पश्चिम आशियात सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धात   हजारो नागरिक, सैनिकांचे बळी जात आहेत तसेच जागतिक अर्थव्यवस्था ढासळत आहे. त्याबरोबरच या संघर्षाचा निसर्ग,  हवामानावरही मोठा परिणाम होत आहे. ही हानी अपरिमित असून अलीकडच्या काळातील अनेक युद्धांच्या तुलनेत हे युद्ध अधिक विध्वंसक ठरू लागले आहे.

सैनिकांच्या तैनातीमुळे प्रदूषण?

पश्चिम आशियातील सध्याच्या युद्धाचा पर्यावरणावर होत असलेल्या परिणामांविषयी ‘एएफपी’ या फ्रेंच आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने काही तज्ज्ञांशी चर्चा केली. लंडनमधील क्वीन मेरी विद्यापीठाचे संशोधक बेंजामिन नेइमार्क यांच्या मते पर्शियन आखातापर्यंत पोहोचण्यासाठी आणि इराणवर हवाई मोहिमा करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायलची विमाने मोठ्या प्रमाणात  इंधन वापरतात. बॉम्बहल्ल्यांसाठी वापरले जाणारे हे जेट इंधन, तसेच तेल साठवणूक डेपो जळाल्याने उठणारे आगीचे लोळ आणि धूर याचा पर्यावरणाला मोठा फटका बसत आहे. स्टेल्थ बॉम्बर्स आणि लढाऊ विमाने दिवस-रात्र तैनात ठेवल्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढवणार्‍या हरितगृह वायूंचे वातावरणात मोठ्या प्रमाणात उत्सर्जन होते. अमेरिकेच्या नौदलाकडेही मोठा ताफा आहे आणि तो काही काळ समुद्रात कार्यरत राहणार आहे. त्यातील सैनिकांचे अन्न, निवास आणि इतर गोष्टींसाठी जी व्यवस्था करावी लागत आहे, त्यासाठी जहाजांना सतत ऊर्जा लागते. ही ऊर्जा काही अंशी प्रदूषण करणार्‍या डिझेल जनरेटरमधून मिळते. या मोठ्या विमानवाहू नौका अणुऊर्जेवर चालतात. त्यामुळे त्या जीवाश्म इंधनांच्या तुलनेत कमी प्रदूषण करतात, पण डिझेलमुळे अंशत: प्रदूषण होतेच.

जाळ, धुरामुळे हवेमध्ये घातक रसायने?

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील संघर्षात तेलसाठे आणि क्षेपणास्त्र तळांवर होणार्‍या हल्ल्यांमुळे मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतील, अशी चिंता तज्ज्ञ व्यक्त करतात. याविषयी संयुक्त राष्ट्रांनीही इशारा दिला आहे. सुरक्षित पाण्याची उपलब्धता, लोकांना श्वास घेण्यासाठी लागणारी हवा आणि अन्नपुरवठ्यावर या हल्ल्यांचा परिणाम होऊ शकतो. या धोक्याचे एक उदाहरण म्हणजे तेहरानमधील ‘काळा पाऊस’.  इस्रायलने अनेक तेलसाठ्यांवर हल्ले केल्यानंतर तेहरान शहरात तेल आणि पावसाचे मिश्रण असलेला काळा पाऊस पडल्याची नोंद झाली. तेलसाठ्यांवरील आगीतून दाट काळा धूर निघून जवळपास एक कोटी लोकसंख्या असलेल्या तेहरान शहरावर पसरला आणि नंतर काळा पाऊस पडला.  नागरिकांना विषारी धूर टाळण्यासाठी घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमचे वातावरणशास्त्रज्ञ झोंगबो शी यांच्या मते, या धुरात सूक्ष्म धूलिकण, सल्फर डायऑक्साइड आणि इतर विषारी रसायने असण्याची शक्यता आहे. असे सूक्ष्म कण फुप्फुसांच्या आतपर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे श्वसनाचे तसेच हृदयविकारांचे धोके वाढतात. 

युद्धामुळे नेमके किती कार्बन उत्सर्जन?

