गेल्या काही दिवसांमध्ये पश्चिम आशियातील संघर्षाअंतर्गत इराण, कतार आणि सौदी अरेबिया यांच्या या तेल आणि गॅस साठ्यांवर हल्ले सुरू झाले आहेत. इराणच्या खर्ग या बेटावर गेल्या आठवड्यात अमेरिकेकडून हल्ले झाले. या आठवड्यात इस्रायलने इराणच्या पार्स बेटावरील नैसर्गिक वायूसाठ्यांना लक्ष्य केले. यावर प्रत्युत्तर म्हणून इराणने कतारच्या गॅस टर्मिनल्सवर आणि सौदी अरेबियाच्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर हल्ले केले. आजवर केवळ होर्मुझ खाडीच्या कोंडीमुळे जगावर तेलसंकटाचे सावट होते. आता मात्र थेट तेल प्रकल्प आणि गॅस टर्मिनल्सवर हल्ले सुरू झाल्यामुळे या घटकांच्या जागतिक उत्पादनावरही विपरीत परिणाम संभवतो. परिणामी तेल आणि गॅस टंचाईचे संकट अधिक उग्र होण्याची चिन्हे आहेत.

इराणच्या पार्सवरील कारवाईचे भीषण पडसाद

इराणच्या दक्षिण पार्स बेटावर जगातील सर्वांत मोठे नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. या बेटावरील हे साठे एके काळी इराण आणि कतार संयुक्तपणे उत्खनित करत होते. पार्सवरील हल्ले इस्रायलकडून झाले. विशेष म्हणजे या हल्ल्यांची आपल्याला कल्पना नव्हती अशी कबुली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना द्यावी लागली. याचा अर्थ इस्रायलने या संघर्षात प्रथमच एकतर्फी हल्ल्यांची योजना आखली. पार्सवर हल्ले करणे थांबवावे, असा इशाराही ट्रम्प यांनी इस्रायलला दिला आहे. तसेच, कतारवर हल्ले थांबवले नाहीत तर संपूर्ण दक्षिण पार्सचे गॅस साठे भस्मसात करू, असे त्यांनी इराणला बजावले आहे. इराणने या हल्ल्याच्या प्रत्युत्तरार्थ कतार आणि सौदी अरेबिया या देशांतील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. यूएई आणि कुवेतवरही हल्ले केले जातील अशा इशाराही त्यांनी दिला.

कतारच्या गॅस टर्मिनलवर हल्ले

कतार हा जगातील प्रमुख नैसर्गिक वायू उत्पादित आणि उत्खनित करणारा देश आहे. विशेषतः लिक्विफाइड नॅचरल गॅस अर्थात एलएनजीचे जगातील ४० टक्के उत्पादन एकट्या कतारमध्ये होते. या देशाच्या रास लाफान एलएनजी प्रकल्पावर इराणकडून पाच क्षेपणास्त्रे डागण्यात आली, यांतील चार क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करण्यात आली, पण एका क्षेपणास्त्राने प्रकल्पाचा वेध घेऊन मोठे नुकसान केले. कतारने त्वरित उत्पादन अनिश्चित काळासाठी थांबवले. १८ मार्चच्या मध्यरात्री आणि १९ मार्चच्या पहाटे इराणने दोन हल्ले केले. हे हल्ले पार्सवरील हल्ल्याचे थेट प्रत्युत्तर होते.

सौदी अरेबिया, कुवेत, यूएई हवालदिल

कतारवर हल्ले करून इराण थांबला नाही. त्याने हल्ल्यांचा रोख तेलसमृद्ध सौदी अरेबियाकडे वळवला. सामरेफ येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने १९ मार्च रोज ड्रोनहल्ले केले. हा प्रकल्प सौदी अरेबियाची अराम्को आणि अमेरिकेची एग्झॉन मोबिल या कंपन्यांमार्फत संयुक्तपणे चालवला जातो. यान्बू या शहरातील हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. कारण होर्मुझ खाडीतून जहाजामार्गे तेलवहनाचा मार्ग बंद झाल्यामुळे पाईपलाइनमधून लाल समुद्रामार्गे तेल इतरत्र पोहोचवण्याची सौदी अरेबियाची योजना आहे. पण इराणने सामरेफ प्रकल्पाला लक्ष्य करून ती तूर्त हाणून पाडलेली दिसते. सौदी अरेबियाने या हल्ल्याचा निषेध करून इराणला प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. पण इराणवर हल्ले करण्याइतकी सौदीची लष्करी क्षमता सध्या तरी नाही. कुवेतच्या दोन तेलविहिरींवर इराणने ड्रोन हल्ले करून त्यांना आगी लावल्या. संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) एका प्रकल्पावरही इराणचे ड्रोनहल्ले झाल्याचे वृत्त आहे.

खनिज तेल दर ११८ डॉलरवर!

गेल्या १८ तासांतील या घडामोडींमुळे जागतिक बाजारात खनिज तेलाचे आणि नैसर्गिक वायूचे भाव पुन्हा उसळले. ब्रेंट क्रूड निर्देशांक ११८ डॉलर प्रतिबॅरलवर काही काळ स्थिरावला होता. तेलविहिरी, शुद्धीकरण प्रकल्प, गॅससाठ्यांवर असे हल्ले दोन्ही बाजूंकडून सुरू राहिले, तर हा दर १५० डॉलरवर जाईल, अशी भीती विश्लेषक व्यक्त करू लागले आहेत. इराणच्या तेलविहिरींवर गेल्या आठवड्यात अमेरिकेने आणि गॅससाठ्यांवर या आठवड्यात इस्रायलने हल्ले केल्यामुळे प्रत्युत्तरादाखल इराणने पश्चिम आशियातील तेलसाठे आणि गॅस साठ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ही परिस्थिती अभूतपूर्व बनली आहे.

भारतीय शेअरबाजारात भयकंप

भारतीय शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १९ मार्च रोजी २५०० अंकांनी कोसळला. याची कारणे अनेक असली, तरी ऊर्जासंकट गहिरे होणार हे कारण सर्वांत प्रमुख होते. एलपीजी आणि एलएनजीच्या बाबतीत भारतात परिस्थिती किंचित आटोक्यात असली, तरी पूर्ण नियंत्रणात नाही. मात्र ताज्या घटनांमुळे मूळ उत्पादनावरच परिणाम होणार असल्यामुळे भारताला विशेषतः एलएनजीचा तुटवडा दीर्घकाला जाणवू शकतो. खनिज तेलाच्या बाबतीतही सौदी अरेबिया, कुवेत आणि यूएई या देशांकडून पुरवठ्यावर परिणाम संभवतो. होर्मुझच्या नाकेबंदीपेक्षाही ही परिस्थिती अधिक गंभीर आहे.