Rujuta Diwekar weight loss tips and diet rules in Marathi: वजन कमी करणे म्हणजे उपाशी राहणे, आवडते पदार्थ सोडणे किंवा रोज नवे डाएट ट्रेंड फॉलो करणे, असा अनेकांचा समज असतो. सोशल मीडियावर रोज कुठला तरी नवा उपाय व्हायरल होत असतो. कधी डिनर स्किप करण्याचा सल्ला दिला जातो, कधी सकाळी उठताच एखादा ‘मॅजिक ड्रिंक’ घेण्याचे सांगितले जाते. पण प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांचे म्हणणे यापेक्षा वेगळे आहे. त्यांच्या मते, वजन कमी करण्याचा खरा मार्ग आपल्या रोजच्या जेवणात, शिस्तीत आणि सातत्यात दडलेला आहे.

अभिनेत्री करीना कपूरच्या ‘साइज झिरो’ ट्रान्सफॉर्मेशनमुळे रुजुता दिवेकर यांचे नाव घराघरांत पोहोचले. मात्र त्या नेहमीच क्रॅश डाएट, फॅड डाएट आणि अतिरेकी फिटनेस ट्रेंडपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. अलीकडेच त्यांनी वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी तीन महत्त्वाचे नियम सांगितले. हे नियम कठीण नाहीत, महागडे नाहीत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते भारतीय जीवनशैलीशी जोडलेले आहेत.

घाई करू नका!

रुजुता यांचा पहिला नियम आहे….. घाई करू नका. वजन कमी करणे ही स्पर्धा नाही. दोन किलो कमी करायचे असो किंवा वीस किलो, पद्धत टिकाऊ असली पाहिजे. त्यांनी सांगितले की, वर्षभरात शरीराच्या एकूण वजनाच्या साधारण ५ ते १० टक्के वजन कमी करणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरते. वजन झपाट्याने कमी झाले तर सुरुवातीला आनंद वाटू शकतो, पण त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात.

अचानक वजन कमी केल्यास शरीराची ताकद कमी होऊ शकते, रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो आणि हाडांची घनताही घटू शकते. त्यामुळे वजनकाट्यावरचे आकडे कमी झाले म्हणून आरोग्य सुधारलेच, असे नाही. रुजुता सांगतात की, वजन कमी करताना ताकद, प्रतिकारशक्ती, हाडांचे आरोग्य, त्वचा, केस आणि मनःस्थिती यांची काळजी घेणे आवश्यक आहे. वजन हळूहळू कमी झाले तर मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईडच्या समस्या, ऑस्टिओपोरोसिस आणि काही गंभीर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

पारंपरिक जेवणावर विश्वास ठेवा:

दुसरा नियम…. आपल्या पारंपरिक जेवणावर विश्वास ठेवा. आजकाल अनेक डाएट प्लॅनमध्ये प्रथिने किती ग्रॅम, फायबर किती ग्रॅम, ओमेगा-३ किती, कार्बोहायड्रेट किती, याचा खूप हिशेब केला जातो. पण रुजुता यांना हा दृष्टिकोन अपूर्ण वाटतो. त्यांच्या मते, पोषणशास्त्रात ‘फूड-बेस्ड डाएटरी गाईडलाइन्स’ म्हणजे अन्नावर आधारित मार्गदर्शक तत्त्वे अधिक महत्त्वाची आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर, आपण ज्या भागात राहतो, आपल्या घरात जे अन्न पिढ्यान्‌पिढ्या खाल्ले जाते, त्यावरच आपला आहार आधारित असला पाहिजे.