‘वन अर्थ’ या जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, पश्चिम आशियातील संघर्षामुळे सुमारे ३३ दशलक्ष टन कार्बन डायऑक्साइड समतुल्य उत्सर्जन झाले. हे प्रमाण पेट्रोलवर चालणार्‍या ७.६ दशलक्ष वाहनांच्या उत्सर्जनाइतके आहे. तसेच एका अंदाजानुसार, युक्रेनमधील युद्धामुळे ३०० दशलक्ष टनांहून अधिक अतिरिक्त कार्बन उत्सर्जन झाले आहे. हे प्रमाण फ्रान्सच्या वार्षिक उत्सर्जनाइतके आहे. हा अंदाज इनिशिएटिव्ह ऑन जीएचजी अकाउंटिंग ऑफ वॉर या संस्थेने मांडला आहे. यात लष्करी कारवाया, पुनर्बांधणी, जंगलातील आगी आणि विमानांना घ्यावे लागणारे लांब मार्ग यांचाही विचार करण्यात आला आहे. 

जल प्रदूषणाचाही धोका?

हवामानावरील परिणामांव्यतिरिक्त, ऊर्जा प्रकल्प, तेलवाहू जहाजे आणि लष्करी लक्ष्यांवर होणारे हल्ले त्या परसिरातील हवा आणि पाणी प्रदूषित करतात. या हल्ल्यामुळे पसरलेली अत्यंत विषारी रसायने दूरपर्यंत पसरू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. तेहरानमध्ये गेल्या आठवड्यात इंधन साठवणूक केंद्रांवर झालेल्या हल्ल्यांमुळे तेल जळाल्याने उठलेल्या विषारी काळ्या धुरामुळे शहर अंधारात बुडाले. इ्स्टिटट्यूट फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक रिलेशन्स (कफकर) येथील मॅथिल्ड जूर्दे यांच्या मते, अणुऊर्जा, लष्करी आणि ऊर्जा केंद्रांवर हल्ले झाल्यास हवा, पाणी आणि मातीवर अत्यंत प्रदूषणकारी परिणाम होतात. कॉ्फ्लिलक्ट अँड एन्व्हायर्नमेंट ऑब्झर्व्हेटरी (उएडइर) चे संचालक डग वेअर यांनी सांगितले की, इराण आणि आसपासच्या देशांमध्ये शेकडो ठिकाणी पायाभूत सुविधा खराब झाल्या असून त्यामुळे प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. 

स्थलांतरित पक्ष्यांना युद्धझळा?

अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षामुळे निर्माण होणारा धूर, प्रदूषण आणि स्फोट यामुळे आखाती भागातील नाजूक पर्यावरण आणि स्थलांतर करणार्‍या पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञ सांगतात. वन्यजीव तज्ज्ञ डॉ. रेझा खान यांच्या मते, युद्धाचा परिणाम फक्त माणसांवरच होत नाही; स्फोट, जळणार्‍या तेल-वायू प्रकल्पांमधून निघणारा धूर आणि प्रदूषण यामुळे वन्यजीव व परिसंस्थांवर मोठा ताण येतो. अरबी आखात हा युरोप, मध्य आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आशिया जोडणार्‍या महत्त्वाच्या स्थलांतर मार्गावर आहे. फ्लेमिंगो, हेरॉन आणि इतर अनेक पक्षी प्रवासादरम्यान येथील पाणथळींवर विश्रांती व अन्नासाठी अवलंबून असतात. म्हणून येथे होणारा पर्यावरणीय त्रास अनेक खंडांतील पक्षीसंख्येवर परिणाम करू शकतो. स्फोट, विमानांची हालचाल आणि आगीमुळे पक्षी घाबरून अन्न शोधण्याची किंवा प्रजननाची ठिकाणे सोडू शकतात, तसेच स्थलांतर मार्गही बदलू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, युद्ध संपल्यानंतरही तेलाचे अवशेष आणि इतर प्रदूषक किनारी भागात राहू शकतात, ज्यामुळे समुद्री जीवसृष्टी आणि त्यावर अवलंबून असलेल्या पक्ष्यांच्या अन्नसाखळीवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतो. १९९१च्या आखाती युद्धानंतरच्या अभ्यासानुसार, मोठ्या तेलगळतीमुळे अरबी आखातात २० ते ३० हजार समुद्री पक्षी मृत्युमुखी पडले होते.

manisha.devne@expressindia.com