठपणाचा त्रास होता. आणि इतर १९० लोक देखील लठ्ठच होते!  

हाय कॅलरी आहार सर्वांनाच परवडणारा झाला

दहा हजार वर्षांपूर्वी माणूस शेतकरी झाला. जवळजवळ तीस लाख वर्षांपासून, मानवपूर्वजांपासून चालत आलेली भटकी शोधी-पारधी जीवनशैली जाऊन स्थैर्य आलं. न वणवणता पोटभर अन्न मिळायला लागलं. शरीरात ऊर्जेची रेलचेल झाली आणि मानवांच्या अंगावर मूठभर मांस चढलं. दुसऱ्या महायुद्धानंतर तैलशर्करायुक्त, ऊर्जासंपृक्त, रुचकर  खाणं मुबलक आणि स्वस्त झालं. भाज्या, फळं हे कमी कॅलरीवालं सकस अन्न गरिबांना परवडत नाही. पण वडापाव, भजी, पावभाजी सगळ्या खिशांना परवडतात. ‘हाय कॅलरी’ आहार सर्वप्राप्य झाला.

Side effects of weight loss pills in Marathi | वजन कमी करण्याच्या औषधांचे दुष्परिणाम | Clinical history of obesity medicine | लठ्ठपणावरील उपचारांची माहिती
वजन कमी करण्याच्या औषधांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम. (फोटो सौजन्य: @Freepik)

ऊर्जेच्या जमाखर्चात जमेची बाजू वरचढ

गेल्या पन्नास वर्षांत सर्वांच्या दिमतीला यंत्रनोकर, सार्वजनिक यांत्रिक वाहनं आली. चालणं, धावणं, चढणं कमी झालं. शरीरातल्या ऊर्जेच्या जमाखर्चात जमेची बाजू वरचढ झाली. चरबीचे साठे वाढले. लठ्ठपणाची साथ आली आणि हा हा म्हणता फैलावली. सध्या जगात ६५ कोटींहून अधिक लोक लठ्ठ आहेत. म्हणजेच साधारण साडेसहा कोटींहून अधिक लोकांना वजन घटवणं अत्यावश्यक झालेलं आहे. म्हणूनच त्या बेगुमान लठ्ठपणावर इलाज शोधायला संशोधकांनी वेगवेगळे मार्ग धुंडाळले.

वो दवा कहाँ से लाऊं 

तसं अती लठ्ठपणासाठी शस्त्रक्रिया करणं १९५०-६० पासून प्रचलित झालं होतं. त्या शस्त्रक्रियांबद्दल वेगळा लेख येईलच.

डाएटच्या गोळ्या आल्या

संशोधकांनी त्याच्या सोबत ‘डाएटच्या गोळ्या’, ‘व्यायामाच्या गोळ्या’ देखील शोधल्या. भूक, तृप्ती, वखवख आणि तुंदिलतनु या स्थितींमध्ये ढवळाढवळ करणाऱ्या अनेक रासायनिक कर्त्याकरवित्या भिडूंना आधीच्या लेखात भेटलो आहोत. संशोधकांनी जवळजवळ त्यांच्यातल्या प्रत्येकाशी वाटाघाटी करायचा प्रयत्न केला.  ‘तस्य पुष्टोदरस्यार्थे किमनाटि न नाटकम्,’ थाटात अक्षरशः जंग जंग पछाडले. त्या धडपडीमुळे कित्येक जादुई, रामबाण उपाय अवतरले आणि आपापली अवलक्षणं दाखवून अंतर्धान पावले. त्यांच्यातले काही मोजके मुद्दाम बघूया. 

पहिलं औषध जिवावर बेतलं

संशोधकांचं डोकं किती प्रकारे चाललं ते या शोधयात्रेतून लक्षात येतं. 
त्यांना सर्वात आधी आठवले ते भटके शोधीपारधी. भटक्या शोधीपारधी मानवांना क्षणोक्षणी युद्धाचा प्रसंग असे. त्या ‘लढा किंवा पळा’ परिस्थितीत जी रसायनं शरीरात वाढतात त्यांनी भूक हरपते आणि हालचाल वाढते. तशी रसायनं (ephedrine, phentermine) बैठ्या बाबूंना दिली तर त्यांचं वजन घटेल अशी संशोधकांची अपेक्षा होती. त्या रसायनांनी वजन खाली आणलं पण सतत ‘लढा-पळा’ ताणाखाली राहून बैठ्या बाबूंचं धडधडतं हृदय वेगाने, वेडंवाकडं धावायला लागलं. जिवावर बेतलं. १०६०च्या सुमाराला वापरात आलेल्या त्या औषधांचा वापर १९७०च्या आसपास बंद झाला. आता Ephedrine फक्त दम्यासाठी मिळतं, लठ्ठपणासाठी नाही.
नव्या औषधासाठी शास्त्रज्ञांचं चौफेर लक्ष होतं. 