जर तुम्ही वरण-भात खात असाल, तर ते चुकीचे नाही. जर तुम्ही इडली-डोसा खात असाल, तर तेही चांगले आहे. कोणाच्या घरी चिकन-भात असतो, तर कोणाच्या घरी मासे-भात. भारतातील प्रत्येक प्रदेशाची खाद्यसंस्कृती वेगळी आहे आणि हीच आपली ताकद आहे. सगळ्यांनी सारखेच खावे, असा आहार टिकाऊ ठरत नाही. आपल्या हवामानाशी, पचनशक्तीशी, संस्कृतीशी आणि घरच्या सवयींशी जुळणारे अन्न दीर्घकाळ उपयोगी पडते.

रुजुता यांचा मुद्दा स्पष्ट आहे की, वजन कमी करण्यासाठी स्वतःसारखे खा, दुसऱ्यासारखे नाही. इंस्टाग्रामवर कुणी सलाड खात आहे म्हणून आपण रोज सलाडवर जगायचे, किंवा कुणी प्रोटीन शेक घेत आहे म्हणून आपणही तेच करायचे, असे करणे योग्य नाही. आपल्या ताटात भाजी, भात, पोळी, डाळ, ताक, लोणचे, चटणी, मोसमातील पदार्थ आणि घरगुती स्वयंपाक असेल, तर तेच शरीराला अधिक समजते.

मॅजिक प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवू नका:

तिसरा नियम …मॅजिक प्रॉडक्ट्सवर विश्वास ठेवू नका. वजन कमी करण्यासाठी एखादा खास शेक, मेथी शॉट, हळद-आले ड्रिंक, गोंद कतीरा किंवा डिनरऐवजी एखादे पेय घेणे आवश्यक आहे, असे सांगितले जात असेल, तर सावध राहा. रुजुता यांच्या मते, आरोग्याचा जादुई उपाय कोणत्याही बाटलीत, पावडरमध्ये किंवा ट्रेंडमध्ये नसतो. खरी जादू प्रक्रियेत असते.

ही प्रक्रिया म्हणजे वेळेवर खाणे, पुरेशी झोप घेणे, नियमित हालचाल करणे, घरी तयार केलेलं अन्न ग्रहण करण आणि सातत्य राखणे. वजन कमी करणे म्हणजे शरीराला शिक्षा देणे नव्हे. ते आनंदाने, शांतपणे आणि सहजतेने झाले पाहिजे. जे उपाय काही दिवसांसाठी जोश देतात, ते अनेकदा दीर्घकाळ टिकत नाहीत. त्यामुळे व्हायरल ट्रेंडपेक्षा आपल्या शरीराचे ऐकणे अधिक महत्त्वाचे आहे.

रुजुता दिवेकर यांचा सल्ला आजच्या काळात विशेष महत्त्वाचा ठरतो. कारण वजन कमी करण्याच्या नावाखाली अनेक लोक स्वतःवर अनावश्यक बंधने घालतात. भात बंद, चहा बंद, गोड बंद, रात्रीचे जेवण बंद ..अशा सल्ल्यांमुळे माणूस निराश होतो. काही दिवस वजन कमी झाले तरी नंतर ते पुन्हा वाढते आणि मनात अपयशाची भावना निर्माण होते.

खरे आरोग्य मात्र अशा टोकाच्या निर्णयांमध्ये नसून संतुलनात आहे. आपल्या घरातील साधे, पारंपरिक आणि ताजे अन्न खाणे, शरीराला वेळ देणे आणि सातत्य ठेवणे हेच वजन कमी करण्याचे खरे सूत्र आहे. वरण-भात, इडली-डोसा, पोळी-भाजी किंवा मासे-भात ..तुमच्या संस्कृतीतले, तुमच्या घरातले अन्न कमीपणाचे नाही. उलट, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ले तर तेच तुमचे आरोग्य सुधारू शकते.

म्हणूनच वजन कमी करायचे असेल, तर घाई करू नका, स्वतःच्या पारंपरिक आहारावर विश्वास ठेवा आणि ‘मॅजिक’ उपायांच्या मागे धावू नका. कारण आरोग्याचा खरा मार्ग तुमच्या स्वयंपाकघरातूनच सुरू होतो.