१९९७ साली फेनफेनही बंद झालं

त्याच सुमाराला लहान मुलांना आकडीसाठी दिल्या जाणाऱ्या एका औषधाने(Fenfluramine) त्यांचं वजन घटतं असं लक्षात आलं. संशोधकांनी ते बैठ्याबाबूंना देऊन पाहिलं. त्यांचं वजन काही काळापुरतं, थोडं (डाएटने ५ किलो घटलं असतं तर औषधाने ६ किलो) कमी झालं. पण त्यांच्या फुप्फुसांतला रक्तदाब फार वाढला. हृदयाकडचं रक्ताभिसरण, मेंदूचा रक्तपुरवठा सारंच एकदम कमी झालं. पुन्हा जीवनमरणाचा प्रश्न आला. मग ते औषध आणि ‘लढा किंवा पळा’ मधलं Phentermine ही दोन्ही औषधं एकत्र (FenPhen) पण कमी प्रमाणात दिली. वजन मस्त कमी झालं. दुष्परिणामही कमी झाले. पण खाली आणलेलं वजन खालीच ठेवायला औषध सतत घेत राहावं लागतं आणि तिथे दोन्ही औषधांच्या दुष्परिणामांनी पुन्हा उचल खाल्ली. कोर्टकचेऱ्या झाल्या आणि १९९७मध्ये  फेनफेन बाद झालं. 

‘त्या’ औषधाने हॉर्ट अटॅक्स वाढले

एरवी आणीबाणीची परिस्थिती निवळली की ‘लढा किंवा पळा’स्थितीच्या रसायनांचा निचरा होऊन जातो. काही औषधं (Sibutramine) तो निचरा होऊ देत नाहीत. रसायनं मेंदूत साठून रहातात. भूक मरते. स्नायू सुसज्ज राहतात. वजन आपसूक कमी होतं. एरवी वजन कमी झाल्यावर ऊर्जेची गरजही कमी होते. या औषधांमुळे लुटूपुटूची युद्धपरिस्थिती चालूच राहते. ऊर्जेची गरज घटत नाही. वजन कमी होत राहतं. १९८८मध्ये ते औषध बूट्स कंपनीने बाजारात आणलं. पण त्या ‘रात्रंदिन युध्दाच्या प्रसंगा’मुळे हार्ट अॅटॅक्स, स्ट्रोक्स वाढले. शेवटी २०१०मध्ये त्याच्यावर कायद्याने बंदी आणली.

संशोधकांनी औषध (Orlistat) निवडलं

बॅरन म्युन्षहाउझन या जर्मन सैनिकाबद्दलच्या अनेक विनोदी गोष्टी जगप्रसिध्द आहेत. त्याने बघितलेल्या एका गावात लोकांच्या पोटांना फार सोयीची दारं होती. कडू औषध तोंडाने न घेता सरळ ते दार उघडून पोटात घालता येई. त्याउलट आवडीच्या खाऊचा डोंगर मनसोक्त चापून खाल्ला की तो त्या दारातून बाहेर काढून टाकता येई. वजनबिजन वाढायची भीतीच नव्हती. आपल्या जगात पोटाला दार करणं कठीण. पण खाल्लेल्या अन्नातली चरबी-तेल आतड्याच्या दारांतून रक्तात पोचू दिली नाहीत तर? खाल्लेले स्निग्ध पदार्थ आतड्यात पचूच दिले नाहीत तर ते रक्तात पोचणारच नाहीत. काम सोपं झालं. संशोधकांनी तसं औषध (Orlistat) निवडलं. त्याने स्निग्ध पदार्थ पचवणाऱ्या पाचकरसांना निकामी केलं. खाल्लेल्या स्निग्ध पदार्थांपैकी ३०% पापक्षालन प्रातर्विधीत व्हायला लागलं. वजन छान कमी झालं. पण मग माशी कुठे शिंकली?

उःशापाचे झाले वरदान

A, D, E, K ही तैलद्राव्य (fat soluble) जीवनसत्त्वं रक्तात न पोचता आतड्यावाटेच धुपून जायला लागली. शिवाय तर्रीदार मिसळीवरचा तेलाचा तवंग चविष्ट एरंडेलाचं काम करायला लागला. तीच पोटातली घुरघुर, तीच घाई, तोच ओघ! ते कामाच्या माणसांना परवडेल का? पण पुष्टिपीडित माणसांना  ती पळापळ परवडली!  तो शाप वाटावा असा उ:शाप त्या जेरीला आलेल्या लोकांनी वरदान म्हणून स्वीकारला. त्यांनी जीवनसत्वांची पूरकं घेतली. पण औषध चालू ठेवलं. १९९९साली बाजारात आलेलं ते औषध अजूनही लोकप्रिय आहे. संशोधक परिपूर्णतेचे पुजारी. त्यांनी शोध चालू ठेवला. 

बहुगुणी खलनायक २००८ मध्येच हद्दपार झाला

गोड खाण्यामुळे मनाला आनंद होतो. म्हणून पुन्हा पुन्हा गोड खात राहावंसं वाटतं. काही औषधं
(Rimonabant) तो आनंदच हिरावून घेतात. ऊर्जेने संपृक्त असलेले गोड पदार्थ नकोसे होतात. वजन कमी होतं. शिवाय ती बहुगुणी औषधं इतर कामंही करतात. त्यांच्यामुळे शरीरात साठलेली चरबी बाहेर काढून वापरली जाते; रक्तातली दुष्ट चरबी कमी होते; इन्सुलिनचा कामसूपणा वाढतो. हे सारं कसं हवंहवंसं होतं. पण त्या औषधामुळे लोकांच्या अंगाला असह्य खाज सुटली. भरीला भर म्हणून त्या आनंदविनाशी औषधामुळे बैठ्याबाबूंना औदासीन्य, नैराश्य आलं. इतकं की आत्महत्यांचं प्रमाण वाढलं. २००६मध्ये युरोपियन मार्केटात आलेला तो बहुगुणी खलनायक २००८ मध्येच हद्दपार झाला. 

औषध चांगलं पण कॅन्सरचं प्रमाण वाढलं

मग २०१२मध्ये शास्त्रज्ञांना सापडला Fenfluramineचा सद्गुणी भाऊ, Lorcaserine. थोडं आहारनियमन आणि व्यायाम करणाऱ्या बैठ्याबाबूंचं वजन घटवायला त्याची छान मदत झाली. पण त्याने फुप्फुसांतला रक्तदाब वाढवला नाही. स्ट्रोक्स, हार्ट ऍटॅक्स वाढले नाहीत. तरी FenPhenच्या अनुभवाने पोळलेल्या संशोधकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवलं. १२००० लोकांवर सतत ५ वर्षं तशी पाळत ठेवल्यावर त्यांच्यातलं वाढलेलं कॅन्सरचं प्रमाण ध्यानात आलं. औषध बनवणाऱ्या कंपनीने २०२०मध्ये आपण होऊन ते बाजारातून मागे घेतलं.

त्या औषधांचा गर्भवतींवर परिणाम

मग एक आकडी/ अर्धशिशीवरचं औषध(Topiramate) संशोधकांच्या नजरेत भरलं. त्याने त्या रुग्णांना गोड चव आवडेनाशी झाली. त्यांचं पोट गप्प झालं; खाखा थांबली. संशोधकांनी सावधपणा बाळगला. त्यांनी ते औषध आणि Phentermine या दोघांनाही कमी प्रमाणात एकत्र आणलं आणि तशी आखूडदोषी, अधिकगुणी गोळी (Qsymia) बाजारात आणली. तीही निर्दोष नव्हतीच! गर्भवती स्त्रियांनी ती घेतल्यावर त्यांच्या बाळांमध्ये ‘फाटका ओठ, टाळूला छेद’ हे व्यंग निर्माण झालं. त्यामुळे ती गोळी गर्भवती स्त्रियांना देऊ नये असा कडक निर्बंध आहे. पण ती अजूनही अमेरिकन बाजारात मिळते. भारतात ते फक्त आकडीच्या रुग्णांसाठीच मिळतं.     

आणखी एक जोडगोळी

२०१४ मध्ये संशोधकांनी दुसरी एक जोडगोळी वापरून बघितली. त्यातलं एक औषध (Bupropion) Sibutramine सारखं मेंदूमधल्या  ‘लढा-पळा’ म्हणणाऱ्या झुंजार रसायनांचा निचरा थांबवतं पण गोड खाण्याचा मोह वाढवतं. म्हणून गोडाचा आनंद कमी करणारं दुसरं(Naltrexone) आनंदविनाशी औषध त्याच्या जोडीला दिलं आहे. ती जोडगोळी अमेरिकेत (Contrave) आणि युरोपमध्ये (Mysimba) बाजारात मिळते. पण संशोधक त्या औषधजोडीचा हार्ट ऍटॅक्स, स्ट्रोक्स आणि आत्महत्यांचा जुना इतिहास विसरलेले नाहीत. औषधनियंत्रक विभागाने त्या गोळीवर कडक नियम लागू केलेले आहेत.  यांच्यातली बहुतेक औषधं भारतीय बाजारात मिळत नाहीत.

आजवरच्या लठ्ठपणाविरोधी औषधांची तुलना 

Side effects of weight loss pills in Marathi | वजन कमी करण्याच्या औषधांचे दुष्परिणाम | Clinical history of obesity medicine | लठ्ठपणावरील उपचारांची माहिती
लठ्ठपणाविरोधी औषधांची तुलना

औषधांचे दुष्परिणाम

आनंद रसायनांना निकामी करणारी इतर काही औषधं संशोधकांनी हेरली आहेत. त्यांच्यातल्या काही औषधांना मेंदूपर्यंत पोचायला मज्जाव होतो. पण त्यांचा साठवलेल्या चरबीवरचा, इन्सुलिनवरचा, रक्तातल्या दुष्ट चरबीवरचा सुपरिणाम मात्र व्यवस्थित चालू राहतो. सध्या त्यांचे उंदरांवरचे प्रयोग चालू आहेत.  ह्या सगळ्या औषधांबद्दल मुद्दाम सांगितलं. कुठलंही औषध हे औषध असतं. ते गुणकारी असलं तरी त्याला काही ना काही दुष्परिणामही असतात आणि ते ध्यानात येईपर्यंत उशीर होऊ शकतो.

आपण गेल्या प्रकरणात ज्या लोकांच्या समस्या समजून घेतल्या त्यांच्यापैकी ज्या भारतीयांचा BMI ३०हून अधिक आहे किंवा ज्यांना इतर दोषांमुळे आजारी म्हटलं त्यांना औषधाखेरीज पर्याय नाही. त्यांनी ते घ्यावंच. पण पूर्णाने किंवा मधुलिकाने आहारनियमन आणि नियमित व्यायाम एवढ्यावरच आपलं वजन ताब्यात ठेवावं. ती तपश्चर्या खडतर वाटते. पण मनोभावे केली तर कायमचं पुण्य लाभेल.

डीएनएच्या माहितीने मिळणारी कलाटणी

शोधयात्रा अजून चालूच आहे. मधल्या काळात जनुकशास्त्राची बरीच प्रगती झाली आहे. शरीरातली सगळी कामं ज्याच्या आदेशानुसार चालतात त्या अतिमहत्त्वाच्या  ‘काम’-सूत्राची, म्हणजेच डीएनएची पुष्कळ माहिती आता गोळा झाली आहे. आजीची, आईची उपासमार काही महत्त्वाच्या जीन्सना रासायनिक बेड्या ठोकते. त्या बेड्या काढणं जमलं नाही तरी त्या जीन्सचं काम दुसऱ्या मार्गांनी करून घ्यायचा प्रयत्न होईल. शिवाय आतापर्यंत वापरून बघितलेल्या गोळ्यांचे दुष्परिणाम सगळ्याच लोकांना भोवतात असं नाही. काही लोकांच्या डीएनएचं त्या औषधांशी छान जमू शकतं. गोळ्या देण्यापूर्वी डीएनएचा तपास करून, ‘त्रास होईल की नाही’ याची शहानिशा करून घेतली तर बाद झालेल्या गुणी गोळ्या पुन्हा वापरात येतील.

आता लक्ष मधुमेहाकडे

विज्ञानामुळे लठ्ठपणावरच्या उपचारांत प्रगती होत गेली. लठ्ठपणाचा जिवलग सोयरा म्हणजे मधुमेह. त्याच्यावरचे उपाय तर पुरातन काळापासून सुरू झाले होते. वाढत्या वैज्ञानिक ज्ञानामुळे मधुमेह अधिकाधिक समजत गेला. त्याच्यावरच्या इलाजांतही अनेक बदल होत गेले.  एका क्रांतिकारक टप्प्यावर लठ्ठपणा आणि मधुमेह या दोन्ही आजारांवरच्या औषधांच्या शोधयात्रा एकाच मार्गावर एकत्र आल्या. एक नवंच क्षितिज दृष्टिपथात आलं. संशोधकांच्या आशा पालवल्या. त्यासाठी मधुमेहाची शोधयात्राही थोडी पाहावी लागेल. 
इति मेदपुराणे उपचारखंडे औषधाध्याय: अद्यापि अपूर्ण:।